स्लमडॉगचा प्रगल्भ स्पर्धक

>> Tuesday, March 17, 2009


एखाद्या भयानक घटनेचाही कदाचित तुलनेने लहान, पण चांगला परिणाम असू शकतो. तो थेट असेल वा अप्रत्यक्ष, मात्र त्यामुळे त्याचं अस्तित्व लपलं जात नाही. जगभरातल्या युद्धांनी चित्रपटांना दिलेलं योगदान हे अशा "स्मॉल मर्सी'चं उदाहरण आहे. दोन्ही महायुद्धं, हिटलरची सत्तालालसा, व्हिएतनाम युद्धामुळे अमेरिकेचं नामोहरम होणं आणि आता वॉर ऑन टेरर, या सर्वांचा उपयोग चांगल्या दिग्दर्शकांनी उत्तम आणि अर्थपूर्ण चित्रपट बनवण्यासाठी केल्याचं दिसतं.
या चित्रपटांमध्येही मुख्यतः तीन प्रकार पडतात. प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांचा आधार असणारे, ऐतिहासिक पार्श्‍वभूमी वापरून युद्धसंबंधातील, पण काल्पनिक गोष्ट सांगणारे आणि प्रत्यक्ष युद्धासंबंधाची गोष्ट मांडून काही घटकांचा वापर करून मानवतेविषयी अधिक सखोल सत्य मांडू पाहणारे. झाबोचा "टेकिंग साइड्‌स' स्पीलबर्गचा "म्युनिक', सीमीनोचा "डिअर इंटर' किंवा स्टोनचा "बॉर्न ऑन द फोर्थ जुलाई' ही सगळी वेगवेगळ्या जॉनरमध्ये मोडणारी अप्रत्यक्ष युद्धविषयक चित्रपटांची उदाहरणं आहेत. स्टीफन डाल्ड्रायचा "द रीडर' हेदेखील अशाच चित्रपटाचं उदाहरण आहे.
रीडरमध्ये युद्धाचा भाग पडद्यावर अजिबात येत नाही, मात्र त्यातल्या एका प्रमुख व्यक्तिरेखेची पार्श्‍वभूमी तिला दुसऱ्या महायुद्धाच्या एका खासच वेदनामय प्रकरणाशी जोडते आणि हे जोडणं चित्रपटाचं केंद्रस्थान होऊन बसतं. या जोडण्याला मग नायक कसा प्रतिसाद देतो आणि आपणही प्रेक्षक म्हणून कसा प्रतिसाद देतो, हे दोन "द रीडर'चे कळीचे मुद्दे आहेत.
हिटलरचा गुन्हा हा इतका मोठा होता, की केवळ त्याची पार्श्‍वभूमीही चित्रपटातल्या नाझींना गडद काळा रंग आणून द्यायला, टाइपकास्ट करायला पुरेशी आहे. त्यामुळेच प्रामुख्याने चित्रपटातलं नाझींचं चित्रण पूर्णपणे खलनायकी छापाचं तरी असतं किंवा उपहास्य विडंबनात्मक अशा प्रकारचं तरी असतं. गेल्या वर्षीच्या दोन हॉलिवूडपटांनी मात्र हा मार्ग टाळून त्याचं थोडं वेगळं चित्रण करणं पसंत केलं. "गुड' त्यात फार यशस्वी झालेला नाही. कारण तो त्रयस्थ न राहता पारंपरिक दृष्टिकोनाच्या विरुद्ध बाजूला झुकलेला दिसतो. रीडर मात्र एका पटेलशा वास्तववादी नजरेने यातल्या व्यक्तिरेखेकडे पाहतो. हे करताना तो या व्यक्तीचा गुन्हा नजरेआड करत नाही, मात्र त्यापलीकडे जाऊन ती कोण होती, हे पाहण्याचा प्रयत्न करतो.
रीडर हा प्रामुख्याने दोन पात्रांचा चित्रपट आहे. दोघं जण आपापल्या आयुष्याच्या एकेका गुपिताच्या छायेत आयुष्यभर वावरतात. फार वर्षांपूर्वी काही काळासाठी एकत्र आलेल्या या दोघांना त्यांच्या या भूतकाळाने एकमेकांशी बांधलेलं आहे- आयुष्यभरासाठी. मायकेल (मोठेपणाचा राल्फ फाइन्स, तरुणपणाचा डेव्हिड क्रॉस) पंधरा वर्षांचा असताना त्याची जवळजवळ अपघाताने भेट होते. हॅना श्‍मिट्‌झ (केट विन्स्लेट) या तिशी ओलांडलेल्या पण सुस्वरूप, एकट्याच राहणाऱ्या बाईशी हॅना ट्राममध्ये तिकीटचेकरचं काम करते, तर मायकेलचं शिक्षण चालू आहे. दोघं झपाट्याने एकमेकांजवळ येतात. मात्र शरीरसंबंधांबरोबरच मायकेलने तिला पुस्तकं वाचून दाखवणं हादेखील त्यांच्या रोजच्या भेटीचा अविभाज्य भाग असतो... हॅनासाठी कदाचित शरीरापलीकडची अधिक महत्त्वाची भूक भागवणारा. काही दिवसांनंतर हॅना नाहीशी होते; पण मायकेल तिला विसरू शकत नाही. काही वर्षांनी वकिली शिक्षण घेत असताना तो तिला पाहतो तो आरोपीच्या पिंजऱ्यात. मायकेलला भेटण्याआधी तिने ऑशविझच्या कुप्रसिद्ध यातनातळावर एस. एस. गार्ड म्हणून केलेल्या कामादरम्यान बळी गेलेल्या ज्यूंच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरण्यात आलेलं असतं. खटल्यादरम्यान मायकेलच्या लक्षात येतं, की त्याची साक्ष ही एका विशिष्ट प्रकारे तिला मदत करू शकेल आणि तिची शिक्षा बरीच कमी करता येईल. मात्र विचार वेगळा आणि कृती वेगळी. प्रत्यक्ष करण्याची वेळ येताच त्याचा निश्‍चय डळमळीत व्हायला लागतो.
स्लमडॉगसारखा त्यामानाने हार्मलेस चित्रपटही जर इतक्‍या मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरू शकतो, तर क्रूरकर्मा म्हणून सर्वमान्य असणाऱ्या नाझींचं वेगळं चित्रण कोणी ना कोणी आक्षेप घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही, हे उघड आहे. सुदैवाने आक्षेप घेणाऱ्यांबरोबरच चित्रपटाच्या बाजूने बोलणाऱ्यांचंही निश्‍चित प्रमाण आहे. आणि शेवटी चित्रपटात म्हटलं आहे ते काय? हॅना निरपराध असल्याचं तर तो म्हणतच नाही. ती फारशी हुशारही नाही की स्वतःच्या डोक्‍याने ती भल्याबुऱ्याचा विचार करू शकेल किंवा तो केला तरीही नाझी विचारसरणीसारख्या बुद्धिनिष्ठ भ्रष्टाचाराच्या विरोधातही उभी राहू शकणार नाही. मात्र तिला एक स्वाभिमान आहे. स्वतःची स्वतःपुरती आणि समाजातलीसुद्धा एक प्रतिमा तिच्यासाठी महत्त्वाची आहे. ती तिच्या नाझी असण्याने डागाळली जाते असं तिला वाटत नाही. कारण तिच्या दृष्टीने ही एक नोकरी आहे. प्रतिमा डागाळणारं रहस्य हे इतरांच्या दृष्टीने क्षुल्लक असलं तरी तिला स्वतःला महत्त्वाचं आहे; किंबहुना ती ऑशविझला रवाना होण्यामागेही हे रहस्यच आहे. हे रहस्य हॅना जपते. त्यासाठी कोणतीही किंमत देण्याची तिची तयारी आहे.
नाझी जरी हिटलरच्या क्रूर धोरणांनी प्रेरित असले तरी सर्वच नाझी काही जाणूनबुजून या धोरणाचे पुरस्कर्ते असतील असं नाही... जसं राजकीय धोरणांबाबत देशांमधली सर्वच जनतादेखील त्या त्या धोरणाचा जाणीवपूर्वक विचार करत असेल असं नाही. हॅनासारखी विचार न करता हुकूम पाळणारी फळी ही म्हटलं तर समाजरचनेचीच बळी आहे. जरी त्यासाठी तिचे गुन्हे माफ झाले नाहीत तरी तिच्या राक्षसी वागण्याची पूर्ण जबाबदारी तिच्याकडे देणंही योग्य ठरणार नाही.
रीडरचा खरा विचार करायला लावणारा भाग आहे तो एक सामान्य परिस्थितीतली नाझी व्यक्ती आणि एक समाजाच्या शैक्षणिक अन्‌ संपत्तीचं सुस्थितीतील लोकशाही असणाऱ्या देशातली व्यक्ती यामधल्या तुलनेचा हॅना ज्याप्रमाणे परिस्थितीचा पूर्ण विचार न करता सोपे (म्हणजे वैचारिक दृष्टिकोनातून सोपे, सोईस्कर) मार्ग स्वीकारते त्याचप्रमाणे तिच्या विरुद्ध परिस्थितीतला मायकेलदेखील निर्णयाची वेळ येताच सोपा मार्ग स्वीकारतो. प्रत्यक्षात या दोघांचंही वागणं हे कोणा ना कोणावर अन्याय करणारं असतं, अन्‌ त्याची शिक्षा या दोघांनाही कोणत्या ना कोणत्या प्रकारे मिळते. हॅनाला प्रत्यक्ष, तर मायकेलला अप्रत्यक्ष. ही तुलना रीडरच्या आशयाला युद्धाच्या चौकटीतून बाहेर काढते आणि एकूण मानवतेसंबंधात प्रश्‍न उभे करते. आपल्या वागण्यातला आपल्यावरल्या संस्कारांचा, सामाजिक पार्श्‍वभूमीचा भाग किती असतो आणि कसोटीच्या क्षणी आपण घेतलेले निर्णय आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे ठरू शकतात, याकडे हा चित्रपट पाहतो. केवळ एक माणूस म्हणून आपल्यातल्या त्रुटी पारखतो, पण त्याच्यासह एक प्रकारच्या मोक्षापर्यंत पोचण्याची शक्‍यताही अधोरेखित करतो.
"द रीडर' जरी यंदाच्या आँस्करच्या नामांकनात होता तरी फिन्चरच्या "क्‍युरिअस केस ऑफ बेन्जामिन बटन'प्रमाणे किंवा "स्लमडॉग'प्रमाणे त्याला भाराभर नामांकनं मिळालेली नव्हती. मोजक्‍या नामांकनांसह तो स्पर्धेत उतरलेला. पण आशयाच्या दृष्टीने पाहायचं तर ही यंदाची सर्वांत प्रगल्भ एन्ट्री होती.
-गणेश मतकरी

1 comments:

Deepak Salunke March 29, 2009 at 9:57 PM  

गणेशजी,

कालच हा चित्रपट पाहिला. आवडला. तुम्ही अगदी योग्य समीक्षा केली आहे. एक अतिशय प्रगल्भ असा चित्रपट !

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP