अस्वस्थ अफगाणी आयुष्य- ओसामा

>> Thursday, March 19, 2009

आपण चित्रपट का बघतो आणि आपल्याला चित्रपट का आवडतात, याची कारणं प्रत्येकाची स्वतंत्र असतील; मात्र, एका कारणासाठी प्रत्येकाचंच एकमत होईल, की अतिशय आनंदी, "फीलगुड' चित्रपट बघताना असं आपल्याही बाबतीत घडावं असं मनोमन आपल्याला वाटत असतं. आणि क्‍लेषदायक घटनांचा चित्रपट बघताना "बरं झालं, हे आपल्या बाबतीत नाहीये'' असं वाटून समाधान मिळतं. "मी त्याच्याजागी असतो तर...'' आणि "बरं झालं मी त्याच्या जागी नाही...'' या दोन भावना चित्रपट आवडण्यासंदर्भात खूप महत्त्वाच्या मला वाटतात.
बऱ्याचदा यातल्या पहिल्या आनंददायी कल्पनेची चित्रं आपण मनात अनेकदा रेखाटत असतो (काही चित्रपटांतून तर ती पुन्हापुन्हा त्याच त्या प्रकारे बघूनही आपल्याला कंटाळा येत नाही!) मात्र काही चित्रपटांमधून कल्पनेच्याही पलीकडल्या घटनांचं चित्रण बघून आपण शहारतो, खुर्चीत घट्ट बसून राहतो. आणि चित्रपट संपल्यावर त्यातल्या व्यक्तिरेखेविषयी सहानुभूती व्यक्त करून आपल्या सुरक्षित कोषात स्वतःला गुरफटून घेतो. आपल्या या उबदार कोषाची आठवण सिद्दिक बरमाकचा "ओसामा' हा चित्रपट बघून प्रत्येकाला होईल. (आणि कल्पनेपलीकडचं आयुष्य जाणवल्यामुळे आपण कितीतरी सुखी असल्याची भावना मनाला शांत करू शकेल.)
"ओसामा'' हा अफगाणिस्तानचा चित्रपट आहे... खऱ्या अर्थानं अफगाण दिग्दर्शकानं केलेला, काबूलमध्येच चित्रित झालेला. तालिबानी राजवटींनी उद्‌ध्वस्त केलेली आयुष्यं बघून आपल्याला अस्वस्थ करणारा. चित्रपटाची सुरवातच हॅंडहेल्ड कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून होते. एक मुलगा हातातल्या डब्यातला धूप हालवून कॅमेरामनकडे एक डॉलर मागतो. तेवढ्यात लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांच्या विधवांचा एक मोर्चा येतो, "आम्हाला काम द्या' एवढीच त्यांची मागणी आहे. तालिबानी राजवटीत स्त्रियांना काम करण्याचीही मनाई आहे. हा मुलगा तेवढ्यात कॅमेऱ्यात बघून "तो बघा मोर्चा, त्याचं शूटिंग करा' असं सांगतो, तेवढ्यात तालिबानी येतात. बायकांचा जमाव अस्ताव्यक्त होतो. पाण्याचा फवारा मारून मोर्चा पांगवला जातो. त्यातच एक स्त्री आणि तिची बारा-तेरा वर्षांची मुलगीही आहे. काही बायकांना पकडून जबरदस्तीनं जीपमध्ये डांबण्यात येतं.
कोंडवाड्यात बंद केल्या जाणाऱ्या कोंबड्यांचा कलकलाटाचा ध्वनी ऐकू येतो. आणि चित्रीकरण करणारा कॅमेरा तोडला जातो. ब्लॅक फ्रेम दिसू लागते. पाच-सहा मिनिटांच्या या पहिल्याच सीक्वेन्सनं दिग्दर्शक आपल्या मनाता ताबा घेतो, तो शेवटपर्यंत!
ही कथा त्या मोर्चात चुकून अडकलेल्या मुलीची आहे. तिचे वडील युद्धात मारले गेले आहेत. घरात आई आणि आजी. आई दवाखान्यात काम करतेय; पण तालिबानी राजवटीत नोकरी जाते. खाण्यापिण्याची मारामार होते. बाहेर पडायची सोय नाही! तालिबानी राजवटीत "कायदेशीर'' पुरुष सोबत्याशिवाय स्त्रीनं घराबाहेर पडणं हाच गुन्हा! "मला मुलीऐवजी मुलगा असता तर'' हे तिचं वाक्‍य वेगवेगळ्या पातळ्यांवर मनाला छेदून जातं. आजी शेवटी उपाय सांगते. मुलीचे केस कापून, वडलांचे कपडे छोटे करून तिला घालते. ती मुलगा होते आणि घराबाहेर पडते!
चित्रपटातली घटना ही फक्त कथा नाही! असं खरंच घडलं होतं- चित्रपट त्या सत्य घटनेवर आधारित आहे. पुढचा सबंध चित्रपट मुलगा म्हणून तालिबानी नजरेखाली वावरणाऱ्या त्या कोवळ्या मुलीच्या मानसिक द्वंद्वाचा आहे.चित्रपटाची दृष्यरचना सुंदर आहे. फक्त विषय म्हणून हा चित्रपट उल्लेखनीय नाही, तर दिग्दर्शनाची बाजूही उजवी आहे. या चित्रपटातली दोन दृष्यं मला विशेष आवडली. अगदी सुरवातीला या मुलीची आई दवाखान्यात असते आणि अचानक तालिबानी आलेत म्हणून सगळे निघून जातात, ते दृष्य मोठं विलक्षण आहे.
दवाखान्याच्या वऱ्हांड्यात टॉप अँगल कॅमेरा आहे. कॅमेऱ्यापासून उलट दिशेनं सगळे घाईत चालू लागतात. त्यांच्यात अपंग असलेला एक तीन-चार वर्षांचा मुलगाही आहे. तोही दिडक्‍या चालीनं चालतोय. अचानक सगळे निघून जातात. हा एकटाच उरतो. त्यांच्याइतकी चपळाई त्याला नाही आणि घाई का करायची, हे कळण्याचंही त्याचं वय नाही. वऱ्हांडा रिकामा होतो आणि हा लंगडत लंगडत जात राहतो... त्याच्या पावलांचा लंगडा आवाज तेवढा ऐकू येतो!
दुसरं दृश्‍य आहे "ओसामा'' हा मुलगी आहे हे मदरशातल्या लोकांना कळतं त्यानंतरचं. ही जीवाच्या आकांतानं पळतेय. आजूबाजूला सगळी तिच्याच वयाची मुलं आहेत. बाहेरच्या भिंती आता आकाशाला टेकल्याहेत आणि भर मैदानामध्ये तिला पकडलं जातं आणि कुणाला काही कळायच्या आत तिला बुरखा चढवला जातो! हे लिहितानाही माझ्या अंगावर शहारा आलाय! तिच्यासाठीचे सगळे मार्ग, स्वातंत्र्याच्या कल्पनांची दारं एका क्षणात बंद होतात.
अस्वस्थ अफगाणी आयुष्याचा "ओसामा'' हा चित्रपट आपल्यासारख्या स्वस्थ समाजाच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेचे मापदंडच हादरवून टाकतो. "ओसामा'' बनून जगावं लागणाऱ्या त्या मुलीच्या जागी मी नाही, या भावनेनं मी एकीकडे सुखाचा निःश्‍वास सोडतो, तर दुसरीकडे कुणाला तरी प्रत्यक्षात असं जगावंही लागतंय, हे आठवून अस्वस्थही होतो.
-प्रसाद नामजोशी

2 comments:

ganesh March 20, 2009 at 7:50 AM  

hi prasad,
have you also written about Baran?
that can be a good companion piece to Osama, if it can be posted.

prasad namjoshi March 27, 2009 at 7:54 AM  

hi ganesh,
befor my reply to u, blog editor has done the job! thanx to him and u too. also congrats for ur new publication.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP