अव्यक्त दुःखाचं प्रतीक -बरान

>> Sunday, March 22, 2009

अफगाण स्त्रीच्या अव्यक्त दुःखाचं प्रतीक म्हणजे बरान. पण आपलं सर्वस्व गहाण टाकून मिळालेले पैसे लतीफ तिच्या वडिलांना देतो आणि त्याचा वापर मात्र त्याच्यापासून बरानला विलग करण्यात होतो. बरान बोलू शकत नाही आणि लतीफची वाचा बसते! ........
नजाफचा अपघात होतो म्हणून त्याच्या मुलाला- रहमतला त्याच बांधकामाच्या साईटवर कामाला घेतलं जातं. नाजूक चणीचा रहमत चुलीवर ठेवलेल्या एका ड्रममागे उभा असतो, तेव्हा धुराआडचा त्याचा चेहरा त्याच्याविषयी संदिग्धता उत्पन्न करतो. त्याच साईटवर वरकाम करणारा पोऱ्या लतीफ हे सगळं बघतोय; पण त्याचं विशेष लक्ष नाही. नाही म्हणायला त्याला एकदा पोतं उचलायला तो मदत करतो; पण आपल्या ऐटीतच तो मग्न आहे. एक तर चहा करायचं काम त्याच्याकडे असल्यामुळे तो तिथल्या स्वयंपाकघराचा राजा आहे. शिवाय ज्यात त्यात नाक खुपसणं आणि फावल्या वेळात कुणाशी तरी मारामारी उकरून काढणं, हा साईडबिझनेस! त्याचं रहमतकडे खऱ्या अर्थानं लक्ष तेव्हाच जातं, जेव्हा मुकादम त्या दोघांच्या कामांची अदलाबदल करतो! रहमतच्या अंगावर तो धावून जातो; पण आतापर्यंत गप्प असणारा रहमत त्याच्या अंगावर स्वसंरक्षणार्थ दगड उगारतो. रहमतकडे शक्‍य तेवढ्या खुनशी नजरेनं बघणं, हे काम मात्र लतीफ प्रामाणिकपणे करतोय.
आपलं आनंदाचं, निवांतपणाचं, स्वयंपाकाचं काम रहमतकडे गेलंय आणि आपल्याला अंगमेहनतीचं काम करावं लागतंय, यामुळे संतापलेला लतीफ अख्खं स्वयंपाकघरच उद्‌ध्वस्त करून टाकतो. रहमत शांतपणे सगळी आवराआवर करतो. पडदा बदलतो. तिथं एक छोटंसं रोपटं असलेली कुंडी ठेवतो. त्या छोट्याशा खोलीला एक वेगळीच चमक येते. एकदा लतीफ काम करत असताना वादळ येतं आणि त्याचं लक्ष किचनच्या पडद्याकडे जातं. हळूच वर जाणाऱ्या पडद्यामागे जुनाट काचेतून एक आकृती दिसते. तो दबकत जवळ जातो. आपल्या लांब केसांतून फणी फिरवणारी ती काळी सावली केस बांधते, रुमाल गुंडाळते, टोपी घालते, बाहेर येते; तो रहमत आहे!
रहमत एक मुलगी आहे, हे समजताच तो सुन्न होतो. त्याचा ऍटीट्यूडच बदलतो! स्वतःला आरशात बघतो, नीट कपडे करतो आणि अतिशय सौजन्यानं रहमतशी बोलतो. रहमत अफगाण शरणार्थी आहे. त्यांच्याकडे इराणचं ओळखपत्र नाही आणि सैनिकांपासून लपून ती मंडळी इराणमध्ये राहतात, विनापरवाना कामं करतात, हे सगळं तर लतीफला माहिती आहेच; पण त्यातही रहमतला मुलगा बनवून घर चालवावं लागतंय यामुळे आता त्याची तिला संपूर्ण सहानुभूती आहे.
रहमतचं खरं रूप उघडकीला आल्यावरचा एक सीन आहे. लतीफ एक भिंत फोडतोय. हातोडीचे वार करतोय. भिंतीला भोक पडतं आणि बाहेरच्या प्रकाशाची तिरीप त्याच्या तोंडावर पडते. जसजसं भोक मोठं होतं तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा प्रकाश वाढत जातो! हा रहमतविषयीच्या त्याच्या मतामध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. दोघांमधली भिंत तुटलीये आणि नातं अधिक स्वच्छ, लख्ख झालंय.रहमतला लतीफची संपूर्ण सहानुभूती आहे; पण ती हवी असल्याचे भाव रहमतच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. छतावरच्या कबूतरांना रहमत खाऊ घालते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हसू लतीफ बघतो. रहमतचं सौंदर्य, हसणं तो हरखून जाऊन बघतोय. पुढे एक दिवस सरकारी अधिकाऱ्यांना रहमत अफगाण असल्याचा संशय येतो. त्यांपैकी एकाशी लतीफ मारामारी करतो; पण रहमत पळून जाते. मुकादमाला सर्व शरणार्थींना कामावरून काढून टाकावं लागतं. लतीफ उदास होतो. आपला वेळ कबूतरांपाशी घालवतो. तिची हेअरपिन त्याला सापडते. ती जपून ठेवतो. स्वयंपाकघरातलं तिनं लावलेलं रोपटं आता वेलीत बदललंय!
लतीफ तिला शोधायला जातो. पत्ता विचारत एका स्मशानभूमीमध्ये पोचतो. खूप सारी मंडळी तिथं आहेत. रहमत स्त्रीवेशात आहे. बुरख्याआडचे रहमतचे डोळे लतीफला शोधतात. तिला लतीफ दिसतो; पण त्याला ती दिसत नाही. पुन्हा एकदा चुलीमागची रहमत धुराआड आहे. पुढे नदीच्या प्रवाहात दगड उचलण्याच्या कामात तिला तो बघतो. ती पडते; आजूबाजूच्या बायका तिला उचलून शेकोटीपाशी बसवतात. ती मिळण्याची शक्‍यता पुन्हा धूसर होते.कथा बांधकामाच्या साईटवर घडते. त्यामुळे अर्धवट भिंती, ड्रमखालच्या चुलीतला धूर, बाहेरचं वादळ, हिमवर्षाव, चहातली वाफ यांसारख्या गोष्टी दिग्दर्शक वारंवार वापरतो आणि नात्यातली, अस्तित्वाची आणि म्हणूनच जीवनाचीही एक धूसरता पडद्यावर वारंवार दिसते. विशेषतः रहमतच्या शॉट्‌सच्या वेळी बहुतेक वेळा ही धुराआडची संदिग्धता अतिशय निःसंदिग्धपणे उभी करण्यात दिग्दर्शक नेमका "दिसला' आहे!
शेवटी लतीफ स्वतःची सगळी पुंजी गोळा करून रहमतचे अपंग वडील नजाफसाठी कुबड्या विकत घेतो. त्यापूर्वी मुकादमाकडून घेतलेले पैसे नजाफला द्यायला त्यानं सुलतानकडे दिले असतात ते घेऊन सुलतानच अफगाणिस्तानला जातो. रहमतच्या दाराबाहेर कुबड्या ठेवताना तिचं खरं नाव बरान असल्याचं त्याला कळतं. "बरान' म्हणजे पाऊस! बरानसाठी काही तरी करायचं म्हणून लतीफ एक धाडसी पाऊल उचलतो. स्वतःचं अस्तित्व असलेलं ओळखपत्रच तो चोरबाजारात विकून टाकतो. पैसे घेतो आणि नजाफला देतो.
नजाफ त्याला आपण आता सुखानं अफगाणिस्तानला परत जाऊ असं सांगतो. बरान मूकपणे ऐकते, तर लतीफ ते ऐकून मूक होतो. त्याच्यावर आभाळ कोसळलंय. ओळखपत्रही गेलंय आणि बरानही चाललीये. तो पुन्हा त्याच स्मशानात येतो. त्याला मृत्यूच्या जवळ आल्यासारखं वाटतं. दारावरचा पडदा वाऱ्यानं हलतो. जणू मृत्यू त्याला आमंत्रण देतोय. तो स्वतःची लाडकी टोपी काढून ठेवतो. भौतिक वस्तूंपासून जणू तो दूर चाललाय. स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात बघतो. तोंडावर पाणी घेतो. लतीफ जणू आता या जगातला राह्यलेलाच नाहीये.
तो बरानच्या घरी जातो. त्यांची सामानाची बांधाबांध चाललीये. बरानच्या हातून भाजी सांडते. ती तो उचलू लागतो. दोघांची नजरानजर होते. ती हसते आणि शांतपणे तोंडावर बुरखा ओढून घेते. बरानला आतापर्यंत काहीही सांगता आलं नाहीये आणि आता सांगण्यासारखं काही राहिलेलंही नाहीये. अव्यक्त अफगाण दुःखाचं मूर्तिमंत प्रतीक असणारी बरान चेहऱ्यावर पडदा ओढून घेते, तेव्हा कबूतरांच्या फडफडण्याचा आवाज ऐकू येतो.
संपूर्ण चित्रपटात एकही अक्षर न बोलणारी बरान मूकपणे खूप काही सांगून जाते आणि स्वतःचं सुखसुद्धा "दुखतंय' म्हणून गोंजारत बसणाऱ्या आम्हाला आपल्या दुःखाची व्याख्या पुन्हा एकदा तपासून पाहायला भाग पाडते.
- प्रसाद नामजोशी

1 comments:

attarian.01 March 5, 2011 at 1:31 AM  

KHUPCH CHAN LIHAL AHE..... MALA BARYACH VARSHAPASOOON BAGAYCHA AHE ..PUN NET VAR ASE CHANGALE CINEMA BAGHAYAL NAKO WAT TE .. HE WAACOON DVD VAR MILTO KA BAGATO ..
THANKS....
JOSHI , TUMHI MADHE SAKAL MADHE LIHIT HOTA TE WACHAYCHO CHANGLE LEKH HOTE KA BAND KELE ?

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP