वर्मावर बोट ठेवणारा इलेक्‍शन

>> Friday, May 1, 2009

निवडणुकांच्या निमित्तानं बाहेर येणाऱ्या प्रवृत्तींकडे त्यामागच्या स्वार्थाकडे, भ्रष्टाचाराकडे आणि निकालानं जैसे थे राहणाऱ्या व्यवस्थेकडे आपली तिरकस नजर लावणारा चित्रपट म्हणजे अलेक्‍झांडर पेनचा "इलेक्‍शन'. "इलेक्‍शन'मधली निवडणूक ही खरं तर शाळेतली - मायक्रो पातळीवरची; पण तरीही या संपूर्ण प्रक्रियेवर नेमकं बोट ठेवणारी. राजकारणावर आधारित आणि प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारा; विनोदी पण तरीही विचारी, असा दुर्मिळ, निवडणुकीशी संबंधित वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेतील दुसरा चित्रपट.

निवडणुकीला उभे राहतात ते उमेदवार सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी असतात अशी एक अफवा आहे. काहींचा त्या अफवेवर दृढ विश्‍वास आहे; इतरांचा तितका नाही. मात्र त्यासंबंधात प्रत्यक्ष काही करणं हे कल्पनेपलीकडलं असल्यानं, ते सत्य असल्याचं स्वतःच्या मनाला पटवणं, हे त्यांना सोपं वाटतं. शिवाय सध्या मतदान करणं म्हणजेच समाजसुधारणेच्या दिशेनं काही पावलं उचलणं, असाही एक समज दृढ होताना दिसतो. पण याचा अर्थ असा म्हणावा का, की केवळ निवडणुकीची यशस्वी प्रक्रियाच आपल्याला कधी ना कधी स्वच्छ समाज आणि प्रामाणिक राज्य व्यवस्था देईल? त्यात प्रत्यक्ष उमेदवारांच्या चारित्र्याचा काहीच हात नसेल? या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्यांचा वा विरोध दर्शवणाऱ्यांचा त्यांच्या भूमिकेमागे काहीच स्वार्थ नसेल? प्रत्यक्ष उमेदवारांचा हेतू चुकून जनतेचं कल्याण हाच असला, तरी त्यासाठी त्यांच्या डोळ्यांसमोर असणारा मार्ग हाच योग्य मार्ग असेल? केवळ एक "इलेक्‍शन' आपल्या शंभर व्याधींवरचा एकच रामबाण उपाय असेल?
अलेक्‍झांडर पेन नावाचा दिग्दर्शक पटकथाकार आहे, जो समाजातल्या विसंगतींवर नेमकं बोट ठेवणारे चित्रपट नियमितपणे काढत असतो. त्याचा एक सिनेमा आहे "इलेक्‍शन (1999). इलेक्‍शन'मधली निवडणूक ही खरं तर जिल्हा, राज्य, देश पातळीवरची नाही, तर ती आहे साधी हायस्कूलमधली. स्टुडंट कौन्सिलचं अध्यक्ष कोणी व्हावं यासाठी लढली जाणारी. मात्र पेनचं टार्गेट हे केवळ हायस्कूलपुरतं मर्यादित नाही. निवडणुकीची प्रक्रिया हेच त्याचं लक्ष्य आहे. मात्र तो या प्रक्रियेला एका मायक्रो पातळीवर आणू पाहतो. या इलेक्‍शनच्या निमित्तानं बाहेर येणाऱ्या प्रवृत्तींकडे त्यामागच्या स्वार्थाकडे, भ्रष्टाचाराकडे आणि निकालानं "जैसे थे' राहणाऱ्या व्यवस्थेकडे आपली तिरकस नजर लावतो.
इलेक्‍शनमध्ये प्रमुख पात्रं चार. तीन उमेदवार आणि एक शिक्षक, ज्याचा या निवडणुकीमागच्या राजकारणात मोठा हात आहे. जिम मॅक्‍झॅलिस्टर (मॅथ्यू ब्रॉडेरिक) या अमेरिकन इतिहास आणि नागरिकशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाचा ट्रेसी फ्लिकवर (रिज विदरस्पून) पहिल्यापासूनच राग आहे. त्याला कारण आहे ते काही दिवसांपूर्वी शाळेने यशस्वीपणे दाबून टाकलेली एक भानगड. या भानगडीत निष्पाप बळी ठरली होती ती "बिचारी' ट्रेसी. आणि जिमच्या एका मित्राला मात्र आपल्या नोकरीसह बायको-मुलांनाही गमवावं लागलं होतं. जिमचा मित्र काही फार शुद्ध चारित्र्याचा होता असं नाही; मात्र जिमच्या मते, चूक त्याची एकट्याची नव्हती. ट्रेसी जेव्हा स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी उभं राहायचं ठरवते, तेव्हा जिमच्या मनात हा राग ताजा असतो आणि ट्रेसीला बिनविरोध निवडून येऊ द्यायचं नाही असं तो ठरवतो. यासाठी तो चिथावतो, तो श्रीमंत आणि सरळमार्गी पॉल मेझल्शला (क्रिस क्‍लाईन). पॉल एक लोकप्रिय फुटबॉलपटू असतो; मात्र नेतेगिरी त्याच्या रक्तातच नसते. पॉलला जिमनं उभं केल्याचं ट्रेसीला लक्षात येतं आणि ती पिसाळते. एवढ्यात आणखी एक अनपेक्षित उमेदवार उभा राहतो, पॉलची बहीण टॅमी (जेसिका कॅम्पबेल). टॅमीची जवळची मैत्रीण अचानक यू टर्न मारून पॉलच्या प्रेमात पडते, आणि निवडणूक हाच एक बदला घेण्याचा मार्ग असल्याचं टॅमी ठरवते. जिम या अचानक तयार झालेल्या स्पर्धेमुळे खूष होतो. मात्र त्याचं कौटुंबिक आयुष्य याच क्षणी एका नव्या पेचप्रसंगाला सामोरं जाणार असतं. कुटुंब आणि पेशा या दोन्ही आघाड्यांवर जोमानं लढत राहणं जिमला शक्‍य होईलसं दिसत नाही.
इलेक्‍शनमध्ये सतत जाणवणारी आणि चित्रपट व्यापून टाकणारी गोष्ट म्हणजे बोचरा उपहास. चित्रपट म्हटलं तर विनोदी आहे; मात्र विनोद कुठेही चिकटलेला वाटणारा नाही. तो व्यक्तिरेखा अन्‌ एक प्रकारे त्यांनीच निर्माण केलेल्या परिस्थितीतून तयार होणारा आहे. जिम आणि ट्रेसी या इथल्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. त्यामुळे अधिक तपशिलात रंगवलेल्या, तर पॉल आणि टॅमी या दुय्यम महत्त्वाच्या, त्यामुळे किंचित कमी तपशिलात. मात्र त्यामुळे त्यांच्या खरेपणावर कुठंही परिणाम झालेला दिसत नाही. किंबहुना त्या खऱ्या असणं, हेच इलेक्‍शनच्या यशाचं मुख्य कारण आहे.
चित्रपट या व्यक्तिरेखांकडे दोन प्रकारे बघताना दिसतो. एक म्हणजे निःपक्षपातीपणे तो जे जसं घडतंय तसं दाखवतो, अन्‌ प्रेक्षकांवर निष्कर्ष काढण्याचं काम सोपवतो. दुसऱ्या प्रकारात तो पात्रांना त्यांची मतं घटनांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याच आवाजात मांडायला देतो. ही त्यांची स्वतःविषयी काय कल्पना आहे ती मांडतात. (बऱ्याचदा ती त्यांच्या एकंदर वागणुकीला छेद देणारी, आणि भव्य असतात) वागणं आणि विचार यांमधली फारकतच बहुतेक वेळा इलेक्‍शनचा टोन निश्‍चित करते.
सामाजिक रूढी आणि नीतिमत्ता यांचं राजकारणातलं स्थान, हे इथं असणारं एक महत्त्वाचं सूत्र. संहितेत जर अशी सूत्रं पात्रांच्या तोंडून वदवली गेली, तर अनेकदा ती प्रेक्षकांच्या नजरेत स्पष्ट व्हायला मदत होते. मात्र हे वदवणं जितकं स्वभाविकपणे होईल तितकं उपयुक्त असतं. जर पात्रं उपदेशाचे डोस पाजायला लागली, तर प्रेक्षक त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला मागेपुढे पाहत नाही. इलेक्‍शनमध्ये हा विषय पात्रांसंदर्भात उल्लेखला जाण्याआधी जिमनं वर्गात विचारलेल्या एका प्रश्‍नातून उच्चारला जातो. जिमचं प्रश्‍न विचारणं आणि ट्रेसीनं उत्तरादाखल उचललेल्या हाताकडे दुर्लक्ष करत राहणं, हा प्रसंग प्रेक्षकांच्या स्मरणात राहील अशा रीतीनं मांडला जातो. जवळजवळ लागून येणाऱ्या फ्लॅशबॅकमध्ये हाच प्रश्‍न ट्रेसीच्या भानगडीसंदर्भात विचारला जातो आणि त्याचं "चर्चेत असणारा प्रश्‍न'म्हणून स्थान निश्‍चित होतं. यानंतर जर कोणी हा महत्त्वाचा मुद्दा विसरलं, तर त्याला आठवण करून दिली जाते चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगात- ज्यात प्रश्‍न बदलतो, पण त्याची वाक्‍यरचना, अन्‌ जिमची वागणूक यातून सुरवातीचा प्रसंग सुचवला जातो, अन्‌ प्रेक्षकांना या मुद्‌द्‌याची आठवणदेखील करून दिली जाते.
इलेक्‍शनचं वरवरचं रूप हे "टीनेज कॉमेडी' या नावाखाली पाहायला लागणाऱ्या तरुण मुला- मुलींच्या वायफळ बाळबोध विनोदिकेचं आहे. मात्र प्रत्यक्षात त्यात मांडलेले विषय ना वायफळ आहेत ना बाळबोध. खरं तर त्यातला संघर्ष आणि शेवट हेदेखील एरवी या प्रकारच्या चित्रपटांमध्ये न आढळणारी उंची दाखवणारे आहेत. नेहमी अशा चित्रपटांतल्या व्यक्तिरेखा टू डिमेन्शनल असतात, अन्‌ त्यांची मांडणीही काळी-पांढरी असं स्पष्ट विभाजन असणारी असते. इथे सगळाच ग्रे शेड्‌सचा मामला आहे. हेतू आणि कृती यांमध्ये एकवाक्‍यता नसणं, हा जिम आणि ट्रेसीचा विशेष इथलं बहुतेक नाट्य घडवतो. त्यांचा हेतू बऱ्याच प्रसंगी स्तुत्य असतो; मात्र प्रत्यक्षात तो कृतीमध्ये उतरलेला दिसत नाही. पॉल आणि टॅमी त्यामानानं "बोले तैसा चाले' प्रकारचे असतात. मात्र त्यांचं पारदर्शक असणं, हेच वेळोवेळी त्यांच्या विरोधात जातं. जणू चित्रपट सुचवतो, की राजकारणात "अमुक एका प्रमाणात भ्रष्ट असणं, स्वार्थी असणं हा गुणच आहे. त्याहून भाबडं असणं व प्रामाणिक असणं राजकारण्यांना परवडणार नाही.'
विचार करायला लावणारे विनोदी चित्रपट मुळातच एक दुर्मिळ वर्ग आहे. राजकारणावर आधारित असणारे आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे चित्रपट हा दुसरा एक दुर्मिळ वर्ग. आता या दोन्ही वर्गांना एकत्र करणारा चित्रपट म्हणजे किती दुर्मिळ, याची कल्पनाच केलेली बरी. "इलेक्‍शन' हा एक असा अतिदुर्मिळ चित्रपट आहे. राजकारण्यांच्या वर्मावर हलकेच बोट ठेवणारा अन्‌ अप्रत्यक्षपणे पाहायचं, तर मतदान करणाऱ्यांच्यादेखील.
- गणेश मतकरी

1 comments:

Yawning Dog May 7, 2009 at 1:26 AM  

attach pahila election. Farach mast ahe, Reese witherspoon che kaam farach mast ahe. focused anee nirdhavalelee !

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP