फिल्ममेकर्सबद्दल....

>> Monday, May 25, 2009


चित्रपट हे आजच्या युगाचे माध्यम आहे असे वारंवार म्हटले गेले आहे. त्यामुळे मराठीत वा इतर प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट-चित्रपटव्यवहार याविषयी सातत्याने लिहिले जाते. परंतु या लेखनाच्या पसाऱ्यात ज्यास चित्रपटसमीक्षा म्हणता येईल असे लेखन फार कमी आहे. या झगमगत्या जगाविषयीचे आकर्षण असणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा विचार करून चित्रपटाच्या अवतीभवतीच्या कथा, वर्णनपर लेखन वा चित्रपटतारका-तारे यांच्याविषयीच्या गप्पा अधिक लिहिल्या जातात. चित्रपटमाध्यमाचा इतिहास आणि विविध चित्रकर्त्यांच्या शैलीचं विश्लेषण यावरचे लेखन दुर्मिळ आहे. एका चित्रपटाच्या घडणीचे विश्लेषण हेही दुर्मिळ आहे. गणेश मतकरी यांचे फिल्ममेकर्स,हे पुस्तक ही उणीव भरुन काढते.
गेल्या काही वर्षांत फिल्म सोसायटी चळवळ आणि इंटरनेटवर उपलब्ध होणारी माहिती, सुलभपणे उपलब्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ‘डीव्हीडी’ यामुळे चित्रपटविश्लेषणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. सुविधा निर्माण झाल्या आहेत याचा अर्थ चित्रपटसमीक्षेच्या लेखनातील अंगभूत मर्यादा नाहीशा झाल्या आहेत असे नाही. चित्रपटासारख्या दृश्य, तंत्राधारी माध्यमाविषयी शब्दाच्या माध्यमातून लेखन करणे ही अवघड प्रक्रिया आहे. सांस्कृतिक वातावरणातील शब्दाच्या धाकामुळे संगीत वा चित्रपटासारख्या इतर माध्यमाविषयी लिहिताना शब्दांच्या जगातील तर्कच मोजला जातो वा एका प्रेक्षकाला आलेल्या अनुभवाचे वर्णन केले जाते. अशा लेखनाला-ज्याला आस्वादात्मक समीक्षा म्हटले जाते, नेहमीच चित्रपटमाध्यमाचा गाभा गवसतो असे नाही. बऱ्याचवेळा समीक्षकाच्या शब्दसौष्ठवावर असे लेखन रेलून राहते. त्याहूनही चित्रपटाच्या संदर्भातील मूलभूत मुद्दा असा की या माध्यमाचा स्वभाव काव्यात्म आहे, सादरीकरण तंत्राधारित आहे आणि पृष्ठभाग कथात्म आहे. हे सुलभीकरण आहे याची जाणीव ठेवूनही त्यामुळे त्या त्या चित्रपटाचे समीक्षण करताना या तिन्ही स्तरांमधील अन्वय लक्षात घ्यावा लागतो. चित्रपट हे माध्यम दिग्दर्शकाचे आहे असे आपण म्हणतो. पण दिग्दर्शक ही संकल्पना चित्रपटाच्या संदर्भात अपुरी वाटते म्हणून मतकरींनी ‘फिल्ममेकर्स’ ही इंग्रजी संकल्पना योजली आहे. ते म्हणतात- ‘दिग्दर्शक या शब्दाला काही मर्यादा आहेत. तो चित्रपट दिग्दर्शकाच्या कर्तृत्वाची पूर्ण कल्पना एका झटक्यात आणून देऊ शकत नाही. ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणून त्याला जी चौफेर कामगिरी करावी लागते आणि संहितेपासून ते संकलनापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे लक्ष घालावं लागतं, ते त्याला खऱ्या अर्थाने चित्रपटाचा जनक ठरवतं. ‘फिल्ममेकर’ हा शब्द दिग्दर्शकाचीही जबाबदारी सोप्या शब्दांत पण थेटपणे मांडतो. या पुस्तकाच्या नावासाठी तो शब्द वापरण्याचंही हेच कारण आहे.’
या पुस्तकात गणेश मतकरींनी १९९८ ते २००७ या काळात लिहिलेल्या अकरा लेखांचा समावेश केलेला आहे. या विश्वविख्यात चित्रपटकर्त्यांची निवड करताना एका विशिष्ट विचारधारेतील वा पठडीतील दिग्दर्शकांची निवड त्यांनी केलेली नाही आणि त्यांनी ‘थोडं पुस्तकाविषयी’मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे लेख पुस्तकात संग्रहित करताना बदल केलेले नाहीत. जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे, कारण ऐतिहासिकदृष्टय़ा सर्व संदर्भ पक्के करण्याचा त्यांचा इरादा नाही. या सर्व लेखांकडे पाहताना एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की काही लेख एखाद्या चित्रपटकर्त्यांच्या पूर्ण कारकीर्दीविषयी आहेत तर काही त्या चित्रपटकर्त्यांच्या विशिष्ट टप्प्याविषयी आहेत. चित्रपटकर्त्यांची निवड करताना केवळ चित्रपटमहोत्सवातून जगापुढे आलेले चित्रपटकर्ते न निवडता समकलीन यशस्वी दिग्दर्शकही निवडलेले आहेत.
गणेश मतकरींच्या चित्रपटविषयक लेखनाविषयी लिहिताना माझ्या डोळ्यासमोर केवळ ‘फिल्ममेकर्स’ हे पुस्तक नाही. तर १९९७-९८ मध्ये चित्रपटाविषयी लिहायला प्रारंभ केल्यापासून मतकरींनी छोटय़ा लेखात वर्तमानकालीन देशीविदेशी चित्रपटाविषयी आणि मोठय़ा लेखात (प्राधान्याने दिवाळी अंकात) चित्रपटकर्त्यांच्या कर्तृत्वाविषयी लिहिले. आजही ‘साप्ताहिक सकाळ’मधील ‘हॉलिवूड बॉलिवूड’ या सदरातून प्रेक्षक जे चित्रपट आज पाहात आहेत त्याविषयी त्यांनी नि:संदिग्ध विधाने केली आहेत. त्यांचे लेख वाचीत असताना लेखकांचा, चित्रपटांचा, चित्रपट इतिहासाचा व्यासंग जाणवतो पण त्याचबरोबर चित्रपट आणि चित्रपटकर्त्यांला जाणून घेण्याची वृत्ती दिसते. चित्रपटाविषयी त्यांना स्वत:ची मते आहेत, ती व्यक्त करण्याची एक थेट पद्धती आहे. ‘फिल्ममेकर्स’ या संग्रहातील लेखाविषयी विचार करताना आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ जाणवते. कोणत्याही समीक्षेने त्या त्या कलाकृतीच्या मागणीचा विचार करून समीक्षामार्ग शोधायचा असतो. आपल्या मूल्यव्यवस्थेशी तडजोड न करता कलावंताच्या मानसिक घडणीशी अन्वय साधायचा असतो हे मतकरींना उमजलेले आहे. त्यामुळे स्फुट लेखनात ज्याप्रमाणे तो तो चित्रपट काय आणि कसे ‘दाखविण्या’चा प्रयत्न करतो आहे हे लक्षात घेऊन ते परीक्षण लिहितात. त्यामागे अभ्यासकाची नम्र वृत्ती आहे तितकाच आपल्या व्यासंगाविषयी विश्वास आहे.
‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकातील अकरा लेख हे विश्वविख्यात अशा चित्रपटकर्त्यांविषयी आहेत. पण या चित्रपटकर्त्यांची निवड खास मतकरींची आहे आणि त्या त्या लेखात आपण कोणत्या दृष्टिकोनातून त्या कलावंताच्या निर्मितीकडे पाहतो आहे हे त्यांना लख्खपणे ठाऊक आहे. त्यामुळे हे अकरा लेख एकत्र वाचतानाही रचनेचा तोचतोपणा जाणवत नाही. लेखक आणि चित्रपटनिर्माता यांच्यातला एक चेतनायुक्त संवाद आपण वाचतो आहोत असे जाणवते. चित्रपटासारखे माध्यम अनेकविध दृक्श्राव्य कलांशी जोडलेले आहे तसेच समाजाच्या सतत बदलत्या प्रश्नांशीही जोडलेले आहे याचे भान या समीक्षकाला आहे. पण यातील कोणतेच संदर्भ वा विवेचन लेखात तुकडय़ातुकडय़ांनी येत नाही. संदर्भ येतात ते त्या त्या लेखातील विचारप्रवाहाच्या सहज ओघात. कलासमीक्षक म्हणून मतकरींना कोटींचे (कॅटेगरी) भान आहे. संमिश्र कोटीतील चित्रपटाविषयीही हे भान समतोलपणे व्यक्त होते.
‘ल्युकसची पहिली चित्रत्रयी’ या लेखात ‘स्टार वॉर्स’ विषयी लिहिताना मतकरी चित्रपटाच्या वेगवेगळ्या कोटींचा विचार असा व्यक्त करतात- ‘मात्र याचा अर्थ ‘स्टार वॉर्स’ केवळ परीकथा, पुराणकथा, विज्ञानपट आणि कॉमिक्स बुक्स यांनाच एकत्र करतो असं नाही. इथे आढळणारे काही संदर्भ आणखी वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांशी नातं सांगतात. म्हणजे वेस्टर्न, समुद्री चाच्यांचे चित्रपट, युद्धपट, सामुराई योद्धय़ांचे चित्रपट इत्यादी. विज्ञानपटांशी असलेलं साम्य आपण गृहित धरून चालतो, पण या इतर शैली अनपेक्षित आहेत आणि त्यामुळे विशेष.. ल्युकसचं कौशल्य आहे, ते या विविध प्रकारांना एकत्र साधण्याचं (फिल्म. पृ. ३१)
वरील विवेचनात ‘कोटी’ हा शब्द मी योजला असला तरी गणेश मतकरींचे दर्शन तारतम्य लक्षात घेता इंग्रजीतील ‘जानर’ ही संकल्पना अधिक प्रस्तुत ठरते. एखादा चित्रपट, त्याची विशिष्ट काळातील निर्मिती, त्यातील निवडी या साऱ्यामागे त्या त्या प्रांतातील कला इतिहासाचा पट जसा असतो तसे राजकीय, सामाजिक अन्वयही असतात. त्या चित्रपटाच्या यशाची कारणमीमांसा म्हणूनच अनेक तऱ्हांनी समजून घ्यावी लागते याची समज मतकरींना आहे.
आपण चित्रपटाविषयी लिहीत आहोत, म्हणून ‘तंत्रज्ञाना’चा वा ‘चित्रपटभाषे’चा जाणीवपूर्वक वेगळा विचार मांडावा असे मतकरींच्या मनात नाही. त्यांना चित्रपट भाषेची सहज जाणीव आहे, त्यांच्या चित्रपट अवलोकनातून ती प्रगल्भ झालेली आहे. पण रसिक म्हणून त्यांची नजर त्याहीपलीकडे आहे. एखाद्या साहित्यरसिकाने कादंबरी वाचताना गोष्टीच्या पलीकडे आशय सूत्र शोधावे तसे मतकरी एखाद्या चित्रपटकर्त्यांने विशिष्ट तंत्र योजले त्यामागचा आधार शोधतात, उदाहरणार्थ हिचकॉक असे म्हटले की, प्रेक्षकांच्या मनात रहस्यपट ही कल्पना येते. पण आपल्या हिचकॉकवरील लेखात मतकरी भयपट आणि रहस्यपट यातील भेद विशद तर करतातच. पण हिचकॉकच्या चित्रपटामागील सूत्र शोधण्याचा यत्न करतात. ही सूत्रे दोन प्रकारची आहेत. हिचकॉकच्या चित्रपटातील तंत्रयोजनेविषयी खूप बोलले गेले असले तरी पटकथेवर त्यातील छोटय़ा छोटय़ा वळणावर ते काम कसे करतात याविषयीचे आणि साऱ्या रहस्याच्या वा पाठलागाच्या मागे असणाऱ्या मनुष्यस्वभावाविषयीचे. मतकरी सांगतात- ‘मानवी मनाची अपरिपक्वता आणि दुर्बलता हे त्यातलं महत्त्वाचं सूत्र. माणसं मूलत: सज्जन असतात, पण कसोटीची वेळ आली तर हा सज्जनपणा टिकत नाही हे हिचकॉकच्या अनेक चित्रपटांतून सांगितलेलं दिसतं.’ (फिल्म मे. पृ. ४०) हिचकॉक कौशल्याने अपराधभावनेचा वापर कसा करतात हेही ते स्पष्ट करतात. तर स्पीलबर्गविषयी लिहिताना अपरिचिताशी गाठ पडल्यावर माणसाचं गोंधळणं आणि सुटण्याच्या आशेनं बहुधा चुकीचे निर्णय घेत जाणं हे त्यांच्या अनेक चित्रपटांच्या मागचे सूत्र ते विशद करतात.
केवळ दिसणाऱ्या दृश्यामागचे सूत्र सांगून ते थांबत नाहीत. मजिदीसारख्या इराणमधील दिग्दर्शकाच्या ‘बरान’चा वेगळेपणा सांगताना मतकरी लिहितात- ‘बरान’चा वेगळेपणा हा की त्याचा पसारा हा केवळ आपल्या नजरेसमोर उलगडतो तेवढाच नसून इतरही पातळ्यांवर पसरलेला आहे.
यातील पहिली पातळी ती त्यातल्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची. अफगाणिस्थानातून इराणमध्ये अनधिकृतपणे येऊन स्थायिक झालेले नागरिक, त्यांचं राहणीमान ते ज्या परिस्थितीत काम करतात ती, याचं स्पष्ट चित्रण इथे दिसून येतं. थेटपणे त्याचबरोबर प्रतीकात्मक रीतीनेही. याची अफगाणी नायिका बोलत नाही. तिचा हा मुकेपणा, हा आपल्या समस्या मांडू न शकणाऱ्या अफगाणिस्थानचंच प्रतीक आहे.’ (फिल्म मे. पृ. ६३)
‘स्पीलबर्गचा सिनेमा’ या लेखात गणेश मतकरींनी अतिशय सुजाणपणे स्पीलबर्ग यांच्या चित्रपटातील विविधता हाताळली आहे. स्पीलबर्ग पटकथाकार, संकलक, कार्यकारी निर्माता असला तरी या लेखात त्यांच्याकडे आपण दिग्दर्शक म्हणून पाहणार आहोत असे सांगून त्याच्या चित्रपटाच्या विषयसूत्राचे वैविध्य, त्या सूत्रानुसार शोधलेल्या शैलीचे आणि तंत्राचे वैविध्य मतकरी मांडतात. यानिमित्ताने मतकरींच्या दृष्टिकोनाचे एक वैशिष्टय़ अधोरेखित करणे आवश्यक आहे. चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीने श्रेयस्कर असू शकतो. एकाच पद्धतीचा वा शैलीतला चित्रपट म्हणजे श्रेष्ठ असे त्यांना वाटत नाही. त्यामुळेच त्यांनी केलेली ‘फिल्ममेकर्स’ ची निवड आहे अशी झाली आहे. स्पीलबर्गविषयी लिहिताना या सुजाणपणाची विशेष गरज होती कारण त्याची निर्मिती वेगवेगळ्या कोटीतली आहे. तंत्रप्रधान निर्मिती असे स्पीलबर्गचे वैशिष्टय़ सांगावे तर ‘अतिस्ताद’ वा ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’सारखे चित्रपट तो करतो. त्याच्या हाताळणीमुळे पारंपरिक युद्धपटाला तो वेगळे आयाम देतो. मतकरींनी वारंवार उल्लेखिलेली एक गोष्ट म्हणजे मुलांसाठीचा चित्रपट आणि प्रौढांसाठीचा हा भेदच स्पीलबर्गने अप्रस्तुत ठरवला. स्पीलबर्गवरच्या लेखात त्यांच्या ‘ह्य़ूएल’चे रसग्रहण करताना मतकरी दिग्दर्शकाच्या काही गोष्टी न दाखविण्याचे निर्णय परिणामाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे असतात ते सांगतात. या तत्त्वाची उदाहरणे हिचकॉकवरच्या लेखातही येतात. प्रेक्षकांना कथेबरोबर नेण्याच्या कौशल्याचे वेगवेगळे अवतार आपल्याला स्पीलबर्गमध्ये पाहायला मिळतात. तो करीत असलेला तंत्रज्ञानाचा वापर कथेला पूरक असतो असे सांगून मतकरी म्हणतात की, तसे पाहिले तर हिचकॉक किंवा स्टॅनली क्युब्रिक यासारख्या दिग्गजांनी स्पीलबर्गहून काकणभर सरसच कामगिरी बजावली आहे. अशी एक इतिहासाची जाणीव मतकरींकडे आहे. ती ‘कलर पर्पल’विषयीचा वाद मांडतानाही दिसते. स्पीलबर्गच्या ‘जुरासिक पार्क’विषयी लिहिताना कादंबरीचं रूपांतर करताना त्यातील डी.एन.ए. क्लोनिंग, केऑस थिएरी विज्ञान भाषेसकट चित्रपटाच्या पूर्वार्धात वापरणाऱ्या स्पीलबर्गचे धाडस नोंदून मगच मतकरी ‘स्पेशल इफेक्ट’ची चर्चा करतात.
‘वाचोस्की बंधू : विज्ञान आणि तत्त्वज्ञान हा या संग्रहातला महत्त्वाचा लेख. याचे कारण वर्तमानकालीन चित्रपट समजून घेताना विज्ञान आणि तंत्रज्ञान यात अनेकदा गोंधळ केला जातो अथवा त्या योजलेल्या वैज्ञानिक टप्प्याची जाणच समीक्षकाला, प्रेक्षकाला नसते. मग आपण ‘सायन्स फिक्शन’ नावाची अपारदर्शी चिठ्ठी लावतो. पण या लेखात ‘मेट्रिक्स’ या चित्रपटाचे विश्लेषण करताना मतकरींनी आजच्या पिढीचे संगणकीय ज्ञान, त्याचा दृश्य प्रतिमांशी असणारा अन्वय आणि त्याही पलीकडे जाऊन प्राचीन तत्त्वज्ञांनी पकडलेल्या प्रश्नांचा चित्रपटाशी असलेला अन्वय विशद केला आहे. चित्रपट मालिकांविषयी फार महत्त्वाचे प्रश्न मतकरींनी याच लेखात नाही तर इतर लेखातही उपस्थित केले आहेत.
चित्रपट हे स्वायत्त माध्यम आहे आणि त्याचे स्वत:चे सौंदर्यशास्त्र आहे. याची जाणीव मतकरींना लख्खपणे आहे. पण चित्रपटकर्ता एका काळात- एका समाजात प्रगत असतो. अपरिहार्यपणे त्याच्या जगातील व्यूह चित्रपटात येतात. गणेश मतकरींनी इराणी चित्रपटाविषयी लिहिताना अथवा ‘भारताबाहेरचा भारतीय शामलन’ या लेखात चित्रपटाच्या सामाजिक- सांस्कृतिक मातीविषयी सखोल जाण व्यक्त केली आहे. आणि ती करताना त्यांच्या मनातील भारतीय चित्रपटांविषयीची सलही व्यक्त झाली आहे. ते लिहितात- ‘मजिदींकडून आज आपल्याला घेण्यासारखं आहे, ते केवळ पडद्यावरल्या चौकटीमधून आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यापेक्षा निश्चित अधिक आहे. ते आहे त्यांच्या विचारांच्या मोकळेपणात, मर्यादांचा सकारात्मक वापर करण्याच्या हिमतीत आणि कोणतीही उधारी- उसनवारी न करता घडवत आणलेल्या स्वत:च्या शैलीच्या सामर्थ्यांत.
मतकरींची लेखनशैली सहज आहे, पण सुलभीकरणाकडे वा सजावटीकडे त्यांचा कल नाही. अभ्यासकाच्या संयत वृत्तीने ते या विषयाकडे पाहतात, पण त्यांच्या मूल्यभानाला न पटणारी गोष्ट नि:संदिग्धपणे मांडतात. या पुस्तकाच्या रचनेत वर्तमानकालीन चित्रपटकर्ते घेऊन शेवटचा लेख बर्गमनवरचा देणे यात एक दृष्टिकोन आहे. मतकरी स्वत: एखाद्या दिग्दर्शकाविषयी विधान करायला दचकत नाहीत. पण एकदा चित्रपट हे आपले क्षेत्र मानल्यानंतर सतत शोधून प्रस्तुत चित्रपट पाहणे, इंटरनेटवरील माहिती, परीक्षणे यांच्याशी संपर्क ठेवणे, चित्रपटाविषयी ग्रंथवाचन करणे हे त्यांनी व्रत मानलेले दिसते. पण लेखनात या व्रतस्थपणाचे ओझे ते वाचकांवर टाकीत नाहीत. किंबहुना चांगल्या अर्थाने निरोगी मोकळी अशी दृष्टी त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या पुस्तकातील लेख वाचल्यावर आपल्याला कधी चित्रपट परत पाहावेसे वाटतील, कधी त्याविषयी अधिक वाचावेसे वाटेल. समीक्षेच्या पुस्तकाने आणखी काय करावे? हे लेख वाचीत असताना मात्र चित्रपट अभिनयाची चिकित्सा पुरेशी झाली नाही असे वाटले. याचा अर्थ मतकरी त्याविषयी लिहीत नाही असे नाही. काही प्रकारच्या चित्रपटात ताकदीचे अभिनेते असूनही दिग्दर्शकाला अभिनयाचा विनियोग करता येत नाही याविषयी ते लिहितात. पण पडद्यावरचा अभिनय या विषयावर मतकरी अधिक काही लिहितील अशी अपेक्षा होती.
गणेश मतकरी हा आजच्या युगातील मोकळ्या स्वतंत्र विचाराचा समीक्षक आहे. त्याच्याकडून यानंतरच्या काळात विशेष अपेक्षा आहेत.
पुस्तकाच्या अखेरीस काही महत्त्वाच्या चित्रपटांची आणि ग्रंथांची संदर्भसूची वाचकांना उपयुक्त ठरेल.
पुष्पा भावे
फिल्ममेकर्स: गणेश मतकरी,
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.
पृष्ठ १८६ (मूल्य २५० रु.)
(लोकसत्तामधून)

1 comments:

sushama August 12, 2010 at 10:41 AM  

छान सविस्तर परीक्षण आहे पुष्पाताईंचं.
माझ्या घरा जवळच्या डीव्हीडी लायब्ररीवाल्याला या पुस्तका बद्दल आणि त्याच्या शेवटी दिलेल्या चित्रपटांच्या यादी बद्दल सांगितल्यावर त्याने त्या यादीची झेरॉक्स मागून घेतली,चित्रपट खरेदीसाठी संदर्भ म्हणून.असे लायब्ररीवाले वाढायला हवेत.आता पुढचं पुस्तक कधी करतोस? रूपवाणीतील लेखांचं तर करच.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP