निवडणुकीचा खेळ आणि रिकाउंट

>> Wednesday, May 6, 2009"रिकाउंट' चित्रपटात बुश-गोर यांच्यातील निवडणुकीदरम्यानच्या तात्कालिक घडामोडी असल्या तरी आजचं राजकारण आणि त्यातल्या प्रवृत्ती यांचा संपूर्ण आढावा हा चित्रपट घेतो.

""सो डिड द बेस्ट मॅन विन देन?''
""अ‍ॅब्सलुट्ली''
""आर यू शुअर अबाऊट दॅट?''
""ऍज शुअर ऍज यू आर अबाऊट युअर मॅन.''
""आय होप यू आर राईट, मि. सेक्रेटरी. आय डू होप यू आर राईट.''

हा संवाद घडतो "रिकाउंट' चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगात. ऍल गोर कॅम्पचा प्रमुख रॉन क्‍लेन (केविन स्पेसी) आणि बुश कॅम्पचा प्रमुख निवृत्त सेक्रेटरी ऑफ स्टेट, जेम्स बेकर द थर्ड (टॉम वेल्किनसन) यांच्यामध्ये. 2000 च्या निवडणुकीत झालेल्या ऍल गोरच्या पराभवानंतर लगेच झालेल्या भेटीत. तेव्हा बुशच्या योग्यतेबद्दल खात्री देणाऱ्या बेकरना जर बुशच्या कारकिर्दीची कल्पना तेव्हाच झाली असती, तर ते आपल्या उत्तरात कचरले असते का? मला तसं वाटत नाही. किंबहुना त्यांच्याच उत्तराप्रमाणे त्यांना स्वतःला आणि क्‍लेनलाही आपापल्या उमेदवाराबद्दल खात्री असणं भाग होतं, नव्हे, त्यांच्या कामाची ती गरज होती. आता प्रश्‍न असा पडतो, की जेते आणि जित हे दोघे आणि त्यांचे आपापले पक्ष हे जर "ग्रेटर कॉमन गुड' हा प्रश्‍नच निकालात काढून निवडणुकांकडे एखाद्या खेळाप्रमाणे, ज्यात कोणत्याही पद्धतीने जिंकणं भाग आहे अशा खेळाप्रमाणे पाहत असतील, तर मुळात या निवडणुकीच्या प्रक्रियेलाच काही अर्थ आहे का?
"रिकाउंट'च्या पार्श्‍वभूमीला राहूनही सतत जाणवणारा हा प्रश्‍न आहे. 2000 चा अमेरिकन निवडणुकांचा निकाल आणि त्यामधून झालेली राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची निवड, ही नक्कीच अमेरिकन राजकारणाच्या सर्वात संदिग्ध निकालांपैकी एक मानली गेली पाहिजे. फ्लॉरिडामध्ये घोषित होणाऱ्या निकालाच्या अखेरच्या टप्प्यावर झालेले अनेक गोंधळ, बुशला असणारी अतिशय थोड्या मतांची आघाडी, मूळ मतदान प्रक्रियेत राहिलेल्या अन्‌ घडवलेल्या अनेक त्रुटी, मग त्यातून घडलेलं फेरमतमोजणीचं नाट्य हा "रिकाउंट'चा विषय. जरी यातल्या घटना एका विशिष्ट निवडणुकीदरम्यान घडलेल्या असल्या, तरी हा चित्रपट केवळ तत्कालीन घडामोडी सांगणारा आहे, असं म्हणणं योग्य नाही. आजचं राजकारण अन्‌ त्यातल्या प्रवृत्ती यांचा संपूर्ण आढावा हा चित्रपट घेतो. त्याचा रोख एका विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने आहे का? असेल कदाचित; पण त्यामुळे त्याच्या आशयाची तीव्रता कमी होत नाही.
रिकाउंटची कल्पना ही थोडी टॉम स्टॉपार्डच्या "रोझेन्क्रान्झ अँड गिल्डर्नस्टर्न आर डेड' या नाटकाची आठवण करून देणारी आहे. शेक्‍सपिअरच्या हॅम्लेटकडे दोन दुय्यम पात्रांच्या दृष्टिकोनातून, त्यांना नायक करून पाहणारं हे नाटक. (याच कल्पनेची खूपच विनोदी आवृत्ती म्हणजे "लायन किंग' चित्रपटाचा तिसरा भाग म्हणून ओळखला जाणारा "हकुना मटाटा'- ज्यात लायन किंगच्याच कथानकाला टिमॉन आणि पुम्बा या दुय्यम पात्राच्या, नायक सिम्बाच्या कॉमिक रिलीफ देणाऱ्या साइडकिक्‍सच्या दृष्टिकोनातून पाहण्यात येतं.) आता "रिकाउंट' काही कोणत्या आधी येऊन गेलेल्या नाटका/ चित्रपटाची आवृत्ती नाही, पण जेव्हा आपण बुश, ऍल गोर यांच्यामधल्या निवडणुकीची अन्‌ त्यातून उद्‌भवलेल्या वादाची ही गोष्ट आहे असं म्हणतो, तेव्हा साहजिकच त्या दोघांना महत्त्वपूर्ण भूमिका असण्याची शक्‍यता तयार होते. प्रत्यक्षात इथे मात्र ती दोघं जवळजवळ अदृश्‍य आहेत. काही मोजक्‍या दृश्‍यांत त्यांचं ओझरतं दर्शन आहे आणि प्रत्यक्ष घटनांदरम्यानचं जे न्यूज फुटेज इथे वापरण्यात आलं आहे, त्यातही ही दोघं दर्शन देतात. मात्र लढा जरी त्यांच्या नावानं दिला गेला तरी त्यांचे सेनापती हेच इथले नायक आहेत. मघा उल्लेखलेला क्‍लेन ही चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे, तर बेकरची भूमिका थोडी लांबीने लहान पण तेवढीच महत्त्वपूर्ण आहे.
तिसरी महत्त्वाची, मात्र खूपच छोटी भूमिका आहे फ्लॉरिडाची तेव्हाची सेक्रेटरी ऑफ स्टेट कॅथरिन हॅरिस (लॉरा डर्न) हिची. छोटी असूनही ही सर्वाधिक स्मरणात राहणारी भूमिका आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक तर मूळच्या कॅथरिन हॅरिसचं या फेरमतमोजणी प्रकरणातलं स्थान महत्त्वाचं आहे. घडणाऱ्या घटनांवर ताबा नसणं, स्वतःवर पडलेल्या जबाबदारीचं भान नसणं, आपण प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहोत हा गैरसमज, या तीन गोष्टी या व्यक्तिरेखेच्या विशेष आहेत. तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची हिंमत दाखवली असती, तर कदाचित या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. मात्र ते झालं नाही. भूमिका लक्षवेधी ठरण्याचं दुसरं कारण आहे ते लॉरा डर्नची उत्तम कामगिरी. तिच्या प्रत्येक वाक्‍यातून, मुद्राभिनयातून, संवाद बोलण्याच्या शैलीतून हॅरीसबाई प्रत्यक्ष जिवंत होतात. याचा पुरावा हा अखेरच्या श्रेयनामावलीत पाहावा. यात या निवडणुकांदरम्यान अस्सल फुटेज पाहायला मिळतं. डर्नची भूमिका पाहिल्यावर आपण या फुटेजमधल्या हॅरीसबाई अचूक ओळखू शकतो.
रिकाउंटचे पटकथाकार अन्‌ दिग्दर्शक हे एक सरप्राइज पॅकेज आहे. कारण या प्रकारच्या गंभीर नाट्यपूर्ण प्रयत्नासांठी नाव झालेली ही मंडळी नाहीत. इथली पटकथा आहे डॅनी स्ट्रॉंग यांची. जे अभिनेता (बफी द व्हॅम्पायर स्लेअर मालिकेसाठी) म्हणून परिचित आहेत. जे रोश यांनी दिग्दर्शनाचे यशस्वी प्रयत्न केले आहेत, पण तो मुख्यतः विनोदी (ऑस्टिन पॉवर्स मालिका) चित्रपटांमधून. या प्रकारचा प्रयत्न या दोघांकडून अनपेक्षित आहे म्हणून अधिकच उल्लेखनीय.
खरं तर जेव्हा रिकाउंट पाहायला बसलो, तेव्हा मला तो आवडेल, किंवा बांधून ठेवेल याची खात्री नव्हती. कारण राजकारणात मला फारसा रस नाही. आपल्याही नाही, मग बाहेरच्या तर सोडाच. त्यामुळे अमेरिकन इलेक्‍शन, सत्य घटनांवर आधारित असणं आणि उघड नाट्यपूर्ण घटनांपेक्षा तात्त्विक वाद केंद्रस्थानी असणं, या तिन्ही गोष्टी मला कथेत गुंतवतील अशी शक्‍यता दिसत नव्हती. मग चित्रपटाला हे जमलं कसं, तर त्याचं कारण आहे ते व्यक्तिरेखा/ दृष्टिकोन/ तपशील/ संदर्भ यांच्या चित्रपट घडवलेल्या मोन्ताजमध्ये. रिकाउंटमध्ये पटकथा लेखक/ दिग्दर्शकाने काही प्रमाणात स्वातंत्र्य जरूर घेतलं असेल, पण त्यांनी त्यासाठी जो अभ्यास केला आहे, तो जाणवणारा आहे. चित्रपट कुठेही कोणाही व्यक्तिरेखेच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरत नाही, प्रेक्षकांना भावनिक कल्लोळात गुंतवायचा प्रयत्न करत नाही. क्‍लेनला ऍल गोरने चीफ ऑफ स्टाफ पदावरून काढल्याचा एक संदर्भ, एवढंच त्याचं व्यक्तिरेखांच्या भूतकाळाशी नातं आहे. मग तो करतो काय, तर अनेक व्यक्तिरेखा, त्यांचं या निवडणुकांसंदर्भात असणारं स्थान, त्यांनी निवडलेली बाजू आणि त्यांचा त्याबाबतचा दृष्टिकोन या सगळ्यांना एकत्र जोडून एक संपूर्ण चित्र उभं करतो. हे पूर्ण चित्र हे मधल्या फळीचं आहे. त्यात ज्याप्रमाणे उमेदवारांना महत्त्वाचं स्थान नाही, तसंच जनतेलाही नाही. मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या या मंडळीचं चित्र खूप अस्सल आहे. आर्थर हेलीच्या एखाद्या उद्योगाचा पूर्ण अभ्यास करून लिहिलेल्या कादंबऱ्या ज्या प्रकारे आपल्याला गुंतवतात, तसाच हा चित्रपट गुंतवतो. त्यासाठी तुमचा गृहपाठ चोख असण्याची गरज नाही.
एक गोष्ट मात्र आहे, हे चित्र जसं अस्सल आहे, तसंच विदारक आहे. राजकारणी जनतेवर अवलंबून असले, तरी त्याचं अस्तित्व प्रत्यक्ष जनतेपासून किती डिस्कनेक्‍टेड आहे, हेदेखील इथे जाणवतं. जनतेच्या मतांचा इथला उल्लेख हा जनतेला काय वाटतेय, या विषयीचा नसून, त्याला केवळ संख्याशास्त्रीय महत्त्व आहे. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद, त्यांच्या क्‍लृप्त्या यादेखील अखेर नंबरशीच जोडलेल्या आहेत. कोणते पान या खेळाचे नियम पाळते आणि कोणते ते वाकवते यावर एकमत नसेल, मात्र शेवटी हा खेळ आहे यावर कोणाचंच दुमत नाही. नेत्यांच्या वचनांमधला जनतेचा कळवळाही विजयाचा आनंद किंवा पराजयाची निराशा लपवण्याचाच एक मार्ग आहे.
अर्थात अमेरिकेसारख्या देशात- जिथे भाषणस्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य अशा गोष्टी खरोखरच मानल्या जातात, तिथे निदान यावर चित्रपट येऊ शकतात. आपल्याकडे जर असा खरोखर गंभीर स्वरूपाचा प्रयत्न झाला तर त्याचं भवितव्य काय असेल, हे वेगळं सांगायला नको.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP