`इझी ए`- अपेक्षित अन् अनपेक्षितही

>> Sunday, December 12, 2010

आपल्याकडे तथाकथित `तरूणाई`शी संबंध जोडणारे चित्रपट हे ब-यापैकी मोनोटोनस असतात, हे आपल्याला माहीतच आहे. क्वचित सोशिओ-पोलिटिकल छटा असणारे `दिल, दोस्ती एटसेट्रा`, `रंग दे बसंती` किंवा गुलाल सारखे चित्रपट सोडले, तर कॉलेजवयीन मुलांचे चित्रपट म्हणजे केवळ रोमान्स असा निष्कर्ष काढता येईल. पूर्वी वर्षानुवर्ष कॉलेजवयीन मुलांच्या भूमिका करणारे नायक जाऊन हल्ली खरोखरची तरूण मुलं आली, किंवा वाढत्या वयावर पळवाटा काढण्यासाठी बॅक टू स्कूल फॉर्म्युला वापरणं (मै हू ना) किंवा कॉलेजचं वय उलटल्याचं नायकाने मान्य करणं (रंग दे बसंती) असे उपाय सुरू झाले, किंवा निदान या भूमिका साकारण्यासाठी जीवतो़ड मेहनत करण्याची तयारी नायक दाखवू लागले (थ्री इडिअट्स) हीच काय ती प्रगती. मात्र मूळात कॉलेजला ख-या जगाचंच एक संक्षिप्त रूप मानून त्यात वेगवेगळे विषय आणणं आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसत नाही. याऊलट आपल्यालाच समांतर असणा-या अमेरिकन सिनेमात (यात हॉलीवूडबरोबर इन्डिपेन्डन्ट सिनेमा देखील आला.)मात्र ब-याच प्रकारे या तरुण मुलांचं विश्व हाताळलेलं दिसतं. त्यांच्याकडेही हायस्कूल कॉमेडीज हा सर्वात लोकप्रिय, अन् ब-यापैकी निर्बुद्ध प्रकार आहेच. मात्र अनेक दिग्दर्शकांनी त्यापलीकडे जाऊन त्यांच्या तरुणाईकडे पाहिलेलं आहे. हायस्कूलमधल्या राजकारणाला तिरकसपणे पाहणारा अलेक्झांडर पेनचा `इलेक्शन` (१९९९), शेक्सपिअरच्या ऑथेल्लोला हाय स्कूल बास्केटबॉलच्या पार्श्वभूमीवर सांगणारा टिम ब्लेक नेल्सनचा `ओ`(२००१), विनोदाच्या आवरणाखाली स्त्रीवादी भूमिका जपणारा रॉबर्ट ल्यूकेटीकचा `लिगली ब्लॉन्ड` (२००१) हायस्कूल शूटिंगसारख्या विदारक घटनेकडे कोणत्याही उपदेशाशिवाय पाहणारा गस व्हान सान्तचा `एलिफन्ट` (२००३). डिटेक्टिव्ह फिक्शन आणि फिल्म न्वारचे सर्व विशेष महाविद्यालयात आणणारा रायन जॉन्सनचा `ब्रिक`(२००५) अन् कुमारी मातेच्या प्रश्नाकडे अतिशय मोकळ्या नजरेने पाहणारा जेसन राईटमनचा `जुनो`(२००८) ही काही हल्लीची महत्त्वाची उदाहरणे पाहिली, तरी आपल्याला दिसेल की तरुणांचं जग किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं.
जुनोच्या पठडीतलाच मोकळा ढाकळा दृष्टिकोन घेऊन आलेला दिग्दर्शक विल ग्लुकचा `इझी ए`(२०१०) हा याच तरूण परंपरेतला पुढचा महत्त्वाचा चित्रपट म्हणता येईल.
मी जेव्हा `इझी ए`चं नाव ऐकलं, अन् तो हायस्कूलमधे घडणारा असल्याचं ऐकलं, तेव्हा नावातल्या `ए`चा अर्थ, मी अर्थातच ग्रेडशी लावला. प्रत्यक्षात मात्र त्याचा ग्रेडशी काही संबंध नाही. नेथॅनीएल हॉथॉर्नची `द स्कार्लेट लेटर` ही कादंबरी वाचलेल्यांना, किंवा निदान तिच्यावर आधारलेल्या चित्रपट पाहिलेल्यांना (`इझी ए`च्या नायिकेच्या सल्ल्यानुसार `ओरिजिनल, नॉट दी डेमी मूर व्हर्जन`) `ए` चा आणखी अर्थ माहीत आहे, जो इथे अपेक्षित आहे. किंबहूना असं सहज म्हणता येईल की, `द स्कार्लेट लेटर`  हे `इझी ए`मागचं इन्स्पिरेशन आहे, स्फूर्ती आहे. हे रूपांतर नाही, किंवा ओ प्रमाणे केवळ पार्श्वभूमी बदलण्याचा प्रयत्न नाही, मात्र दोन्ही ठिकाणी विचारण्यात आलेल्या नैतिक प्रश्नांमध्ये साम्य आहे, घटनाक्रमात नसलं तरीही.
चित्रपटाची नायिका ऑलिव्ह पेन्डरगास्ट (एमा स्टोन) एका चारित्र्यवान ओल्ड स्कूल शाळेची विद्यार्थिनी आहे. अतिशय साधी. कोणाच्या अध्यात वा मध्यात नसणारी. एकदा आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या समाधानासाठी ऑलिव्ह आपल्या
`सेक्शुअल एन्काउन्टर`ची काल्पनिक कथा सांगते. ही कथा शाळेच्या नीतीमूल्यांच्या वसा घेतलेल्या मेरीअ‍ॅनच्या कानावर पडते, अन् अक्षरशः क्षणार्धात (या अफवेचा शाळेतला प्रसार दाखविणारी छायाचित्रणातील क्लृप्ती उल्लेखनीय) ऑलिव्ह भलतीच लोकप्रिय होते. तीदेखील अगदीच चुकीच्या कारणांसाठी.
कशीही का असेना, पण ही लोकप्रियता ऑलिव्हला आवडायला लागते. आपल्या शब्दांचा वापर ती काही निरूपद्रवी मुलांना, त्यांच्याच विनंतीवरून, प्रकाशझोतात आणण्यासाठी करायला लागते. सुदैवाने तिचे पालक, हे जुनोच्या आदर्श पालकांप्रमाणेच अतिशय भले असतात, अन् आपल्या मुलीवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. याच सुमारास शाळेत अभ्यासाला लावलेल्या हॉथॉर्नच्या पुस्तकातल्या बदनाम नायिकेबद्दल तिला सहानुभूती वाटायला लागते. `अ‍ॅडल्टरी`चं प्रतीक म्हणून कादंबरीच्या नायिकेला आपल्या कपड्यांवर नाइलाजाने मिरवावा लागणारा `ए` ऑलिव्ह स्वतःहून स्वीकारायचं ठरविते आणि शाळेतल्या संस्कृतीरक्षकांच्या काळजाच्या ठोका चुकतो.
`इझी ए`चा विषय हा तितका सोपा नाही. एकतर तो रोमान्स किंवा कॉमेडी या दोन्हीचे संकेत पाळत नाही. दुसरं म्हणजे, तो स्कार्लेट लेटरसारख्या आजच्या नव्वद टक्के तरुण पिढीने न वाचलेल्या पुस्तकाचा (अन् पंचाहत्तर टक्के तरूण पिढीने न पाहिलेल्या चित्रपटांचा) आधार घेतो. तिसरं म्हणजे विनोद अन् नाट्य या परिचयाच्या गोष्टी त्यात असल्या तरी त्यातला आशय हा मुळात प्रगल्भ मुद्द्यांना स्पर्श करणारा आहे. पाप म्हणजे काय ? नीतीमत्ता ही दृष्टिकोनावर ठरू शकते का ? आजच्या समाजात प्रसिद्धीची किंमत कोणती ?  लोकप्रियता ही सर्व दुखण्यांवर इलाज ठरू शकते का ?  चेहरा आणि मुखवटा यांतलं श्रेष्ठ काय अन् ते ठरविण्याचं परिमाण कोणतं ?  असे अनेक प्रश्न या चित्रपटात विचारले जातात. चौथं म्हणजे... पण जाऊ दे. मुद्दा असा की, त्याचा विषय हा नेहमीच्या सरावाच्या प्रेक्षकांना पटकन झेपेलसा नाही.  मात्र लेखक बर्ट व्ही रॉयल यांनी ओळखीची भाषा आणि रचना वापरणा-या पटकथेतून आणि दिग्दर्शक विल ग्लुक यांनी स्मार्ट सादरीकरणातून हा परकेपणा लपवण्याचं काम यशस्वीपणे केलं आहे.
चित्रपटाचा स्मार्टनेस हा श्रेयनामावलीपासूनच सुरू होतो. शाळेच्या बाहेरच्या भागात जमिनीवर पसरलेल्या नावांमधून चाललेली विद्यार्थ्यांची धावपळ अन् त्याला लागून येणारं ऑलिव्हचं थेट प्रेक्षकांना उद्देशून केलेलं निवेदन हे आपल्याला लगेच चित्रपटात खेचून नेतं. गंमत म्हणजे ते प्रेक्षकांना उद्देशून नसूनही, तसं असल्याचा आभास आहे. प्रत्यक्षात ते तसं वाटण्याचंही उत्तम स्पष्टीकरण चित्रपटाच्या अखेरीस आपल्याला मिळतं. मात्र सुरुवातीला आपण गुंतण्यासाठी हा आभास योग्य ठरतो. ऑलिव्हच्या बोलण्यातला उपहास, त्यातले एकाचवेळी येणारे आधुनिक (इफ गुगल अर्थ वॉज ए गाय...) अन् सांस्कृतिक (हकलबरी फिन प्रकरण, स्कार्लेट लेटर) संदर्भ आपल्या निवेदनाची तिने प्रकरणात केलेली विभागणी अन् त्यांना दिलेली लांबलचक नावं (उदा द शडर इन्ड्युसिंग अ‍ॅण्ड क्लिशेड, हाऊएव्हर टोटली फॉल्स अकाउंट ऑफ हाऊ आय लॉस्ट माय व्हर्जिनिटी टू ए गाय अ‍ॅट कम्युनिटी कॉलेज), निवेदन केवळ ध्वनीरूप नसून नाटकातल्या स्वगताप्रमाणे (अन् अर्थातच वेबकास्टप्रमाणे देखील) दृश्य रुपातही असणं या सगळ्यांचा प्रेक्षकाची ऑलिव्हशी मैत्री
होण्यात महत्त्वाचा हात आहे. एकदा का ही मैत्री झाली की आपण ऑलिव्ह काय म्हणते, ते लक्षपूर्वक ऐकतो. ऑलिव्हची कथा ही फूलप्रूफ नाही. होणा-या गोंधळात तिचीही भरपूर चूक आहे. मात्र ती चूकच आहे, मुळात ही मुलगी फार सज्जन आणि थोडी हेडस्ट्राँग आहे, हे आपल्याला पटणं हे एकूण चित्रपटच आपल्याला पटण्यासाठी गरजेचं. एकदा हे झालं की, चित्रपटाने अर्धी बाजी मारलीच.
(`इझी ए` हा एकाचवेळी अपेक्षित अन् अनपेक्षित अशा दोन पातळ्यांवरून पुढे सरकतो. त्याच्या नायिकेचं निष्पाप, अन् कुमारिका असणं हे तसं कन्व्हेन्शनल आहे. (मुळात स्कार्लेट लेटरच्या नायिकेमधेही ते या प्रमाणात नाही.) ते जपण्यासाठी चित्रपट जंग जंग पछाडतो. त्याचवेळी संवाद,संदर्भ अन् प्रौढ व्यक्तिरेखांच्या वागण्या बोलण्यात तो फारच मोकळा आहे. होमोसेक्शुअ‍ॅलिटीकडे पाहण्याची नजर, ऑलिव्हच्या पालकांचा भूतकाळ, गायडन्स कौन्सिलरचा स्वैराचार अशा बाबतीत तो सर्व नियम मोडीत काढणारा आहे. मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वातला हा दुभंग आपल्याला प्रथमदर्शनी जाणवू न देणं ही त्याची हुशारी.
मी विकिपिडीआवर वाचलं की, पटकथाकार रॉयल यांनी अभिजात साहित्यकृतींचा आधार घेणा-या अन् एकाच हायस्कूलमध्ये घडणा-या तीन पटकथा लिहिल्या आहेत. स्कार्लेट लेटरचा आधार घेणारी `इझी ए` ही त्यातली पहिली. इतर दोन आहेत `सिरानो द बर्जराक` (आपल्याकडला साजन) अन् डिकन्सची अपूर्ण कलाकृती `द मिस्टरी ऑफ एडविन ड्रूड` एकाच शाळेत घडल्याने काही पात्रांची देवाणघेवाणही इतर दोन चित्रपटांमध्ये शक्य आहे. अर्थात हा प्रयोग अजूनतरी अपुराच आहे. जर पूर्ण झाला तर तो वैशिष्ट्यपूर्ण ठरेल हे नक्की. जरी झाला नाही, तरी या प्रयोगाच्या निमित्ताने `इझी ए`सारखा चांगला चित्रपट बनला हे काय कमी आहे.?
- गणेश मतकरी. 







(तरुणाईशी संबंध जोडणा-या सिनेमांचे पुढील लेख वाचायचे असल्यास कंसातील महिन्यांच्या ब्लॉग पोस्ट काढा अथवा गुगल सर्चला द्या. )
ब्रिक- शाळेच्या आवारात पोचवणारा (मार्च २००८)
जुनो - एक हट्टी मुलगी (मार्च २००८)
`एलिफन्ट` - हत्ती आणि आंधळे (मार्च २००८)
 `ओ`- हायस्कूलमधला ऑथेल्लो (एप्रिल २००८)
इलेक्शन- वर्मावर बोट ठेवणारा इलेक्शन (मे २००९)

2 comments:

Abhijit Bathe December 13, 2010 at 1:27 PM  

Finally! निदान याच ब्लॉगवरचे संदर्भ इथेच मिळतील!
क्लूनीचा ’द अमेरिकन’ पहायला गेलो होतो तेव्हा ’ईझी ए’ ची पहिली पंधरा मिनिटं पाह्यली होती. बायकोला एवढा आवडला कि ती म्हणे तु एकटाच जा ’अमेरिकन’ पहायला.
एनीवे - पिक्चर पाहिल्यावर अधिक.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP