सोर्सकोड- हाच खेळ उद्या पुन्हा
>> Sunday, April 24, 2011
चित्रपट हे सामान्यत: एका ठरावीक रचनेचा आधार घेताना आपल्याला दिसतात. पात्राची मूळ परिस्थिती तपशिलात मांडणं, त्यानंतर ती परिस्थिती बदलून जाईल अशी काहीशी अडचण तयार करणं आणि पुढे परिस्थिती पुन्हा स्थिरस्थावर बनवणं असा ढोबळ आकार आपल्याला बहुतेक चित्रपटांत दिसून येतो. या चित्रपटांचा दृष्टिकोन ठरवणारे प्रोटॅगनिस्ट्स किंवा प्रमुख पात्रं, या कथेदरम्यान बदलत जातात, बहुधा सकारात्मक पद्धतीने. प्रेक्षक या पात्रांशीच समरस होत असल्याने, चित्रपटाचा शेवट हा त्यांना एक दिलासा मिळवून देणारा ठरतो. व्यावसायिक चित्रपट हे गेली अनेक वर्षे, या परिचित आराखडय़ाची मदत घेताना दिसून येतात. मात्र रचना प्रस्थापित असली, तरी ती बदलता येत नाही असं थोडंच आहे? प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अफिरा कुरोसावा यांनी त्यांच्या ‘राशोमॉन’ (१९५०) नावाच्या गाजलेल्या चित्रपटात या रचनेला एक मूलभूत धक्का देऊन पाहिला. कथा सरळसोट पद्धतीने पॉईंट एपासून पॉईंट बीपर्यंत नेण्याऐवजी, त्यांनी एक प्रसंगमालिका योजली, जिची चित्रपटभर पुनरावृत्ती होत जाईल, मात्र ही पुनरावृत्ती होईल ती वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टिकोनामधून.
‘राशोमॉन’ एका गुन्ह्य़ाशी संबंधित होता. गुन्हेगार, बळी आणि साक्षीदार यातल्या प्रत्येकाच्या नजरेतून कुरोसावा ही घटना आपल्यापुढे मांडतो. मात्र कोणत्याही क्षणी तो आपल्याला त्रयस्थ निवेदकाच्या भूमिकेतून ‘असं असं झालं’ असं सांगत नाही. त्यामुळे खरोखर काय झालं, हे सत्य आपल्यापुढे येतच नाही. आपल्यापुढं येते, ती दर पात्राची आवृत्ती, त्याचं आपल्यापुरतं सत्य. कुरोसावाची ही क्लृप्ती जशी आपल्याला सत्याच्या व्यक्तिसापेक्ष असण्याबद्दल सांगते, तशीच ती मनुष्यस्वभावाबद्दलही बोलून जाते. अंतिमत: प्रेक्षक त्यातल्या पुनरावृत्तीने गोंधळत नाहीत, तर त्यातल्या आशयाने प्रभावित होतात.
‘राशोमॉन’ने ज्या आत्मविश्वासाने ही सरळसोट निवेदनाचा पर्याय असलेली रचना पुढे आणली, तो आत्मविश्वास या डिव्हाईसला अजरामर करून गेला. या प्रकारची पुनरावृत्ती साधणारा पटकथेचा खेळ पुढे अनेक महत्त्वाच्या दिग्दर्शकांनी आपल्या कामात करून पाहिला. गंमत म्हणजे, रचनेत साम्य असूनही या चित्रपटांचे प्रकार, त्यांचे हेतू वेगवेगळे होते. या दिग्दर्शकांना जे म्हणायचंय त्यातही साम्य नव्हतं.
मर्यादित जागेत आपण या प्रकारच्या सर्वच चित्रपटांचा उल्लेख तर आणू शकत नाही, पण काही नावं न टाळण्यासारखी. १९८१च्या ‘ब्लाईन्ड चान्स’मध्ये दिग्दर्शक क्रिस्टॉफ किसलोवस्कीने या प्रकारची युक्ती राजकीय, सामाजिक विचार मांडण्यासाठी केली. किसलोवस्कीच्या नायकाचा ट्रेन पकडण्याचा यशस्वी वा अयशस्वी प्रयत्न त्याच्या आयुष्याला दर खेपेला वेगळ्या प्रकारची वळणं देताना आपल्याला पाहायला मिळाला. १९९८ मध्ये आलेल्या टॉम टायक्वरच्या ‘रन लोला रन’मध्ये आणि पीटर हॉवीटच्या ‘स्लायडिंग’ डोअर्स’मध्ये आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्याला किती वेगळ्या संधी देऊ करतो हे दाखवलं होतं. या दोन्ही चित्रपटांना ठळक कळण्याजोगा रोमॅन्टिक अँगल होता, मात्र तत्त्वज्ञानात अनेक वर्ष चालत असलेल्या ‘फ्री विल का डिटर्मिनिझम?’ या वादाचा अंतप्रवाह या दोन्ही चित्रपटांत होता. आपण आपला मार्ग स्वत: निवडू शकतो वा आपण पूर्वनियोजित मार्गावरचे प्रवासी आहोत, हा प्रश्न या दोन्ही चित्रपटांना पडलेला होता. हॅरॉल्ड रामीसच्या ‘ग्राऊन्डहॉग डे’ (१९९३) मध्ये तर पुनरावृत्तीची कमाल होती. स्वत:च्या वागणुकीनेच आपलं आयुष्य नासवणाऱ्या यातल्या नायकाला नियती एका विशिष्ट दिवसात अडकवून ठेवते. हा एकच दिवस त्याच्या आयुष्यात पुन:पुन्हा येत राहतो, त्यातून सुटण्याचा मार्ग हा केवळ त्याने आपली वागणूक सुधारण्यावर अवलंबून असतो.
२००५ मध्ये कोरी एडवर्ड्सनने केलेला ‘हूडविन्क्ड’ हा अॅनिमेटेड चित्रपट तर मूळ ‘राशोमॉन’कडेच निर्देश करणारा होता. इथली प्रमुख घटना, ही रेड रायडिंग हूडची परिकथा होती, तर सत्याच्या आपापल्या आवृत्त्या सांगणारे होते, ते रेड रायडिंग हूड, तिची आजी, लाकूडतोडय़ा आणि लांडगा.
हे सारं आता आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच या रचनेचा छान प्रयोग पुन्हा एकदा पाहायला मिळाला ‘मून’ चित्रपटात लक्षवेधी कामगिरी करणारे दिग्दर्शक डंकन जोन्स यांच्या ‘सोर्स कोड’ या चित्रपटात.
‘सोर्स कोड’चा बाह्य़ाकार हा विज्ञानपटाचा आहे, मात्र केवळ विज्ञानपटाचा नाही. विज्ञान, तत्त्वज्ञान यांच्या सढळ वापराबरोबर तो डिटेक्टिव्ह फिक्शन आणि अॅक्शन थ्रिलर या प्रकारांचाही पटकथेत शिरकाव करून देतो. याबाबतीत त्याचं ‘मेट्रिक्स’शी साम्य आहे. (यापलीकडे जाणाऱ्या, नायकाच्या खऱ्या ओळखीशी संबंधित आणखी एका गोष्टीचंही मेट्रिक्सशी खूप साम्य आहे. मात्र मी सगळ्याच गोष्टी सांगून टाकल्या तर चित्रपटाने गुंफलेल्या रहस्यालाच अर्थ उरणार नाही.)
चित्रपट सुरू होतो, तेव्हा शॉन (जेक गेलनहाल) ट्रेनमध्ये जागा होतो. एक सुंदर मुलगी त्याने दिलेल्या छान सल्ल्याबद्दल त्याचे आभार मानत असते. शॉन गोंधळतो. त्याचं एक कारण हेही असतं की, तो शॉन नसून कोल्टर स्टीव्हन्स नावाचा सैन्याधिकारी असल्याची त्याची खात्री असते. त्याच्या या आठवणीला आरशातलं अनोळखी प्रतिबिंब खतपाणीच घालतं. अफगाणिस्तानातली रणभूमी सोडून आपण इथे कसे पोचलो या विचारात तो असतानाच ट्रेनमध्ये प्रचंड स्फोट होतो. आता कोल्टर एका बंदिस्त खोलीत असतो. पडद्यावर त्याला दिसते कोलीन गुडविन (व्हेरा फार्मिगा). गुडविनच्या सांगण्यातून जे काही थोडं फार कळतं, ते गोंधळ अधिक वाढवणारं असतं. तिच्या म्हणण्यानुसार कोल्टरने पाहिलेला अपघात हा काही काळापूर्वी झालेला असतो. सोर्स कोड या मिलिटरी प्रोग्रॅमच्या मदतीने वैज्ञानिकांनी ट्रेनमधल्या ‘शॉन’ या प्रवाशाच्या अखेरच्या आठ मिनिटांच्या आठवणींवर ताबा मिळवलेला असतो आणि या आठवणीत कोल्टरचा शिरकाव करून देऊन अपघातामागे कोणाचा हात होता ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न असतो. जवळजवळ बंदिवान असलेल्या कोल्टरपुढे दुसरा मार्ग उरत नाही. पुन:पुन्हा शॉन बनून तीच आठ मिनिटं पुन:पुन्हा जगणं हेच आता त्याचं काम होऊन बसतं.
एक गोष्ट पहिल्या प्रथम स्पष्ट व्हावी, की सोर्स कोड जितके प्रश्न उपस्थित करतो, तितके तो सोडवत नाही. त्याचं विज्ञान हे फूल प्रूफ नाही. मात्र हेदेखील खरं की, ‘देजा वू’सारख्या चित्रपटात जसा एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचा वापर (उदाहरणार्थ कालप्रवास) असतानाही, अंतिम परिणाम अॅक्शनपटाचा होतो, तसं सोर्स कोड करीत नाही. फ्री विल/ डिटर्मिनिझम, समांतर विश्व, कालप्रवास असे विज्ञान/ तत्त्वज्ञानाशी संबंधित अनेक मुद्दे तो सुचवत राहतो, बाजूने वा विरोधात युक्तिवाद करीत राहतो.
हा हाय कन्सेप्ट चित्रपट आहे अन् इतर संकल्पनांबरोबरच इथे लक्षात घेण्याजोगी आणखी एक संकल्पना म्हणजे अनरिलाएबल नरेटरची. इथे कथा उलगडत जाते ती कोल्टरच्या दृष्टिकोनातून. मात्र कोल्टर स्वत:च इतका गोंधळलेला आहे की, त्याला स्वत:विषयीच फार मर्यादित गोष्टी माहीत आहेत. त्याला काय ठाऊक आहे, याहून त्याला काय जाणवतंय हे अधिक महत्त्वाचं आणि हे जाणवणं इथे बहुतेक प्रसंगी निवेदनाची दिशा ठरवितं. कोल्टरच्या अज्ञानाबरोबर गुडविनचं माहिती लपवणं आणि रहस्यमय डॉक्टर रुटलेजचं (जेफ्री राइट) आगेमागे फिरतं राहणं, हे इथला खऱ्या-खोटय़ाचा खेळ रंगता ठेवतं. पात्रांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठीही.
गेल्या काही वर्षांत म्हणजे गेल्या शतकाअखेरच्या डार्क सिटी, एक्झिस्टन्झ, मेट्रिक्सपासून आताच्या शटर आयलण्ड, इन्सेप्शनपर्यंत पाहता एक लक्षात येईल की, पूर्वीप्रमाणे थ्रिलर्स हे केवळ भौतिक अस्तित्वावर अवलंबून नाहीत, तर कल्पित वास्तव हे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका पार पाडतंय. वास्तवाचा आभास हे या चित्रपटाचं नवं वास्तव झालंय. या वास्तवाचे काही नियम ठरू पाहताहेत (अर्थात मेट्रिक्समधल्या मॉर्फिअसकडून सल्ला घ्यायचा तर यातले काही नियम वाकवता येतात, तर उरलेले मोडता!) त्याचं स्वत:चं तर्कशास्त्र बनायला लागलंय, हे तर्कशास्त्र पुढे नेणाऱ्या चित्रपटांतला एक महत्त्वाचा नवा दुवा म्हणजे ‘सोर्स कोड’ गेमचेंजर नक्कीच नव्हे पण आपलं डोकं चालतं ठेवणारा, आपल्या विचारांना खाद्य पुरविणारा, राशोमॉनने सुरू केलेला जुनाच खेळ पूर्ण विचारांनी नव्याने मांडणारा.
-गणेश मतकरी.
(लोकसत्तामधून- सोर्सकोड या आठवड्यामध्ये भारतीय चित्रगृहांत प्रदर्शित होत आहे.)
Read more...