कॅबिनेट ऑफ डॉ. कॅलिगरी(१९२०)

>> Sunday, April 3, 2011

चित्रपटाचं आजचं स्वरूप हे एक रंजक कथानक मांडणारं माध्यम असं असलं, तरी चित्रपटाच्या जन्मापासून त्याला तो आकार आलेला नव्हता. १८९५मध्ये आपल्या चित्रपटांचा पहिला जाहीर खेळ करणा-या आणि या माध्यमाचे जनक मानल्या जाणा-या लुमिएर बंधूंनाही ते इतका टिकाव धरेल याची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांचं स्वतःचं काम हे त्या दृष्टीने पुढे गेलेलं दिसत नाही. रोजच्या आयुष्याचं प्रतिबिंब दाखवणारा अन् वेळोवेळी प्रेक्षकांना त्यांच्या आटोक्याबाहेरच्या प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविणारा सिनेमाच त्यांना अपेक्षित होता. या दृष्टिकोनात बदल घडवून आणून चित्रपटांना करमणुकीसाठी वापरलं ते मेलिएस या जादुगाराने. त्याने आपल्या जादुच्या खेळापासून छोटी मोठी कथानकं मर्यादित वेळात सांगण्यापर्यंत बरेच प्रयोग केले, पण तरीही कथेच्या निवेदनाचे संकेत ठरायला खूप वर्षे गेली. बर्थ आँफ नेशन आणि इनटॉलरन्स या चित्रपटांसाठी इतिहासात कायम झालेल्या डी.डब्ल्यू ग्रिफिथ यांनी चित्रभाषेला आणलेली शिस्त या दृष्टीने थोडी फायद्याची ठरली, पण अजून विविधतेला वाव होता. १९२०चा जर्मन चित्रपट हा या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो, तो त्याने निवेदनात आणलेल्या वेगळेपणासाठी आणि या वेगळेपणाचा संबंध त्यातल्या दृश्यचमत्कृतीबरोबर लावण्यासाठी.
दिग्दर्शक रॉबर्ट वाईनचा कॅलिगरी पडद्यावर येण्याचा काळ हा विलक्षण होता. पहिलं महायुद्ध सुरू होण्याआधी असणारी जर्मन चित्रपटांची केविलवाणी स्थिती उफा (ufa) या सरकारी संस्थेने देऊ केलेल्या पाठिंब्याने सुधारली होती. असं असूनही जर्मनीला असणा-या जागतिक विरोधाने त्यांच्या चित्रपटाला जगभर मान्यता नव्हती. अनेक जर्मन नागरिक हे देखील युद्धाच्या विरोधात असूनही त्यांची बाजू कोणी मांडू शकत नव्हतं. या काळात जर्मन चित्रपटांना इतर देशांमधून मागणी येण्यासाठी काय उपाय करावेत हा प्रश्न तात्कालिन चित्रकर्त्यांना पडला होता.
त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर केला जायला लागला. यातलीच एक क्लृप्ती होती `कॅबिनेट ऑफ डॉ कॅलिगरी`मध्ये केलेला एक्स्प्रेशनिस्ट प्रतिमांचा वापर.
एक्स्प्रेशनिस्ट चळवळ ही मुळात चित्रकलेत आली आणि पुढे वास्तुकलेपासून नृत्यापर्यंत सर्व कलाशाखांमध्ये पसरत गेली. एक्स्प्रेशनिझम आधीच्या रिअँलिझम आणि इम्प्रेशनिझम या चित्रशैलीचा वास्तवाशी खूप जवळचा संबंध होता. चित्राला वास्तवाचा आरसा म्हणून वापरायचं, अशीच पद्धत तोवर चालत आलेली होती. मात्र फ्रॉइडच्या मानसशास्त्रातल्या संशोधनाने प्रभावित झालेले चित्रकार हे वास्तवाचा नाद सोडून अंतर्मनाचा वेध घ्यायला लागले आणि एक्स्प्रेशनिझम ही मुक्त चित्रशैली अस्तित्त्वात आली. कॅलिगिरीने या शैलीचा वापर पहिल्या प्रथम चित्रपटात करून पाहिला.
आज जर आपण कॅलिगरी पाहिला तरीही त्यातला प्रयोग हा विक्षिप्त पण क्रांतिकारी वाटतो, मग जेमतेम वीस-पंचवीस वर्षे जुन्या माध्यमात त्याच अवतरणं, त्याकाळात किती धक्कादायक वाटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी.
या चित्रपटातील दृश्य ही वास्तवाशी नातं जोडण्याचा प्रयत्न मुळातच करीत नाहीत. गडद छटा आणि सावल्यांनी भरलेल्या या जगात दारं खिडक्यांपासून प्रत्येक गोष्ट ही परकी वाटणारी आहे. वस्तूंचे अपरिचित आकार, अनपेक्षित कोनांचा नेपथ्यातला वापर, वेशभूषांमधील गूढता या सर्वांमधून उभं राहणारं जग हे पूर्णतः आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. मात्र गंमतीची गोष्ट ही, की या चमत्कारिक दृश्ययोजनेमागेही एक पटण्यासारखं स्पष्टीकरण आहे. चित्रपटातल्या निवेदकाच्या भूमिकेशी जोडलेलं.
आपण जेव्हा एखादी कथा-कादंबरी वाचतो तेव्हा लेखकाने ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. यातील एक सर्वात लोकप्रिय पद्धत असते,ती सार्वत्रिक संचार असणा-या सार्वभौम, त्रयस्थ निवेदकाची. या निवेदकाला कथेतलं दर पात्र माहिती असतं, तो घडणा-या सर्व घटना एकाच वेळी जाणून असतो, कधी कधी पुढे घडणा-या गोष्टीही त्याला आधीच ठाऊक असतात. याउलट काहीवेळा निवेदन एका विशिष्ट पात्राच्या दृष्टिकोनातून केलं जातं. कधी त्याच्या तोंडून. पण नेहमीच नाही. इतरवेळी निवेदक हा या पात्राला केंद्रस्थानी ठेवतो, घटना त्याच्या दृष्टीने पाहतो. या पात्राच्या अपरोक्ष झालेले प्रसंग निवेदकही जाणत नाही, अन् ही गोष्ट कथेतलं नाट्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरते. कॅलिगरी पडद्यावर येईपर्यंत चित्रपट हे नेहमीच सार्वभौम निवेदनाच्या तंत्रातून घडविले जात. कॅलिगरीने हे बदलून दाखवलं. त्याने चित्रपट घ़डविला तो एका विशिष्ट पात्राच्या नजरेतून.
मुळात जेव्हा कॅलिगरीची संहिता लिहिली तेव्हा तिचा रोख जर्मन सरकारच्या विरोधातला. त्यांच्या अंदाधुंद कारभारावर टीका करणारा होता. पटकथाकार कॉर्ल मेयर आणि हान्स यानोविझ यांनी डॉ.कॅलिगरी या आपल्या सीझर या हस्तकाकरवी कृष्णकृत्य घडविणा-या खलनायकाची कथा ही कॅलिगरीला सरकारचं प्रतीक असल्याप्रमाणे मांडून रचली. चित्रपटाचा नायक आणि निवेदक फ्रान्सिस हा कॅलिगरीच्या कारवायांनी त्रस्त होतो, आणि या दोघांवर मात करायचं ठरवतो. पटकथाकारांची प्रतिकांची भाषा पुढे नेली, तर फ्रान्सिस ठरतो भाबड्या जनतेचं प्रतीक, तर सीझर सरकारी यंत्रणेचं. मात्र ही झाली पटकथाकारांची मूळ योजना. चित्रपट जेव्हा निर्माता, दिग्दर्शकाच्या हातात गेला, तेव्हा यात एक मोठा फरक झाला. निर्माता एरिक पॉमर अन् दिग्दर्शक रॉबर्ट वाईन यांची एक मोठी अडचण होती. ते लेखकांप्रमाणे सरकारच्या विरोधात उघड भूमिका घेऊ शकत नव्हते. मग त्यांनी पटकथेतल्या घटनांना एक वेगळी चौकट लावली. चित्रपटाच्या सुरूवातीला आपल्या मित्राला कॅलिगरीची गोष्ट सांगणारा फ्रान्सिस हा वेड्यांच्या इस्पितळातला एक रूग्ण आहे. असं अखेरच्या प्रसंगात उघड झालं, तर कॅलिगरी ठरला या रूग्णालयातला सज्जन प्रमुख. आता कथेतल्या रहस्याला छानदार ट्विस्ट एन्डिग मिळालं. सरकार काय म्हणेल हा प्रश्न निकालात निघाला, आणि गोष्टीचं स्वरूप एका मनोरूग्णाचे आभास असं बनल्याने वास्तवाशी नातं सोडणा-या एक्स्प्रेशनिस्ट शैलीचा वापर करायला चित्रकर्ते मोकळे झाले. थोडक्यात एका दगडात कितीतरी पक्षी!
१९१९मधे वापरली गेलेली ही युक्ती काळाच्या कितीतरी पुढे होती यात शंका नाही. या प्रकारे दिशाभूल करणा-या अनरिलाएबल नॅरेटर्सना वापरून आजही चित्रपट काढले जातात. युजवल सस्पेक्ट्स (१९९५), सिक्रेट विन्डो (२००४), अमेरिकन सायको (२०००) यासारखी या पठडीतील कितीतरी उदाहरणं आज देता येतील. या क्लृप्तीबरोबरच मूळ कथाबाह्य चौकट तयार करणारी फ्रेम स्टोरी, अन् शेवटाचा धक्का या दोन्ही तंत्राचाही पहिल्या प्रथम वापर करणारा कॅलिगरी आजही चित्रकर्ते आणि प्रेक्षक या दोघांनाही मोहात पाडू शकतो. २००५ साली दिग्दर्शक डेव्हिड ली फिशरने केलेला अतिशय प्रामाणिक रिमेक हा याचीच साक्ष आहे. रिमेकमधील पात्रं बोलतात अन् दृश्य भाग अधिक तपशीलात अन् अधिक तंत्रशुद्ध आहे. पण मूळ चित्रपटाचा ठसा पुसण्याचा जराही प्रयत्न इथे दिसून येत नाही.
कॅलिगरी हा जर्मन एक्स्प्रेशनिस्ट चळवळीतला सर्वार्थाने जमलेला चित्रपट. यापासून प्रेरित होऊन मुर्नाव, फ्रित्झ लान्ग यासारख्या गाजलेल्या दिग्दर्शकांनी आपले चित्रपट केले अन् पुढे या जर्मन दिग्दर्शकांची अमेरिकेकडे झालेली वाटचाल, ही फिल्म न्वार या अमेरिकन चळवळीला जन्म देणारी ठरली. या चळवळीचे वंशज, असणा-या सिनसिटी, ब्लॅक डालिआ, किस किस बॅन्ग बॅन्ग, द स्पिरीट, पब्लिक एनिमिज अशा निओ न्वार चित्रपटांमधून आपण जर्मन एक्स्प्रेशनिझमचे अन् पर्यायाने कॅलिगरीचे पडसाद उमटलेले आजही पाहू शकतो.
-गणेश मतकरी.

2 comments:

Ameya Girolla April 5, 2011 at 4:40 AM  

मस्त आहे ब्लॉग...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP