`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज` - युद्धानंतर...
>> Sunday, September 25, 2011
`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज` हे नाव थोडं फसवं आहे, आणि उपरोधाने भरलेलं. ते ज्या वाक्प्रचाराशी संबंधित आहे, तो एका प्रसंगात अनपेक्षितपणे आपल्या कानावर पडतो आणि आपण चमकतो. आपलं आयुष्य, आपल्या आजवरच्या जगण्याचा अर्थ आणि आयुष्याकडून आपल्याला असणा-या अपेक्षा यांचा ताळेबंद लावू पाहतो. बहुधा तो लागणार नाही, असं एका बाजूने वाटत असताना देखील!
`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज`ला युद्धपट म्हणता येणार नाही, कारण तो युद्धादरम्यान घडत नाही, मात्र युद्ध या चित्रपटाच्या केंद्रस्थानी जरूर आहे. त्याचे तीन नायक हे युद्धावरून आपल्या गावात परत आले आहेत. सैनिक म्हणून आपलं कर्तव्य त्यांनी यथायोग्य पार पाडलं आहे. त्यासाठी केवळ आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळच नाही तर इतरही गोष्टींचा त्याग त्यांना करावा लागला आहे. आता परत आल्यावर आपलं आयुष्य पूर्ववत सुरू करावं एवढीच त्यांची इच्छा आहे. मात्र मधे गेलेल्या काळाचं काय ? या काळात त्यांच्याशिवाय जग पुढे गेलं आहे, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या स्वतःमधेही बदल झाला आहेच. हा बदल विसरून समाजात आपलं स्थान पुन्हा मिळवणं शक्य होईल का, हा त्यांच्यापुढला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
व्हिएतनाम युद्धात सहभागी झालेल्या रॉन कॉविकच्या आत्मचरित्रावर आधारित असलेल्या ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित `बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै` ( Born on the Fourth of July) अनेकांनी पाहिला असेल. मात्र बेस्ट इयर्स... हा त्याच्या अनेक वर्ष आधी केलेला, आणि एका विशिष्ट हकिकतीपेक्षा अधिक प्रातिनिधिक पातळीवरून समाजात परत येऊ पाहाणा-या सैनिकांच्या समस्यांकडे पाहणारा चित्रपट आहे. तीन वेळा दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळविलेल्या विलिअम वायलर यांचा हा सर्वात महत्त्वाचा चित्रपट मानता येईल.
निर्माते सॅम्युअल गोल्डविन यांना `टाइम` मासिकातल्या एका लेखावरून या चित्रपटाची कल्पना सुचली, आणि प्रत्यक्ष पटकथेवर काम करण्यासाठी त्यांनी युद्ध पत्रकारितेत काम केलेल्या मॅककिनले कॅन्टर यांची मदत घेतली. मॅककिनलेनी आपला आशय व्यक्त केला तो `ग्लोरी ऑफ मी` नावाने प्रकाशित झालेल्या लघुकादंबरीमधून. पुढे या कादंबरीचं रॉबर्ट इ, शेरवुड यांनी पटकथेत रुपांतर केलं. मॅककिनले यांना आपल्या वॉर कॉरस्पॉन्डन्ट असतानाच्या अनुभवाचा फायदा नक्की झाला असणार, हे आपल्याला चित्रपटात उभ्या राहणा-या सैनिकांच्या आयुष्याच्या अनेक पैलूंवरून लक्षात येतं. सैनिकांची वये, युद्धापूर्वी असणारे त्यांचे व्यवसाय, समाजातलं स्थान आणि सैन्यातलं पद यामधे असणारी विसंगती आणि गणवेश उतरल्यानंतर त्यातून उदभवणा-या समस्या, मानसिक समस्या, अपंगत्वासारखे अधिक बिकट प्रश्न, कुटुंबाबरोबरच्या संबंधात संभवणारे बदल, अशा कितीतरी पातळ्यांवरून इथे सैनिकांबद्दल विचार केलेला दिसतो. या चित्रपटात सांकेतिक खलप्रवृत्ती दाखवणारं पात्र नाही, चित्रपटाची तशी गरजही नाही. मात्र एका परीने परिस्थिती हीच यातली खलप्रवृत्ती आहे, असं म्हणता येईल.
चित्रपटाच्या तीन नायकांच्या व्यक्तिरेखा या, या सा-या पैलूंचा काळजीपूर्वक विचार करून मांडलेल्या आपल्याला दिसतात. यातली सर्वात ज्येष्ठ व्यक्तिरेखा आहे, ती अॅल स्टीवन्सन (फ्रेड्रीक मार्च) याची. याचा सैन्यातला हुद्दा सार्जन्टचा, म्हणजे फार वरचा नव्हे, पण त्याचा मूळ व्यवसाय बॅन्करचा असल्याने त्याचं समाजातलं स्थान सुरक्षित आहे. मध्यमवयीन अॅलचं एक सांकेतिक सुखी कुटुंब आहे. पत्नी मिली (मर्ना लॉय), मुलगी पेगी (टेरसा राईट) आणि मुलगा रॉब यांचं अॅलवर प्रेम आहे. आल्या आल्याच पुन्हा सन्मानाने कामावर रुजू होण्यासाठी त्याला बॅन्केचं बोलावणंही आलेलं आहे. तरीही अॅल अस्वस्थ आहे. आपण नसताना आपले कुटुंबीय आपल्यापासून लांब गेल्याची भावना त्याच्या मनात आहे. आपल्या युद्धातल्या अनुभवाची किंमत आपल्या व्यवसायात होऊ शकत नसल्याची खंतही आहे.
मधली, तरुण नायकाची व्यक्तिरेखा आहे, ती कॅप्टन फ्रेड डेरी (डाना अँन्ड्रज) याची. फ्रेड विवाहीत आहे, मात्र विवाह युद्धावर जाण्याआधी घाईघाईत केलेलं. पत्नीशी घड परिचय नाही. युद्धातल्या हुद्दयाचा एरवीच्या आयुष्यात उपयोगही नाही. भरकटत जाणा-या फ्रेडला पेगी, ही अॅलची मुलगी आधार देऊ पाहते, मात्र या संबंधावर अॅल आक्षेप घेतो.
होमर पॅरीश (हॅरल्ड रसेल ) ही यातली तिसरी व्यक्तिरेखा त्यामानाने लहान, आणि कमी गुंतागुंत असणारी असली, तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर मुळातच ती अपंगत्वासारख्या सैनिकांबाबत संभवणा-या मुलभूत प्रश्नाला हात घालते. त्यातून ती साकारणारा अभिनेता हा नॉन अॅक्टर अन् खराच सैन्यात अपंगत्व आलेला. होमरचे दोन्ही हात कोपराखाली तुटलेले आहेत, आणि नेव्हीने तिथे हुक्स बसवून दिले आहेत. होमर ते वापरण्यात पारंगत आहे, आणि धडधाकट माणूस करेल ती कोणतीही गोष्ट तो करून दाखवू शकतो. मात्र आपल्या प्रेयसीचं, विल्माचं प्रेम स्वीकारणं त्याला कठीण जातं. वरवर अपंगत्वावर मात करणा-या होमरला आपल्या मनातल्या अपंगत्वाला कसं दूर करायचं, हे अजून समजलेलं नाही.
चित्रपटातलं प्रमुख कथासूत्र हे अॅल आणि फ्रेड यांच्या एकमेकांत गुंफलेल्या गोष्टीला पुढे नेतं. या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात आणि परिस्थितीत मूळचाच विरोधाभास साधून पटकथेने विषयाशी संबंधित अनेक घटक इथे एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न केला आहे. खासकरून सैन्यातला हुद्दा अन् समाजातलं स्थान या प्रश्नाची दोन टोकं आणि अॅलच्या सुखी कुटुंबाने फ्रेडच्या बिकट वैवाहिक जीवनाला दिलेला छेद यामधून हे कथानक अनेक मुद्द्यांना स्पर्श करू शकतं. होमरची समस्या ही त्यामानाने या दोघांच्या आयुष्यापेक्षा वेगळी आणि सेल्फ कन्टेन्ड आहे. इतर दोघांच्या कथेत तो अधेमधे डोकावत राहतो, आणि त्याच्या आयुष्यातलं नाट्यही उलगडत राहतं. मात्र त्याच्या प्रश्नावर चित्रपटाने शोधलेलं उत्तर हे त्यामानाने सोपं आणि अपेक्षित आहे. साहजिकच आहे, चित्रपट सैनिकांच्या सहानुभूतीने विचार करण्यासाठी काढण्यात आलेला आहे. अपंगत्वाकडे तो वास्तववादापेक्षा आदर्शवादी नजरेने पाहतो, यात आश्चर्य नाही.
दिग्दर्शक वायलर आणि `सिटीझन केन`साठी गाजलेला छायाचित्रकार ग्रेग टोलन्ड यांनी मिळून चित्रपटाच्या दृश्यरचनांमधे फार अव्वल कामगिरी बजावली आहे. केन प्रमाणेच इथेही डीप फोकस तंत्राचा, म्हणजे दृश्यचौकटीतल्या सर्व कोप-यांमधे स्पष्ट प्रतिमा उमटविण्याचा प्रयोग इथे केलेला दिसतो. चित्रपटात अनेक प्रसंगात तीनही प्रमुख पात्र आपल्या वेगवेगळ्या कथानकाला पुढे नेताना दिसतात, अशावेळी दृश्यचौकटीच्या खोलीचा, डेप्थ ऑफ फिल्डचा सराईत वापर करून दिग्दर्शक चौकट विभागून देतो. केवळ शॉट डिव्हिजन न करता बराच वेळ चालणा-या लॉन्ग टेक्स आणि पात्रांच्या योजनाबद्ध रचनेमधून दिग्दर्शक अर्थपूर्ण दृश्य मांडताना दिसतो.
होमरच्या काकाच्या बारमधले प्रसंग यादृष्टीने खास पाहण्यासारखे. बारची पूर्ण रचना नाटकाच्या नेपथ्याप्रमाणे आपल्यापुढे मांडत डायनिंग एरिआ, पिआनो, बार काउन्टर प्रवेशद्वार आणि त्याजवळचा फोनबुथ या सगळ्या जागांचा वापर करणारा अॅल आणि फ्रेडमधल्या कन्फ्रन्टेशनचा प्रसंग तर या पद्धतीचा सर्वात जमलेला नमुना.
`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज` हा सकारात्मक सूचक शेवटावर संपतो, मात्र तो पोलिटिकली करेक्ट पद्धतीने वागण्यासाठी आणि सैनिकांकडे सहानुभूतीने पाहाणं आवश्यक वाटल्याने केला असेल, हे उघड आहे. तो ज्या समस्या मांडतो, त्या अशा चुटकीसरशी सुटणा-या नव्हेत, किंबहुना आजही त्यांची भेदकता जाणवणारी आहे. काही चित्रपटांचं अभिजातत्व मान्य करण्यासाठी त्याकडे काळाच्या विशिष्ट चौकटीतून पाहावं लागतं. बेस्ट इयर्स त्यातला नाही. आजही ना त्याची जादू कमी झाली आहे, ना त्याची भेदकता.
- गणेश मतकरी Read more...