डबल इन्डेम्निटी - संकेत रुढ करणारा

>> Sunday, September 18, 2011

१९२५ च्या सुमारास क्वीन्स व्हिलेजमधे राहणा-या रूथ श्नायडरचं हेन्री जड ग्रे नावाच्या सेल्समनवर प्रेम बसलं. दोघांचही लग्न झालेलं होतं, पण रुथची या लग्नाबाहेर पडण्याची तयारी आधीपासूनच सुरू होती. एका इन्शुरन्स एजन्टच्या मदतीने तिने आपल्या नव-याला आयुर्विम्याची पॉलिसी काढण्यासाठी भरीला पाडलं होतं. पॉलिसीत डबल इन्डेम्निटीचा क्लॉज होता, ज्यामुळे एका विशिष्ट परिस्थितीत विमाधारकाला आलेला मृत्यू हा त्याच्या कुटुंबियांना अधिकच लाभदायक ठरेल !
रूथ श्नायडरच्या या प्रेमप्रकरणाचा अन् झटपट श्रीमंत होण्याच्या योजनेचा फायदा तिच्या नव-याला महागात तर पडलाच, पण तिला स्वतःला अन् तिच्या प्रियकरालाही देहांत शासन भोगायला लागलं. नाही म्हणायला त्याचा एक फारच वेगळ्या प्रकारचा फायदा साहित्य अन् चित्रपट क्षेत्राला आणि अर्थातच आम जनतेलाही झाला. दोन गाजलेल्या कादंब-या आणि किमान (एक रिमेक धरून) चार उत्तम चित्रपट या गुन्ह्यावरून स्फुरले असं म्हणणं ही अतिशयोक्ती होणार नाही.
१९२७मधे श्नायडर/ग्रे खटला चालू असताना, त्याला हजर राहणा-या अनेक बातमीदारांपैकी एक होता जेम्स एम. केन. कालांतराने केनने या खटल्यावरून दोन कादंब-या लिहिल्या. `पोस्टमन ऑल्वेज रिंग्ज ट्वाईस ` आणि `डबल इन्डेम्निटी` पोस्टमनची दोन हॉलीवूड रुपांतरं तर झालीच, वर (काही जणांच्या मते इटालिअन नववास्तववादाची सुरुवात मानला गेलेला ) विस्कोन्तीचा `ओसेसिओने` (१९४३) हा देखील त्याचीच अनधिकृत आवृत्ती होता. बिली वाईल्डर दिग्दर्शित `डबल इन्डेम्निटी` चं रुपांतर एकच असलं, तरी या खटल्यावर आधारित कलाकृतीतली ती सर्वात महत्वाची कलाकृती ठरावी. मूळच्या केनच्या कादंबरीवरून स्वतः वाईल्डर आणि डिटेक्टिव्ह फिक्शनमधलं महत्त्वाचं नाव असलेल्या रेमन्ड चॅण्डलरने (भांडत भांडत) केलेली पटकथा असणारा `डबल इन्डेम्निटी` हा फिल्म न्वार नावाने ओळखला जाणा-या चित्रप्रकारातलं सुरुवातीचं आणि महत्त्वाचं उदाहरण आहे. इतकं महत्त्वाचं, की त्याचं नाव या चित्रप्रकाराची व्याख्या ठऱविणा-या मोजक्या चित्रपटात घेतलं जावं.
गडद दृश्ययोजना आणि तितकाच गडद आशय असणा-या ज्या पाच चित्रपटांच्या दर्शनामधून निनो फ्रँक या फ्रेन्च समीक्षकाला `फिल्म न्वार` या नव्या चित्रप्रकाराचं अस्तित्व जाणवलं, त्यातला `डबल इन्डेम्निटी` हा एक चित्रपट होता.  अर्थात ही गोष्ट पुढल्या काळातली, प्रत्यक्ष प्रदर्शनावेळी तरी अमेरिकन प्रेक्षकाच्या दृष्टीने हा एक साधा मध्यम बजेट असणारा पण चांगला गुन्हेगारीपट होता.
सामान्यतः चित्रपटाचा नायक भला माणूस असावा, असा संकेत आहे. १९४४मधे तर तो आजच्यापेक्षाही अधिक प्रमाणात रुढ होता. हा संकेत मुळातच न जुमानणारे नायक, नायिका आणि अपेक्षित शोकांताकडे जाणारं तणावपूर्ण कथानक यामुळे मुळातच ही निर्मिती अवघड होती. तत्कालिन सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटूनही प्रेक्षकांना इतक्या निष्ठूर व्यक्तिरेखांशी समरस व्हायला लावणं सोपं नव्हतं. त्यातून मूळ कादंबरीने तो रहस्यपट करण्याचा मार्गही बंद करून टाकला होता. तिच्याशी प्रामाणिक राहायचं तर ही एका गुन्हेगाराच्या तोंडून वदवलेली, एका  काळजीपूर्वक आखून फसलेल्या गुन्ह्याची कहाणी असणार हे उघड होतं. शेवटाबाबत बोलायचं, तर चित्रपटाची मजल आणखी वरची होती. कादंबरीत प्रमुख व्यक्तिरेखा आत्महत्या करतात. चित्रपटाला मात्र शेवट अधिक हार्ड कोअर, गुन्हेगारी वळणाचा हवा होता.
`डबल इन्डेम्निटी` मधे तीन प्रमुख पात्र आहेत. इन्शुरन्स एजन्ट वॉल्टर नेफ (फ्रेड मॅकमरे) , त्याला आपल्या नव-याचा काटा काढण्याच्या कटात सामील करून घेणारी फिलीस डिट्रिचसन (बार्बरा स्टॅनविक) आणि फ्रॉड केसेस क्षणात ओळखू शकणारा नेफचा बॉस आणि जवळचा मित्र बार्टन कीज (एडवर्ड जी. रॉबिन्सन) .
चित्रपट सुरू होतो, तो अत्यंत थकलेल्या (आणि कदाचित जखमी) अवस्थेत मध्यरात्री आपल्या ऑफिसवर पोहोचणा-या नेफपासून. नेफ ऑफिसातल्या डिक्टेशन मशीनवर आपला कबुलीजबाब नोंदवायला लागतो, आणि कथेला खरी सुरुवात होते. निवेदन वापरणारे चित्रपट, किंवा साहित्यही ब-याचदा निवेदन का आणि कोणाला उद्देशून आहे, याची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाहीत. इथे हा कबुलीजबाब कीजला उद्देशून असणं ही अत्यंत चपखल बसणारी क्लृप्ती आहे. स्वतः केनने देखील ही क्लृप्ती अन् चित्रपटातल्या अनेक फेरबदलांचं पुढे कौतुक केलं अन् ते जर आपल्याला सुचते, तर आपणही ते मूळातच कादंबरीत वापरले असते, असं मान्य केलं.
प्रथम पुरुषी निवेदन आणि सर्व प्रमुख पात्रांचं नकारात्मक असणं, हे न्वार चित्रपटांचे दोन प्रमुख गुणधर्म. हे दोन्ही इथे पाळले जाणार, हे नायकाने पहिल्या काही वाक्यातच दिलेल्या गुन्ह्याच्या कबुलीजबाबावरून स्पष्ट होतं. चित्रपट भूतकाळात जातो अन् आपल्याला नेफ आणि फिलीस यांची प्रथम भेट पाहायला मिळते. फिलीसच्या पतीच्या गाडीच्या इन्शरन्ससंबंधी बोलायला गेलेल्या नेफला फिलीस जाळ्यात ओढते. लवकरच प्रश्न येतो, की पतीला कळू न देता त्याचा आयुर्विमा काढता येईल का ? मुळात हुशार असलेल्या नेफला, फिलीसची योजना लक्षात न येणं अशक्य असतं, मात्र सुरुवातीला या कटात सहभागी व्हायला नकार देणारा नेफ बदलत जातो. विमा व्यवसायातल्या सर्व खाचाखोचा त्याला माहीत असतातच. आणि कधीतरी या ज्ञानाचा सदुपयोग करण्याची त्याचीही इच्छा असतेच.
`डबल इन्डेम्निटी` आपल्या ननायिकेला पूर्ण काळ्या रंगात रंगवायला निघतानाही नायकाला संशयाचा फायदा देत नाही. केवळ नायिकेच्या नादी लागल्याने तो गुन्ह्याला तयार होतो, असं दाखवून त्याला सहानुभूती मिळवून देत नाही. उलट नायकाच्या डोक्यातही काही फसवाफसवीच्या योजना असल्याचं दाखवून त्यालाही दोषी ठरवतो. इथे त्यामानाने सहानुभूती मिळते, ती एकाच पात्राला, जे सांकेतिक रहस्यपटात डिटेक्टिव्हचं पात्रं ठरू शकलं असतं, हे आहे कीजचं पात्र, जे नायकाला मित्रासारखं किंवा त्याहूनही अधिक, धाकट्या भावासारखं मानतं. मात्र लांबीने मोठं असूनही हे कथानकाबाहेरचं निरीक्षकाचं पात्रं आहे. चित्रपट त्याच्या अन् नेफच्या मैत्रीचा दाखला देऊन त्याला वजन आणतो, आणि त्याच्या विश्वासघाताला कथेचा हाय पॉईंट ठरवतो.
विश्वासघात हे डबल इन्डेम्निटीमधलं प्रमुख कथासूत्र आहे, आणि ते वेगवेगळ्या पात्रांबाबत, वेगवेगळ्या नात्यांबाबत विविध परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्समधे पुन्हा पुन्हा योजलेलं आपल्याला दिसतं. फिलीस आणि तिचा पती, फिलीसची सावत्र मुलगी लोला आणि तिचा मित्र झाकेती, नेफ आणि लोला, नेफ आणि फिलीस अन् अखेर नेफ आणि कीज अशा सर्व प्रकारच्या जोड्यांमधे विश्वासघाताच्या सूत्राची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. या अगदी मूलभूत स्वरूपाच्या नाट्यपूर्ण सूत्राने सादरीकरण वेगळं असूनही प्रेक्षक चित्रपटात अडकतो.
रहस्यपट नसूनही रहस्यपटांचे अनेक संकेत रुढ करणा-या `डबल इन्डेम्निटी`चा परिणाम चिरकाल टिकलेला आपल्याला दिसतो. आजचा आधुनिक थ्रिलरदेखील एका परीने त्याच्या ऋणातच आहे, असं म्हणता येईल.
- गणेश मतकरी. 

7 comments:

Vivek Kulkarni September 19, 2011 at 3:14 AM  

Khup chan lekh lihila ahe. Tumhi rahasyapat and film-noir hya concepts clear karun taklyat. Dhanyavad. Ata ha picture kuthe milato ka te baghato mhanje baghaun takata yeil.

ganesh September 19, 2011 at 5:23 AM  

if u use torrents, this will be available anywhere. its a very well known film.

हेरंब September 20, 2011 at 9:12 AM  

'डबल इन्डेम्निटी' आणि 'पोस्टमन ऑल्वेज रिंग्ज ट्वाईस' दोन्ही आहेत माझ्याकडे बऱ्याच महिन्यांपासून.. तुमची जुनी 'बिग नथिंग' वरची पोस्ट वाचल्यानंतर 'फिल्म न्वार' बद्दल बरंच वाचन केलं होतं. तेव्हा हे दोन चित्रपट डालो केले होते. पण बघून झाले नाहीत. या विकांतात बघतो नक्की.

sagar zepale September 21, 2011 at 3:50 AM  

mirch ha hindi cinema nukatch yeun gela . khup bold film hoti ase mhanatat tyawar jar likhan kara

ganesh September 21, 2011 at 7:09 AM  

Heramb, u should also have a look at maltese falcon, the big sleep , night of the hunter. All these r v gd noirs.
Sagar, the beauty of writing freelance is that u can write about things which interest u. Thats what i do. Mirch was never on my list and its unlikely that i will go through all the trouble of getting it and writing on it.

हेरंब September 24, 2011 at 9:48 PM  

'डबल इन्डेम्निटी' आणि 'पोस्टमन ऑल्वेज रिंग्ज ट्वाईस' दोन्ही बघितले. अप्रतिम आहेत. 'डबल इन्डेम्निटी' तर मला खूपच आवडला... बाकीचे तीन सुद्धा बघतो लवकरच

Vivek Kulkarni June 15, 2012 at 12:28 AM  

डबल इंडेम्नीटीबद्दल वाचून मला बाबा कदमांच्या इस्टेट मनेजर ह्या कादंबरीची आठवण झाली. त्या कादंबरीवर एक चांगला फिल्म न्वार छापाचा चित्रपट होऊ शकतो. तसेच भारद्वाजच्या कमीनेसारखा उत्तम निर्मितीमूल्य असणारा मराठीत या प्रकारचा चित्रपट करता येईल फक्त लेखक आणि दिग्दर्शकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
कादंबरीचं कथानक एका खेडेगावात घडतं. मी खूपवर्षापूर्वी डेनिस हॉपरचा दी हॉट स्पॉट हा चित्रपट बघितला होता. त्याचा कथानक एका अतिशय छोट्या शहरात घडतं. तो पिच्चर बघितल्यापासून मला इस्टेट मनेजर कादंबरीची खूपच तीव्रतेने आठवण येत होती. आपल्या इथे मराठीत विविध जानरा असणारे चित्रपट बनवले जात नाहीत जरी विविध जानराच्या कथा कादंबर्या असल्यातरी.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP