`डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क` - पारंपरिक भयाचा नवा आविष्कार

>> Monday, September 5, 2011


सध्याचे भयपट हे प्रामुख्याने  `रिअ‍ॅलिटी हॉरर` च्या लाटेत वाहून गेलेले दिसतात. `ब्लेअर विच प्रोजेक्ट`ने सुरू केलेल्या आणि रेक/पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी सारख्या चित्रपटांनी पुढे नेलेल्या या बहुसंख्य चित्रपटांमध्ये अतिमानवी अस्तित्त्व  आणि आधुनिक समाज यांना वास्तवाच्या पातळीवर एकत्र आणलेलं दिसतं. जरी या चित्रप्रकारातला त्यामानाने नवा असणारा हा प्रयोग भयपटांना एकप्रकारे पुनरज्जीवीत करताना दिसला, तरी त्याने भयपटांच्या अभिजात संकल्पनांना अन् त्यातल्या प्रामुख्याने रंजनप्रधान आणि फॅण्टसीच्या वळणाने जाणा-या कथावस्तू विसरल्या जाणं हे फारसं बरं वाटत नाही. झपाटलेले जुने वाडे, जंगलं, त्यातून एकट्या दुकट्या फिरणा-या माणसांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचणारी भीती, वास्तवापेक्षा रोमॅण्टिक वळणाची भूतखेतं हे सारं आपल्यातल्या अनेकांना पाहायला आवडतं हे निश्चित. त्यामुळे अशा क्लासिकल वळणाच्या भयपटांनी अधेमधे वर डोकं काढणं हे स्वागतार्ह. विशेषतः जर ते चांगल्या चित्रकर्त्यांनी केले असले तर फारच.
मेक्सिकन दिग्दर्शक (निर्माता,पटकथाकार, कादंबरीकार इत्यादी) गिआर्मो डेल टोरो याचा ओढा हा पहिल्यापासूनच भय आणि फॅण्टसी या दोन्हीच्या उत्तम मिश्रणाकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. क्रोनोस, ब्लेड -२ , हेलबॉय अशा याच जातीच्या अनेक चांगल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं असलं, तरी त्याचा सर्वोत्तम गाजलेला चित्रपट होता पॅन्स लॅबिरीन्थ (२००६) युद्धातलं क्रौर्य आणि फॅण्टसी यांचं अप्रतिम मिश्रण लॅबिरीन्थमधे होतं. गिआर्मोची निर्मिती असणारा पण दिग्दर्शन नसलेला `ऑर्फनेज` (२००७) त्याच जातीचा, पण अधिक सांकेतिक वळणाचा होता. या दोन्ही चित्रपटांमधे लहान मुलं प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये होती. नुकताच अमेरिकेत प्रदर्शित झालेला `डोन्ट बी अफ्रेड ऑफ डार्क`देखील या दोन्ही चित्रपटांच्या गटात बसणारा आहे. या खेपेला तो ऑर्फनेजहूनही अधिक परिचित बाजाचा आहे. मात्र त्याचं एक कारण तो पूर्णपणे स्वतंत्र नसून १९७३च्या टेलिफिल्मचा रिमेक आहे, हे देखील असू शकतं.

`डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क` चं दिग्दर्शन देखील डेल टोरोचं नाही. तर ट्रॉय निक्सीचं आहे. मात्र निर्मिती अन् पटकथा डेल टोरोची असल्याने, त्याची छाया चित्रपटभर पडलेली दिसते. झपाटलेलं घर, रहस्यमय भूतकाळ, सत्य जाणणारा गूढ केअरटेकर असे भयपटांत दिसणारे लोकप्रिय घटक इथे आहेत. वर प्रमुख भूमिकेत लहान मुलगी अन् परीकथेत शोभणा-या कल्पनांचा भयप्रद वापर या खास डेल टोरोच्या आवडीच्या गोष्टी आहेत. या चित्रपटातला डेल टोरोचा रस हा स्वाभाविक आहे. त्याच्याच म्हणण्यानुसार त्याने नऊ वर्षांचा असताना टी.व्हीवर पाहिलेला मूळ चित्रपट, हा त्याच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. या प्रकारचे फॅन्टॅस्टिक भयपट करण्याची प्रेरणा त्याला तिथेच मिळाली.
चित्रपट सुरू होतो तो एकोणीसाव्या शतकात, एका गूढ, प्रचंड हवेलीत. इथे तो फार रेंगाळत मात्र नाही. भयपटाला साजेशी वातावरण निर्मिती करून , आणि किमान एक अनपेक्षित चमत्कृती दाखवून तो थेट आजच्या काळात येऊन पोहोचतो. आज ही हवेली अ‍ॅलेक्स (गाय पीअर्स) या आर्किटेक्टच्या ताब्यात आहे. गेल्या शतकातल्या काही रहस्यमय घटनानंतर बंदच असलेल्या या हवेलीला तिचं मूळचं वैभव पुन्हा देऊ करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र त्याला मूळ घटनांची फारशी माहिती नाही. त्याचबरोबर या हवेलीला एक तळघर असल्याचीही नाही. त्या तळघरात असलेल्या अन् घडलेल्या गोष्टींची माहिती असती, तर कदाचित त्याने घराला हातही लावला नसता.
अ‍ॅलेक्स आपल्या किम (केटी होम्स) या मैत्रिणीबरोबर या घरातच मुक्काम ठोकून आहे. घर नव्यासारखं करून `आर्किटेक्चरल डायजेस्ट`च्या कव्हरवर आणण्याचा त्याचा मनसुबा आहे. अन् त्यामुळे आपलं करिअर पुन्हा मार्गी लागेल ही त्याची अपेक्षा. अशातच अ‍ॅलेक्सकडे त्याची आठ-दहा वर्षांची मुलगी सॅली (बेली मॅडिसन) येऊन थडकते. आईने अ‍ॅलेक्सकडे सोपवल्याने आपण कोणालाच नको आहोत, अशी तिची भावना झालेली. अनवधानाने, सॅली घरातलं तळघर हुडकून काढते, आणि कदाचित त्या तळघरापलीकडे असलेलं दुसरं काही. जेव्हा या तळघरापलीकडचे रहिवासी तिच्याशी कानगोष्टी करायला लागतात, तेव्हा सुरुवातीला तिला ते आपले मित्रंच वाटतात. आणि जेव्हा त्यांचं खरं स्वरूप तिच्या ध्यानात येतं , तेव्हा अर्थातच, परंपरेला अनुसरून, खूप उशीर झालेला असतो.
`डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क`ची पटकथा चांगली आहे. मात्र तिच्यात त्रुटी नाहीत, असं मात्र नाही. ती मुळात चांगली आहे, ती तिच्या निवेदनाच्या गतीसाठी. सुरुवातीचा प्रसंग वगळता, ती प्रेक्षकांना लगेच धक्के द्यायला सुरुवात करत नाही, तर घटनांना वेग यायला वेळ देते. व्यक्तिरेखांची ओळख करून देते. त्यांच्या वागण्याला कारणमीमांसा देण्याचा प्रयत्न करते. मुख्य म्हणजे, घटनांना वेग यायला लागल्यावरही, ती तळघरातल्या रहिवाशांना बराच काळ पडद्यावर येऊ देत नाही. हे रहिवासी संगणकाच्या मदतीने कितीही छान साकारले असले तरी त्यांचं प्रत्यक्ष दिसणं हे प्रभाव कमी करणारं ठरतं. चित्रपटातील भीती ही आपल्याला काय दिसतं यापेक्षा काय सुचवलं जातं यावर अवलंबून असते. जेव्हा राक्षस आपल्या मनात तयार होतात, तेव्हा ते सर्वात भीतीदायक असतात. त्यांना एक स्पष्ट आकार येणं हे नेहमीच परिणाम कमी करणारं ठरतं. इथेही तेच होतं. मात्र या सुमारास घटना वेगवान आणि आपल्या अंदाजांना न जुमानणा-या झालेल्या असल्याने चित्रपटाची पकड सुटत नाही.
या पटकथेची त्रुटी आहे, ती तिच्या तर्कशास्त्रात. इथल्या अतिमानवी अस्तित्वाचा वेगळेपणा आपण गृहीत धरला, की त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. हे सारे प्राणी कुठे राहतात ? कुठून येतात ? त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याला केवळ तळघरातून वाट का असावी ? त्यांच्या अस्तित्वाला कोणत्या योनीचे नियम लागतात ? असे अनेक प्रश्न तयार होतात, ज्यांची समाधानकारक सोडाच, पण एकूणच उत्तरं देण्याचं पटकथा टाळते. मात्र ती आपल्याला पात्र आणि घटना यांमधे पुरेशी गुंतवत असल्याने आपण तेवढ्यापुरतं या प्रश्नांकडे दुर्लक्षित करू शकतो.
या चित्रपटात, किंवा डेल टोरोच्या आधीच्या चित्रपटातही कुटुंबव्यवस्थेला महत्त्व दिसतं, मात्र कधी ते सकारात्मक असतं, तर कधी नकारात्मक. इथे सॅलीच्या मनःस्थितीचं अन् पुढे येणा-या संकटांचं मूळ, हे मोठ्या प्रमाणात अ‍ॅलेक्सच्या घटस्फोटात आहे. त्यामुळे एका परीने हा घटस्फोटित मुलांच्या मानसिक संतुलनाकडे केलेला निर्देष दिसून येतो. त्याचबरोबर व्यक्तिरेखाटन मात्र स्त्रीवादी पद्धतीने केलेलं दिसून येतं. सॅली आणि किम यांच्या भूमिका या अ‍ॅलेक्सपेक्षा महत्त्वाच्या तर आहेतच, वर त्यांचा वस्तूस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक मोकळा असल्याचं पटकथा मांडते.
गेल्या काही वर्षांत भयपटांमधे स्त्रियांना अधिक महत्त्व देण्याची प्रथाच पडली आहे का ? नजिकचा इतिहास तरी हेच सांगतो. (आठवा, द रिंग, द ग्रज, डार्क वॉटर, ब्लेअर विच प्रोजेक्ट, पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी, रेक इत्यादी)
ट्रॉय निक्सीचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असला, तरी कुठेही ते जाणवत नाही. गिआर्मो डेल टोरोच्या चमूतल्या इतर दिग्दर्शकांप्रमाणेच हा देखील सराईत असल्याचं इथे सिद्ध होतं. अ‍ॅक्शनच्या मोहात न पडता किंवा स्टार्सच्या नावाला भूमिकेच्या वजनाबरोबर न तोलता आपल्या चित्रपटातलं तणावपूर्ण वातावरण आणि त्यातली सर्वात महत्त्वाची  व्यक्तिरेखा असणारी छोटी नायिका यावरच त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.
दिग्दर्शकाच्या योग्य फोकसचा फायदा चित्रपटाला झाला आहे. नव्या, बदलत्या भयपटांच्या अन् रिअ‍ॅलिटी हॉररच्या आक्रमणातही त्याने आपला काहीशा जुन्या पद्धतीचा, पण उत्तम मांडणी असणारा भयपट उभा करून दाखविला आहे. अभिजात भयपट मिस करणा-या प्रेक्षकाला हा प्रयत्न आवडण्यासारखाच.
-गणेश मतकरी 


1 comments:

lalit September 5, 2011 at 9:24 AM  

hya film cha trilar baghital hota lekha chhan jamun alay baghato ata movie

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP