सिंगींग इन द रेन - हॉलीवूडचा/हॉलीवूडविषयी
>> Monday, November 28, 2011
चांगला जादूगार हा आपल्या प्रेक्षकाला नेहमी विश्वासात घेतो. त्याच्याशी गप्पा मारतो. त्याला हसवतो, आपली सारी साधनं त्याला तपासायला देतो. जादुगाराने आपल्यापासून काही दडवून ठेवलं नसल्याची पूर्ण खात्री करून घेण्याची संधी प्रेक्षकाला मिळते. मात्र एकदा का जादूचा प्रयोग सुरू झाला की, आतापर्यंत सामान्य वाटणारी साधनं जणू खरीच एखाद्या शक्तीने प्रेरीत होतात, आणि आपल्याशी साधेपणाने संवाद साधणारा या प्रयोगाचा कर्ता, कोणी दिव्य पुरूष वाटायला लागतो.
हॉलीवूडची जादू आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करून त्याला थक्क करणारा `सिंगिंग इन द रेन` आपल्याला एक उत्तम जादूचा प्रयोग पाहिल्याचा आनंद देतो, असं म्हणणं ही अतिशयोक्ती होणार नाही. मूकपटांचं बोलपटांत रुपांतर होण्याचा म्हणजे १९३०च्या आसपासच्या काळात घडणारा हा चित्रपट मुळातच सिनेमा हे कसं बनवाबनवीचं माध्यम आहे, हे पहिल्या प्रसंगापासूनच उघडपणे, कोणतीही लपवाछपवी न करता आपल्यापुढे मांडतो. ही बनवाबनवी सर्व प्रकारची, म्हणजे स्टार्सच्या स्वतःविषयीच्या भव्य कल्पना, गॉसिप, मीडियापुरती बनलेली खोटी खोटी नाती अशी व्यक्तिगत प्रकारची, पण त्याचबरोबर बॅकप्रोजेक्शन, डबिंग, छायाचित्रण यासारख्या माध्यमाशी निगडीत चमत्कृतींमध्ये दिसणारी देखील.
चित्रपट, त्यासंबंधित तंत्रज्ञान, या क्षेत्रातल्या व्यक्ती यांना अशाप्रकारे पारदर्शक पद्धतीने मांडल्यावर खरं तर प्रेक्षक या `चित्रपट` हीच पार्श्वभूमी असलेल्या कथेत गुंतेल असं वाटणार नाही. मात्र सिंगींग इन द रेन आपली अशी काही पकड घेतो की माध्यमाच्या कृत्रिमतेचा, ती समोर स्पष्टपणे दाखवली जाऊनही आपल्याला विसर पडतो. पाहाता पाहाता प्रेक्षक या हॉलीवूडमध्ये बनलेल्या अन् हॉलीवू़डविषयी असलेल्या चित्रपटाच्या प्रेमात पडतो.
हॉलीवूडवर एकाच वेळी टीका करणं अन् या मोहमयी दुनियेचा उन्माद साजरा करणं, असा सिंगींग इन द रेनचा दुहेरी अजेंडा आहे. हे नक्की कसं करता येईल असा प्रश्न पडणारं असेल, तर `ओम शांती ओम` आठवून पाहा. त्यातल्या कथानकात `कर्ज` आणि `मधुमती` डोकावले, तरी त्याचा आत्मा, हा `सिंगींग इन द रेन`चाच होता. त्याचा सूर, त्यातल्या जीवाभावाच्या मित्रांच्या व्यक्तिरेखा, चित्रपटमाध्यमाचे गुणदोष सांगणारा विनोद, निदान एका गाण्याची कल्पना (मै अगर कहूँ), अन् चित्रसृष्टीबद्दल वाटणारं अतीव प्रेम, हे सारं मुळात कोठून आलं, तर तिथून !
`सिंगींग इन द रेन` हा नावात सुचविल्याप्रमाणे म्युझिकल आहे. आपले सर्वच चित्रपट नाचगाण्यांनी सजलेले असले, तरी हॉलीवूड म्युझिकल, हे आपल्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या प्रकारचं, ब्रॉडवे म्युझिकलशी नातं सांगणारं.
पाश्चात्य चित्रपट, मग ते हॉलीवूडच्या परंपरेप्रमाणे भव्य, करमणुक प्रधान अन् तद्दन खोट्या गोष्टी सांगणारे का असेनात, वास्तवाचा एक आभास निर्माण करतात. चित्रपटाच्या चौकटीत तर्कशास्त्र गृहीत धरणं, व्यक्तिरेखांच्या वागण्या बोलण्यात सुसंगती असणं, नेपथ्य- वेशभूषा चित्रपटाच्या स्थलकालाशी जोडलेली असणं, असे काही अलिखित नियम, ते पाळतात. अपवाद हा म्युझिकल्सचा. म्युझिकल्स ही निदान गाण्यांदरम्यान वास्तवाशी नातं सोडत असल्याने, त्यांना सादरीकरणात अधिक मोकळेपणा घेता येतो. गाण्यांचं चित्रिकरणही काहीसं कथानकाच्या चौकटीबाहेर जाणारं, प्रेक्षकांच्या रंजनासाठीच सादर केल्यासारखं असतं, `परफॉर्मन्स ओरिएण्टेड`
`सिंगींग इन द रेन` सुरू होतो, तो मूकपटांच्या अखेरीच्या दिवसांत. डॉन लॉकवु़ड (जीन केली) अन् लीना लमॉन्ट (जीन हेगन) ही पडद्यावरील यशस्वी जोडी. प्रेक्षकांच्या दृष्टीने खरोखरीच प्रेमात असणारी, पण प्रत्यक्षात डॉनला लीना जराही सहन होत नाही. कॉस्मो ब्राऊन (डोनल्ड ओ `कॉनर) हा डॉनचा चांगला मित्र. अभिनयात मागे पडलेला, पण चित्रपटांना संगीत देणारा योगायोगाने डॉनची गाठ पडते, ती कॅथी सेल्डन (डेबी रेनल्डस) या होतकरू अभिनेत्रीशी, अन् पहिली भेट फिसकटूनही पुढे मात्र दोघांचं जमायला लागतं. अचानक, वॉर्नर ब्रदर्सचा `जॅझ सिंगर` हा बोलपट प्रसिद्ध होतो आणि प्रचंड यशस्वी होतो. बोलपटांना ताबडतोब मागणी येते, आणि मूकपटाच्या स्टार्सना धड बोलायला शिकवणा-या भाषातज्ज्ञांना देखील लॉकवुड -लम़ॉन्टना घेऊन बोलपट तर बनतो, पण लिनाच्या विचित्र चिरक्या सुराने, अन् डॉनच्या संवादांचं महत्त्व न ओळखण्याने तो कोसळण्याची चिन्हे दिसायला लागतात. कॅथी आणि कॉस्मोच्या मदतीने, ड़ॉन या संकटाशी सामना देण्याच्या तयारीला लागतो.
स्टॅनली डॉनन आणि जीन केली यांच्या सहदिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे तीन विशेष आहेत. त्यातली गाणी (अन् अर्थातच नाच), त्यातला विनोद अन् त्याची चित्रपटा्च्या पडद्यामागलं जग दाखवण्याची हातोटी. कथानकाचा आलेख हा स्वतंत्रपणे जमलेला (अर्थातच, एक व्यावसायिक दृष्टिकोनातून) असला, तरीही त्यापलीकडे जाणारे हे तीन घटक `सिंगींग इन द रेन`ला ख-या अर्थाने वर नेतात. मुसळधार पावसात, छत्रीचा केवळ प्रॉपसारखा वापर करीत जीन केलीने केलेलं (असं म्हणतात, की या छायाचित्रणावेळी त्याच्या अंगात सडकून ताप होता.) जोरदार नृत्य, हे या चित्रपटाचा ट्रेडमार्कच आहे, पण त्याशिवाय इतरही गाणी श्रवणीय अन् दर्शनीय जरूर आहेत. केली, रेनॉल्ड्स आणि कॉनर या तिघांचं `गुडमॉर्निंग`, केली आणि कॉनरचा टन्ग ट्विस्टर्सवर आधारलेल्या `मोझेस सपोजेस`वरला उस्फूर्त वाटणारा नाच, `ब्रॉडवे मेलडी` या गोष्टीशी जराही संबंध नसलेल्या पण नेत्रदीपक नृत्यनाट्याची निव्वळ ऊर्जा, हे सारं आपल्याला खिळवून ठेवतं. मुळात कोरिओग्राफर असलेली `ओम शांती ओम`ची दिग्दर्शिका फराह खान `सिंगींग इन द रेन` कडे आकर्षित झाली असल्याचं नवल, या नाचगण्यांच्या मेजवानीकडे पाहून मुळीच वाटत नाही.
विनोदी कथानक नसणारे काही चित्रपट हे विनोदासाठी वेगळे प्रसंग घालतात. हा चित्रपट मुळात गंभीर कथाविषय असूनही तसं करीत नाही. यातला विनोद, संहिता, संवादाची फेक, बॉडी लँग्वेज, नाच अशा सर्व ठिकाणाहून येतो. ऑस्करसाठी सहायक अभिनेत्री म्हणून नामांकन मिळविणा-या जीन हेगनची लिना लमॉन्ट मात्र लोकाना हसवण्यात सर्वात पुढे आहे. चिरका आवाज, आपल्या मोठेपणाचं कौतुक, स्वार्थीपणा असणारी ही व्यक्तिरेखा ती असणा-या प्रत्येक दृश्यावर आपला ठसा सोडते. खासकरून तिने अन् जीन केलीने मूकपटासाठी चित्रित केलेला प्रेमप्रसंग, ज्यात अभिनयातून प्रेम व्यक्त होतं, तर संवदातून द्वेष, त्याबरोबरच बोलपटाच्या चित्रिकरणात ध्वनिमुद्रणासाठी माईक लपविण्याचा प्रसंग, किंवा अखेरच्या प्रसंगातलं तिचं भाषण हे सारंच फार गंमतीदार आहे.
चित्रपटाचा मूळ विषय हा ध्वनीच्या आगमनाबरोबर चित्रसृष्टीत घडलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर असल्याने त्यात मांडलेल्या तांत्रिक अडचणी ब-याच प्रमाणात सत्य परिस्थितीवर आधारेल्या आहेत. ख-याखु-या. उदाहरणार्थ मूकपटांची सद्दी संपल्याने त्या काळच्या अभिनेत्यांमध्ये पसरलेली घबराट, बदलामुळे आलेली अनिश्चितता, मोठ्या स्टार्सची मागणी अचानक संपणं, ध्वनीमुद्रणात येणा-या अडचणी, त्यावर उपाय म्हणून डबिंगची सोय या सा-या गोष्टी ख-याखु-या घडलेल्या. अर्थात हा काही माहितीपट नाही, म्हणून तपशीलात फेरफार आहेत, ते आहेतच. ते अधिकच खरे वाटतात, ते चित्रपटात ठेवलेल्या मोकळ्या दृष्टिकोनाने. स्टुडिओतलं वातावरण, प्रत्यक्ष छायाचित्रणाचे तपशील, रेकॉर्डिंग बुथ्ससारख्या तत्कालिन गोष्टी, उच्चार प्रशिक्षण, मुख्य प्रदर्शनाआधी प्रेक्षकपसंती जोखण्यासाठी घेण्यात येणारे खास खेळ यासारख्या अनेक बाबींचं प्रत्यक्ष दर्शन हे तत्कालिन चित्रसृष्टी आपल्यापुढे प्रत्यक्षात उभी करतं. थोड्या `शुगर कोटेड` स्वरुपात, पण तिचा अस्सलपणा जाणवून देत.
चित्रपटांच्या इतिहासात म्युझिकल या चित्रप्रकाराला महत्त्वाचं स्थान आहे आणि जुन्या हॉलीवूडमधल्या अॅन अमेरिकन इन पॅरिस, साऊंड ऑफ म्युझिक, मेरी पॉपिन्स, माय फेअर लेडीपासून ते हल्लीच्या शिकागो, मुला रूजपर्यंत अनेक उत्तम चित्रपटांनी हा चित्रप्रकार भरलेला आहे. तरीही या यादीतल्या सर्वोच्च स्थानासाठी जे एक दोन चित्रपट स्पर्धेत असतील, त्यात `सिंगींग इन द रेन` हे नाव नक्कीच असेल. प्रदर्शनावेळी चाललेल्या पण अभिजात म्हणून न ओळखलेल्या गेलेल्या, अन् एकही ऑस्कर न मिळवू शकलेल्या चित्रपटाचा काळाबरोबर सर्वोच्च स्थानाकडे झालेला हा प्रवासही त्याच्या जादूचाच एक भाग म्हणावा लागेल!
- गणेश मतकरी.
Read more...