ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर - सहेतूक अतिरंजीत शोकांतिका

>> Monday, November 14, 2011

काही चित्रपट हे एकाच वेळी एका विशिष्ट काळाशी जोडलेले आणि तरीही कालातीत असतात, त्यांना तत्कालिन सामाजिक विचाराचा, घाडामोडींचा संदर्भ असतो. मात्र त्या संदर्भाच्या आधारे ते  काही मूलभूत विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. केवळ गोष्ट सांगणं हे त्यांच्या दृष्टीने पुरेसं नसतं, त्यापलीकडे जाऊन मानवी स्वभावाशी संबंधित भाष्य करणं ही त्यांची गरज असते. केवळ चित्रपट माध्यमाच्या चौकटीत बसणा-या, दिग्दर्शकांची सोय अन् प्रेक्षकांची मर्जी राखणा-या पटकथा लिहिणा-या पटकथाकारापेक्षा साहित्यिक अशा चित्रपटांच्या रचनेमागे असावा लागतो. जो केवळ माध्यमाला आवश्यक म्हणून कथा रचण्यापेक्षा, विशिष्ट कथा कल्पनेला कोणतं माध्यम समर्पक ठरेल हा विचार आधी मांडेल. अशा साहित्यिकाच्या, लेखकाच्या कलाकृती या मुळात त्यामागे असलेल्या विचाराने आपोआप अमुक एका दर्जाला पोहोचतात, अन् मग त्यांची इतर माध्यमांत झालेली रुपांतरंदेखील बहुतेक वेळा हा दर्जा सांभाळून केली जातात. प्रामुख्याने नाटककार असलेल्या पण साहित्याच्या सर्व प्रवाहांत मुशाफिरी केलेल्या टेनेसी विलिअम्सच्या `ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर` या बद्दल हेच म्हणता येईल.
स्ट्रीटकार हे मुळात नाटक. एकाच घरात फिरणारं, त्यामुळे त्याचं चित्रपटरुपांतरही एकाच घराच्या नेपथ्याचा प्रामुख्याने आधार घेतं, यात आश्चर्य नाही. कधीमधी कॅमेरा घर सोडून बाहेर डोकावतो, पण ते काही खरं नाही. मुळात नाट्य घडतं ते न्यू ऑर्लिन्सच्या गरीब वस्तीतल्या एका घरातच. त्यातले प्रवेशही नाटकातल्या प्रवेशांचा आधार घेत असल्याने पटकथांच्या तुलनेत अधिक मोठे आहेत. मात्र याचा अर्थ असा घ्यावा का, की स्ट्रीटकार नेम्ड डिझायर `सिनेमा` म्हणून कमी पडतो ?  खरं तर या चित्रपटावर काही प्रमाणात अशी टीका जरूर झाली आहे, मात्र मला तरी त्यात तथ्य वाटत नाही. चित्रपट केवळ वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याने सिनेमॅटिक होतो असं थोडंच आहे ? तो असलेल्या अवकाशाचा वापर कशा पद्धतीने करतो ? संवाद केवळ नाटकाची प्रतिकृती असल्याप्रमाणे येतात की दिग्दर्शक त्यांनाही दृश्यमाध्यमाशी सुनियोजित अर्थपूर्ण रीतीने योजतो, हे पाहणं मग महत्त्वाचं ठरतं. अन् त्या दृष्टीने स्ट्रीटकारचं उदाहरण हे दर्जेदार अन् वैशिष्ट्यपूर्ण आहे.
स्ट्रीटकारच्या पटकथा रुपांतरासाठी ऑस्कर सोल हे एक वेगळं नाव चित्रपटाला येऊन मिळालं असलं तरी दिग्दर्शकापासून प्रमुख अभिनेत्यापर्यंत ब-याच गोष्टी मूळाबरहुकूम होत्या. दिग्दर्शक इलिया कझान , नटमंडळीतले मार्लन ब्रॅन्डो , स्ट्रीटकारसाठी सहाय्यक भूमिकांत ऑस्कर  मिळविणारे किम हन्टर/कार्ल माल्डेन हे सारेच ब्रॉडवे प्रॉडक्शनमधेही होते. बदल हा एकच पण खूप महत्त्वाचा होता. ब्लान्च डुब्बा या अतिशय अवघड भूमिकेत  ब्रॉडवेवर जेसिका टॅन्डी दिसली होती. चित्रपटात ही भूमिका विवीअन ली या `गॉन विथ द विन्ड`साठी आधीच ऑस्कर सन्मानित असणा-या अभिनेत्रीने केली. तिला पुन्हा याही भूमिकेत ऑस्कर  मिळालं. टॅन्डीला मात्र ते मिळालं, आणखी अडतीस वर्षांनी. १९८९ च्या `ड्रायव्हिंग मिस डेझी`मधल्या वृद्धेच्या भूमिकेसाठी. भूमिका बदलासाठी दोन प्रमुख कारणं होती. एकतर वीवीअन लीचं नाव, जे चित्रपटातल्या इतर कोणाकडेच त्या सुमारास नव्हतं. अन् दुसरं म्हणजे ब्रॅन्डो अन् टॅन्डीमधला छत्तीसचा आकडा.  अभिनयशैली, शिस्त आणि स्वभाव या सर्वच बाबतीत या दोघांचं कधी जमलं नाही. दिग्दर्शकाने ब्रॅन्डोची निवड केली यात आश्चर्य नाही. या दोघांचं पटत असे हे त्यांनी पुढेही `विवा झपाटा!`, `ऑन दि वॉटरफ्रन्ट` सारख्या चित्रपटात एकत्रितपणे केलेल्या महत्त्वपूर्ण कामावरून लक्षात येतं.
विवीअन ली ला ब्लान्चची भूमिका देणं आणखी एका गोष्टीकरीता विशेष महत्त्वाचं म्हणावं लागेल. आणि ते म्हणजे तिची गॉन विथ द विंडमधील स्कार्लेट या नायिकेची उमदी प्रतिमा . स्कार्लेट अन् ब्लान्चची पार्श्वभूमी बरीच एकसारखी आहे. दोघी अमेरिकेच्या दाक्षिणात्य राज्यांमधल्या उमरावांच्या प्रतिनिधी आहेत. मात्र ब्लान्चसाठी ते विश्व आता हरवून गेलंय. कोणत्याशा अडचणीत येऊन तिने आपली मालमत्ता, राहत्या जागेसकट गमावली आहे. तिच्या स्वप्नातलं श्रीमंतीचं, घराणेशाहीचं जग आता उरलेलं नाही, पण ते तिच्या मनाने मान्य केलेलं नाही. न्यू ऑर्लिन्समधल्या आपल्या गरीबीत आनंदाने राहणा-या बहिणीकडे येतानाही हे आभासीविश्व ती बरोबर घेऊन येते. हे विश्व आणि बहिणीच्या घरी येणा-या गाडीचं प्रतिकात्मक अर्थाने आलेलं नाव, `डिझायर`, हे ब्लान्चला तर तिच्या शोकांताकडे नेतंच. वर बहीण स्टेला (हन्टर) आणि तिचा नवरा स्टॅनली कोवाल्स्की (ब्रॅन्डो) यांच्या संबंधांनाही गढुळ करून सोडतं.
स्ट्रीटकारमधे गतकालीन वैभवाच्या रोमॅन्टिक कल्पना अन् तत्कालिन अमेरिकेचा बकालपणा यांच्या विरोधाभासाहून एक सामाजिक भीषण वास्तव रेखाटण्याचा प्रयत्न तर आहेच, पण त्यापलीकडे जाऊन मानवी मनात दडलेल्या पशुवृत्तीलाही उडघ्यावर आणून टाकणं आहे. `डिझायर` हे इथल्या सर्वनाशाचं मूळ आहे. जे केवळ ब्लान्चलाच नाही तर सर्वच व्यक्तिरेखांना  आपल्या कह्यात ठेवून आहे. स्टेला आपला भूतकाळ विसरून स्टॅनली बरोबर आनंदाने राहाते, यामागेही तिला वाटणारं अपरिमीत आकर्षण हेच आहे, अन् स्टॅनली तर सर्वार्थाने पशुवत आहे. त्याला कोणतेच नियम लागू पडत नाहीत. आंतरिक स्वार्थच त्याला मार्ग दाखवतो. हा मार्ग त्याच्या ब्लान्चशी होणा-या संघर्षाचं कारण ठरतो, अन् कदाचित स्टेलाबरोबरच्या नात्याची अखेरही.
ब्लान्चचं पात्र इथे सर्वात महत्त्वाचं असलं, अन ऑस्करने त्याचा यथोचित सन्मान केला असला, तरी स्टॅनलीचं पात्र इथे दुस-या एका कारणासाठी महत्त्वाचं आहे.  चित्रपटातल्या अभिनयशैलीला या व्यक्तिरेखेने लावलेलं  वेगळं वळण हे इतकं महत्त्वाचं आहे, की केवळ त्यामुळेही स्ट्रीटकारचं नाव इतिहासात कायम राहावं, अगदी भूमिकेला आँस्कर न मिळूनही. इथेही स्टॅनलीला स्टेलाची मदत झाली, मात्र ही पडद्यावरली स्टेला नव्हे तर हॉलीवूडमधील अभिनयशिक्षिका स्टेला अँडलर. मॉस्को आर्ट थिएटरच्या कॉन्स्टॅन्टीन स्टॅनीस्लावस्कींकडे शिकून आलेल्या स्टेलाने आपल्या शिष्यांना कानमंत्र दिला तो उसना अभिनय न करता, व्यक्तिरेखा आपल्या सर्वस्वात भिनवून घेण्याचा. जणू स्वतःला त्या व्यक्तिरेखेच्या जागी घेऊन जाण्याचा. `मेथड अँक्टिंग` नावाने ओळखल्या जाणा-या या पद्धतीचा पहिला मोठा नमुना म्हणजे ब्रॅण्डोचा स्टॅनली. पुढे जेम्स डीनपासून अल पचिनोपर्यंत अनेक नावं या शैलीमध्ये नाव मिळवून गेली. मात्र परिचित शैलीत काम करण्याच्या स्टार्सच्या सवयीला वेगळं वळण देऊन आधुनिक अभिनय पहिल्या प्रथम हॉलीवूडमधे रुजवणारा चित्रपट, अशी देखील स्ट्रीटकारची ओळख होऊ शकते.
या भूमिकेचा परिणाम इतका प्रचंड आहे, की ती आपल्या चित्रपटांवरही प्रभाव पाडून आहे. मेथड अँक्टिंगला एक शैली म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न आपल्याकडे अनेक अभिनेत्यांनी तर केलाच आहे, पण ज्यांना या भूमिकेची ब-यापैकी जमलेली आवृत्ती पाहायची असेल, त्यांनी मणीरत्नमचा `युवा` पाहावा. अभिषेक बच्चनने यात साकारलेला लल्लन, स्टॅनली कोवाल्स्कीवरूनच स्फूर्ती घेतो हे उघड आहे. अभिषेक बच्चनच्या करिअरला या भूमिकेपासूनच एक दिशा मिळाली हे तर आपण पडताळूनही पाहू शकतो.
स्ट्रीटकारला वास्तवाचा आधार असला, तरी त्याला वास्तववादी म्हणता .येणार नाही. अमुक एक आशय पोहोचविण्यासाठी काही प्रमाणात अतिरंजीततेचा वापर सहेतूक करणारा हा चित्रपट आहे. त्याचा मानवी मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न त्याला आजही लक्षवेधी ठरवणारा आहे.
- गणेश मतकरी 

4 comments:

mahesh November 14, 2011 at 6:35 AM  

great article sir ,i also liked your article on brando & desperately waiting for review of deool

lalit November 15, 2011 at 12:03 AM  

chhan ahe lekh waiting for review about deool and also roman holiday ...so get some new way to see the movie

Anonymous,  November 15, 2011 at 10:26 AM  

I remember having read haphazardly, its original play's script. I had a book. But considering english reading speed and understanding back then, I didn't complete it...
Now I know about movie and marlon brando... Must watch!

Thanks for writing about it.

Vishalkumar November 16, 2011 at 3:14 AM  

नमस्कार,
मी अजुन हा चित्रपट पाहिला नाही पण आता प्रयत्न करीन. यापुर्वी विश्चास पाटीलांच्या 'नॉट गॉन विथ द विंड' मध्ये या चित्रपटाचे आणि मुळ नाटकाचे प्रकरण वाचले होते. त्याचीही पुन्हा आठवण झाली. पुस्तक असल्याने त्यांनी चित्रपट निर्मिती कथा आणि त्यातील व्यक्तिरेखा विस्ताराने रंगवल्या आहेत. दुर्दैवाने यानंतर मात्र मी रॉकस्टार पाहिला!! अन काही प्रश्न मनात आले.
इम्तियाझ अली अजुन जब वुई मेटच्या करिनाच्याच प्रेमात दिसतोय? जब वुई मेटची करिना रात्री दुसर्‍याला मदत करण्याच्या नादात स्वतः अडकते आणि पुढची हलकी फुलकी कथा घडते, ती आवडली पण होती. पण त्यानंतर तो तीच व्यक्तिरेखा अधिक उथळ करत आजु बाजुची परिस्थिती बदलत सादर करतोय. जब वुई मेटची नायिका लग्नाच्या दिवशी प्रियकराला मिळते. लव आज कल ची नायिका लग्न करुन दुसर्‍या दिवशी तर रॉकस्टारची लग्न क्रुरुन २ वर्षानी. त्याच स्टोरीला खपवतांना त्याने नायकाला रॉकस्टार (?) बनवले हीच त्याची चतुराई!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP