द सर्चर्स (१९५६)- सूडाचा प्रवास

>> Sunday, April 1, 2012


ब-याचदा कलाकृतींचं महत्व, त्यांच्याकडे पाहाण्याची दृष्टी आणि कधीकधी त्यांचा अर्थदेखील काळाबरोबर , तत्कालिन सामाजिक विचारधारांबरोबर बदलत असतो. त्यामुळे अनेकदा प्रथमदर्शी महत्वाच्या वाटणा-या कलाकृतींचं तेज कालांतराने पुसट होतं, कधी त्या विस्मृतीतही जाऊ शकतात. याउलट निर्मितीच्या वेळी दुर्लक्षित राहिलेली कलाकृती ही पुढे श्रेष्ठ गणली जाउ शकते. कलेच्या अनेक प्रांतांप्रमाणेच ही गोष्टं चित्रपटांबाबतदेखील खरी आहे. जॉन फोर्ड या वेस्टर्न चित्रप्रकारात नावाजलेल्या दिग्दर्शकाच्या 'द सर्चर्स’ला दुर्लक्षित नक्कीच म्हणता येणार नाही. तो प्रथम प्रदर्शनाच्या वेळी तर चांगला गाजलाच, वर कालपरत्वे त्याची किर्तीदेखील वाढत गेली . फोर्डचं काम आणि वेस्टर्न्स हा एकूण चित्रप्रकार ,या दोन्ही वर्गात सर्चर्सचं नाव खूपच वरचं आणि आदराने घेतलं जाणारं आहे. असं असतानाही त्याचं तत्कालिन यश आणि चित्रपटांच्या इतिहासात त्याला मिळालेलं स्थान यांची थेट तुलना होणार नाही कारण दोन भिन्न प्रकारच्या यशांमागची कारणं आणि त्या कारणांमागचं तर्कशास्त्र यात खूपंच फरक आहे.
१८६८ मधे घडणारा सर्चर्स हा फोर्डच्या करिअरच्या उत्तरार्धातला सिनेमा. तो स्वतः आणि त्याच्या अनेक चित्रपटांतून महत्वाची कामगिरी बजावणारा जॉन वेन या दोघांचंही नाव एव्हना या चित्रप्रकाराशी घट्ट जोडलेलं होत. अमेरिकन वेस्टच्या भव्य पार्श्वभूमीवर रंगवलेली परिचित , उघड काळ्या पांढ-या छटांत असणारी पण वेधक साहसं आवडणारा एक विशिष्ट आणि मोठासा प्रेक्षकवर्ग होता आणि या चित्रपटाने त्यांना चटकन आवडेल ,पटेल असा नायक आणि कथानक दिलं. नायक संकेताप्रमाणे तरुण नसून मध्यमवयीन असला तरी फोर्ड ,वेन आणि काउबॉईजच्या चाहात्यांना जे हवं , ते बाकी सारं इथे होतं. अँक्शन होती, लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखा होत्या, फोर्डच्या आवडत्या मॉन्युमेन्ट व्हॅलीमधे केलेलं भव्य छायाचित्रणदेखील होतं.
नावाला जागणारा सर्चर्स हा खरोखरंच एका शोधावर आधारित आहे. इथन (वेन) या तडफदार अन भडक माथ्याच्या शिलेदाराने ,मार्टिन (जेफ्री हन्टर) या तरुणाच्या मदतीने चालवलेल्या शोधावर. सिव्हिल वॉरवरुन परत आलेल्या इथनची आपल्या भावाच्या कुटुंबाशी भेट तर होते ,पण लवकरच स्कार या रेड इंडिअन प्रमुखाची टोळी घरातल्या सा-यांचा नायनाट करुन त्याच्या दोन भाच्यांचं अपहरण करते. एका भाचीचा मृतदेह लवकरच सापडतो मात्र धाकट्या डेबीचा शोध सुरुच राहातो. वर्षानुवर्ष, प्रतिकूल परिस्थितीत, कधी सहकार्यांच्या मदतीने ,तर कधी विश्वासघाताला तोंड देत.डेबीला सोडवण्यासाठी नव्हे, तर इंडिअनांचा विटाळ झालेल्या तिला मारुन टाकण्यासाठी. पाच वर्ष चालणारा हा सूडाचा प्रवास ,म्हणजेच द सर्चर्स.
सर्चर्सचा नायक हा आउटसायडर आहे. तो समाजाचा भाग नाही ,तसा तो कधी होणंही शक्य नाही. त्याची पार्श्वभूमी काहिशी रहस्यमय आहे,त्याच्या न्याय अन्यायाच्या ,नीतीमूल्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. तो समाजाशी अपरिहार्यपणे संबंध ठेवून असला ,तरी त्यात तो सहजपणे वावरु शकत नाही. चित्रपट हे जाणतो आणि वेळोवेळी आपल्यालाही त्याची जाणीव करुन देतो. ही जाणीव करुन देण्याची सर्वात मोठी खूण हि चित्रपटाच्या सुरुवातीत आणि शेवटात आहे. चित्रपट सुरू इथनपासून होत नाही ,तर त्याच्या भावाच्या कुटुंबापासून होतो ,ज्यामुळे या कुटुंबियांप्रमाणेच प्रेक्षकही त्याला उपरा म्हणून पाहातात. हे उपरेपण पुन्हा अधोरेखित होतं ते शेवटी ,जेव्हा अखेरच्या क्षणी इथनला झालेली आपल्या कर्तव्याची जाणीव डेबीचा जीव तर वाचवते ,मात्र त्याला कुटुंबाचा भाग बनवू शकत नाही. इथनला संकल्पनेत आणि प्रत्यक्ष दृश्यात उंबरठ्यापलीकडे ठेवणारा चित्रपट अखेरच्या दृश्यचौकटीतही त्याला तसाच उंबरठ्याबाहेर ठेवतो, त्याला आपला म्हणत नाही.
त्याच्या व्यक्तिमत्वाची ही बाजू, त्याची काहिशी रहस्यमय प्रतिमा उभी करते , पण दिग्दर्शकाची या पात्राकडे पाहाण्याची दृष्टी आणि प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाहाण्याची दृष्टी याविषयी थोडा संभ्रम निर्माण करुन , जो चित्रपटाच्या आशयाशी संबंधित आहे. इथन हा नुसताच एकलकोंडा नाही ,तर त्याची एक उघडपणे गडद बाजू आहे. तो टोकाला जाउन वर्णभेद मानतो. मार्टिन लहान असल्यापासून इथनच्या कुटुंबात वाढूनही त्याच्या वंशात कुठेतरी असलेलं इंडिअन रक्त इथनला सहन होत नाही आणि त्याची जाणीव तो सतत मार्टिनला करुन देतो. इंडिअन टोळीशी आलेला डेबीचा संबंध हा तिला शोधून काढून ठार करण्याएवढा भयंकर आहे असं तो मानतो. आता प्रश्न असा की हा माणूस जर चित्रपटाचा नायक असेल ,तर दिग्दर्शकाची या रेसिस्ट दृष्टिकोनाला सहानुभूती मानावी का? एक गोष्ट खरी की इथनच्या वागण्यातली ही खोच तत्कालिन प्रेक्षकाच्या फार लक्षात आली नसावी कारण १९५० च्या दशकातला प्रेक्षक हा पुढल्या काळाइतका पोलिटिकली करेक्ट नव्हता. इथनने केलेला भेदभाव ,हा या प्रेक्षकाने त्याच्या पुरुषार्थाबद्दलच्या कल्पनांचा , मर्दुमकीचा एक भाग म्हणून मान्य केला आणि चित्रपट इतर चार साहसपटांप्रमाणे पाहिला. त्याला तेव्हा मिळालेल्या यशात ,प्रेक्षकांच्या या उथळ नजरेचा भाग जरुर आहे. नंतर मात्र या व्यक्तिरेखेकडे अधिक तपशीलात पाहाण्याची गरज तयार झाली.
फोर्डचे इतर चित्रपट पाहिले ,तर तो अशा चुकीच्या दृष्टिकोनाची बाजू घेईल असं वाटत नाही. त्याने आपल्या चित्रपटांतून कायमच समतोल दृष्टिकोन मांडला आहे आणि इंडिअन व्यक्तिरेखांचं चित्रणदेखील सहानुभूतीने केल्याची उदाहरणं आहेत ,त्यामुळे त्याच्या स्वत:च्या दृष्टिकोनाबद्दल शंका घ्यायला ,किंवा हे चित्रण हा अपघात मानायला जागा नाही. या परिस्थितीत दोन अर्थ निघतात. एकतर फोर्डने आपल्या नायकाचं चित्रण आदर्श , पारंपारिक नायक म्हणून न करता , ग्रे शेड्समधे करुन त्याच्या व्यक्तिमत्वाला एक खोली आणून दिली आहे. इथनचं व्यक्तिमत्व त्याला नायक बनवत नाही ,उलट असं व्यक्तिमत्व असूनही तो नायक ठरतो ,हा विशेष.
इथला दुसरा अर्थ म्हणजे व्यक्तिमत्व महत्वाचं नसून नायक आणि खलनायक ठरण्यासाठी निवेदकाचा दृष्टिकोन महत्वाचा असल्याचं दिग्दर्शक आपल्याला सांगतो आहे.कारण एका परीने नायक इथन आणि खलनायक स्कार यांच्यात काही फरक नाही. दोघंही दुस-या जमातीचा द्वेष करणारे ,क्रूर आहेत. मात्र धाडसी, आपल्या लक्ष्याचा अखेरपर्यंत पाठपुरावा करणारे आहेत.दोघांच्या सूडनाट्याची सुरुवात आप्तांच्या हत्येपासून झाली आहे. स्कारला अनेक बायका आहेत, इथनने लग्न केलेलं नाही ,मात्र त्याचे आपल्या भावाच्या पत्नीशी संबंध असल्याचं (अर्थात डेबी ही भाची नसून कदाचित मुलगी असल्याचं) सुचवण्यात आलं आहे. त्यामुळे या जुळ्या व्यक्तिमत्वांमधे एक खलनायक असेल तर दुसरा नायक कसा ,हा इथे पडणारा प्रश्न आहे जो चित्रपटाला वेगळं परिमाण देतो आणि तो काळाच्या पुढे असल्याचं दाखवून देतो. व्यक्तिरेखेला अंगभूत असलेली ही गुंतागूंत, त्याला मोठा ,महत्वाचा चित्रपट ठरवण्यासाठी जबाबदार आहे.
अशी एक शक्यता आहे की तेव्हाच्या प्रेक्षकांच्या सोयीसाठी सर्चर्सने आपला हा दृष्टिचा वेगळेपणा लपवण्याचा प्रयत्न केला असेल. त्यामुळे इथनबरोबर मार्टिनला आणून चित्रकर्त्यांनी इतर मसाल्याची सोय केली आहे. मार्टिनमुळे चित्रपटात येणारा विनोद आणि रोमान्स ,चित्रपटाचा परीणाम थोडा कमी करत असला तरी तेव्हाच्या प्रेक्षकांना तो पचणं थोडं सोपं झालं असेल , हे निश्चित. हा मसाला नसता ,तर चित्रपट किती जहाल झाला असता याची झलक पाहायची असेल ,तर मार्टिन स्कोर्सेसीचा ’टॅक्सी ड्रायव्हर’ ( १९७६) पाहावा ज्यावर सर्चर्सचा  जाणवण्याजोगा प्रभाव आहे.समाजाशी संबंध सुटलेला -नायकाच्या पारंपारिक साच्यात न बसणारा नायक, आपल्याच वेडात गुरफटलेलं गडद आयुष्य, अल्पवयीन मुलीची गडद भविष्यकाळापासून सुटका, थोडक्या ठळक छटांमधे रंगवलेला खलनायक ,सर्व व्यक्तिरेखांमधली संदिग्धता हे सारं तिथे आहे. तेदेखील थेट, टोकाचं , विचारांना उसंत न देणारं.
टॅक्सी ड्रायव्हरचा पुरोगामीपणा सर्चर्सच्या प्रेक्षकांना झेपला असता असं वाटत नाही. त्यामुळे जॉन फोर्डने निवडलेला मार्ग हा एका परीने योग्यच म्हणायला हवा.मात्र ते म्हणतानाच आपण हे विसरता कामा नये ,की सर्चर्स बदलाचं पाऊल न ऊचलता, तर आधुनिक नायकांच्या व्यक्तिरेखांमधली वाढच खुंटली असती.
- गणेश मतकरी 

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP