द सायलेन्ट हाऊस- व्यक्तिगत सत्याचे प्रयोग
>> Monday, April 9, 2012
सायलेन्ट हाऊसचं श्रेयनामावलीत सांगितल्याप्रमाणे सत्य घटनेवर आधारलेलं असणं निरर्थक आहे.कारण चित्रपटातल्या व्यक्तिरेखांचा चित्रपटाच्या अखेरपर्यंतचा प्रवास बघता या घरात नक्की काय आणि कसं घडलं हे सांगणारा उमेदवार मिळणं अशक्य. नाही म्हणायला आपल्याकडल्या एका गाजलेल्या चित्रपटाची आठवण मात्र तो करुन देतो. तो म्हणजे राम गोपाल वर्मा दिग्दर्शित आणि अनुराग कश्यप लिखित 'कौन?'.घराचा वापर, पात्रांची संख्या, एकच सलग प्रसंग म्हणून उलगडणारी कथा ,स्पष्टिकरणाची वानवा आणि रहस्यभेद या सा-याच बाबतीत या दोन्ही चित्रपटांत आश्चर्यकारक साम्य आहे. एका बाबतीत मात्र तो कौनपेक्षा खूपच वेगळा आहे, आणि तो म्हणजे चित्रपटाची दृश्य संकल्पना.
लाँग टेक्स , किंवा मधे न तोडता सलग बराच काळ चालणारे शॉट्स अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या रितीने वापरले आहेत, मात्र सिंगल शॉट फिल्म्स आजही एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या, त्यादेखील थोडं चीटिंग गृहीत धरुन. हिचकॉकची 'रोप' या प्रकारची सिंगल शॉट फिल्म होती मात्र प्रत्यक्षात ते १० ,१० मिनिटं चालणा-या लांबलचक शॉट्सचं चतुर जोडकाम होतं ,फिल्मच्या रिळांच्या लांबीवर बेतलेलं. पुढे डिजिटल तंत्र रुढ झाल्यावर साकुरोवने केलेला रशियन चित्रपट ’रशियन आर्क’ मात्र खरोखरच एका शॉटमधे बनवलेला अतिशय अवघड चित्रपट होता. दिग्दर्शक गुस्तावो हेर्नांन्डेज यांचा सायलेन्ट हाऊस, आर्कपेक्षा रोपच्याच मार्गाने जातो. प्रत्यक्ष एका शॉटमधे चित्रण न करताही तो तसा आभास निर्माण करतो. दिवाबत्ती नसणा-या अंधा-या बंद घरातच तो घडत असल्याने आणि मधे ब-याच वेळा सोयीस्कर पूर्ण अंधार असल्याने जोडकाम कठीण नाहीच
चित्रपटाच्या नावातलं घर ,हे भयपटात शोभण्यासारखं, वर्षानुवर्ष बंद (म्हणजे अगदी दारं खिडक्यांवर फळ्या मारण्याइतपत बंद) असणारं, निर्मनुष्य रानातलं ओसाड घर आहे. लॉराच्या नजरेतून आपल्याला होणारं त्याचं पहिलं दर्शनच अस्वस्थ करणारं आहे.लॉरा (फ्लोरेन्शिआ कोलूची) ही आपल्या वडिलांबरोबर घरमालकासाठी या विकाऊ घराची थोडी डागडूजी करायला आली आहे . दुस-या दिवशी लवकर कामाला लागायचं असल्याने वडील झोपतात पण लॉराला झोप येत नाही. तिला वरच्या मजल्यावरून कसले तरी आवाज यायला लागतात.वडिलांना उठवून ती तपासाला पाठवते पण परिस्थिती बिघडत जाते. या घरात जे काही घडतंय त्यात केवळ मानवी हात नसेल की काय अशीही शक्यता दिसायला लागते.
सायलेन्ट हाऊस मधे माझ्या मते दोन गोंधळ आहेत. दोन्ही पटकथेसंबंधातले . पहिला म्हणजे त्यात पुरेशा घटना किंवा टप्पे नाहीत. या प्रकारच्या चित्रपटांना एक पॅटर्न लागतो. त्यांची सुरूवात सावकाश आणि सारं आलबेल असल्याच्या आभासाने व्हावी लागते. मग रहस्यमय घटनांना गती येण्याकरता काही वेळ द्यावा लागतो. आणि गती आली की ती वाढवत नेत शेवटापर्यंत खेचावी लागते. या प्रकारचा पॅटर्न इथे दिसत नाही. इथे काहीतरी बिनसल्याची जाणीव सुरुवातीपासून होते ,चमत्कारिक गोष्टी लगेचंच घडायला लागतात मात्र गती सतत बदलत राहाते, घटनांमधे सातत्य राहात नाही.
दुसरा गोंधळ आहे तो स्पष्टिकरणाचा .चित्रपट कायम पॅनिक मोड मधे असल्याने आणि नायिकेखेरीज इतरांना फार भाव देत नसल्याने त्याला घटनांचं सूसूत्र स्पष्टिकरण द्यायला जमत नाही .प्रतिमा आणि चित्रपटभर पसरलेले रहस्यमय पुरावे हे सतत लक्षवेधी वाटतात, मात्र त्यांचा अंतिम उलगडा केला जात नाही. हे सहज शक्य असताना न करणं हेदेखील त्याचं ’कौन?' शी असणारं साम्य.
हे दोष आहेत हे मान्य ,पण ते चित्रपटाकडे दुर्लक्ष करण्यासाठी पुरेसे नाहीत. वातावरणनिर्मिती आणि चलाख छायाचित्रण हे सायलेन्ट हाउसचे विशेष आहेत ,आणि केवळ या दोघांसाठीदेखील तो पाहाणं योग्य ठरेल.हॉरर चित्रपटांमधे फॉर्म्युलांचा सुळसुळाट असतो आणि अपेक्षेपेक्षा काही वेगळ पाहायला मिळण्याची शक्यता कमी. इथे ते पाहायला मिळतं हीच या चित्रपटाची जमेची बाजू.
- गणेश मतकरी
4 comments:
Ganesh, You must inform the readers about the 'spoilers'. You are demystifying at least some part of it, When you write about it. Those who want to see the film, you should alert them : SPOILERS AHEAD. Hope you would agree with me. Have you written anything about Pansingh Tomar? I'm eager to read it. - Mukund Taksale
चुका दाखवून देऊन तरीही हा चित्रपट दखलपात्र का आहे हे सांगण्याची तुझी धाटणी आवडली.
I don't think there r any spoilers here, as i avoid them at all costs. U may be assuming that comparison to 'kaun?' or explaining the unreliable narrator application here are spoilers but they are not.
Ok . bagto milto ka ?? dusra aas ki Ram Goplal Varma cha mala Kaun ajoon hi awadto.. Tyachi mandani , urmila , manoj cha lajawab abhinay ....
Post a Comment