सादरीकरणातला 'टायटॅनिक' प्रयत्न
>> Sunday, April 15, 2012
टायटॅनिकची दर्जात्मक गुणवत्ता, ही नेहमीच विवाद्य होती. भयंकर आवडणं आणि अगदीच ढोबळ वाटणं अशा दोन प्रतिक्रिया त्याबद्दल कायमच व्यक्तं होत आल्या. माझं व्यक्तिगत मत हे दुस-या बाजूला झुकणारं असलं तरी त्यातली तांत्रिक सफाई ही मूळ प्रदर्शनावेळीही थक्क करून सोडणारी होती आणि आता संगणकीय अॅनिमेशनची सवय झालेले आपण ,आजही त्यातल्या स्वतंत्रपणे चित्रीत केलेल्या तुकडयांना संपूर्ण जहाजाचा संदर्भ आणून देणा-या दृश्यांनी , वा आपल्या अभिनेत्यांना बुडत्या जहाजाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत पळायला लावत जहाजाचा शेवट पूर्ण लांबीच्या चित्रपटाइतका वेळ देऊन तपशिलात उभ्या करण्याच्या दिग्दर्शकीय कौशल्याने प्रभावित होतो ,यात शंका नाही. तरीही प्रश्न हा उरतोच ,की ज्या त्रिमितीचा आनंद लुटण्यासाठी आपण हा चित्रपट नव्याने पाहावा असं जाहिरातींमधून सांगण्यात येतंय, त्यात काही तथ्य आहे अथवा नाही.त्याचं उत्तर सरळ 'हो' किंवा 'नाही' अशा सोप्या शब्दात देणं कठीण आहे.
चित्रपटातला ३ डी चा वापर हा सामान्यत: दोन प्रकारचा असू शकतो. पहिला हा ३ डी च्या सुरुवातीच्या दिवसांप्रमाणे प्रेक्षकांच्या अंगावर वस्तू फेकत ,वा प्रेक्षक आणि पडदा यामधल्या अवकाशाचा चमत्कृतीपूर्ण परिणाम साधत ,तंत्राला क्लुप्तीप्रमाणे वापरत केला जातो .दुसरा ,तंत्रापायी वा तंत्रज्ञानापायी कथेचं महत्व कमी करू इच्छित नसतो. केवळ पडद्यावरले प्रसंग अस्सल वाटण्यासाठी , अवकाशाला खोली येण्यासाठी ,प्रेक्षकाला सारं आपल्यापुढे प्रत्यक्ष घडत असल्याचा आभास तयार व्हावा म्हणून केलेला हा संयत वापर असतो.पहिल्या प्रकारचा वापर प्रेक्षकांना अधिक गंमतीदार वाटत असला आणि आकर्षित करत असला तरी प्रेक्षकांना कथेवर लक्ष केंद्रीत करु देत नाही. याउलट दुसरा प्रकार हा नकळत प्रेक्षकांना कथेत गुरफटत नेतो. 'टायटॅनिक' मधला वापर हा असा दुस-या प्रकारचा आहे.
टायटॅनिक नव्याने बनवला गेला असता तर कदाचित अवतार शैलीला अनुसरून कॅमेरॉनने छायाचित्रणातच या तंत्राला अधिक वाव मिळेल अशा जागा शोधल्या असत्या ,पण चित्रपट मुळात अस्तित्वात असल्याने कॅमेरॉन त्यात मुळापासून बदल करण्याचं टाळतो. 'एखादी गोष्ट बिघडली नसल्यास दुरुस्त करण्याच्या फंदात पडू नये' या न्यायाने टायटॅनिकमधे काही मोडतोड केली जात नाही. तंत्राचा वापर हलक्या हातांनी ,गरजेप्रमाणे आणि केवळ गरजेप्रमाणेच केला जातो. यामुळे सर्वाधिक उपयोग हा खजिन्याच्या शोधाच्या प्रस्तावनपर कथानकात आणि उत्तरार्धातल्या जहाजाच्या जलसमाधीदरम्यानच होतो. रोमान्सला धक्का लागत नाही. जी गोष्ट अतिशय चांगली आहे.
हा वापर , ही प्रसंगाना येणारी खोली आपल्याला जाणवते , मात्र तो रॅडिकली वेगळा नसल्याने आणि मूळ चित्रीकरणदेखील अतिशय परिणामकारक असल्याने ,परिणाम फार वेगळा ,नवा असत नाही हेदेखील खरं. मात्र जी मंडळी पहिल्यांदाच हा चित्रपट पाहातायत त्यांचा अनुभव काहिसा अधिक तीव्र ,अधिक गहिरा असेल हे निश्चित.आज टायटॅनिकला पुरेसा प्रेक्षक का नाही हे मला माहित नाही. कदाचित त्याचं चॅनल्सवरुन अतिपरिचित होणं हे त्याचं कारण असेल, किंवा कदाचित प्रेक्षकाला ज्या प्रकारचं गिमिकी तंत्र हवं आहे त्या प्रकारचं आणि तितकं तो देऊ शकत नाही हेदेखील असेल . तरीही या चित्रपटाला प्रेक्षक असावा, अधिकाधिक लोकांनी तो पाहावा असं जरुर वाटतं. आशय बाजूला ठेवूनही ,केवळ सादरीकरणातला एक टायटॅनिक प्रयत्न म्हणून तो सर्वांनी अनुभवणं गरजेचं आहे.निदान एकदा तरी.
- गणेश मतकरी
(लोकसत्तामधून)
0 comments:
Post a Comment