नो लॅन्ड्स मॅन

>> Sunday, May 20, 2012चित्रपटांच्या जाहीरातीत टॅगलाईन वापरण्याची, म्हणजे त्या चित्रपटाबद्दल माहिती देणारी एखादी ओळ टाकण्याची पद्धत आपल्याकडेही गेली बरीच वर्षे आहे; पण तिचा पुरेसा हुशार वापर आपल्याकडे झालेला दिसत नाही. हॉलीवूडमधून सरळ उचलण्यात आलेल्या गोष्टींप्रमाणेच हीदेखील एक, एवढंच म्हणता येईल. हिंदी चित्रपट ही ओळ इंग्रजीत लिहिताना दिसतात. आता हिंदी चित्रपटाचा प्रेक्षक वर्गही अर्थातच हिंदी जाणणारा, मग टॅगलाईन इंग्रजी कशाला ? पण नाही. आजच्या हिंदी चित्रपटसृष्टीची बोलीभाषा इंग्रजी असल्याचा हा परिणाम आहे. बरं, या भाषांतरानंतरही ही योजना फार उपयुक्त ठरलेली दिसत नाही. कारण यातला इंग्रजीचा वापर हा कृत्रिम आणि कुतूहलापेक्षा मनात गोंधळ निर्माण करणारा वाटतो.
मात्र ही प्रथा जर अधिक अक्कलहुशारीने वापरली तर उपयुक्त ठरू शकते, हे तिच्या हॉलीवूडनं केलेल्या वापरातून लक्षात येतं. काही उदाहरणंच पाहू. प्लॅटून चित्रपटात आँलिव्हर स्टोनने सैनिकांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. आशयाला अचूक स्पर्श करणारी त्यानं वापरलेली ओळ होती `द फर्स्ट कॅज्युअल्टी आँफ वॉर इज इनोसन्स` शामलनला आपल्या `साईन्स` चित्रपटाच्या जाहिरातीतून प्रेक्षकाची दिशाभूल करायची होती. त्यांना मूळ विषय न सांगता, केवळ त्यांचं कुतूहल जागृत करायचं होतं आणि परग्रहवासीयांवर आधी निघालेल्या `इंडिपेंडन्स डे` सारख्या चित्रपटासारखी जाहिरातबाजी करून प्रेक्षक खेचायचा होता. त्यासाठी क्रॉप सर्कल्सच्या मोठाल्या चिन्हांबरोबर त्यानं वापरलेली ओळ होती `इट्स नॉट लाइक दे डिडन्ट वॉर्न अस`. या ओळीनं आपल्या मनात आपोआपच एक चित्रं उभं केलं, जे शामलनच्या पथ्यावर पडलं.
`ट्वेल्व्ह मंकीज` हे नाव सायन्स फिक्शन चित्रपटाचं वाटत नाही, हे मी सांगायची गरज नाही. पण हा एक अतिशय उत्तम विज्ञानपट होता, आहे. त्याला थोडा विज्ञानपटाचा बाज आणून देणारी, थोडा शब्दांचा खेळ करणारी अन् तरीही प्रामाणिक असणारी जाहिरातीतील ओळ होती. `फ्युचर इज हिस्टरी`. प्लेगच्या साथीने उलथापालथ झालेल्या भविष्यातील पृथ्वीवासीयांचा, आपलं अटळ भवितव्य बदलण्याचा प्रयत्न सांगणा-या चित्रपटाचा मूड याओळीत अचूक आला.
हे आठवायचं कारण म्हणजे स्पिलबर्ग आणि टॉम हॅन्क्स यांच्या चित्रपटाची जाहीरात. `द टर्मिनल` चित्रपटासाठी वापरलेली ओळ आहे `लाईफ इज वेटिंग` आणि एकाच वेळी कथेविषयी, आशयाविषयी अन् गर्भित अर्थाविषयी सांगणारी ही ओळ टॅगलाईनचं एक उत्तम उदाहरण आहे.
टर्मिनलचा नायक व्हिक्टर नावोर्स्की (हॅन्क्स) हा क्राकोझिया या रशियाच्या आसपासच्या (पण अर्थातच काल्पनिक) देशाचा रहिवासी. हा कामानिमित्त न्यूयॉर्क विमानतळावर उतरतो आणि एका चमत्कारिक अडचणीत सापडतो.
प्रवासादरम्यान त्याच्या देशात क्रांती झालेली असते आणि राजकीय उलथापालथीनंतर अजून स्थिरस्थावर होण्याची कोणतीच चिन्हे नसतात. क्राकोझियात या काळात दिलेले सर्व परवाने रद्द झालेले असतात. अन् व्हिसाअभावी व्हिक्टर न्यूयॉर्कमध्ये पाऊल ठेवू शकत नाही. दुर्दैवाने क्राकोझियाच्या नव्या राजवटीला अजून अमेरिकेने मान्यता दिलेली नसल्याने त्याला आपल्या देशात परत जाणंही शक्य नसतं. आता हा प्रश्न सुटण्याची वाट पाहत अनिश्चित कालावधीसाठी विमानतळावर मुक्काम ठोकण्याखेरीज कोणताच पर्याय व्हिक्टरपुढे उरत नाही.
पण चित्रपटाच्या जाहिरातीतलं `लाईफ इज वेटिंग` हे वाक्य एखाद्या व्हिक्टर नावोर्स्कीला उद्देशून म्हटलेलं नाही, तर स्पिलबर्गला ते जीवनाच्या व्याख्येशीच नेऊन जोडायचं आहे. जगातला कितीही यशस्वी किंवा कितीही सुखी माणूस घ्या, तो कायम कशा ना कशाची वाट पाहत असतो. गरीब माणूस धनाची, श्रीमंत माणूस सुखाची, व्यग्र माणूस विश्रांतीची, तर निवृत्त माणूस पुन्हा गुंतण्याची वाट पाहताना दिसतो. ज्याक्षणी ही प्रतीक्षा संपते, तो क्षण जगण्याच्या अंताचाच संभवतो आणि म्हणूनच हे थांबून राहणं एक प्रकारे आयुष्याचं प्रतीक आहे.
टर्मिनलमधील सगळीच पात्रं या ना त्या प्रकारे कोणासाठी तरी कशासाठी तरी थांबलेली दिसतात. व्हिक्टर स्वतः कसल्या प्रतीक्षेत आहे, हे आपल्याला काही अंशी माहीत आहे, त्याचबरोबर त्याला छळणारा विमानतळाचा टेम्पररी प्रमुख डिक्सन (स्टॅनली टुकी) आपल्या बढतीच्या आशेवर आहे. विमानतळावर सतत ये-जा करणारी आकर्षक हवाई सुंदरी अमेलिया (कॅथरीन झेटा जोन्स) आपलं धावपळीचं आयुष्य थांबवून स्थैर्य मिळविण्यासाठी धडपडते आहे. भारतीय सफाई कामगार गुप्ता ( कुमार पल्लानाटुची) आपल्या भारतातल्या घरून पळून आलेला आहे. त्याच्यामागे पोलिसांचा ससेमीरा आहे. या ना त्याप्रकारे आपल्याला परत जाता यावं अशी त्याची मनापासून इच्छा आहे. खाद्य पुरवठा विभागातला एक कर्मचारी (दिएगो लुना) आयएनएस एजंट (झोसल्याना)च्या प्रेमात आहे. आणि कोणीतरी हे तिच्यापर्यंत पोहोचवेल याची तो वाट पाहत आहे.
चित्रपट संपतेवळी या सर्वांचे प्रश्न सुटत नाहीत, आणि ते तसे सुटणं अपेक्षितही नाही. ज्यांचे सुटतात त्यांची एका प्रतिक्षेतून सुटका होते, अन् दुस-या गोष्टीची वाट पाहणं सुरू होतं.
स्पिलबर्ग आणि हॅन्क्स हे दोघेही जण आपापल्या क्षेत्रातले दिग्गज समजले जातात. स्पीलबर्गने अनेक प्रकारांमध्ये मोडणा-या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून देदीप्यमान कामगिरी केली आहे, तर हॅन्क्सने एड्स पेशंट (फिलाडेल्फिया) पासून बुद्धीने बेताच्या पण जग काबीज करणा-या भाबड्या तरुणापर्यंत (फॉरेस्ट गम्प) आणि रुक्ष गँगस्टर (रोड टू पर्डिशन)पासून अँस्ट्रोनॉट (अपोलो १३) पर्यंत अनेक त-हांच्या भूमिका केल्या आहेत. स्पिलबर्ग-हॅन्क्सचा `सेव्हिंग प्रायव्हेट रायन`,  `कॅच मी इफ यू कॅन` नंतरचा हा तिसरा एकत्रित चित्रपट. रायनच्या अतिगंभीर विषयानंतर आलेले हे दोन्ही चित्रपट म्हणजे या दोन नावांच्या मानाने छोटेखानी म्हणण्यासारखे चित्रपट आहेत. पण दोनही चित्रपटांत खासकरून टर्मिनलमध्ये दिसलेलं तपशीलातलं व्यक्तिचित्रण हे पाहण्यासारखं आणि या दोनही नावांना साजेसं आहे.
स्पिलबर्गनं या चित्रपटात आपल्या नेहमीच्या पद्धतीने स्टोरिटेलिंगवर भर दिला आहे. आपली चतुराई न दाखविता व्हिक्टर आणि त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींवरचं प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित होईल आणि त्यांच्या प्रश्नात ते गुंतून राहतील, हे त्याने पाहिलं आहे. टर्मिनलच्या सेटचं फार कौतुक झालंय आणि हा जे.एफ.के विमानतळाच्या एका भागाचा सेट जसाच्या तसा उभा करताना स्पिलबर्गच्या टीमनं प्रचंड मेहनत घेतली आहे, हे खरं. पण जर या मंडळींना ख-या एअरपोर्टवर चित्रीकरणाचा परवाना मिळता, तरीही साधारण हेच चित्र दिसलं असतं, हेदेखील तितकंच खरं. त्यामुळे विमानतळाचं नेपथ्य उभं करण्याचा निर्णय हा क्रिएटिव्हिटीपेक्षा व्यावसायिक तडजोडीतून आलेला आहे, हे दिसतं. टर्मिनलचा खरा डोलारा उभा आहे, तो हॅन्क्सच्या अभिनयावर आणि त्याने तो सहज पेललाही आहे. फॉरेस्टगम्प नंतर पुन्हा एकदा इथं त्याने आपल्या संवादाच्या शैलीवर, भाषेवर प्रयोग केलेला दिसतो.
व्हिक्टरची भाषा इंग्रजी नाही. तो जे शिकतो, ते इंग्रजीही मोडकं तोडकं आहे. या अशा चुकतमाकत बोलीवर पूर्ण चित्रपट खेचणं कठीण आहे. तेही योग्य ठिकाणी विनोदनिर्मिती करीत, हास्यास्पद न ठरता. व्हिक्टरचा विनोद हा चॅप्लिनचा विनोद आहे. अंतर्मुख कऱणारा, तरीही चिकार हसवणारा. चॅप्लिनचा ट्रॅम्प जसा आपल्या दुर्दम्य आशावादासह अधिकारशाहीविरूद्ध झगडताना दिसतो, तसाच इथला व्हिक्टर आपल्या नियमांना धरून, हार न मानता आपला लढा चालू ठेवतो. टर्मिनलचं वास्तव हे चित्रपटाच्या चौकटीपुरतं मर्यादित आहे. ही एक देश हरविलेल्या माणसाची परीकथा आहे, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.कारण ख-या जगात- खास करून ९/११नंतरच्या अमेरिकेत कोणी या प्रकारे विमानतळावर राहणं अशक्य. पण चित्रपटागणिक अधिक हिंसक होत जाणा-या हॉलीवूडला अशा भाबड्या फील गुड चित्रपटांचा उतारा देणंही आवश्यक आहे. अन्यथा पूर्ण चित्रपटसृष्टीच सध्या पडद्यावर दिसणा-या विकृतीची बळी ठरल्यावाचून राहणार नाही.
- गणेश मतकरी
(साप्ताहिक सकाळच्या २००४मधील लेखांतून)
10 comments:

Anonymous,  May 20, 2012 at 11:46 PM  

Downloading... :)

हेरंब May 21, 2012 at 1:52 AM  

Apratim chitrpat aahe. And this is inspired by (not 'based on') a true story.

>> फॉरेस्टगम्प नंतर पुन्हा एकदा इथं त्याने आपल्या संवादाच्या शैलीवर, भाषेवर प्रयोग केलेला दिसतो.

Agadi agadi sahamat. Aani ya prayogat to kamalicha yashasvi zalaay as mhanav lagel.

mayuresh shaligram May 21, 2012 at 7:57 AM  

आदरणीय मतकरी सर
हा लेख वाचण्याआधी टर्मिनल जवळपास डझन वेळा पहिला आहे पण त्याची 'life is waiting'हि ओळखच माहित न्हवती.ती ओळख करून दिल्याबद्दल खूप आभार .सर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे(ह्यावर आमच्या मित्र मंडळीत नुकताच जोरदार वाद झाला ) तो असा कि - कुठलाही चित्रपट पाहण्याआधी त्याचे रेटिंग (उदा.IMDB रेटिंग)पाहणे गरजेचे आहे का ? मला व्यक्तीशः वाटते कि ते गरजेचे नाही.उदा. नुकत्याच आलेल्या दिग्दर्शक जोन व्हेदोनच्या आणि मार्वलच्या हिरोंची भेळमिसळ असलेल्या Avengers चे IMDB रेटिंग ८.७ आहे .पण तो चित्रपट तेवढ्या ताकदीचा आहे का ? मला व्यक्तीशः वाटते कि 'नाही '.आपण जरूर मार्गदर्शन करावे

ganesh May 21, 2012 at 8:32 AM  

Thanks heramb. मयुरेश, रेटिंग किंवा स्टार्स देण्याची पध्दत ,यातलं काहीच मला आवडत नाही कारण ते बहुतेक वेळा खूप व्यक्तिगत मतावर अवलंबून असतं किंवा तपशीलात न जाता शेरेबाजी केल्यासारखं असतं. Imdb च्या मताला तर काहीच मुद्दा नाही. तू एखाद्या समीक्षकाचं लिखाण खूप काळ वाचत असलास तर त्याने दिलेले स्टार वा रेटिंग अंदाजासाठी उपयुक्त असतं ( eg I consider roger ebert's star rating reliable to an extent) पण तेही केवळ अंदाज म्हणून.

Chaitanya Joshi May 23, 2012 at 4:08 PM  

Spielberg aani Hanks yaa doghanachahi mee vedyasarkha fan aahe...aani 'terminal' me kadhihi, kitihi vela baghu shakato!!
attaparyant spielbercghcya sinemanvishayi ithe vachyala milala navhta...(nidaan gelya kahi mahinyaat..me blog vachayla lagalyapasun)..majaa aali..!

@Heramb dada: true story varun inspired aahe he mahit navhta..mahitit bhar..dhanyavaads!

aativas May 24, 2012 at 3:03 AM  

लेख एकदम अचानक संपला असं वाटलं!

Digamber Kokitkar May 26, 2012 at 8:25 AM  
This comment has been removed by the author.
Digamber Kokitkar May 26, 2012 at 8:26 AM  

Sundar Film,

Usually u write very less about acting but here we can not ignore TOM HANKS.

Thanks for the detail information about Tagline.

Really a very good Film & as usual very good Article

Unknown June 3, 2012 at 11:26 AM  

फिल्म मनाला स्पर्श करणारी आहे ...
Tom Hanks ने "वेत (wait) , वेत(wet) फ्लोर.." अस म्हणताना केलेला भाबडा अभिनय .. आणि Zeta Jones च्या "Victor , I Have To Go" ला त्याने दिलेला
"I Have to.... Stay " .. म्हणताना घेतलेला pause आणि वापरलेला टोन फिल्म चा बेस्ट point वाटला :)

ganesh June 7, 2012 at 7:24 PM  

Thanks digambar and gaurav. Acting is one of the most easily accessible and obvious elements which all can grasp quite easily. And many standard format reviewers lik it the most. So unless a special case, i avoid dwelling on it. Hanks is very reliable and the role is simple , so i avoided as usual. But yes, he is v good , as expected.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP