द चेजर- परफेक्ट क्राईम
>> Sunday, May 27, 2012
२००३/४ मधे साउथ कोरिआत घडलेल्या एका सिरिअल किलरच्या केसचा चेजरला आधार आहे. मात्र हे केसचं डॉक्युमेन्टेशन नव्हे. पोलिसांच्या कारवाईचा बराच भाग चित्रपटात दाखवण्यात आला तरी त्याला पोलिस प्रोसिजरल देखील म्हणता येणार नाही. सामान्यत: अशा केसवर आधारित चित्रपट हे गुन्ह्यांचा माग ठेवत ,मोठ्या कालावधीवर पसरत, टप्प्याटप्प्याने ताण वाढवत जाताना दिसतात. अशाच विषयावर आधारलेले दोन उत्कृष्ट अमेरिकन चित्रपट ’सायलेन्स आँफ द लॅम्ब्स ’ आणि ’सेवन’ ,किंवा साउथ कोरिआतच बनलेला ’मेमरीज आँफ मर्डर’ अशी गाजलेली उदाहरणं पाहता हे स्पष्ट होईल. चेजर मात्र ही रचना बदलून टाकतो.
या चित्रपटातल्या बहुतेक घटना ,या एका रात्रीत घडतात. यातल्या काही गुन्ह्यांना सूचित करणारा प्रस्तावनापर भाग ,आणि प्रमुख घटना संपल्यावर उलगडणारा ,काहीसा हाफ हार्टेड एपिलॉग वगळता पूर्ण कथानक हे एका संध्याकाळपासून -दुस-या दिवशी सकाळपर्यंत चालतं. जुन्ग हो (किम यून सेओक) हा एकेकाळचा पोलिस डिटेक्टिव , सध्या वेश्या व्यवसायात जम बसून असलेला . सध्या काळजीत, कारण त्याच्याकडल्या दोन मुली,पैसे उचलून गायब झालेल्या. पैशांची गरज असलेला जुन्ग हो, आजारी असलेल्या मी-जिनला ( सिओ योन्ग-ही) तशाच अवस्थेत गि-हाईकाकडे पाठवतो, पण लगेचच आपली चूक त्याच्या लक्षात येते. याच गि-हाईकाकडे गेलेल्या मुली अचानक नाहीशा झालेल्या असतात.या गि-हाईकाला, जी योन्ग-मिनला ( हा जुन्ग-वू) पकडण्यासाठी जुन्ग-हो एक योजना आखतो. तो मी-जिनला फोन करुन ती जात असलेला पत्ता आपल्याला मेसेजवर कळवण्याची सूचना देतो. दुर्दैवाने या एकलकोंड्या घरात फोनला सिग्नल मिळूच शकत नाही आणि मी-जिन जिवावरच्या संकटात येते. कर्मधर्म संयोगाने जुन्ग-हो आणि योन्ग-मिनची गाठ पडते आणि दोघांचीही रवानगी पोलिस स्टेशनवर होते . आडबाजूच्या घरात जखमी अवस्थेत पडलेल्या मी-जिनचा जीव वाचणं, न वाचणं आता या दोघांतला पहिला कोण पोलिस स्टेशन बाहेर पाउल टाकतो यावर अवलंबून राहातं.
सिरीअल किलिंगवर आधारित चित्रपट हे सामान्यत: ’गुन्हेगार कोण?’ छापाचा रहस्यभेद वापरु शकत नाहीत. इथलं गुन्हेगार आणि त्याचा तपास करणारे यांचं विश्व एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळं असल्याने हे शक्य होत नाही. तरीही गुन्हेगाराला तपशीलात दाखवणं बराच काळ टाळलं जातं ,हे खरं. चेजर चा लेखक-दिग्दर्शक ना होन्ग-जिन ,हेदेखील करु इच्छित नाही. तो सुरुवातीपासुनच गुन्हेगार कोण आहे आणि तो काय थराला जाउ शकतो हे आपल्याला दाखवून देतो.त्यामुळे होतं काय ,की प्रेक्षक गुन्हेगार कोण असेल या विचारात फार वेळ फुकट घालवत नाही. याउलट योन्ग-मिन आणि जुन्ग-हो या दोन्ही व्यक्तिरेखा आपापल्या बाजूने काय चाली प्रतिचाली खेळतात हे लक्षपूर्वक पाहाणं त्याला शक्य होतं.
रहस्य शेवटाच्या एका उत्कर्षबिंदूवर अवलंबून न ठेवल्याने दिग्दर्शक कथानकातलं दर वळण, हे रहस्याला चढवत नेण्यासाठी वापरतो. त्याला सुरुवात होते ,ती मी-जिनला आपण सापळ्यात अडकल्याचं लक्षात येतं त्या प्रसंगापासून ,ते छोट्या अंधा-या गल्ल्यांमधून चाललेल्या जुन्ग-हो आणि योन्ग-मिन मधल्या पाठलागापर्यंत चालणा-या प्रसंगमालिकेपासून . ही प्रसंगमालिका त्यातल्या प्रत्येक अनपेक्षित वळणाबरोबर वाढत जाणारा तणाव ,वातावरणनिर्मितीचे तपशिल आणि तरबेज छायाचित्रण यामुळे हिचकॉकियन परंपरेत बसणारी म्हणावी लागेल. तिचा दोन्ही प्रमुख पात्रांना पोलिसांच्या हवाली करणारा शेवट तर पाहाणा-याला अधिकच संभ्रमात टाकणारा.
चेजरची पटकथा ही काळजीपूर्वक रचलेली आणि दर वळणाचा काळजीपूर्वक विचार करणारी आहे. केवळ अँक्शनला महत्व देऊन ,ती इतर ठिकाणी तडजोड करत नाही. यातला प्रमुख तपासाचा विषय सोडला ,तर इतर दोन बाबीही तिच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. यातली पहिली आहे ती जुन्ग-हो च्या व्यक्तिमत्वात होणारा बदल. चित्रपट सुरु होतानाचा जुन्ग-हो आणि शेवटाकडला जुन्ग हो, यांमधे खूपच मोठा बदल आहे. मुळातच ही व्यक्तिरेखा अँन्टीहिरोची आहे ,हे लक्षात घेतल्यास अधिक जाणवणारा. दुसरी बाब आहे ती पोलिस आणि कायदा यांच्या त्रुटी आणि मर्यादा. मेयरवरल्या चमत्कारिक हल्ल्याचा संदर्भ देऊन चित्रपट टिंगलीच्या सूरात ही बाब हाताळतो, पण परिणामांचा ठपका त्यांच्यावरही ठेवायला तो मागेपुढे पाहात नाही. हे सारं लक्षात घेतलं तर व्यक्तिरेखा , सामाजिक पार्श्वभूमी आणि प्रत्यक्ष घटना , या अशा चित्रपटाच्या तिनही महत्वाच्या बाजूना चेजरमधे महत्वाचं स्थान असल्याचं दिसून येईल.
चेजरची अमेरिकन आवृत्ती लवकरच पडद्यावर येण्याची शक्यता आहे. जरी तशा घोषणा झाली नसली ,तरी लिओनार्दो डिकाप्रिओने प्रोजेक्टमधे दाखवलेला रस त्याकडे निर्देश करतो. बॉलिवूड आवृत्ती तर आधीच येऊन गेली असं म्हणतात. चेजर पाहाण्याआधी मी मर्डर २ पाहिला नाही ही चांगलीच गोष्ट. आणि आता तो पाहाण्याची शक्यताच नाही म्हंटलं तरी चालेल.
- गणेश मतकरी
4 comments:
सुपर्ब आहे चेजर. पाठलाग सही आहेत आणि अजून एक म्हणजे ती छोटी मुलगी आणि प्रमुख पात्र यांचं उलगडत जाणारं नातंही सुंदर पद्धतीने दाखवलं आहे.
>> चेजर पाहाण्याआधी मी मर्डर २ पाहिला नाही ही चांगलीच गोष्ट. आणि आता तो पाहाण्याची शक्यताच नाही म्हंटलं तरी चालेल.
+१
Chaser,I thought could've been much better.Somewhere the whole timeline and extra period the movie takes after first hour to settle the tone
was really annoying for the pace of overall.
If you liked this one,you definitely want to watch "I saw the devil",another great movie.
i plan to
सिरीयल किलर.. मेसेज.. योगायोगाने गाठ पडणे.. दोघही एकाच तुरुंगात..
आरर्र्र... 'मर्डर २' सही सही ढापलेला पिक्चर आहे की.
Post a Comment