मार्था मार्सी मे मार्लीन- मनोव्यापारांचा गुंता
>> Monday, June 25, 2012
प्रोटॅगनिस्टची मानसिक स्थिती प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा एक अत्यंत उत्तम आणि कठीण प्रयत्न क्रिस्टोफर नोलनच्या मेमेन्टोमधे झाला होता ज्यात निवेदनाची रचना हीच त्या स्थितीचं स्पष्टिकरण म्हणून वापरण्यात आली होती. इथला प्रयत्न हा तितका गुंतागुंतीचा नसला तरीही दिग्दर्शकाने केलेला विचार हा साधारण त्याच प्रकारचा आहे. 'मार्था मार्सी मे मार्लीन' ची नायिका (एलिझबेथ ओल्सन, उत्तम अभिनय),मूळची मार्था, ही अशा परिस्थितीत आहे की आता घडणा-या गोष्टी आणि भूतकाळ यांची तिच्या नजरेत सरमिसळ झाली आहे. वरवर पाहाता आजूबाजूला घडणा-या गोष्टिंची जाणीव असूनही ती एका कायमच्या संभ्रमात आहे ,ज्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे.दिग्दर्शक हा तिला वाटणारा संभ्रम काही प्रमाणात प्रेक्षकालाही जाणवेल अशा पध्दतीने आपली चित्रीकरणाची आणि संकलनाची दृष्टी ठरवतो. मार्था जिथे सध्या राहाते आहे ,ते तिच्या बहिणीचं प्रशस्त घर आणि ती नुकतीच जिथून पळून आलीय ते ,पॅट्रिक (जॉन हॉक्स) च्या अधिपत्याखाली चालणारं , पळून आलेल्या तरुण तरुणींनी भरलेलं शेतावरलं घर या दोन्ही जागा ,मुळात एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत ़ मात्र चित्रपट त्या आपल्यासमोर अशा पध्दतीने मांडतो ,की क्षणभर विचार केल्याशिवाय आपल्याला दिसणारं दर दृश्य ,हे कोणत्या घरातलं ,कोणत्या काळातलं आहे याचा पत्ता लागू नये. दृश्य संकल्पनांमधला नेमका सारखेपणा, दोन्ही काळातलं मार्थाच्या दिसण्यातलं साम्य, संवादात पुनरावृत्ती करणारे विषय ,आणि पटकथेत कोणत्याही निश्चित आराखड्याशिवाय येणारे वेगळ्या स्थलकालांचे प्रसंग यांच्या मदतीने हे साधतं. हे परिणामाच्या दृष्टिने योग्य पाऊल सामान्यपणे चित्रपटात दिसणा-या, कथेत स्पष्टपणा आणण्याच्या प्रयत्नाच्या बरोबर उलट आहे, हे लक्षात ठेवण्यासारखं.
पटकथा आणि दृश्यातली सरमिसळ चित्रपटाच्या नावापासूनच सुरू होते.’मार्था’ हे नायिकेचं खरं नाव, ’मार्सी मे’ हे पॅट्रिकने पंखाखाली घेतल्यावर दिलेलं नाव आणि पॅट्रिकच्या घरातल्या सर्व तरुणी (आपली खरी ओळख लपवण्याकरता) वापरत असलेलं ’मार्लीन’ हे नाव . ही सारी नावं चित्रपटाच्या नावात सलग येतात. त्यांचा क्रम, नावांची स्वतंत्र ओळख यातलं काहीच सूचित न करता. जणू ही सारी नावं एकत्रितपणे एकाच व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत.दिग्दर्शकालाही हेच दाखवून द्यायचं आहे ,हे उघड आहे.
चित्रपट सुरु होताहोताच मार्सी मे अर्थात मार्था ,ही पॅट्रिकच्या घरून पळ काढताना दिसते. अर्थात या क्षणी या घराविषयी काहीच स्पष्टपणे कळत नाही. केवळ तरुण मुलामुलींचा एकत्रितपणे राहाणारा गट दिसतो. काहीतरी चमत्कारिक , अनैसर्गिक असल्याचं जाणवतं ,पण ते अर्धवटच. मार्था कुठूनसा आपल्या बहिणीला,लूसीला (सारा पॉल्सन) फोन करते आणि ती येउन मार्थाला आपल्या घरी घेउन जाते.लूसीचा मुळातच मार्थाशी फार संपर्क नसावा.लहानपणच्या कुठल्याशा क्लेशकारक अनुभवाने (ज्याबद्दल चित्रपट स्पष्टपणे काही सांगत नाही) मार्था कुटुंबापासून दुरावली असावी आणि आपलेपणाचा, प्रेमाचा शोध तिला पॅट्रिकपर्यंत घेउन गेला असावा. मार्थाच्या गरजेच्या काळात तिला मदत करणं शक्य न झाल्याने लूसीचं मन तिला टोचतंय आणि या टोचणीतून सुटण्याचा उपाय म्हणूनच तिने आता मार्थाची जबाबदारी उचलायचं ठरवल असावं. अर्थात ती उचलणं फारसं सोपं नाही. कारण पॅट्रिक बरोबरच्या काळात तिचा समाजाशी संबंध पूर्णपणे तुटलेला आहे. चार लोकांत कसं वावरावं हे तिला कळत नाही. त्याबरोबर मधल्या काळात तयार झालेलं विक्षिप्त तर्कशास्त्र आणि वेळोवेळी अनावर होणं यामुळे गोष्टी अधिकच हाताबाहेर जातात. लूसी आणि तिचा स्नॉबिश नवरा टेड, यांना हे प्रकरण झेपणं कठीण होणार असं दिसायला लागतं.
चित्रपटात संकल्पनांच्या पातळीवर खास वाटाव्यात अशा दोन गोष्टी आहेत.पहिली आहे ती पॅट्रिकच्या टोळीचं चित्रण. शॅरन टेट हत्याकांडाला जबाबदार असणा-या चार्ल्स मॅन्सन या माथेफिरुचा कल्ट यासाठी मॉडेल असावा असं या भूमिकेसाठी केलेल्या जॉन हॉक्सच्या निवडीवरून वाटतं. त्याखेरीज इतर सूचक तपशील देखील आहेत.पॅट्रिकला संगीतात असणारा रस, त्याची समोरच्याला गुंगवून टाकण्यातली हातोटी, वरवर एकत्र मुक्त कुटुंबाचा आव आणणा-या या मंडळींनी बलात्कारापासून खूनापर्यंत सर्व गोष्टिंमधे निर्विकारपणे सामिल होणं, इत्यादी. या निमित्ताने काही अत्यंत साधेपणी चित्रित केलेले ,पण तरीही अंगावर काटा आणणारे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात.
दुसरी गोष्ट जाणूनबुजून केलेली आहे ,की सरमिसळ करण्याच्या योजनेतून ती तशी असल्याचा आभास तयार झालाय हे मी ठामपणे सांगू शकणार नाही.ती म्हणजे पॅट्रिकचं स्वैर जग , आणि लूसीचा नियमांनी बांधलेला समाज यांमधली तुलना.दोन्ही ठिकाणी घडणार््या घटनांमधलं साम्य सूचीत करतं की खरं मुक्त आयुष्य हा पर्याय होउ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बांधलेलेच असता.बंधमुक्त अस्तित्व हे स्वत:चे वेगळे बंध तयार करतं. हे निरिक्षण पूर्णपणे खरं नाही मात्र त्यात सत्याचा अंश जरूर आहे.
'मार्था मार्सी मे मार्लीन'चा शेवट हा थ्रिलर संस्कृतीत वाढलेल्यांना फसवा ,किंवा अपूर्ण वाटण्याची शक्यता . त्याबद्दल मी अर्थात फार लिहू शकणार नाही. पण एक सांगेन ,की मार्थाला शेवटाशेवटाकडे दिसणा-या गोष्टिंची सत्यासत्यता पडताळून पाहाणं हे शेवटाचा अर्थ लावण्यासाठी उपयुक्त ठरेल.
चित्रपटाकडून कथेपेक्षा अधिक गोष्टीची अपेक्षा करणा-यांना ,आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिचित्रणांमधे रमणा-यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. सनडान्स या इन्डिपेन्ट सिनेमासाठी गाजलेल्या चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळवणारा 'मार्था मार्सी मे मार्लीन' त्यांना आवडल्यावाचून राहाणार नाही.
-गणेश मतकरी
Read more...