शांघाय, झी आणि निरूत्तर करणारा प्रश्न

>> Sunday, June 17, 2012

दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकाचे चित्रपट मी नियमितपणे पाहातो.खोसला का घोसला पासून आजपर्यंत त्याच्या कामात सातत्य आणि वैविध्य आहे, संकेतांना चिकटून न राहाता वेगळं काही करुन पाहाण्याची धमक आहे. त्याची शैली आणि चित्रपटांचे विषयदेखील अधिकाधिक महत्वाकांक्षी होत गेल्याचं दिसून येतं.सरळ सोपा विनोदी ’खोसला’ , चोराचं चरित्र थोड्या गंभीर तर थोड्या गंमतीदार पध्दतीने मांडताना कोणताही परिचित ढाचा वापरणं टाळणारा ’ओय लक्की ,लक्की ओय’ ,परकीय कल्पनेला वेगळ्या- यशस्वी पध्दतीने वापरणारा ’लव्ह, सेक्स और धोखा’ आणि आता राजकीय भ्रष्टाचाराकडे पाहाण्याचा ’शांघाय’ मधला प्रयत्न, हे टप्पे पाहाताच या तरूण दिग्दर्शकाची दिशा योग्य असल्याचं दिसून येईल.मात्र असं असतानाही त्याचे चित्रपट ज्या उंचीला पोहोचणं शक्य आहे, त्या उंचीला पोचण्यासाठी पुरेसा प्रयत्न करताना दिसत नाहीत. योग्य उत्कर्षबिंदू समोर दिसत असताना त्याच्या एक दोन पाय-या खालीच ते थांबतात.क्वचित भरकटतात. शांघाय यातलं सर्वात मोठं, सर्वात महत्वाचं आणि म्हणूनच अधिक वाईट वाटायला लावणारं उदाहरण.
शांघाय पहिल्या प्रथमच हे सांगून टाकतो की तो ग्रीक लेखक वॅसिलीस वॅसिलीकोव यांच्या ’झी’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत आहे. आपल्याला प्रत्यक्ष कादंबरी परिचित नसली तरी आपल्यातल्या अनेकांनी त्याचं कोस्टा-गावरासने याच नावाने केलेलं चित्रपट रुपांतर पाहिलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा चित्रपट आणीबाणीच्या काळात आपल्याकडे प्रदर्शित झाला होता आणि त्यातला जहाल आशय पाहून लगोलग त्याची हकालपट्टी देखील झाली होती. मी कादंबरी वाचलेली नाही पण दोन्ही चित्रपटांच्या पटकथेतलं साम्य पाहाता एक उघड शक्यता दिसते ,ती म्हणजे कादंबरीपेक्षा १९६९ चं चित्रपटरुप हेच शांघायला अधिक जबाबदार आहे, आणि चित्रपट टाळून कादंबरीला श्रेय देण्यामागचं कारण अधिक व्यावसायिक , आर्थिक असावं. तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे, की एक खूप गाजलेला चित्रपट आणि त्याची विषयाला न्याय देणारी पटकथा ,आराखड्याच्या स्वरूपात दिबाकर बॅनर्जीपुढे उपलब्ध होती. असं असतानाही त्याचा करुन घ्यावा तितका उपयोग इथे करून घेतलेला दिसत नाही. मग हा चित्रपटाहून वेगळं भासण्याचा प्रयत्न म्हणायचा ,का आणखी काही?
चित्रपटाचा सर्वात अनावश्यक भाग म्हणजे त्याला ओढून ताणून जोडलेला शहरांच्या अत्याधुनिकिकरणाचा मुद्दा. हा मुद्दा राजकारणात खेळवला जातोय हे खरंच आहे,मात्र तो ज्या अपरिहार्यतेने कथेत समाविष्ट होणं आवश्यक आहे ,तेवढा इथे होत नाही. चित्रपटातल्या विकास प्रकल्पामागचा व्यूह, सर्व संबंधित व्यक्तिंची धोरणं , त्यांचे स्वार्थ हे प्रसंगांमधून उलगडत गेले असते तर हा मुद्दा प्रेक्षकांसाठी खरा ठरता. सध्याचं त्याचं अस्तित्व हे चित्रपटाचं चमत्कृतीपूर्ण नाव, काही घोषणा आणि स्पष्टिकरण दिल्यासारखे येणारे माहितीचे तुकडे यावर अवलंबून आहे, जे मुद्दा थेटपणे मांडला जाण्याच्या आड येतं.जर का हा करमणूकप्रधान ,’मसाला ’ कॅटेगरीतला चित्रपट असता ,तर या मुद्दयाचं असं मॅकगफिन बनून जाणं आपण चालवूनही घेतलं असतं, पण हा त्याप्रकारचा चित्रपट नसून आशयाला प्राधान्य देणारा आहे. शिवाय तो रंजनवादी नसल्याने , तशा चित्रपटांची मेलोड्रामा  ,खूप गाणीबजावणी ,अशी लोकांना आवडतील अशी बलस्थानंही इथे नाहीत.
झी आणि शांघाय ,या दोन्ही पटकथांच्या रचनेमधे म्हंटलं तर एक महत्वाची अडचण आहे, आणि ती म्हणजे त्यांच्या केंद्रस्थानी एक वा दोन निश्चित प्रोटॅगनिस्ट नाहीत. कथा ही एका प्रातिनिधिक समाजाची आणि त्यातल्या अनिष्ट प्रवृत्तींची आहे. त्यामुळे त्यात छोट्या लक्षवेधी व्यक्तिरेखांची कमी नाही, पण पूर्ण चित्रपट पेलणारं कोणी नाही. एका समाजसुधारकाची ( मूळ चित्रपटात विरोधी पक्ष नेत्याची) हत्या आणि पुढे ते प्रकरण मिटवण्याचे चालणारे प्रयत्न असा या कथानकाचा ढोबळ आराखडा आहे. त्यामुळे पूर्वार्धात महत्व येतं ते समाजसुधारक डाॅ अहमदीना (प्रोशोनजीत चॅटर्जी) ज्याना उत्तरार्धात कामच नाही, आणि उत्तरार्धात अहमदींचे सहकारी (त्यातलीच एक ,जरा ’अधिकच’ जवळची कलकी), अहमदींची पत्नी, राजकारणी मंडळी, हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभागी लोक, सरकारने प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ,वा ते मिटवण्यासाठी नेमलेला अधिकारी कृष्णन (देओल) ,घटनास्थळी असणारा , ब्लू फिल्म्सच्या धंद्यात असलेला फोटो/ व्हिडिओग्राफर जोगी (हाश्मी) असे महत्वाच्या भूमिकांसाठी अनेक उमेदवार तयार होतात.यात अभिनेत्यांच्या बिलिंगप्रमाणे कलकी, देओल आणि हाश्मी या तिघांसाठीही काम तयार केलं जातं.संहितेच्या ख-या गरजेनुसार पूर्वार्धात चॅटर्जी आणि उत्तरार्धात देओल ही विभागणी पटण्याजोगी आहे मात्र ती इथे होउ शकत नाही.कृष्णनची भूमिका इतर दोघंाबरोबर विभागली जाते आणि परिणामात कमी पडते.
असं असतानाही, चित्रपट अमुक एका पातळीपर्यंत चांगला वाटतो. त्याने सुरूवातीपासून पकडलेला सूर योग्य आहे आणि चित्रपटाचं अस्सल, वास्तववादी टेक्श्चर जमलेलं आहे. त्यातला राजकीय प्रश्नदेखील पुरेसा सोफेस्टिकेटेड आहे आणि छायाचित्रण ,संकलनासारख्या बाजू तर अतिशय चांगल्या आहेत. त्यामुळे जर त्याने शेवटापर्यंत हे सारं असंच टिकवून धरलं असतं ,तरीही हरकत नव्हती. पण दुर्दैवाने शेवटाकडे चित्रपट आणखी एक मोठी चूक करतो. या प्रकारच्या चित्रपटाचा शेवट सकारात्मक हवा का नकारात्मक ,हे मी सांगण्याची गरज नाही. झी पाहिलेल्यांनी तर मुळातच त्यात असणारा ,अशा उपहासात्मक चित्रपटांचा वस्तुपाठ मानण्यासारखा शेवट पाहिलेला आहे. मात्र तो शेवट , आणि आशयाच्या दृष्टिने तो काय असावा याबद्दलचं सारं तर्कशास्त्र निकालात काढून शांघाय आपल्याला एक बाळबोध वळणाचा शेवट देतो. असा शेवट , जो एकूण सिस्टिमवर भाष्य करण्याएेवजी एका पात्राच्या शॉर्ट टर्म हुशारीलाच महत्व द्यायचं ठरवतो. हे करतानाही , तो भ्रष्ट राजकारण्यांकडे थोड्याफार सहानुभूतीने पाहिल्यावाचून राहात नाही.
आता मी खरं तर इतर सा-या समीक्षकांप्रमाणे असं म्हणायला हवं की तरीही हा प्रयत्न वेगळा असल्याने सर्वांनी जरूर पाहावा वगैरे. पण मी तसं म्हणणार नाही. उलट मी असं सुचवेन, की शांघाय पाहिलेल्यानी मूळ चित्रपट मिळवून जरूर पाहावा. इथला प्रश्न दोन चित्रपटांच्या तुलनेचा नाही. प्रश्न हा आहे ,की जे सत्य १९६९ मधल्या चित्रपटाने प्रतिकूल राजकीय परिस्थितीत मांडून दाखवलं ,ते जसंच्या तसं मांडताना आज २०१२ मधेही आपल्याला काचकूच का वाटावी? आपला समाज अजून इतका प्रतिगामी आहे का? आणि जर तो तसा असेल,सत्य जर पचवता येणारच नसेल तर सत्यशोधनाचा आव तरी कशाला? मग आपले नेहमीचे नाच गाणी ,लुटुपुटीच्या मारामा-या आणि विनोदाचा मारा असणारे सुखान्त चित्रपट काय वाईट. ते निदान ख-याखु-या प्रश्नांना दिशाभूल करणारी सोपी उत्तरं तरी देत नाहीत !

- गणेश मतकरी 

10 comments:

Vivek Kulkarni June 18, 2012 at 12:54 AM  

तुमचा सूर जरा चढा वाटला या वेळेस. चित्रपट बघितला नसल्यामूळे काही लिहिणार नाही पण तुमचा सूर हा कालच्या DNA मध्ये लिहिलेल्या लेखासारखाच होता. त्यांनी थोडा वेगळ्या पद्धतीने या चित्रपटाकडे बघितले आहे.

प्रतिबिॆंब June 18, 2012 at 1:16 AM  

सर मी झी हा मूळ सिनेमा पाहि्लेला नाही मात्र तो पाहाण्याची इच्छा आहे.. शांघायच्या बाबतीत बोलायचं, तर हा सिनेमा मला आवडला.. त्याच्या सगळ्याच बाजू मला सरस वाटल्या.. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याचा शेवट साचेबद्ध असला तरी एकूण कथानकाच्या दृष्टीनं दिग्दर्शकानं खेळलेली चाल परिणामकारक वाटते.. नॉन लिनीयर पद्धतीनं पटकथेची केलेली रचना थोडी किचकट वाटत असली ती शेवटाला त्याचे सगळे अर्थ स्पष्ट होतात. कॅमेरा फार वेगळ्या पद्धतीनं हाताळला आहे..

Digamber Kokitkar June 18, 2012 at 8:04 AM  

Movie release honya agodar Z che nav Aikle hote. Org. movie pahayachi aahe. Kuthe milel?

I agree with PRATIBIMB - Camera veglya padhtine vaprla aahe. Movie changli vatli. pan tumhi mhatlya pramane ajahi aaple chitrapat SATYA dakhvayla himmat karat nahit. he patle.

ganesh June 18, 2012 at 8:05 AM  

Vivek, I haven't read the DNA review. the tone may be a little harsh but I could not find any other way to put the argument across. recent films seem to have two simultaneous opinions about the films. papers say they r damn good and viewers say they were bored or the films were not great. there r two possibilities .critics are genuinely smart and audience doesn't know anything, or critics have their own agenda. ( now this is a subject for an article and i won't waste it here) still ,the point is that I found shanghai average and most papers were praising it sky high for no apparent reason. they could have said its a good attempt and film is fairly good. but unanimously , a single opinion sounds false, for a film like this.
chinmay, its true that film withholds certain info, but it does have aristotelian linear structure (a beginning, a middle and an end ,in that order). and i have no idea which kheli u r talking about. can u please elaborate?

ganesh June 18, 2012 at 8:10 AM  
This comment has been removed by the author.
ganesh June 18, 2012 at 8:13 AM  

digamber ,
camera and editing is very good and the film is ok. its certainly not what all the papers r telling us it is. two ways to get Z . unofficial, torrent sites or other piracy options. official, order from Amazon or ask ur friends abroad. u won't get it here.

हेरंब June 18, 2012 at 9:50 AM  

तुमच्या भिंतीवरची पोस्ट वाचून (ब्लॉगपोस्ट नव्हे. झी विषयीची) मी लगेच झी बघितला. प्रचंड आवडला. आपल्या 'सिंहासन' ची थोड्याफार प्रमाणात आठवण झाली. त्यानंतर 'शांघाय' बघितला. एकूण एक मुद्दे पटले.

**** SPOILER ALERT ****

मला अजून मुद्दा जाणवला. तो म्हणजे झी मध्ये कटात समविष्ट असलेल्या (किंवा बळजबरीने अडकवलेल्या) प्रत्येक पात्राची बऱ्यापैकी ओळख करून दिलेली आहे. त्या प्रत्येकाची गुन्ह्यातली भुमिका, ते करण्यामागची त्याची अपरिहार्यता, पोलीस आणि नेते यांची थेट इन्व्हॉल्व्हमेंट स्पष्टपणे दाखवली आहे. साक्षीदाराची पेपरात चमकून येऊन प्रसिद्धी मिळवण्याची (त्यातले धोके माहित असूनही) मानसिकता वगैरे छोटे मुद्देही फार खुबीने दाखवले आहेत. शांघाय त्या कटाच्या घटनेचा इतक्या खोलात जाऊन विचार करत नाही. अनंत जोगचं पात्र निव्वळ तोंडी लावण्यापुरतं आलंय.

मुद्दा स्पष्टपणे आणि ठसठशीतपणे मांडण्याच्या धोरणामुळे झी मला अधिक आवडला.

Preeti June 18, 2012 at 10:09 AM  

चित्रपट ज्या उंचीला पोहोचणं शक्य आहे, त्या उंचीला तो पोचत नाही किंबहुना तसा प्रयत्न कमी पडतो, हे एकदम मान्य.

झी मिळवून पाहायला हवा.

Suhrud Javadekar June 19, 2012 at 9:02 PM  

I agree completely that the issue of modernisation of the city does not come across convincingly at all...the title 'Shanghai' therefore looks gimmicky...we experience no emotional connect with any of the characters nor with the story...without an emotional connect, no film can really work...Banerjee tries to be too intelligent...and that's ironically the film's undoing!

Unknown August 30, 2012 at 9:04 AM  

Ganeshji,
saglyat adhi, mi tumacha blog niyamitpane vachto. baryach vela adhi cinema ani nantar blog vachn hot ani mat baryachda julatat. arhtat prtyek blog postmadhn navin perspective milatoch.
shanghai ala tevhach pahyla. avdala hota mhanje cinema baghtana kahi prashn padle nahit asa avdla. nantar kahi prashn padle. barachsa politically correct kelyasarkha vatla.
tya nantar tumacha ha blog vachunch aj ZEE baghitla. ani agadi je shanghai madhe missing vatl hot te sagl ZEE madhe baghayla milal. thodasa angavar ala surwatila pan nantar tya kathechi garaj vatli.
yapudhe niyamit comments post karaycha vicahr ahe. baghuya kas jamtay te...

Shreyas Kulkarni

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP