द डेव्हिल्स डबल- कूपर आणि कूपर

>> Monday, June 4, 2012


प्रत्येक चित्रपट हा सर्वार्थाने जमलेला असावा अशी अपेक्षा फोल आहे. चांगल्यात चांगला चित्रपटदेखील कधीकधी एखादा मूलभूत दोष बाळगतो आणि सामान्य वाटणारे चित्रपटदेखील एखादी छान गोष्ट करुन जातात. मात्र ही झाली दोन टोकं. बरेच,म्हणजे काही मोजके श्रेष्ठ आणि अगदीच टाकाऊ चित्रपट वगळता बहुतेक सारेच चित्रपट ,या टोकांच्या मधे कुठेतरी येतात असं आपल्याला दिसतं. लतीफ वाहीया ,या वादग्रस्त इराकी व्यक्तिमत्वाच्या चरित्रात्मक कादंबरीवर (?) आधारलेला ली तामाहोरी दिग्दर्शित ’द डेव्हिल्स डबल’ देखील अशामधल्या चित्रपटांतलाच एक आहे, हे पाहताक्षणीच लक्षात येतं. त्यातले गोंधळ अनेक आहेत आणि ते संकल्पनेपासून ते दिग्दर्शन शैलीपर्यंत सर्वत्र पसरलेले आहेत. तरीही तो जरूर पाहावा अशाही काही निश्चित गोष्टी इथे आहेतच.
डबल रोल्स आपल्या परिचयाचे आहेतच.लोककथा, परीकथा ,साहित्य ,नाटकं, जगभरचे चित्रपट यांमधे सातत्याने येणा-या ज्या प्रमुख कल्पना आहेत ,त्यात एका चेह-याच्या दोन माणसांमधे घडणा-या नाट्याचा नंबर बराच वर लागतो. या माणसांचे परस्परसंबंध वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, चित्रप्रकारही पूर्ण वेगळ्या जातकुळीचे असू शकतात, मात्र एका मूलभूत पातळीवर या समान चेह-याच्या दोन प्रवृत्तींमधला  संघर्ष सर्व माध्यमांत काहीसा परिचयाचा वाटतो, कदाचित प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वातल्या दुभंगलेपणाची हा विषय आठवण करुन देत असल्याने.
मूळ कल्पनेतच असलेल्या चमत्कृतीचाच परिणाम म्हणून कदाचित, पण बहुधा या विषयाला स्थान देणा-या कलाकृती सत्यकथनाचा दावा करत नाहीत. डेव्हिल्स डबलचा वेगळेपणा हा, की तो तसा दावा करतो.
अगदी शंभर टक्के नाही, कारण मूळ पुस्तकाच्या सत्याबद्दलच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे लतीफ हा सद्दाम हुसेन या कुप्रसिध्द इराकी हुकूमशहाच्या माथेफिरु मुलाचा ,उदे हुसेनचा बॉडी डबल होता किंवा नाही याचाच काही निश्चित पुरावा उपलब्ध नाही. त्याखेरीज पुस्तकदेखील पटकथाकार मायकेल थॉमस आणि दिग्दर्शक तामाहोरीने चित्रपटासाठी बरच बदललं आहे.त्यामुळे हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत आहे असं म्हणणं कठीणंच. त्याखेरीज त्यातले काही मोजके तुकडे वगळता ,दृश्य आणि सादरीकरण या दोन्ही बाबतीत चित्रपट वास्तववादी न वाटता करमणूकप्रधान व्यावसायिक स्वरुपाचा वाटतो. तरीही उदे हुसेनच्या आयुष्याचे तपशील, न्यूज फूटेजचा वापर, ऐतिहासिक घटनांचे संदर्भ, उदे आणि सद्दाम सारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा यांमुळे त्याला पूर्ण काल्पनिकदेखील मानता येत नाही.
चित्रपट सुरू होतो तो लतिफला (डॉमिनिक कूपर) उदेपुढे (पुन्हा कूपर) हजर  केलं जाण्यापासून. शाळेत असतानाची दोघांची ओळख पण पुढल्या काळात रस्ते अर्थातच वेगळे झालेले.उदे आपल्या वडिलांच्या सत्तेचा वाटेल तसा फायदा घेणारा क्रूरकर्मा बनलेला , तर लतिफने आजवर सैन्यात चाकरी केलेली. समोर दुसरा पर्यायच नसल्याने थोड्याफार मारहाणीनंतर आणि तुरुंगवासानंतर लतिफ उदेची धमकीवजा विनंती मान्य करतो आणि स्वत:चं अस्तित्व पुसून टाकून ऐशोआरामाच्या नजरकैदेत राहायला लागतो.अर्थात वेळोवेळी लतिफची जागा घेत. यापुढला चित्रपटाचा बराचसा भाग ,हा उदेच्या मनमानी कारभाराच्या आणि लतीफच्या हे निभावून नेत सुटकेचा मार्ग शोधण्याच्या गोष्टी सांगतो.असा मार्ग शोधणं जवळपास अशक्य असतं , हे वेगळं सांगायला नकोच.
चित्रपट हा प्रामाणिकपणे चरित्र मांडत नसल्याने आणि त्याबरोबरच केवळ रंजक कथानकाकडेही पाहात नसल्याने त्याच्या निर्मितीमागच्या हेतूवरच काहींना शंका आहे. त्यात एक स्पष्टपणे न कळणारा खोटेपणा असण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे लतीफचं पूर्ण सकारात्मक चित्रण. लतीफने आपल्या पुस्तकात ते तसं करणं स्वाभाविक आहे ,पण हेही खरं की त्याच्या वागण्याला एकही साक्षीदार नाही. हातात सत्ता ,मनमानी करण्याची शक्ती आणि संधी येताच ती पूर्णपणे झुगारुन द्यायला माणूस फारच सज्जन हवा आणि लतीफ तितका सज्जन असल्याचं सर्टिफिकेट त्याने पुस्तकातून स्वत:लाच बहाल केलंय, त्यामुळे ते फारसं विश्वसनीय नाही. पण चित्रपटाकडे केवळ चित्रपट म्हणून पाहाताना ,हे हेतू ,ख-याखोट्याचे हिशेब बाजूला ठेवता येतात आणि जर तसं केलं ,तर डेव्हिल्स डबल आपल्याला गुंतवून ठेवतो.
आपल्या पटकथेत मायकेल थॉमसने उदेच्या आयुष्यातले अनेक प्रमुख प्रसंग घेतले आहेत. कधी पुस्तकाच्या संदर्भाने तर कधी स्वतंत्रपणे. यात उदेबद्दल सांगितल्या जाणा-या ब-या वाईट गोष्टी येतात (उदाहरणार्थ ,शाळकरी मुलींना रस्त्यातून जबरदस्ती उचलून नेणं), त्याने सद्दामच्या खास माणसाला भर पार्टीत खलास करण्यासारख्या इतिहासात नोंदलेल्या घटना येतात, आणि खास तपशील माहीत नसलेल्या ,पण कथेच्या तर्कशास्त्रात बसणा-या घटनाही वेगळ्या रुपात हजेरी लावतात (उदाहरणार्थ उदेला जवळजवळ प्राणघातक ठरलेला हल्ला).मात्र या सार््याचं जोडकाम केवळ चित्रपटाला वादग्रस्त आणि अतिरंजित करण्यासाठी वापरल्यासारखं वाटत नाही. त्यातून खरंच एक चांगली पटकथा आकाराला येते.
सामान्यत: या प्रकारचे चित्रपट पूर्णत: कल्पित असल्याने शेवटच्या ऊत्कर्षबिंदूवर नजर ठेवून बांधलेले असतात. इथे मात्र सरमिसळ असल्याने रचना ही वेळोवेळी येणा-या छोट्या मोठ्या उत्कर्षबिंदूना सामावत पुढे जाते.त्यामुळे वळणं ,धक्के यांचं प्रमाण अनपेक्षित राहातं. रिअँलिझमवरभर नसल्याने चित्रपट थ्रिलरसारख्या दृश्यरचना आणि नाट्यपूर्णतेच्या इतर जागा शोधतो आणि आपला परिणाम चढवत नेतो. पार्टीतल्या खूनाचा प्रसंग , कॅलिग्युलाच्या परंपरेतला लग्नाचा प्रसंग, शाळकरी मुलीच्या बापाबरोबरचा स्फोटक संवाद अशा अनेक जागा या प्रेक्षकाला विचाराला उसंत न देता खिळवून ठेवतात. काही वेळा आपण तर्कातल्या चुका हेरू शकतो, नाही असं नाही. उदाहरणार्थ शेवटाकडे उदेपासून लपताना लतीफ दाढी मिशा काढण्यासारखी उघड गोष्ट का करत नाही? घरच्यांना संकटात आणण्याचा धोका तो कसा पत्करतो?  इत्यादी.पण अशा शंकामधे आपण अडकून राहात नाही , ते डॉमिनीक कूपरच्या उत्कृष्ट दुहेरी भूमिकेमुळे.बहुतेक दुहेरी भूमिका मोजक्याच प्रसंगात पडद्यावर एकत्र असतात.इथे मात्र असे मुबलक प्रसंग आहेत.  उत्तम इफेक्ट्स मुळे इथला कूपरचा दोन्ही भूमिकांमधला वावर सोपा झालाय हे खरं असलं तरी त्याने या एकाच रुपातल्या दोन्ही व्यक्तिरेखा परस्परांपेक्षा इतक्या भिन्न रंगवल्यात ,की हा एकच माणूस आहे यावर विश्वास बसू नये.उदेचा उत्साह, दात पुढे काढून हसण्याची लकब , चेह-यावरला माज आणि लतीफचा नाईलाज,धिटाई आणि अभिमान यांनी हे चेहरे पूर्ण बदलतात. लतीफ उदेची जागा घेतो तेव्हा तर हा परकायाप्रवेश फारच गुंतागुंतीचा होतो. कूपरची भूमिका ,ही या चित्रपटाच्या यशामागचं प्रमुख कारण आहे. त्याला वगळून ’द डेव्हिल्स डबल’ची कल्पनाच करता येणं शक्य नाही.
- गणेश मतकरी 

3 comments:

हेरंब June 5, 2012 at 9:11 PM  

अप्रतिम चित्रपट.. प्रचंड आवडला. अनेक प्रसंग उत्तम जमलेत. पार्श्वसंगीतही जबरी आहे. पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉमिनीक कूपरचा अभिनय. निव्वळ अप्रतिम.

>> या एकाच रुपातल्या दोन्ही व्यक्तिरेखा परस्परांपेक्षा इतक्या भिन्न रंगवल्यात ,की हा एकच माणूस आहे यावर विश्वास बसू नये. कूपरची भूमिका ,ही या चित्रपटाच्या यशामागचं प्रमुख कारण आहे. त्याला वगळून ’द डेव्हिल्स डबल’ची कल्पनाच करता येणं शक्य नाही.

अगदी अगदी परफेक्ट !

Sneha June 11, 2012 at 12:33 AM  

Just a query. Was trying to see some older posts which were posted earlier this year (a separation, the artist etc). Cant see them anymore. Have they been removed? Cant we access them again?

ganesh June 11, 2012 at 4:16 AM  

Some posts were removed due to some web page loading issue. I think 2/3 months worth articles

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP