पुन्हा वासेपूर- दुस-या पिढीची गुन्हेगारी
>> Sunday, August 26, 2012
गँग्ज आँफ वासेपुरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी गर्दी तर केली ,पण झपाट्याने त्याविषयी एक असंतोषाचं वातावरणदेखील पसरलं. याला अर्थातच कारणं होती. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे याचं अपरिचित टेक्श्चर. सरळसोट कथानक रंजक पध्दतीने सांगितलं जावं अशी आपल्या प्रेक्षकांची आपल्या चित्रपटांकडून अपेक्षा असते आणि आपल्या चित्रपटांची कथाप्रधान परंपरा पाहाता त्यांच्या दृष्टिकोनातून ती रास्तदेखील मानता येईल. या अपेक्षेने अन पोस्टरवरल्या टिपिकल सूडपटांना शोभणा-या टॅगलाईन्स वाचून गेलेला प्रेक्षक चार पाच दशकांच्या कालावधीवर पसरलेलं हे गँगस्टरपट आणि माहितीपट यांचं मिश्रण ,तेदेखील अपूर्ण शेवटासह पाहून भांबावला असल्यास आश्चर्य नाही.पोस्टरवर हा चित्रपटाचा प्रथम भाग असल्याचा अजिबात उल्लेख नसल्याने तर ब-याच जणांना चित्रपटाअखेर येणारी ’ टु बी कन्टिन्यूड ’ही सूचनादेखील प्रतिकात्मक, हे गँगवॉर असंच सुरू राहाणार ,या आशयाची देखील वाटली. सुदैवाने कश्यप कंपूने एक गोष्ट उत्तम केली.दुस-या भागाच्या प्रदर्शनात फार वेळ काढला नाही. पहिला भाग , आणि त्याबद्दलच्या भल्याबु-या प्रतिक्रिया डोक्यात असतानाच आपल्याला पुढला भाग पाहायला मिळाला.
एक गोष्ट वासेपुरच्या दुस-या भागाकडे पाहाताना लक्षात ठेवायला हवी. आणि ती म्हणजे तो पारंपारिक अर्थाने दुसरा भाग नाही. तर एका लांब चित्रपटाचा ,तो उत्तरार्ध आहे. अनुराग कश्यपने पहिला भाग सेल्फ कन्टेन्ड करण्याचा प्रयत्नही केला नाही यावरुनही ते स्पष्ट होतं . त्याच्या दृष्टिने गँग्ज आँफ वासेपूर दोन भागात पाहाणंच न्याय्य आहे. असं असतानाही, चित्रपटाचे असे दोन तुकडे करणं ,केवळ लांबीमुळे आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण त्यात अगदी मूलभूत स्वरुपाचे काही फरक आहेत. पहिला आणि कदाचित सर्वात महत्वाचा म्हणजे पहिला भाग हा जवळजवळ सेट अप आहे ,तर दुसरा भाग मुख्य गोष्ट. दुस-या भागातल्या घटना घडण्यासाठी जी पार्श्वभूमी हवी ती तयार करण्याचं काम हे प्रामुख्याने पहिल्या भागाचं काम होतं. ही पार्श्वभूमी मुळातच इन्टरेस्टिंग होती आणि ती पुरेशा तपशीलात येण्यासाठी अडीच पावणेतीन तास आवश्यक होते असं आपण मानूनही चालू, मात्र हेदेखील तितकंच खरं, की चित्रपट पाहून असंतुष्ट राहिलेल्या प्रेक्षकांच्या असंतोषाचं खरं कारणही ,पहिल्या भागाच्या या गुणधर्माशीच संबंधित आहे. या प्रेक्षकांची चित्रपटाकडून जी अपेक्षा होती, त्या चौकटीत पहिला भाग नॉनस्टार्टर राहिला, आणि कथेचा खरा प्राण त्याने दुस-या भागासाठी राखून ठेवला. पहिल्या भागाचा एकूण अवाका, त्यात घडणा-या घटनांचा कालावधी ,चित्रपटातल्या नाट्यपूर्णतेचं आणि वास्तववादी वृत्तीचं प्रमाण हे सारंच दोन्ही भागात वेगवेगळं आहे. त्याशिवाय ज्या प्रकारे पहिला भाग उघड उघड अपूर्ण आहे, तसं दुस-या भागाचं नाही. नायकाच्या वडिलांच्या हत्येची बॅकस्टोरी असणारा हा जवळपास पूर्ण चित्रपट आहे. पहिला भाग पाहिला नसला तरी या चित्रपटाच्या प्रेक्षकाला फार फरक पडणार नाही.
वासेपुरच्या पहिल्या भागाविषयी लिहिताना मी या चित्रपटाची प्रेरणा अनुराग कश्यपला कपोलाच्या ( आणि अर्थात पुझोच्याही ) गॉडफादर वरून मिळाली असावी असं लिहिलं होतं . मांडणी आणि तपशीलात जराही सारखेपणा नसूनही व्यक्तिरेखांचे टाईप्स ,घटनाक्रम उलगडण्यातलं वा कथानकाच्या रचनेतलं साम्य ,विशिष्ट दिशेने होणारा प्रवास , या बाबतीत दोन्ही चित्रपटात तुलना होण्याजोगी आहे.धोरणी डॉन व्हिटो कॉर्लिओनीची आठवण करुन देणारा सरदार खान (प्रथम भागातला मनोज बाजपेयी) , वडिलांवरल्या हल्ल्याने पेटून उठणा-या आणि आपल्या शीघ्रकोपीपणाचा बळी ठरणा-या सनीची आठवण करुन देणारा दानीश (विनीत कुमार) आणि काहीशा उप-या परिस्थितीत वाढलेल्या ,पण अचानक वडिलांच्या वारशाला जागणा-या आणि आपला बदला पूर्ण करणा-या मायकेलची आठवण जागवणारा फैजल (नवाझुद्दैन सिद्दिकी)ही पात्रं तर सहजच आेळखता येण्यासारखी.अर्थात वासेपुर द्वयीमधे सरदार आणि फैजल यांना अधिक वाव आहे, ते जवळजवळ एकेका भागाचे नायक आहेत. दानीशची थोडी भूमिका पहिल्या भागात असली ,तरी दुस-या भागात त्याला फारच कमी वाव आहे.वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रकरणात त्याचा लगेचच बळी जातो. फैजल आपला व्यसनीपणा थोडा बाजूला ठेवून गुन्हेगारांतल्या एकाचा त्वरीत आणि दहशत बसेलशा पध्दतीने बळी घेतो आणि आपला प्रमुख शत्रू रामाधीर सिंग (तिगमांशू धुलीया) ,याच्याबरोबर समझोत्याची बोलणी करुन सुलतान (पंकज त्रिपाठी) या दुय्यम शत्रूला दूर ठेवतो. अर्थात हा समझोता काही कायम टिकणार नसतो . त्याप्रमाणे सुलतान लवकरच त्यातून सुटण्याचा विचार करायला लागतो.
वासेपूरचा पहिला भाग न आवडलेल्यांनाही दुसरा आवडण्याची अधिक शक्यता आहे कारण तो उघडच अधिक रंजक आहे. पहिल्या भागाप्रमाणे इथेही गँगवॉर, राजकारण, बदलती सामाजिक परिस्थिती आणि हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव यांचं टेक्स्टमधे मिश्रण आहे ,पण हे कथानक थोड्या कमी कालावधीत घडणारं आणि मुख्य कुटुंबाकडे अधिक लक्ष देणारं आहे.पहिल्या भागात सरदार खान आणि रामाधीर यांच्यातलं वैर खूप ताणलं जातं पण फार काही घडत नाही. इतकं नाही ,की अखेर सरदार खानची सूडाची योजनाही अपूर्ण राहाते. त्याउलट इथे अनेक पात्र आहेत जी व्यक्तिचित्रणात खास आहेत आणि ती सतत आपल्या किर्तीला शोभणा-या गोष्टी करताना दिसतात. फैजलला तुल्यबळ भूमिकेतली त्याची पत्नी मोहसीना ( हुमा कुरेशी), फैजलचा ब्लेड चघळणारा भाऊ परपेन्डिक्युलर (आदित्य कुमार) आणि त्याचा बिकट प्रसंगी काढता पाय घेणारा मित्र टँजंट, फैजलचा सावत्र भाऊ डेफिनेट ( झीशान काद्री) असे अनेक जण चित्रपटात वेगवेगळ्या वेळी लक्षवेधी ठरतात. प्रत्येकजण केवळ गप्पा न मारता काहीतरी करताना दिसतो ज्यात आपण गुंतलेले तर राहातोच ,वर त्यांच्या उद्योगांच्या निमित्ताने दिग्दर्शकाला काही सेट अँक्शन पीसेस घालून आपली तंत्रावरची पकड दाखवण्याची संधी मिळते. परपेन्डिक्युलरवरचा जीवघेणा हल्ला, अडचणीच्या रस्त्यातून डेफिनेटने केलेला शमशाद आलमचा पाठपुरावा, इलेक्शन बूथ लुटण्याचा प्रसंग अशी कितीतरी उदाहरणं घेता येतील.
हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव हे पहिल्या भागातलं सूत्र इथे खूप विस्तृत पध्दतीने मांडलं जातं. मयतापासून (याद तेरी आएगी)आनंदसोहळ्यापर्यंत (माय नेम इज लखन)लाइव्ह आँर्केस्ट्रासह वाजणारी गाणी, फैजलने स्वत:च्या नाकर्तेपणाची शशी कपूर बरोबर केलेली तुलना आणि त्याने स्वत:ला सिध्द केल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात होणारा अमिताभ बच्चनचा संचार ,त्याच्या मोहसीनाबरोबरच्या प्रेमप्रकरणादरम्यान येणारे नव्या नायकांचे संदर्भ, परपेन्डिक्युलर आणि टँजंटची मुन्ना आणि सर्किट बरोबरची तुलना अशा या वेळोवेळी निदर्शनाला आणून दिलेल्या जागा आहेत, ज्या सहजपणे या सतत बदलत्या पण कायमस्वरुपी प्रभावाकडे निर्देश करतात.
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इथला विनोद. सामान्यत: ,टीपिकल नाट्यपूर्ण चित्रपट हे एका वेळी एका भावनेवर आपलं लक्ष केंद्रित करतात. गंभीर प्रसंगात विनोदाचा शिरकाव न होईलसं ते पाहातात. वासेपूर मात्र वेळोवेळी प्रसंगांची अँब्सर्डिटी समोर आणतो आणि विनोदाच्या जागा आपोआप तयार होतात. शोकसभेदरम्यान अत्यंत गंभीरपणे आणि संदर्भ सोडून गायल्या जाणा-या फिल्मी गाण्यापासून ते माणसाला मारायला जातेवेळी भाजीपाल्याच्या खरेदीवर केलेल्या चर्चेपर्यंत अशा अनेक जागा चित्रपटात आहेत ज्या केवळ करमणूक म्हणून विनोद करत नाहीत पण परिणामाला वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी करतात.
कश्यपचं पटकथेसाठी नाव असणा-या सत्या चित्रपटापासून आपल्या चित्रपटात दिसणा-या गुन्हेगारीचं रूप बदलायला , आणि वास्तवाच्या अधिकाधिक जवळ यायला सुरुवात झाली. गँग्ज या बदलाच्या प्रयत्नांतलाच एक महत्वाचा टप्पा मानावा लागेल. हा बदल सार्वत्रिक असेलसं वाटत नाही ,मात्र तरुण दिग्दर्शकांसाठी तो निश्चितच प्रेरक ठरेलसं वाटतं.
- गणेश मतकरी
(महाराष्ट्र टाइम्समधून) Read more...