रेड: रिडेम्प्शन- पैसा वसूल अँक्शन
>> Sunday, August 12, 2012
मला कॉन्सन्ट्रेटेड नाट्य ही नेहमीच आवडतात.केवळ दृष्यभाषेच्या नादात पटकथा पसरट न करता सोपी कल्पना सर्व संभाव्य शक्यतांसह स्थळकाळाच्या मर्यादेत घडवून पाहिली ,तर परिणामकारक ठरते असं माझं प्रामाणिक मत आहे. जेनेरिक चित्रपटांनी या विचारसरणीचा खूप फायदा करुन घेतल्याचं आपल्या लक्षात येईल.वाढत्या तणावाबरोबरच क्लॉस्ट्रोफोबिआला अस्त्रासारखं वापरणा-या भय, रहस्य, कोर्ट रुम ड्रामा अशा चित्रप्रकारा़त याप्रकारची मांडणी जरुर दिसून येते. ती जितकी सोपी आणि सिम्प्लिफाइड, तितका या चित्रपटांचा परिणाम अधिक. हे सूत्र सर्वसाधारण अँक्शनपटात वापरलं जात नाही कारण सर्व प्रकारची नेत्रदिपकता ,ही मुळातच अँक्शनपटांच्या अजेंड्यावर असते.त्यामुळे अँक्शन एका जागी कॉन्सन्ट्रेट न करता अधिकाधिक नावीन्यपूर्ण पार्श्वभूमीवर ती घडवण्याकडे त्यांचा कल असतो. रेड मात्र हे करून दाखवतो.
रेडच्या रचनेवर एक स्पष्ट कळण्याजोगा प्रभाव आहे आणि तो आहे व्हिडिओ गेम्सचा.एक स्थळ , एक मोठा खलनायक, काही मधले-छोटे खलनायक, चढत्या क्रमाने अवघड होणा-या लेव्हल्स (अर्थात मजले) आणि खेळणा-याचं (किंवा पाहाणा-याचं) प्रातिनिधित्व करणारा एक नायक. हे सारं काही इथे आहे.अनेकदा ,परिणामकारक व्हिडिओ गेम्स हे इन्टरअँक्टिव्हिटी हरवताच चित्रपट म्हणून कंटाळवाणे होतात. रेड यातल्या नायकाला गेम्सच्या नायकांप्रमाणे सर्वशक्तिशाली घोषित करत नसल्याने संघर्षाचं पारडं वर खाली होत राहातं आणि आपण गुंतून राहातो.
चित्रपटाची पहिली किंचित प्रस्तावना सोडता इतर सारं घडतं ते एकाच इमारतीत . रामा (इको योवेस)हा नवशिका तरूण इथे चटकन नायक ठरतो तो त्याच्या चटकन नवनव्या कल्पना काढण्यामुळे , इथे वापरण्यात आलेल्या इन्डोनेशिअन मार्शल आर्ट वरल्या़ त्याच्या उघड प्रभूत्वाने, आणि अर्थातच ,चित्रपटातलं एक रहस्य त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडलेलं असल्याने. या जीवघेण्या रेडमधून जे मोजके लोक वाचतात त्यात रामाचा सहभाग असण्यामागेही तेच रहस्य असतं. मात्र असं असूनही ,या रहस्याचं चित्रपटातल स्थान मॅकगफिन सारखं आहे. त्याचं असणं ,हे या व्यक्तिरेखांना मोटिव्हेशन देत असलं ,तरी प्रेक्षकाच्या दृष्टिने ते दुय्यम आहे.प्रेक्षकाचा खरा हुक आहे, तो इथली अँक्शन.
अनेक वर्षांपूर्वी ब्रूस ली ने विशिष्ट शैलीतल्या अँक्शनला पुढे करून वेगळ्या ब्रँडचे अँक्शनपट पुढे आणले, आणि पुढे अनेक आशियाई स्टार अभिनेत्यांनी त्याचं अनुकरण केलं.रेड:रिडेम्प्शनचा प्रकारही त्याच चित्रपटांसारखा आहे. इथला तरुण स्टार इको योवेस हा ’पेन्काक सिलात’या पारंपारिक मार्शल आर्ट तंत्रात पारंगत आहे. या चित्रपटाचा वेल्श दिग्दर्शक गॅरेथ इवान्स २००७ मधे या तंत्रावर माहितीपट करत असताना त्याचा इकोशी परिचय झाला. आपला पुढला चित्रपट ’मेरान्टो’ याच तंत्रावर आधारताना त्याने इकोलाच प्रमुख भूमिका दिली आणि टेलिकॉम कंपनीचा ड्रायवर इको स्टार बनला. इको आणि इवान्स यांचा हा नवा प्रयत्न आणि त्यांच्या आगामी चित्रपटांकडे पाहाता ,त्यांनी ब्रूस ली च्या पावलावर पाउल ठेवूनच पुढे जायचं ठरवलेलं दिसतं. या चित्रपटाप्रमाणेच त्यांचे आगामी चित्रपटदेखील मार्शल आर्ट बाबत पारंपारिक पण दृश्यात्मकतेत आधुनिक आणि पाश्चात्य प्रभावाचा वापर करतील अशी शक्यता दिसते.
रेड :रिडेम्प्शनची तुलना भयपटांबरोबर करता येईल ती तो फॉर्म्युलाचा वापर ज्या प्रकारे करतो त्यामुळे. एक रहस्यमय जागा, चटकन समोर न येणारा खलनायक. भाराभर दुय्यम व्यक्तिरेखा ज्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून न करता पटापट मारत जाण्यासाठी बॉडीकाउंटसारखा केलेला वापर.त्याबरोबरच इथल्या मूळ कल्पनेचा साधेपणा आणि चित्रपटाची मार्शल आर्टलाच व्यक्तिचित्रणापेक्षा अधिक महत्व देण्याची पध्दत पाहाता त्याची पटकथा उत्कंठावर्धक करणं फार सोपं नाही हे स्पष्ट व्हावं.पुरेशी काळजी न घेतल्यास अशा चित्रपटांची नेपथ्यातली आणि शैलीतली पुनरावृत्ती प्रेक्षकांना कंटाळा आणू शकते. पण हा चित्रपट कथेतल्या मोजक्या ,त्यामानाने परिचित पण उघड नाट्यपूर्ण टप्प्यांना योग्य प्रमाणात महत्व येइलशा पध्दतीने पटकथेत गुंफतो आणि प्रेक्षक त्यात अडकत जातो. चित्रपटात प्रत्यक्ष संवाद असणारे प्रसंग इतके मोजके आहेत ,की त्यामधून, आणि फ्लॅशबॅक पूर्णपणे टाळून पात्रांबद्दल पुरेशी माहिती आपल्याला कशी पुरवली जाते हा एक संशोधनाचा विषय आहे. मात्र चित्रपट हे जमवतो. ही पटकथा फार हुषार प्लॉटिंगचा नमुना नाही हे उघड आहे ,पण तिच्याकडे चित्रकर्त्यांचं दुर्लक्ष झालेलं नाही हे निश्चित.
या चित्रपटाचा फोकस, अँक्शनपटांना असणारी मागणी आणि त्याचं त्यामानाने आळखीच्या वाटेवरून प्रवास करणं पाहिल्यास तो तद्दन व्यावसायिक चित्रपट असल्याचं दिसतं. त्याचा दृष्टिकोन किंचित वेगळा जरुर आहे, प्रायोगिक मात्र नाही.अर्थात ,चांगला व्यावसायिक चित्रपट बनवणं सोपं थोडंच असतं? उलट अनेकदा कलात्मक सिनेमाच्या मुळातच सिम्पथॅटिक आणि मर्यादित प्रेक्षकाला खूष करण्यापेक्षा आपल्या पैशाची किंमत वाजवून घेणारा आम प्रेक्षकच चोखंदळ ठरू शकतो. रेड:रिडेम्प्शन हा अँक्शनपटाच्या आम प्रेक्षकासाठी आहे. त्यांचा पैसा पूर्ण वसूल करून देण्याची तयारी असणारा.
- गणेश मतकरी
3 comments:
लगेच trailer बघितला, नक्कीच पैसा वसूल असणार.
District B13(2004)मधील parkour शैलीतील स्टंट सिक्वेन्सेस पण ह्याच प्रकारचे पैसे वसूल आहेत.
सिरीयसली पैसा वसूल अॅक्शन आहे. जाम आवडला.
>> चित्रपटात प्रत्यक्ष संवाद असणारे प्रसंग इतके मोजके आहेत ,की त्यामधून, आणि फ्लॅशबॅक पूर्णपणे टाळून पात्रांबद्दल पुरेशी माहिती आपल्याला कशी पुरवली जाते हा एक संशोधनाचा विषय आहे. मात्र चित्रपट हे जमवतो.
प्रचंड सहमत.. जबरी आवडला सिनेमा..
Post a Comment