टुरींग टॉकीज- अस्सल असल्याचा आभास
>> Monday, April 22, 2013
सामान्यत: चित्रपटाचा प्रेक्षक आणि परीक्षक यांच्यात टोकाचे मतभेद होऊ नयेत कारण दोघांनीही तोच चित्रपट पाहिलेला असतो. अखेर परीक्षक देखील एक प्रेक्षक असतो आणि प्रेक्षक परीक्षक. फरक एवढाच की दोघांची एकेक बाजू ही आपापल्या भूमिकेप्रमाणे स्पष्टपणे कार्यरत असते तर दुसरी थोडी सबकॉन्शस पातळीवरुन हे सारं पाहात असते. शेवटी अंतिम निकाल हा अवधानाने वा अनवधानाने दोन्हीच्या संगनमतातूनच तयार होत असतो. तरीही वेळोवेळी असं दिसून येतं की मतं केवळ तपशीलातच नाही तर एकूण गुणवत्तेबद्दलच्या मूलभूत मुद्द्यांवरही संपूर्णपणे वेगळी असू शकतात. मग यात केवळ अप्रामाणिकपणा असतो का? कोणत्याही एका बाजूचा? तर तो नसतो किंवा नसावा असं मला मनापासून वाटतं . माझ्या मते चित्रपट पाहाताना ती ती व्यक्ती कोणत्या गोष्टीना अधिक महत्व देते याचा बराचसा परीणाम त्यांच्या दृष्टीला पडणा-या अंतिम निकालावर होत असावा. या शुक्रवारी लागलेला टुरींग टॉकीज पाहाताना झालेलं माझं मत आणि वर्तमानपत्रांमधून या चित्रपटावर व्यक्त झालेली, परीक्षक, समीक्षक या अधिकारातून व्यक्त करण्यात आलेली माझ्या वाचनात आलेली मतं , यांमधे असाच जमिन अस्मानाचा फरक होता.
टुरींग टॉकीज बद्दलचे दोन मुद्दे वादातीत आहेत. पहिला म्हणजे त्याचा विषय. हा विषय उत्तम आहे ,आणि वरवर पाहाता त्याचं कथासूत्र, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत एका टुरींग टॉकीजच्या तरुण मालकिणीने आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यात तिला एका अगदी वेगळ्या वळणाच्या चित्रप्रकारा़त रुजलेल्या दिग्दर्शकाकडून झालेली प्रामाणिक मदत, हेदेखील वाईट नाही. त्यात रचनेच्या दृष्टीने नवीन काही नसलं तरी ते तपशीलातून श्रीमंत होऊ शकेलसं नक्कीच आहे. दुसरा मुद्दा आहे तो त्यासाठी अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी मनापासून केलेली मेहनत. निर्माती आणि प्रमुख भूमिका पार पाडणारी तृप्ती भोईर, सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, संकलक बल्लू सलूजा ,पडद्यामागले इतर अनेक जण, आणि अभिनेते किशोर कदम, सुबोध भावे, इत्यादी सा-यांनीच अतिशय मन लावून काम केलं आहे. हे दोन मुद्दे सिध्द आहेत, यावर दुमत नाही. आता दुमत असलेल्या भागाकडे वळू.
चित्रपटात दिग्दर्शकाची भूमिका काय हा प्रश्न चित्रपट माध्यमाविषयी चर्चा करताना नेहमी विचारला जातो. कारण ही व्यक्ती अमुक एक तांत्रिक बाजू सांभांळत नाही. ती प्रत्येकाला आपापली भूमिका , मग ती पडद्यापुढली असो वा मागची, करु देते,मात्र ती करताना हा प्रयत्न एका पूर्वनियोजित आणि निश्चित दिशेने जातो आहे ना हे पाहाते. अनेकदा ,हे दिशानियंत्रण सोपं जावं म्हणून दिग्दर्शक लेखनाची बाजूही स्वीकारतात मात्र हा निर्णय कधी फसण्याचीही शक्यता असते. लेखन आणि दिग्दर्शन हे स्वतंत्र सर्जनशीलता दाखवून करणारे लेखक/दिग्दर्शक जरुर आहेत, मात्र प्रत्येक दिग्दर्शक हा चांगला लेखक असतो( वा लेखक चांगला दिग्दर्शक) असं नाही. बहुधा दिग्दर्शक हा चांगल्या दृश्ययोजना , ढोबळ उठावदार संकल्पना ,प्रेक्षकावर थेट प्रभाव टाकणारे प्रसंग याच्याभोवती विचार करतो, तर लेखक त्यातल्या आशयाला प्रमुख स्थान देतो. त्यामुळे बहुधा हे दोन उद्योग दोन वेगळ्या व्यक्ती करत असल्या तर चित्रपट अधिक समतोल होण्याची शक्यता असते. टुरींग टॉकीजला लेखक ( पटकथा आणि संवाद) आणि दिग्दर्शक एकच आहे, त्यामुळे असा समतोल तिथे न राहाणं आश्चर्याचं नाही. आश्चर्याचं आहे ते या चित्रपटाचं दिग्दर्शक असूनही तो नसल्यासारखं भरकटणं.
गजेंद्र अहिरे हे आपल्याकडले पारंगत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या चित्रपटांचे विषय नेहमीच लक्षवेधी असतात. त्यांच्या चित्रपटांची चाळीशी जवळ आहे वा कदाचित उलटूनही गेली असेल. त्यांना राष्ट्रिय पुरस्कारही ( मला वाटतं दोनदा) मिळालेला आहे.त्यामुळे केवळ त्यांचा अनुभव पाहूनही या ढिसाळ कामगिरीचं आश्चर्य वाटतं. ज्यांनी त्यांचे इतर चित्रपट पाहिले असतील त्यांना अहिरेंच्या चित्रपट निर्मितीकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनातल्या त्रुटी सहज लक्षात याव्यात, ज्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावंसं खूप आहे, आणि ज्या नसत्या तर अहिरे नक्कीच मराठीतले महत्वाचे दिग्दर्शक ठरू शकले असते. असो. आता मी त्याकडे वळणार नाही. सध्या हा एक चित्रपट पुरे आहे.
अहिरेंनी या चित्रपटाविषयी केलेलं आणि काही परीक्षकांनी उचललेलं भाष्य चित्रपटाचा घोळ वाढवणारं आहे. आणि ते म्हणजे 'हा चित्रपट दिग्दर्शकापेक्षा संकलकाचा आहे.'हे गौडबंगाल काही मला कळलेलं नाही. हा अगदी नॉर्मल चित्रपटासारखा चित्रपट आहे. त्यात काही प्रयोग नाही, इम्प्रोवायजेशन नाही, प्रचंड फूटेज मधून चित्रपटाचा आकार करणं नाही, काही नाही! थोडक्यात, संकलकाने जरुरीपेक्षा अधिक भार उचलल्याचा पुरावा नाही. सरळ प्रसंग लिहिलेले आहेत. त्याप्रमाणे व्यक्तिरेखांची कामं आहेत. नाही म्हणायला जत्रेचं बरंचसं फूटेज आहे ,पण ते चांगल्या पध्दतीने वापरल्याने संकलक चांगला , अगदी उत्तम आहे हे सिध्द होईल, पण त्याने चित्रपट संकलकाचा कसा होईल? आणि जर झाला, तर या तर्कशास्त्राने प्रत्येकच चित्रपट संकलकाचा असतो, मग एकूणच दिग्दर्शक दुय्यम असतो असं अहिरेना म्हणायचंय का?
कथानकात आपल्याला कळतं, म्हणजे सांगितलं जातं, की टुरींग टॉकीजच्या उद्योगाला कशी वाईट परिस्थिती आहे, मात्र प्रत्यक्षात दिसतो तो भयंकर गर्दीत चाललेला सिनेमा. चित्रपट फुल जातोय, लोक तिकीटाला गर्दी करतायत, थिएटर मालकीण चांदी ( भोईर) नेहमीपेक्षा अधिक खेळ लावूया म्हणतेय, मग हा तोट्यात चाललेला उद्योग कसा? यानंतर तिला येणारी अडचण ही कोणालाही, कोणत्याही आणि कितीही तेजीत चाललेल्या उद्योगात येणारी आहे. ती म्हणजे जुगारी बापाने थिएटर पैशासाठी गहाण ठेवणं. आता या अडचणीचा टुरींग टॉकीजशी काय संबंध आहे? मल्टीप्लेक्स आल्याने टुरींग टॉकीजचा उद्योग बसला किंवा तत्सम अडचण ही विषयाला धरुन झाली असती. पण ही निव्वळ चिकटवलेली आहे. उद्या त्यांचं टुरींग टॉकीज नसून जुएलरी शॉप किंवा रेस्ताँरा असतं आणि बापाने ते गहाण ठेवलं असतं तर ते उद्योगही तोट्यातले म्हणता आले असते का? बरं हा एकच चांगला चालणारा चित्रपट आहे असंही नाही. कारण यानंतर चांदी घेते तो प्रायोगिक वळणाचा ,आर्ट फिल्म प्रकारातला अविनाश ( भावे) या होतकरु महान दिग्दर्शकाचा सिनेमा आणि तोही थोड्याफार हातचलाखीनंतर तितक्याच जोरात चालवून दाखवते. इतक्या जोरात चाललेला तोट्यातला उद्योग मी तरी दुसरा पाहिलेला नाही.
आता दुसरा प्रश्न हा, की अविनाश मुळात आपला प्रायोगिक सिनेमा पन्नास हजार अँडव्हान्स देऊन टुरींग टॉकीज मधे का लावणार असतो? या प्रकारच्या चित्रपटाचा तो योग्य प्रेक्षकवर्ग आहे? का त्याच्या नजरेत तसा तो लावून पाहाणं ,हा प्रयोग आहे?का त्याला इतर कोणतही थिएटर उभं करत नाही इतका हा रद्दी सिनेमा आहे?का त्याची पैशांची अडचण आहे? यातलं एकही कारण अविनाश नीटपणे देत नाही. केवळ अहिरेना वाटलं की प्रायोगिक चित्रपट आणि टुरींग टॉकीज यांची सांगड नाट्यपूर्ण वाटेल हेच कारण. बरं ,हा जत्रेतला प्रेक्षक आनंदाने पाहातो असा प्रायोगिक सिनेमा आहे तरी कसा? तर तेही कळत नाही. चांदी काही छापील वाक्य बोलून दाखवते पण त्याने काही कळत नाही. तिला सिनेमा बरा वाटला एवढं कळतं. तरी प्रेक्षकांना आकर्षित करायला ती त्याचं नाव बदलते. पोस्टर बदलते. नव्या पोस्टरवर भरत जाधव आणि सिध्दार्थ जाधव असतात.म्हणजे हे मुळातच या कलात्मक चित्रपटात ,ज्याला पुढे बर्लिन फेस्टीवलला अवॉर्ड मिळतं , त्यात होते ,का केवळ पोस्टरवर प्रेक्षकांसाठी, कोणाला माहीत! पण असावेत. अन्यथा प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या असत्या. ( बर्लिन बर्लिन राहिलं नाही हेच खरं !!) बरं एवढ करुन चांदी थांबत नाही, तर एका पॉइंटला मधेच़ एक्स रेटेड सीन जोडते. का ? सिनेमा तर आधीच चालायला लागलेला असतो. किंबहुना सगळे सिनेमे इथे प्रचंड गर्दीतच चालतात. हल्ली रिकामी मल्टीप्लेक्स चालवणा-यांनी जर जाऊन टुरींग टॉकीज काढली तर मला वाटतं सगळाच प्रश्न सुटेल.
मुळात या सा-याचा उगम हा तृप्ती भोईरच्या पहिल्या चित्रपटाच्या अनुभवावर ,आणि तो चित्रपटगृहात फसल्यावर टुरींग टॉकीजमधे तो चालावा यासाठी तिने घेतलेल्या प्रयत्नांमधे आहे. पण हे जरी गृहीत धरलं तरी तिचा चित्रपट हा साधा मराठी चित्रपट होता. इतर चार चित्रपटांसारखा, कौटुंबिक जिव्हाळ्याचा वगैरे. शिवाय तिने केलेले बदल हे निर्माती म्हणून होते. कलेबिलेला त्यात थारा नव्हता. या ठिकाणी केवळ नाट्यपूर्णतेसाठी आणलेली अविनाशच्या कलात्मक दिग्दर्शक असण्याची जागा ही पूर्णपणे फसवी आहे. या प्रकारचा दिग्दर्शक अशा ठिकाणी जाऊन या प्रकारच्या तडजोडी करणं हे मुळातच अशक्य आहे.
'टुरींग टॉकीज' क्लिशेजचा एक्स्टेन्सिवली आणि अनावश्यक वापर करतो. त्यात मुलासारखी राहाणारी ( का? कोणाला माहीत, पण या विषयावरला 'देवाने दिलेली वजनं ' असा फेमिनिटीचा भयंकर प्रतिकात्मक वापर करणारा एक अफलातून (!!)डायलॉग तिच्या तोंडी आहे. ) नायिका आहे, तिचं सुंदर नायिकेत इन्स्टन्टली होणारं रुपांतर आहे ( 'पिग्मॅलिअन' ते 'ती फुलराणी' पर्यंत क्लासिक्समधे अशा रुपांतरासाठी एवढा वेळ का काढतात कोणाला माहीत, इथे ते सिंडरेला प्रमाणे नव्या कपड्यांपासून शुध्द उच्चारांपर्यंत सर्व बाबतीत तत्काळ होतं . खरं तर मी इथे अलंकारीक भाषेपर्यंत असं म्हणणार होतो. पण इथे प्रमुख भूमिकांपासून सटर फटर पात्रांपर्यंत सारेच त्याच शैलीच्या अलंकारिक भाषेत म्हणजे 'तुझ्या आभाळाला माझे हात पोचत नाहीत',किंवा' तंबू नाही प्रियकर आहे माझा' , या छापाचं बोलतात, त्यामुळे तसं म्हणणं शक्य नाही ,असो) त्याशिवाय हिंदी सिनेमातली वाक्य बोलणारा जुगारी बाप आहे, सुंदर नायिकेकडे दुर्लक्ष करुन पुरुषी गेट अप मधल्या मुलीच्या प्रेमात पडणारा दिग्दर्शक आहे, शहरी संस्कारांना मूर्ख ठरवणारं फिल्म हिरॉईनचं पात्र आहे, पैसे लाथाडून ईमानदारी मानणारा विश्वासू सेवक आहे, अचानक जगप्रसिध्द होणारा नायक आहे आणि तद्दन खोटा सुखांत शेवट आहे. यातलं सारं आपण अनेकदा पाहिलेलं आहे.
चांदी आणि अविनाश यांची चित्रपट माध्यमाशी लॉयल्टी हा एक मोठा विनोद आहे. चांदी चित्रपटाचं नाव बदलते, चावट पोस्टर करते, त्यात एक्स रेटेड सीन घालते, पण भावाने एका चित्रपटाचं पोस्टर फाडलेलं तिला सहन होत नाही. अविनाश वेगळ्या प्रकारचे चित्रपट करु पाहाणारा , बर्लिन महोत्सवाची स्वप्न पाहाणारा ,आदर्शवादी दिग्दर्शक आहे. पण चांदीने चित्रपटाचं नाव आणि पोस्टर बदलणं त्याला चालतं. गर्दी जमवायला नायिकेचं प्रदर्शन मांडलेलं त्याला चालतं . त्याच्याच कलाकृतीत एक्स रेटेड सीन घातला तरीही त्याला फार फरक पडत नाही. दिग्दर्शक कसा असावा यावरचं त्याचं भाषण फारच विनोदी आहे. गावात प्रोजेक्टर चालवणा-या मुलाला दिग्दर्शकाला कला आणि साहित्याची जाण हवी पण निर्मात्याच्या बजेटचं भान हवं वगैरे कळणार आहे का? मग हे कोणासाठी आहे?
'टुरींग टॉकीज' पाहून आपण या उद्योगाच्या सद्य पररिस्थितीवर विचार करावा असं वाटत असेल तर आणखी एका बाजूकडे पाहाणं गरजेचं होतं आणि ते म्हणजे या तंबूंमधला प्रेक्षक. जो चित्रपटाला येत नाही असं आपण ऐकतो पण ज्याचा पुरावा चित्रपटात दिसत नाही, जो सवंग आणि कलात्मक चित्रपट (म्हणे) त्याच उत्साहाने पाहातो, त्याची या बिकट परिस्थितीतल्या उद्योगावर काय प्रतिक्रीया ,त्याची काय बाजू, हे आपल्याला कुठेच का कळू नये? खासकरून उद्योगाचा -हास हाच तथाकथित विषय असताना. पण तसं होत नाही खरं.
हे सारं प्रामुख्याने होतं ते चित्रपट दिशाहीन असल्याने. त्याला काय वातावरण आहे हे माहीत आहे , काय प्रकारच्या व्यक्तिरेखा असाव्यात हे माहित आहे, त्याप्रमाणे त्यांना पटकथेत अंतर्भूत करण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर या परिस्थितीचा जो खरोखरचा विचार आवश्यक आहे ,तो इथे दिसत नाही. प्रत्यक्षात या मंडळींच्या समस्या काय आहेत?प्रेक्षक प्रतिसाद किती आहे? कमी असल्यास का कमी आहे? त्यांच्यापुढे मार्ग कोणते? शहरी सिनेमा आणि ग्रामीण सिनेमा यांच्यात तफावत किती आणि का आहे? या उद्योगातल्या लोकांना काय परिस्थितीत जगावं लागतंय? त्यात काही राजकारण आहे का? कायदा या सा-यांकडे काय दृष्टीने पाहातो? हे सारं इथे दिसायला हवं होतं. आणखी एक गोंधळ म्हणजे चित्रपट कोणाच्या दृष्टिकोनातून सांगितला जातोय हा ! दृष्टीकोन चांदीचा की अविनाशचा? चांदीचा असेल तर मधेच पार्श्वसंगीतात इंग्रजी गाण्यांचा वापर का? चांदी एका बुडत्या उद्योगाची प्रतिनिधी मानली तर शेवट सुखांत कसा असू शकतो? आणि चित्रपट अविनाशच्या नजरेतून पाहायचा तर तो त्याच्या येण्यापासून सुरू हवा. त्याचा या सगळ्यांकडे आणि परिस्थितीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, त्याची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. इथला त्याच्या व्यक्तिरेखेने सुचवलेला मार्ग हा उद्योगाशी जोडलेला नसून व्यक्तिरेखांशी जोडलेला आहे. या प्रकारचा नायकाला 'नाईट इन ए शायनिंग आर्मर' करणारा शेवट कोणत्याही चित्रपटाचा असू शकतो. मग तो याच विषयावरल्या चित्रपटाचा का?
हे सारं स्पष्ट असून प्रेक्षका परीक्षकांपासून कधीकधी लपू शकतं ते चित्रपटाचं बाह्य रुप ,दृश्य रुप अचूक असल्याने. सारेच कलावंत आणि मुख्यत: सध्या डिजिटल छायाचित्रणाचा बेन्चमार्क बनलेल्या अमोल गोळेच्या कामाने चित्रपट एक ठाम लुक पकडतो, जो हे सारं अस्सल असल्याचा आभास निर्माण करायला काही अंशी जबाबदार आहे.
वुडी अँलनच्या नावावरला पहिला चित्रपट 'व्हॉट्स अप, टायगर लिली?' (१९६६)या संदर्भात आठवावासा वाटतो. पाहिला नसल्यास जरुर बघा. त्यासाठी त्याने एक ( मोठ्या आवृत्तीत दोन) जेम्स बाँड छापाचा जपानी चित्रपट घेतला आणि तो पुनर्संकलित करुन त्यात काही प्रसंग वाढवून, संवाद पूर्णपणे वेगळे डब करुन त्याची नवी आवृत्ती केली. टुरींग टॉकीजचही खरं तर असच काही करायला हवं. त्याचा जमलेला दृश्य भाग आणि जमेल तितका अभिनय शाबूत ठेवून त्याचं प्रत्यक्ष कथानक, आशय आणि विचार असलेल्या नव्या आवृत्तीत रुपांतर करता आलं तर किती बरं होईल. एका अर्थी मग तो खरंच संकलकाचा सिनेमादेखील ठरेल.
- गणेश मतकरी Read more...