बोस - एक लुटुपुटीचा इतिहास

>> Monday, April 1, 2013




भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे क्रांतिकारक सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रपटाबद्दल प्रेक्षकांना अमाप कुतूहल होते. श्याम बेनेगल यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाची ३५ कोटींची ती महान कलाकृती असणार होती. पण चित्रपट पाहून अनेकांचा अपेक्षाभंगच झाला होता. प्रत्येक भारतीयाच्या मनात काळाने निर्माण केलेली नेताजींची प्रतिमा आणि चित्रपटातील सुभाषचंद्र बोस यांच्यात एवढे अंतर कसे पडले? कथासूत्र, व्यक्तिचित्र, इतिहास आणि सिनेमाची भाषा यांचा वेध घेतलेला साप्ताहिक सकाळमधील हा लेख... 

मी काही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्राचा अभ्यासक नाही. इच्छा असूनही त्यांच्या आयुष्यावर विश्वास पाटील यांनी लिहिलेली महानायक कादंबरीही अजून मी वाचलेली नाही, तरी त्यांच्याबद्दल जुजबी माहिती जरूर आहे. पाठ्यपुस्तकातून आणि इतर थोड्याफार वाचनातून भेटलेल्या या नेत्याची प्रतिमा सर्वांपेक्षा भिन्न, वेगळ्या विचारांची कास धरणारी आणि प्रभावी आहे. इतर प्रस्थापित नेत्यांना, प्रत्यक्ष महात्मा गांधींसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाला तात्त्विक विरोध करून सुभाषबाबूंनी आपल्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला वेग आणून द्यायचा प्रयत्न केला. सामोपचाराची बोलणी बाजूला ठेवून थेट कृती करण्याची वेळ आली आहे, अशी त्यांची धारणा होती; मात्र ही कृती नियोजित असण्याची गरज त्यांनी जाणली होती. महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांना विरोध असणा-या देशांची मदत घेऊन उठाव घडवता आला, तर देश लवकर स्वतंत्र होईल, या मताचे ते होते. आपल्या विचारांना मान्यता न देणा-या काँग्रेसला न जुमानता त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडला. या कामासाठी त्यांनी जगभर प्रवास केला, अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर वाटाघाटी केल्या. आपले विचार त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि अखेरपर्यंत आपल्या मताशी ते ठाम राहिले. त्यांच्या वादळी आयुष्याइतकाच त्यांचा विमान अपघातात झालेला मृत्यूही रहस्यमय आणि विवाद्य ठरला.
त्यांच्याबद्दल असणा-या या माहितीतून सुभाषचंद्रांचे एक तेजस्वी पण काहीसे धुसर चित्र डोळ्यांसमोर तयार झालेले होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोसः द फरग़ॉटन हीरो हा चित्रपट, त्या चित्रात तपशील भरून ते स्पष्ट करेल, अशी अपेक्षा होती. तसे झाले मात्र नाही.
या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला १९३९ मध्ये घडणा-या एका प्रसंगात सुभाषबाबू आपल्या योजना गांधीजींसमोर मांडताना दिसतात. गांधीजी त्यांना आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करतात आणि सुभाषबाबूंना सांगतात की, त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे. यावर प्रेक्षक म्हणून आपली अपेक्षा अशी होते की यानंतरच्या प्रसंगांमधून सुभाषबाबूंची विचारसरणी आपल्यासमोर उभी राहील आणि त्यांचे मनसुबे पूर्ण झाले नसले, तरीही त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने होत होते, आणि अंतिमतः त्यांनी निवडलेला मार्ग योग्यच होता, हे उघड होईल. प्रत्यक्षात मात्र चित्रपट संपताना आपण गांधीजींच्या विचारांशी सहमत झालेले असतो.
बोसमध्ये आपल्याला नायकाच्या आयुष्याची शेवटची, सुमारे पाच-एक वर्षे दाखविली जातात. ही वर्षे सुभाषबाबूंच्या कारकिर्दीतील महत्त्वाची वर्षे असली आणि त्यात बरीच अँक्शन असली, तरीही त्यांना पूर्णपणे समजून घ्यायला ती पुरेशी वाटत नाहीत. त्यांचा चळवळीतील इतर नेत्यांना विरोध असल्याचे आपल्याला सांगितले जाते; पण तो का, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे चित्रपट पार्श्वभूमी तयार न करता, मध्येच सुरू झाल्यासारखा वाटतो. त्याबरोबरच पुढील चित्रपटही जवळपास प्रवासवर्णनासारखा बोस कुठे जाऊन कोणाकोणाला भेटले याची जंत्री सांगत असल्याने या भागातही त्यांच्या विचारांमागची तात्त्विक बैठक आपल्यासमोर तयार होऊ शकत नाही. इथला कथाभाग १९३९च्या पुढला असला तरी त्याआधी जवळजवळ वीस-एक वर्षे सुभाषबाबू चळवळीत होते. उत्तम शिक्षण घेऊनही सरकारी सेवा त्यांनी नाकारली आणि स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतले ( याचा पुसट उल्लेख चित्रपटात आहे.) त्यानंतर पुढली अनेक वर्षे ते गांधीजी, नेहरुंसारख्या लोकप्रिय नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. त्यामुळेच एकेकाळी त्यांच्याच मताच्या असणा-या या तरुणाला पुढे काँग्रेसची विचारप्रणाली कमकुवत का वाटायला लागली आणि त्याचा परिणाम पुढे त्याने वेगळा मार्ग निवडण्यात का झाला, हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. आपल्याला दिसणा-या घटनाचक्राच्या मुळाशी असणा-या या प्रश्नांची उत्तरे पटकथा शोधतच नसल्याने आपल्याला ब-याचदा सुभाषबाबूंच्या वागण्याची तर्कसंगतीच लागू शकत नाही. याउलट क्वचित त्यांच्या बोलण्यात येणारे भूतकाळाचे उल्लेख प्रेक्षकाला माहिती पुरवण्यापेक्षा संभ्रमात अधिक टाकताना दिसतात.
चित्रपटाच्या नावातच जरी समाजाला सुभाषबाबूंचा विसर पडल्याचे सूचित केले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची एक प्रतिमा सामान्य प्रेक्षकाच्या नजरेत निश्चित आहे. ही प्रतिमा एखाद्या सेनापतीची आहे. त्यामुळे दुरदृष्टी, योजनाबद्ध हालचाल, पूर्ण तयारीनिशी पाऊल उचलणे यांसारखे गुणविशेष या प्रतिमेशीच निगडित आहेत. या चित्रपटात मात्र हे गुण अभावानेच पाहायला मिळतात. दुरदृष्टी आणि योजनाबद्धता तर सोडाच, इथे चित्रित केलेला सुभाषबाबूंचा स्वभाव, हा `काय होईल, ते नंतर पाहून घेऊ या` पठडीतला दिसतो. दोन-तीन स्वतंत्र प्रसंगांमध्ये त्यांच्या तोंडून `जो होगा देखा जाएगा` ही ओळ ऐकू येते. त्याखेरीज एका गाण्यातही ती ऐकायला मिळते. जो होगा देखा जाएगा, हे वाक्य नायकाने एका प्रसंगी म्हणणे हे आपण समजू शकतो. किंबहुना ती त्याच्या निडरपणाचीच खूण ठरेल. पण इथला त्या ओळीचा सततचा वापर हा ती नायकाची स्ट्रॅटेजी असल्याप्रमाणे भासतो. आपल्या वागणुकीच्या परिणामाची अनिश्चितता नायकाला जाणवते आहे, अशी शंका वाटायला लागते आणि कथाभागातील तपशीलही तेच दाखवितात.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात इंग्रजांनी सुभाषबाबूंना (सचिन खेडेकर) नजरकैदेत टाकलेले दिसते. त्यांचा स्वतःचा विचार असतो, तो या पहा-यातून पलायन करण्याचा आणि रशियाची मदत मिळविण्याकरिता मॉस्को गाठण्याचा; पण प्रत्यक्षात त्यांची तयारी एक दाढी वाढविण्यापलीकडे काहीच दिसत नाही. (इतर हिंदी चित्रपटांप्रमाणेच दाढी वाढविणे ही वेशांतराची परिसीमा असल्याचे या चित्रपटातील सुभाषबाबूंनाही वाटत असावे.) पुढे पोलिसांच्या अत्यंत मूर्खपणाने आणि इंग्रजांनीही जातीने लक्ष न पुरविल्याने सुभाषबाबू पळ काढतात.पण त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या सहका-यांनी मॉस्कोशी प्रत्यक्ष संपर्क साधलेला नसतो. त्यांच्या पठाण सहका-याबरोबर (राजपाल यादव) ते भारताबाहेर पडून काबूलला पोहोचतात; पण तिथेही रशियन वकिलातीशी संपर्क साधता येत नाही. मग रशिया नाही तर नाही; म्हणून ते जर्मनीशीच संपर्क साधतात. आता मला सांगा, रशिया आणि जर्मनी या शक्ती मुळातच एकमेकांच्या विरोधी प्रवृत्त्या असणा-या, त्यातून जर्मनीचा नेता हुकूमशहा हिटलर. बरे हिटलर किती धोकादायक आहे, हे सुभाषबाबूंच्या लक्षात आले नसणेही शक्य नाही; कारण दुस-या महायुद्धातील त्याच्या धोरणावरून, त्याच्या हेतूबद्दल शंका घ्यायला जागा तयार होते. त्याचबरोबर आपल्या माइन काम्फमध्ये त्याने काढलेल्या भारतविरोधी उदगाराची सुभाषबाबूंना चांगलीच माहिती असते ( तिच्या जोरावर ते हिटलरला चार शब्द सुनावतातदेखील) मग या परिस्थितीत केवळ जर्मन वकिलातीत घुसणे सोपे आहे, हे त्यांच्याशी हात मिळविण्याचे कारण होऊ शकते का?
बरे, यानंतरही वरवर संगती न लागणा-या गोष्टी करणे चालूच राहिलेले दिसते. मग जर्मनीतील युद्धकैद्यांना मुक्त करून आझाद हिंद सेना काढली जाते. जिला युद्धाच्या धुमश्चक्रीत जर्मनीतून बाहेरदेखील पडता येत नाही आणि पर्ल हार्बरसारख्या भयानक घटनेनंतर लगेचच, या घटनेत आपल्या योजनाबद्घ क्रौयाचे प्रदर्शन करणा-या जपानचे सहकार्य मागितले जाते.
माझा सुभाषबाबूंच्या चरित्राचा अभ्यास नसल्याचे मागे सांगितले ते एवढ्यासाठीच, की प्रत्यक्षात त्यांच्या आय़ुष्यात काही प्रेरणा असतीलही ( उदा. १९३३ ते १९३६ मधल्या त्यांच्या युरोपातील वास्तव्यात अनेक नेते आणि विद्वानांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या, ज्यांनी त्यांना पटवले होते, की परकी सत्तेची मदत घेतल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही.) किंवा त्यांच्या विशिष्ट प्रकारचे निर्णय घेण्यामागे काही कारणे असतील; पण चित्रपटात ती स्पष्ट होत नाहीत. अशा खटकणा-या प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना पडणारे प्रश्न एखाद्या व्यक्तिरेखेच्या तोंडून आले असते, तर सुभाषबाबूंना त्यांचा दृष्टिकोन सहज मांडता आला असता, पण चित्रकर्त्यांना तशी गरज वाटलेली दिसत नाही. याचा परिणाम असा होतो की चित्रपटात जे दिसते त्यावरून आपला सुभाषबाबूंबद्दलच आदर वाढायला मदत होत नाही. या उलट चुकीच्या लोकांशी हातमिळवणी, योजनाबद्धतेचा अभाव, गोंधळाची विचारसरणी, स्वतःच्या शक्तीचा अंदाज न घेता घेतलेले निर्णय, यांसारख्या अनेक घटकांतून हा चित्रपट सुभाषबाबूंची जनमानसातील चांगली प्रतिमा डागाळेल की काय अशी शंका मनात यायला लागते.
चित्रपटाचा शेवटही एका परीने विचित्र वाटतो. एकदा भारताबाहेर गेलेले सुभाषबाबू नंतर पुनरागमन करूच शकत नाहीत. आझाद हिंद सेना जर्मनीतच राहते आणि रासबिहारी घोष यांच्या इंडियन नॅशनल आर्मीचाही प्रभाव बेताचाच असतो. त्यामुळे ते स्वतः, सेना किंवा INA यांची सुभाषबाबूंच्या कथित मृत्यूपर्यंत स्वातंत्र्यलढ्याला थेट मदत झालेली दिसत नाही. सुभाषचंद्र बोसांचे विमान कोसळल्याची खबर येऊन गेल्यानंतरच्या मोजक्या प्रसंगांमधल्या एकात इंग्रजांमधील एक संभाषण ऐकायला मिळते. त्यात एकजण दुस-याला म्हणतो की किंवा INAला भारतीयांचा वाढता पाठिंबा आहे, म्हणजे आता आपले दिवस बहुधा संपुष्टात येणार. लगेचच पुढल्या प्रसंगात ब्रिटिश गेल्याचा उल्लेख येतो आणि निवेदन सुचवते की सुभाषबाबूंचे सैन्य नसते, तर स्वातंत्र्य मिळायला उशीर लागला असता. आता हे काही आपल्या फार पचनी पडत नाही. हे मान्य, की ही फौज इम्फाळमार्गे भारतात घुसली होती, पण जपान्यांनी माघार घेतल्यावर त्यांनाही परत फिरावे लागले होते. मग त्यांनी अशी काय भरगच्च कामगिरी केली, की ज्याने ब्रिटिशांना दहशत बसावी? आणि काँग्रेसचे जे इतर नेते स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्त्व शांततापूर्ण मार्गाने करत होते त्यांचे काय ? या विजयात त्यांचा वाटा किती ?
माझा असा अंदाज आहे, की चित्रपटात हे दोन सकारात्मक प्रसंग मुद्दाम घातले गेले असावेत, काऱण तोपर्यंतच्या चित्रपटाचा एकूण प्रभाव हा इतका नकारात्मक आहे, की चित्रपट सुभाषबाबूंच्या विरोधात असल्याचे बोलले गेले असते आणि अर्थातच वादांना तोंड फुटले असते. ते सगळे टाळण्यासाठी ही उपाययोजना असावी, शेवटच्या क्षणी करण्यात आलेली.
आपल्याकडल्या या प्रकारच्या चरित्रपटांची शोकांतिका ही आहे की, त्या सर्वांची तुलना रिचर्ड अँटनबरो यांच्या गांधी चित्रपटाशी होते आणि त्यात ते हमखास कमी पडतात. आंबेडकर, पटेल, सावरकर आणि आता बोस य़ांच्या गुणवत्तेत फरक असेल, पण अंतिम तुलनेत ते सर्वच गांधींपुढे फिके वाटतात. गांधींमध्ये असे काय होते जे या इतर चित्रपटांमध्ये नाही, तर अनेक गोष्टी; पण प्रामुख्याने दोन !  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानायकाचा मानवी चेहरा. या प्रकारच्या मोठ्या आवाक्याच्या आणि इतिहासातील मान्यवर व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपटाशी संबंधित हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा चित्रपटांची पटकथा करताना खूप अभ्यास केल्याचे आपण ऐकतो; पण प्रामुख्याने हा अभ्यास असतो तो त्या नायकाच्या कर्तृ्त्त्वाचा. त्याने अमुक अमुक गोष्टी केल्या, याची यादी तयार केली जाते आणि त्यातल्या शक्य तितक्या गोष्टी पटकथेत दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. पण माणूस म्हणजे केवळ कर्तृत्त्व नव्हे. जोपर्यंत त्याची ओळख एक माणूस म्हणून होत नाही, त्याची व्यक्तिगत जीवनपद्धती, त्याचे गुण-अवगुण, त्याचे आप्तांशी संबंध, त्याच्या भावभावना या सर्वांना जोवर पडद्यावर स्थान मिळत नाही, तोपर्यंत ही ओळख पूर्ण होऊ शकत नाही. अँटनबरोच्या चित्रपटात हा कर्तृत्त्व आणि वैयक्तिक चेहरा यातला तोल जमलेला होता. गांधींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण तर यात होतेच. पण कस्तुरबा,गांधीजींचे स्नेही, विदेशी पत्रकार यांच्याबरोबर असणा-या लहान-मोठ्या प्रसंगांतून आपल्याला गांधीजींची संपूर्ण ओळख झाली. त्यामुळे मग प्रेक्षक हा केवळ इतिहासाच्या पानांचा साक्षीदार ठरला नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी पूर्णतः समरस होऊ शकला. याचे श्रेय दिग्दर्शकाला जाते, ते त्याच्या दृष्टिकोनामुळे आणि पटकथाकाराला त्यांच्या तपशिलाच्या निवडीमुळे.
बोससाठी करण्यात आलेला अभ्यास सुभाषबाबूंच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा नसून, केवळ त्यांच्या कारकीर्दीतल्या, अमुक कालावधीतल्या घटनांचा आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या या घटनेनंतर ती घटना घडली हे कळते; पण मुळातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला तिसरी मिती येऊ शकत नाही. हा दोष प्रामुख्याने आहे, तो शमा झैदी आणि अतुल तिवारी यांच्या पटकथेचा; पण श्याम बेनेगल यांच्यासारखे ज्येष्ठ दिग्दर्शक या चित्रपटाशी संबंधित असताना त्यांनी पटकथाकारांवर अंकुश ठेवण्याची गरज होती. त्यामुळे त्यातल्या त्रुटी सुधारण्याची शक्यता होती.
गांधीमध्ये जमलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळाचे आणि चळवळीचे हुबेहुब चित्रण. य़ातले अनेक प्रसंग आठवले, तर आपल्या लक्षात येते की त्यांचा परिणाम हा अक्षऱशः  इतिहास जिवंत झाल्याप्रमाणे होता. गांधी हत्येच्या दिवशी उसळलेली गर्दी, जालियनवाला बाग हत्याकांड, फाळणीच्या आधी गांधीजी उपोषणाला बसतात तो प्रसंग यांसारख्या ठिकाणी प्रमुख व्यक्तिरेखा आणि जनसमुदाय यांचा करण्यात आलेला अचूक वापर आपल्याला संपूर्ण अकृत्रिम अनुभव देणारा ठरला. आपल्याकडल्या चरित्रपटांमध्ये या अनुभवाचा खरेपणा हा कमी जास्त ठरलेला दिसतो. याचे प्रमाण त्यातल्या त्यात अधिक होते ते सरदारमध्ये. बोसमध्ये मात्र ते चिंताजनक वाटण्याइतके कमी आहे. इथले अनेक प्रसंग हे व्यावसायिक हिंदी चित्रपटांहूनही कमी प्रभावी वाटतात आणि लुटुपुटीचे.
उदाहरणार्थ या चित्रपटात जेव्हा जेव्हा नोकर किंवा ड्रायव्हर्सची पात्रे दिसतात, तेव्हा ती हमखास ब्रिटिशांची हेर असतात. त्यातून ही हेरगिरीगदेखील ते इतक्या उघडपणे करतात, की ती हास्यास्पद ठरावी. इथले इंग्रजांचे प्रसंग हे त्यांनी नेमून दिलेल्या त्याच नेपथ्यावर घडणारे, एकसुरी आहेत. इथे अज्ञातवासातील बोस यांना मोठमोठ्य़ाने सुभाषबाबू म्हणून हाका मारणारे सहकारी आहेत, काबूलच्या रस्त्यावर केलेला अत्यंत बाळबोध पाठलाग आहे, हिटलरला उपदेश करणारे सुभाषबाबू, चुटकीसरशी जर्मनीतील भारतीय युद्धकैद्यांचे होणारे मतपरिवर्तन, पर्ल हार्बरचा विध्वंस सस्मित मुद्रेने जपान्यांबरोबर बसून पाहणारे सुभाषबाबू... या प्रसंगांना काय म्हणावे हेच कळत नाही. हे सर्व कमी म्हणून की काय पार्श्वभूमीला मोठमोठ्याने चालणारी गाणी आपल्याला पडद्यावर लक्ष केंद्रितच करू देत नाहीत. चित्रपटाच्या उत्तरार्धातील आयएनएची कामगिरी जितकी निराशाजनक आहे, त्याहून किती तरी अधिक निराशाजनक आहे, ती या युद्धप्रसंगांच्या चित्रिकरणातील दिग्दर्शकाची आणि छायाचित्रकाराची कामगिरी. एका नदी किना-यावर ब्रिटिश सैन्याशी आयएनएने दिलेल्या टकरीचे कौतुक ब्रिटिश अधिकारी करताना दिसतात. पण प्रत्यक्षात या सैनिकांच्या कामगिरीत विस्कळितपणा एवढीच गोष्ट दिसून येते. यापेक्षा कितीतरी दर्जेदार युद्धचित्रण त्यावेळी प्रदर्शित झालेल्या टँगो- चार्लीसारख्या कमी गंभीर प्रयत्नांतही पाहायला मिळते.
स्पेशल इफेक्ट्सचा वापर हा परिणामकारक तेव्हाच समजला जातो, जेव्हा तो वापर केल्याचे पाहणा-याच्या लक्षात येत नाही. बोसमध्ये हा वापर उघड आहे. यू बोटीने शत्रूची बोट उडविण्याच्या प्रसंगात ही मॉ़डेलमधील बोट आहे, हे ज्वालांच्या प्रमाणावरून सहज लक्षात येऊ शकते. त्याचबरोबर युद्धप्रसंगातील आगी संगणकीय आहेत, हे समजण्यासाठीही कुणा तज्ज्ञाची गरज नाही. हे स्पेशल इफेक्ट्स त्या मानाने क्षुल्लक आहेत आणि इतर देशांमध्ये ते वर्षोनुवर्षे यशस्वीपणे वापरले जात असल्याची उदाहरणे आहेत. आपल्याकडे इतक्या मोठ्या विषयावरच्या आणि ब-यापैकी बजेट असणा-या चित्रपटातही ते जर योग्य रीतीने वापरता येणार नसतील, तर ही चिंतेची बाब आहे. या प्रकारची दर्जाहीन चमत्कृती दाखविण्यापेक्षा हे प्रसंग पूर्णपणे वगळता आले असते, तर कदाचित बरे झाले असते.
जेव्हा सुभाषबाबूंसारख्या महत्त्वाच्या नेतृत्त्वाबद्दल चित्रपट काही सांगतो, तेव्हा तो त्यांच्या बाजूने वा विरोधात काही ठाम विधान करील अशी अपेक्षा तयार होते. जेव्हा तो ती करू शकत नाही आणि केवळ घटनांचा पाढा वाचतो, तोही गुळमुळीतपणे, तेव्हा त्या चित्रपटाच्या प्रयोजनाविषयी शंका घ्यायला जागा तयार होते. बोसला सुभाषबाबूंविषयी काहीच सांगायचे नाही. बाजूने तर नाहीच नाही, पण विरोधात आहे तेदेखील बहुदा सत्याच्या विपर्यासाने. मग बोसच्या निर्मितीमागे प्रयोजन काय? आपल्याला विसर पडत चाललेल्या एका मोठ्या नेत्याची आठवण जागवायचा हा प्रयत्न आहे, असे गृहित धरले तर तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि वागण्यातील दोषच पुढे आणताना दिसतो; पण मग आपण सत्य नक्की कोणते मानायचे? इतिहासाच्या पुस्तकातून शिकविले जाणारे झुंजार बोस खरे, की बेनेगल यांच्या चित्रपटातील कोणत्याही ठाम योजनेविना चाचपडणारे बोस खरे?
घटनांच्या सत्यासत्यतेबद्दलही चित्रपट कोणतीही भूमिका घेणे टाळतो. त्याच्या सुरुवातीलाच एक सूचना दाखविली जाते.हा काल्पनिक चित्रपट ऐतिहासिक सत्यांवर आधारित आहे, असा तिचा गोषवारा असतो; पण म्हणजे नक्की काय?
ऐतिहासिक सत्यावर बेतलेला चित्रपट काल्पनिक असू शकतो, जर ही सत्ये केवळ आधारासाठी वापरलेली असली, तरी संपूर्ण चित्रपटात जर सत्य घटनांची रेलचेल असेल, तर त्यातला काल्पनिक भाग कुठला म्हणायचा? सुभाषबाबूंच्या वागण्याचा चित्रकर्त्यांनी लावलेला अर्थ हा तर तो काल्पनिक भाग नव्हे? का ही सूचना म्हणजे केवळ सर्व वादातून सुटण्याची सोपी पळवाट आहे?
बोसला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम नव्हता हे जाहीर आहे. बहुतेक वेळा अशा परिस्थितीत दोन ठिकाणी अपयशाचे खापर फुटते. एक म्हणजे प्रेक्षकांच्या माथी, तर दुसरे वितरकांच्या. प्रेक्षकांना अशा चित्रपटाचे महत्त्व कळत नाही, तो केवळ करमणुकप्रधान चित्रपटांच्या मागे धावतो, असे म्हटले किंवा वितरकांनी तो प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचेल याची काळजी घेतली नाही असे म्हटले की चित्रकर्त्यांची जबाबदारी संपली. बोसच्या बाबतीत वितरणातल्या त्रुटींचा मुद्दा काहीसा योग्य आहे. पण प्रेक्षकांना दोष देण्याआधी स्वतंत्रपणे चित्रपटाच्या गुणवत्तेचा विचार व्हायला हवा. गांधी देखील चरित्रपटच होता. त्याला पाहायला लोकांनी तुफान गर्दी केलीच ना? आणि प्रेक्षक मुळात चित्रपटगृहात येतो की नाही, इथपर्यंत वितरणाचा संबंध, पण एकदा का तो चित्रपटगृहात पोहोचला की मग त्याचा चित्रपटाला प्रतिसाद कसा आहे ते पाहण महत्त्वाचे. बोसच्या चित्रकर्त्यांनी एकदा चित्रपटगृहात सामान्य प्रेक्षकांबरोबर चित्रपट पाहिला असता तर त्यांना यशापयशाची कारणे देण्याची गरज पडली नसती.
बोस संपताना श्रेयनामावलीच्या दरम्यान आपल्याला प्रत्यक्ष सुभाषबाबूंचे थोडे फुटेज दाखविले जाते. या ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या प्रामुख्याने न्यूजरील फूटेजमध्ये आणि फोटोमध्ये जो जोरकसपणा आहे, तो या चित्रपटात कुठेही येऊ नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या सुभाषबाबूंच्या चेह-यावर चित्रपटातल्या सारखे प्रत्येक प्रसंगात दिसणारे बेगडी स्मित नाही, तर कठोर कर्तव्यबुद्धी आणि आत्मविश्वास आहे. या थोड्या फूटेजच्या निमित्ताने तरी आपली ख-या सुभाषबाबूंशी भेट होते, मग ती काही क्षणांपुरती का होईना. संपूर्ण चित्रपटापेक्षा हे मोजके क्षणच आपल्याला बरेच काही सांगून जातात.
आपल्या देशाच्या इतिहासाशी खरेखुरे नाते सांगणारा केवळ एवढाच भाग या चित्रपटात पाहायला मिळतो.
- गणेश मतकरी  

2 comments:

Harshal April 1, 2013 at 2:51 AM  

शेवटचा परिच्छेद खूप आवडला !

aativas April 1, 2013 at 9:31 AM  

म्हणजे इथेही सुभाषबाबुंवर अन्यायाच झाला म्हणायचा तर :-(

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP