खोपकरांची जोडचित्रं- कलाप्रांताचा अद्भुत मागोवा

>> Sunday, April 7, 2013


गेली अनेक वर्षं ,मराठी चित्रपटसमीक्षेत एकच पुस्तक अढळपद मिळवून आहे आणि ते म्हणजे अरुण खोपकरांचं 'गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका'. सामान्यतः समीक्षेच्या नावाखाली गोष्टी सांगणा-या, किंवा परकीय संकल्पनाच्या भाषांतरांना समीक्षा मानण्याच्या, किंवा कलाभ्यासापेक्षा चरित्रामधे रमण्याच्या  आपल्या प्रथेत न बसणारं ,काही नवीन सांगून पाहाणारं, निश्चित वैचारिक बैठक असणारं हे पुस्तक. पुढे खोपकर प्रत्यक्ष निर्मितीच्या कामात अडकल्याने त्यांनी ब-याच कालावधीत नव्या पुस्तकाचा विचार केला नाही, आणि या पुस्तकाची लोकप्रियता माहीत असतानाही सोप्या चित्रपटविषयक लिखाणाचे मार्ग उपलब्ध असल्याने या प्रांतातल्या इतरांनीही असा गंभीर समीक्षेचा मार्ग टाळला. आता अनेक वर्षांनी खोपकरांची दोन नवी पुस्तकं उपलब्ध झाली आहेत. चित्रव्यूह आणि चलत्-चित्रव्यूह. ही पुस्तकं पाहताच आपल्या लक्षात येतं,की गुरुदत्तचं यश ,त्याचा वेगळेपणा हा केवळ त्या पुस्तकाच्या विषयात नव्हता, तर तो लिहिणा-याच्या दृष्टिकोनात होता.
 चित्रव्यूह आणि चलत्-चित्रव्यूह ही  दोन्ही पुस्तकं अमूक वर्गात बसणारी आहेत असं छातीठोकपणे सागणं अवघड आहे, कारण हे विविध गद्यप्रकारांशी नातं सांगणारं लिखाण आहे. कोणी त्यांना ललित लेख म्हणू शकेल, कोणी व्यक्तिचित्रांचा संग्रह म्हणू शकेल किंवा कोणी आत्मचिंतनात्मक आणि आत्मचरित्रात्मक लिखाणही म्हणू शकेल. मात्र यातली कोणतीही कसोटी लावली तरीही यात एक गोष्ट निश्चितपणे आहे आणि ती म्हणजे कलाविषयक सखोल विचार. जर याप्रकारची वैचारिक बैठक हा लेखकाच्या व्यक्तिमत्वाचाच भाग असेल, तर त्याला त्या पध्दतीने व्यक्त होण्यासाठी विशिष्ट प्रकारचं लिखाण असण्याची गरज पडत नाही. विचार हा सहजपणे त्याच्या लिखाणाचा अविभाज्य भाग बनून येतो, मग ते कोणत्याही वर्गात बसणारं का असेना.
लेखक सुरुवातीलाच सांगून टाकतो की ही दोन पुस्तकं ही जोडचित्रांप्रमाणे आहेत. स्वतंत्रपणे संपूर्ण असली, तरी एकमेकांच्या संदर्भाने अधिक अर्थपूर्ण होणारी. एकमेकांच्या सान्निध्यात एका विशाल कलाविश्वाचं चित्र आपल्यापुढे रेखाटणारी. या पुस्तकांमागे असणारी व्यूहरचना चटकन लक्षात यायची, तर आपल्याला चित्रव्यूहातल्या पहिल्या प्रकरणाकडे, 'चित्रव्यूहप्रवेश' कडे वळावं लागेल. यात खोपकर एका अशा व्यक्तीचं वर्णन करतात, जी बोटीच्या कॅबिनमधे बसून, बाहेर डेकवर ठेवलेल्या अनेक आरशांमधे दिसणारी भवतालाची प्रतिबिंब पाहाते आहे. वाटेतल्या अनेक आरशांनी थेट काही बघण्यापासून तिची वाट अडवली आहे, त्यामुळे तिला दिसतात केवळ विविध प्रदेश, रंग, स्थलकाल, निसर्ग यांना वेगवेगळ्या रंग, आकार, कोन आणि विस्तारात दाखवणारी आरशातली अंशचित्र. एखादा किंचित क्षण पकडण्यापासून , आपल्या अस्तित्वावरच प्रगल्भ भाष्य करण्यापर्यंत विविध प्रकारची क्षमता असणारी. लेखक या संग्रहातल्या लेखांची तुलना या अशा अंशचित्रांशी करताे. अंशतम असून पूर्णचित्राकडे निर्देश करणा-या आणि त्याचवेळी स्वतःतही संपूर्ण असणा-या चित्रांशी.
लेखकाने उभी केलेली ही आरशात भवतालाचे तुकडे न्याहाळणा-या बोटीतल्या प्रवाशाची प्रतिमा, ही या लेखनाच्या आत्मचरीत्रपर असण्यावर शिक्कामोर्तब करणारी आहे आणि ती एकाच पुस्तकात येऊनही, काही प्रमाणात दोन्ही पुस्तकांच्या रचनेवर बोट ठेवणारी आहे.
चित्रव्यूह आणि चलत्-चित्र व्यूह या दोन्हीमधे जशी साम्य आहेत तसे फरकही आहेत. साम्य यासाठी ,की दोन्हीमधे प्रामुख्याने दिसतं ते लेखकाचं अनुभवविश्व.  त्याला भेटणारी माणसं . विविध प्रकारची.  पु लं देशपांडे , मामा वरेरकरांसारख्या साहित्यिकांपासून बारा भाषा येणा-या पानवाल्यापर्यंत आणि जहांगीर साबावाला, भूपेन खक्कर यांसारख्या मोठ्या चित्रकारांपासून ऋत्विक घटक, के के महाजन यांच्यासारख्या महत्वाच्या चित्रकर्मींपर्यंत. यात मांडला जाणारा विचार हा केवळ या व्यक्तिंनी मांडलेला विचार नसतो,तर लेखकापर्यंत पोचलेला , त्याला प्रभावित करुन त्यावर चिंतन करायला भाग पाडणारा विचार असतो. हे लेख या व्यक्तिंचा मोठेपणा त्यांच्या कारकिर्दीच्या पाढ्यामधून मांडत नाहीत, तर प्रत्यक्ष संपर्कात लेखकाला आलेली प्रचिती, ही या लेखांमागची खरी प्रेरणा आहे.
पुस्तकांमधला फरक आहे तो दोन्ही पुस्तकांसाठी वापरलेल्या फॉर्ममधून आलेला. चित्रव्यूह मधले लेख हे तुलनेने लहान स्वरुपाचे, घटनांकडे किंचित अंतरावरुन पाहाणारे आहेत. यात मांडल्या जाणार््या घटनांमधेही खोपकरांचं स्थान आहे पण ते प्रामुख्याने निरीक्षकाचं. ही निरीक्षणं विविध प्रकारची आहेत. लहानपणी  रेडिओसाठी बसवलेल्या पेंडशांच्या 'हत्या' कादंबरीवर आधारीत नभोनाट्य मालिकेत प्रमुख भूमिका करताना केलेल्या पु ल देशपांडेंच्या दिग्दर्शनशैलीच्या निरीक्षणापासून   ते सध्या रहात असणार््या एकविसाव्या मजल्याबाहेर बांधलेल्या परातीवर लटकून काम करणा-या रंगा-यांच्या एकमेकांशी होणा-या संवादांपर्यंत, अनेक काळात, परिस्थितीत, पार्श्वभूमीवर आणि देशांमधे केलेली ही निरीक्षणं आहेत. त्यात अनेक परिचित व्यक्ती आहेत, पण त्या व्यक्ती हा या लेखांचा उद्देश नाही. उद्देश आहे तो या व्यक्तींच्या सान्निध्यात लेखकाचं एक माणूस म्हणून घडत जाणं.
'चित्रव्यूह' मधे समाविष्ट लेखांमधे सरसकट सारी व्यक्तिचित्रं आहेत असंही नाही. त्यात ' तांबड्या विटांची शाळा' हा बालमोहनच्या सुरुवातीच्या दिवसांवरला लेख आहे, 'बेगम बर्वे' हा आळेकरांच्या नाटकाचं महत्व थोडक्यात उलगडून सांगणारा लेख आहे , 'व्हेनिस: तीन क्षण' सारखा लेखकाच्या जगप्रवासी वृत्तीशी संबंधित पण सर्गेई आईझेनश्टाईन या महान रशियन दिग्दर्शकापासून तत्वज्ञ प्लेटोपर्यंत आणि भारतीय तसंच युरोपिअन चित्रकलेपासून   इटालिअन आॅपेरापर्यंत अनेकानेक दिशाना पसरलेला लेख आहे, आणि खोपकरांना अतिशय प्रिय असलेल्या आणि मृत्यूनंतर भूपेन खक्करसारख्या महत्वाच्या भारतीय चित्रकाराचा कलाविषय बनण्याचं नशीब लाभलेल्या ( हा संदर्भ येतो तो मात्र चलत्- चित्रव्यूह मधल्या संत भूपेन या लेखात) त्यांच्या 'कोश्का' या मांजरीवरचा लेखही आहे.
मला खास आवडणारा 'बरखा ऋतू आयी' हा लेख , त्यांच्या फिल्मअँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधे १९७४ साली घडलेल्या  एका छोटेखानी प्रसंगावर बेतलेला, परंतु विषयाची मोठी व्याप्ती असणारा. इन्स्टिट्यूट मधल्या एका पावसाळी दुपारी खोपकरांना झालेली अमीर खांसाहेबांच्या एका मैफिलीची आठवण, आणि त्यानंतर त्यांच्या वसतीगृहातल्या छोट्या खोलीत जमलेली आणि केतन मेहता, सईद मिर्जा यांसारख्या नंतर नावारुपाला आलेल्या सहविद्यार्थ्यांचा श्रोत्यांमधे समावेश असणारी अजब संगीतसभा हाच या घटनेचा एेवज. या लेखात खोपकरांच्या शैलीची अनेक वैशिष्ट्य आहे. मुळात कथनावर असणारं नियंत्रण, थोडक्यात आणि अचूक शब्दांमधे स्थळकाळ उभा करण्याची त्यांची हातोटी,  कलेकडे पाहाण्याची दृष्टी आणि इतिहासाचा संदर्भ या काही गोष्टींचा उल्लेख खास करण्यासारखा. अखेर येणारा धक्का हा तसा अपरिचित, नेहमी न येणारा, पण लेखाचं कथामूल्य वाढवणारा.
या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने दिलेलं 'विषयांतर हा माझ्या योजनेचा भाग आहे' हे हिरोडटस या ग्रीक इतिहासकाराचं उधृत, यातल्या लेखांच्या रचनेवर थोडा प्रकाश टाकणारं आहे. इथे अनेक लेख हे विशिष्ट ठिकाणी सुरु झाले तरी अखेर पर्यंत त्याच मार्गावर राहात नाहीत. मधे एखादा छानसा फाटा लागला तर तिथे फेरफटका मारायला त्यांना गंमत वाटते. बालमोहन वरल्या लेखात, शाळेच्या नव्या इमारतीमुळे आेढवलेल्या आंब्याच्या मृत्यूविषयी बोलताना खोपकर  शहरात वाढीला लागलेल्या या निसर्गावर अत्याचार करण्याच्या वृत्तीवर सरकतात, लच्छू महाराज या कत्थक शैलीतल्या ज्येष्ठ कलाकारांविषयी बोलताना कत्थक शैलीचे विशेष आणि भारतीय चित्रकलेतल्या मिनिएचर्सवर विवेचन करतात, सुधीर पटवर्धनांच्या चित्रकलेविषयी बोलताना  रनेसान्स दरम्यान वा इम्प्रेशनिझम मुळे झालेला चित्रकलेचा विकास यावर भाष्य करतात. 'व्हेनिस :तीन क्षण' किंवा 'भाषावार प्रांतरचना ' ही तर विषयांची कोलाजेस असल्यासारखीच आहेत. हे सारं अपघात म्हणून होत नाही. कलावंत, विचारवंत आणि अभ्यासक हे जसजसे आपल्या विषयात पारंगत होतात, तसतशी त्यांची नजर आपोआप रुंदावत जाते. त्याना एक 'बिग पिक्चर' दिसायला लागतं ,जिथे सारं काही एकदुसर््याशी जोडलेलं आहे. त्यामुळे केवळ एका ठिकाणी अडकणं, हे दिसणार््या जागांकडे दुर्लक्ष करण्यासारखं, जबरदस्तीने साधलेलं ,कृत्रिम. ते टाळणं, हाच दृष्टीकोन अधिक योग्य, वाचकासमोर नव्या दिशा खुल्या करणारा, त्याच्या समजून घेण्याच्या क्षमतेला कमी न लेखणारा.
'चित्रव्यूह' मधे लेखकाची माणूस म्हणून जडण घडण दिसते असं म्हंटलं तर 'चलत्-चित्रव्यूह' मधे एक कलावंत म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून दिसते असं म्हणता येईल. त्याच्या नावातच चित्रपटाचा संदर्भ असल्याने, आणि अरुण खोपकरांचा सर्व कलांशी संबंध येऊनही त्यांचं व्यक्तिगत काम या कलेशी जोडलेलं असल्याने हे लेख अधिक 'हॅन्ड्स-आॅन' असणार हेदेखील उघड आहे. यातले अनुभव हे अधिक जवळून आलेले आहेत. लेखकाने चित्रपट क्षेत्रात केलेल्या कामाशी तर त्यांचा जवळून संबंध आहेच, वर त्यांना मिळालेली दिशा, त्यांनी स्वतंत्रपणे केलेला या क्षेत्राचा विचार आणि त्यांचा क्षेत्रातला प्रत्यक्ष सहभाग, हे सारं इथे एकत्र आलेलं आहे.
चलत्- चित्रव्यूहमधले लेखही लांबीने अधिक मोठेे, संबंधित व्यक्तिचा शोध पूर्ण करणारे आणि त्या त्या कलावंताविषयी काही नवीन देणारे आहेत. सामान्य वाचकाला यातले सारेच कलावंत/तंत्रज्ञ माहीत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे एका परीने त्याच्यासाठी हे एका वेगळ्या जगाचं दार खुलं करणारं आहे. ढोबळमानाने पाहिलं तर या पुस्तकाचा पूर्वार्ध हा खोपकरांनी केलेल्या कामाशी संबंधित व्यक्तिंविषयी आहे. यांत चित्रकार जहांगीर साबावाला आणि भूपेन खक्कर आहेत, जाहिरात क्षेत्रात मानाने नाव घेतले जाणारे ग्राफिक आर्टिस्ट र.कृ. जोशी आहेत, खोपकरांची इच्छा असून ज्यांच्यावर माहितीपट बनवता आला नाही असे जानेमाने तमाशा कलावंत दादू इंदूरीकर आहेत, कवी नारायण सुर्वे आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात खोपकरांच्या चित्रपटशिक्षणात अमूल्य सहाय्य झालेले आणि फिल्म इन्स्टिट्यूटशी जवळून संबंधित असणारे चित्रपट रसास्वादाचे प्रणेते सतीश बहादूर, संगीतकार आणि संगीत अभ्यासक भास्कर चंदावरकर आणि सत्यजित राय यांच्या तोडीचे दिग्दर्शक ॠत्विक घटक आहेत. त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळ्या शैलीतल्या कलात्मक चित्रपटांसाठी गाजलेले दिग्दर्शक मनी कौल आणि छायाचित्रकार के के महाजन आहेत. यातला दरेक लेख हा लेखकाच्या या व्यक्तीसंबंधातल्या निरीक्षणांनी त्यांच्या कलेचं, कलाविषयक विचाराचं चित्र उभा करतो तसंच या सगळ्यांचं माणूस म्हणूनही चित्र रंगवतो.
साबावालांच्या ,त्यांना 'प्रकाश दिसल्याच्या' क्षणानंतर त्यांच्या आंतरीक प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास किंवा भूपेन खक्करने चित्रांत प्रकाशाचा एक स्त्रोत वापरण्याएेवजी प्रत्येक कथनकेंद्राकरता वेगळा स्त्रोत वापरण्याची पध्दत जशी खोपकर नोंदवतात तशीच साबावालांची खानदानी पार्श्वभूमी आणि व्यवस्थितपणा,किंवा भूपेनच्या स्वभावातला साधेपणा आणि सेन्स आॅफ ह्यूमरही नोंदवतात. रकृंच्या कामातल्या सौदर्याबरोबरच ते या कामातून रकृंना मिळणार््या आनंदाची दखल घेतात. सुर्व्यांच्या भाषेवर, भास्कर चंदावरकरांच्या विद्यार्थ्यांबरोबरच्या संवादावर किंवा ॠत्विकदांच्या जगण्यात आणि कलेत दिसणा-या वेदनेवरचं त्यांचं भाष्य हे नुसतं कोरडं निरीक्षण नाही, तर या व्यक्तींना आतून ओळखल्याचा पुरावा आहे. या अंतर्बाह्य ओळखीच्या लेखनशैलीला अपवाद एक, तो म्हणजे ' खंड क्रमांक शून्य' हा विख्यात वास्तूविशारद चार्ल्स कोरिआंवरचा लेख. इथे आपल्यापर्यंत त्यांच्या वास्तूंची भव्यता, संकल्पनांमधली कल्पकता आणि एकूण कामाची थोरवी पोचते, पण व्यक्ती लपलेलीच राहते. वास्तूशास्त्रावर मराठीत अतिशय मर्यादित प्रमाणात लेखन झाल्याने, आणि कोरिआ हे निःसंशय आपल्याकडले सर्वात महत्वाचे वास्तुविशारद असल्याने या लेखालाही महत्व आहेच, मात्र इतर लेखांच्या तुलनेत याचं असं व्यक्तीपासून हातभर दूर राहाणं जाणवणारं आहे.
खोपकरांच्या पुस्तकातली भाषा वाचणं हा एक आनंददायी अनुभव आहे. उत्तम मराठीचा हा नमुना आहे. जशी ती कुठेही अवजड वा क्लिष्ट होत नाही तशीच ती बाळबोध वा इंग्रजी धार्जिणीही होत नाही. कलेसारख्या विषयाचा पुस्तकांमधे मोठा भाग असताना, आणि देशीविदेशी संदर्भांची रेलचेल असतानाही ती परिभाषेत अडकत नाही आणि वाचकाला उपदेश केल्याचा थाटही आणत नाही. किंबहुना त्यांच्या या भाषेवरल्या प्रभुत्वात आणि वेळोवेळी दिसणा-या आपल्या संस्कृतीवरल्या आदरमिश्रीत प्रेमातच त्यांनी जागोजागी व्यक्त केलेल्या मराठी संस्कृतीच्या दिवसेंदिवस होणा-या अवमूल्यनाबद्दलचा संताप दडलेला आहे.'मराठी भाषेला झालेल्या खोट्या खोट्या भावविवशतेच्या मृत्यूलाक्षणिक कर्करोगावर' उघड टिका करणा-या 'भाषावार प्रांतरचना' या लेखात हे खूपच स्पष्टपणे येतं ,पण इतरत्रही 'मराठी कवितेला एका उथळ सुबकपणाची सवय झाली आहे', किंवा 'आमच्याकडे सार्वजनिक कला आणि सार्वजनिक शौचालय, यात शौचालय परवडले अशी कला असते', यासारख्या उधृतातून हे असमाधान जाणवत राहातं. अर्थात हा असंतोष विचार करु शकणा-या ,करु पाहाणा-या आपल्यातल्या अनेकांमधे असेल, त्यावर उपाय मात्र सहजी सापडण्यासारखा नाही.
दृष्ट लागेलसा आशय , विकास गायतोंडे या जाहिरातक्षेत्रातल्या मोठ्या कलावंताने अत्यंत तपशिलात जाऊन केलेली मांडणी, आणि लोकवाड़मयगृहाने केलेल्या अतिशय देखण्या पुस्तक निर्मितीत ,मला थोडी तक्रार करायला एकच जागा सापडू शकते ,आणि ती म्हणजे छायाचित्रांचा अभाव. खासकरुन चित्रकला आणि चित्रपट या दोन दृश्यकला यातल्या ब-याच लेखांशी संबंधित असताना असलेला. हे उघड आहे, की खोपकर आणि गायतोंडे या दोघांनीही घेतलेल्या या छायाचित्र टाळण्याच्या निर्णयामागे काहीतरी निश्चित विचार असणार. कदाचित व्यक्तिगत अनुभवांप्रमाणे असणा-या पुस्तकात स्टॉक छायाचित्र जाणार नाहीत असं कारण असू शकतं, किंवा सर्व लेखांसाठी सारख्या प्रमाणात एका दर्जाची छायाचित्र उपलब्ध होऊ शकणार नाहीत ही काळजीही असेल, कदाचित आणखीही काही. असं असूनही मला वाटतं की छायाचित्रांची गरज होती. तशा जागा आहेत. ज्या आता रिकाम्या आहेत.
ही एक गोष्ट सोडता ही जोडचित्रं किंवा जोडपुस्तकं यावर्षीच्याच नाही तर एकूणच कलाविषयक विचार करणा-या  पुस्तकांमधे महत्वाची भर आहे, हे लख्ख आहे
-गणेश मतकरी
(महा अनुभव मासिकामधून)

4 comments:

Anonymous,  April 10, 2013 at 8:09 AM  

This seems like a MUST BUY! Your review gives a very good idea about the books. Even i was wondering if the books have pictures/illustrations. Glad you mentioned about it in the review itself.

Thanks!

Meghana Bhuskute June 4, 2013 at 10:22 AM  

आत्ता हातात पडलीयेत. खास आहेत. हे वाचू की ते असं होतंय. सवडीनं पुन्हा पुन्हा वाचली जातीलच. पण ही पोच, हा लेख वाचून मी ती आणली, म्हणून.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP