इफ्फी २०१३- काही विशेष चित्रपट

>> Sunday, December 1, 2013


चित्रपट महोत्सवात चांगले चित्रपट शोधणं ही एक कला असते. थोडा अभ्यास, बराचसा काॅमन सेन्स, स्वतःची आवड नक्की माहीत असणं आणि थोडंसं चांगलं नशीब, या सगळ्याची मदत असेल तरच हे जमू शकतं. अन्यथा हाताला फारसं काही लागत नाही. आणि हे करुनही सारेच चित्रपट चांगले पाहायला मिळतील असं समजणं हे तर दिवास्वप्नच.
मी स्वतः सर्वात आधी आॅब्विअस गोष्टी पाहातो. आपल्या पाहाण्याच्या अजेंडावर असलेले किंवा कॅन, बर्लिन सारख्या नामांकित महोत्सवांमधे गाजलेले काही चित्रपट आहेत का? सेक्शन्स कोणत्या विषयांना धरुन आहेत, कन्ट्री फोकस, रेट्रोस्पेक्टिव सारख्या विभागांमधे आपलं पाहायचं राहिलेलं काय सापडू शकतं, वगैरे. ते झाल्यावर मग वल्ड सिनेमा मधे माहितीच्या दिग्दर्शकांचे पण आपल्याला माहित नसलेले, चुकलेले चित्रपट कोणते वगैरे. दुर्दैवाने काही वेळा या गणितात भारतीय चित्रपट मागे पडतात कारण ते पुढे मागे पाहायला मिळण्याची शक्यता अधिक असते. इतर भाषिक आणि त्यातही प्रायोगिक चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच, म्हणून त्यांची वर्णी आधी लागते. त्याला इलाज नाही.  यंदा गोव्याच्या महोत्सवातही तसंच झालं.
गोव्याला मी बहुधा पहिले चारपाच दिवस हजेरी लावतो, पण यंदा थोडं उलटं करुन पाहीलं. दोन तीन दिवस सोडूनच मी पोचलो, तो शेवटपर्यंत राहाण्याच्या तयारीने. त्याचा सर्वात जाणवणारा मोठा तोटा दिसला तो पोचल्यावर पहिल्या दोनतीन दिवसातच.  महोत्सवात हव्या त्या चित्रपटांची तिकिटं मिळणं हे एक अशक्य काम असतं. सारेच चांगले चित्रपट सर्वांना पाहायचे असतात , त्यामुळे काही वर्षांपूर्वीपर्यंत हवा असणार््या चित्रपटाना लांबचलांब रांगा आणि इतरत्र ओस सिनेमागृह, असा कारभार असायचा. त्यावर उपाय म्हणून आपल्या बर््याच महोत्सवांनी परकीय महोत्सवांकडून कल्पना घेऊन बुकींग सिस्टीम चालू केली. मात्र ही बुकींग सिस्टीम समाधानकारक पध्तीने कशी वापरायची, याचं गणित अजून कोणत्याच महोत्सवाला धडपणे जमलेलं नाही. विशेषतः आॅनलाईन बुकिंग्ज आणि तिकिटांचे प्रिन्टाऊट्स यांचे सर्वत्र गोंधळ आहेत. त्यावर उपाय म्हणजे वेळेवर तिकिट काढणं किंवा हा नाही तर तो अशा तडजोडीच्या भाषेची तयारी ठेवणं. या तिकिटांच्या भानगडीत माझ्या उशीरा येण्यानंतरचे दोनतीन दिवसही वाया जाण्याची चिन्ह दिसायला लागली कारण बुकींग्ज आधी ओपन झाल्याने जी तिकिटं हाती पडतील ती घेण्यावाचून इलाज नव्हता. पण या दिवसातही दोन चांगले चित्रपट अनपेक्षितपणे पाहायला मिळाले. ते म्हणजे  यान किदावा-ब्लोन्स्की यांचा पोलिश चित्रपट ' इन हायडिंग'  आणि भावे-सुकथनकरांचा ' अस्तु'.
नाझी अत्याचार हा विषय जागतिक चित्रपटांत इतका महत्वाचा आहे की हे हत्याकांड प्रत्यक्षात कितीही लांच्छनास्पद असलं तरीही त्याचं चित्रपट ( आणि साहित्य) क्षेत्रातलं योगदान दुर्लक्ष करण्याजोगं नाही. पोलान्स्कीच्या 'द पिअनिस्ट' सारख्या व्यक्तिगत भयकथांपासून स्पीलबर्गच्या समाजाच्या मोठ्या चित्राकडे पाहाणार््या ' द शिंडलर्स लिस्ट' पर्यंत विविध चित्रप्रकार आणि अवाक्यांमधून या भीषण युध्दाचं चित्रण झालं आहे. इन हायडिंग मधलं चित्र खूप फोकस्ड असं आहे आणि ते प्रत्यक्ष युध्दाविषयी कमी आणि मानवी गुणदोषांविषयी अधिक आहे. युध्दाच्या छायेत सामान्य माणसंही वेळप्रसंगी किती भयंकर वागू शकतात हे सांगताना हा चित्रपट प्रेम, स्वार्थ, आशा, धैर्य अशा अनेक संकल्पना चर्चेला घेतो. त्याची रचना म्हंटलं तर नाटकासारखी आहे. एका घरात राहाणार््या दोन मुली, एक घराची मालकीण आणि चेलो वादक जेनिना तर दुसरी तिच्या वडिलांनी घरात लपवून ठेवलेली ज्यू नर्तिका एस्टर. आधी एस्टरचा राग करणारी जेनिना बदलत्या परिस्थितीबरोबर एस्टरच्या प्रेमात पडते. बाहेरच्या भीषण परिस्थितीत दोघी एकमेकींचा आधार शोधतात. प्रेमाचं रुपांतर हक्कभावनेत होतं आणि युध्द संपायला येताच एस्टर आपला वेगळा मार्ग निवडेल या कल्पनेने जेनिना बिथरते. प्रेमकथा, युध्दकथा, सायकाॅलाॅजिकल थ्रिलर अशा अनेक अंगाने जाणार््या या चित्रपटाचा शेवटचा भाग मला क्लाॅस्ट्रोफोबिक साय फाय कादंबर््यांचा मोठा लेखक फिलिप के डिक याच्या 'द पेनल्टिमेट ट्रुथ' या कादंबरीची आठवण देऊन गेला. यातली जेनिनाची भूमिका साकारणारी माग्दालिना बोझारस्का, ही यंदाच्या इफ्फी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
'अस्तु' चा प्रकार हा बराचसा भावे- सुकथनकरांच्या इतर चित्रपटांसारखा. कथेपेक्षा व्यक्तिचित्रणाला महत्व देणारा, काहीसा अॅटमोस्फेरिक, सांकेतिक कथानक नसूनही लक्षात येण्यासारखा ग्राफ असणारा. वैचारिक चित्रपट असूनही हत्तीचा लक्षात येण्यासारखा वावर हा एक माफक वेगळेपणा. अल्झायमर झालेले प्राध्यापक ( डाॅ आगाशे) , ते हरवल्यामुळे हवालदील झालेल्या त्यांच्या मुली, आणि त्यांना त्या अवस्थेत आपलं म्हणणारं गरीब तेलुगु जोडपं यांची गोष्ट असणारा अस्तु , पालक आणि पाल्या यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न तर करतोच पण मला वाटतं त्यापलीकडे जाऊन तो ' घर ' आणि 'घरपण' याविषयी जे बोलतो ते अधिक महत्वाचं आहे.या चित्रपटात मला काही जागा गोंधळाच्या वाटल्या. प्रामुख्याने मुख्य घटनांचं एका दिवसभरात घडणं मला फार पटलं नाही. घटनांची संख्या, त्या कालावधीत नात्यांचं डेव्हलप होणं आणि समांतर घटनांच्या छायाचित्रणाच्या प्रकाशयोजनेत मला जाणवलेली इनकन्सिस्टन्सी या सार््याच बाबतीत हे एक दिवसाचं गणित विस्कळीत वाटतं. पण त्याकडे दुर्लक्ष करुनही चित्रपट मला आवडला.
महोत्सवाच्या उत्तरार्धात माझं तिकिटांचं गणित बसायला लागलं आणि चांगले चित्रपट पाहाता येण्याची शक्यताही वाढली. मला स्वतःला शक्य असूनही एका दिवसात तीनपेक्षा अधिक चित्रपट पाहायला आवडत नाहीत. अगदीच झालं तर चार, म्हणजे डोक्यावरुन पाणी. काही जण दिवसाला पाच, सहा चित्रपट लिलया पाहातात. मला ते जमत नाही. फार चित्रपट एकत्र पाहिले की त्यांना सर्वांना प्रोसेस करायला आपण डोक्यात पुरेसा वेळ देऊ शकत नाही असा माझा अनुभव आहे. त्यामुळे क्वचित अपवाद वगळता मी तीनाच्या पाढ्याला चिकटून राहातो. तसाच मी यंदाही राहिलो.
पुढले चित्रपट हे काही विशिष्ट वर्गीकरणांमधे बसण्यासारखे होते. इन हायडिंग मधल्याप्रमाणे नाही, मात्र त्याहून फार वेगळ्याही नाही, अशा राज्यकर्त्यांपुढे हतबल ठरलेल्या नागरिकांच्या कहाण्या दोन चित्रपटांत पाहायला मिळाल्या. ' विवा बेलारुस' आणि ' क्लोज्ड कर्टन'.
बेलारुस या छोट्या देशाने रशियन हुकुमशहांच्या विरोधात लोकशाहीसाठी दिलेल्या लढ्याचं सत्य घटनांवर आधारित चित्रण क्रिस्टाॅफ लुकासेविज दिग्दर्शित 'विवा बेलारुस' मधे होतं. एका पाॅप गायकाचा आवाज दाबून टाकण्यासाठी उभ्या राहिलेल्या सरकारी यंत्रणेचं भयावह दर्शन इथे होतं. बेलारूससारख्या छोट्या देशांमधले मनाला भिडणारे चित्रपट पाहाताना मला नेहमीच आपल्या मोठ्या चित्रपटसंस्कृतीच्या चालवलेल्या दुरुपयोगाविषयी राग येतो. पण याचं एक कारण नेहमीच हे असतं, की सारेच लोक चित्रपटांकडे करमणूक म्हणून पाहात नाहीत. कलाविष्कार, लोकांसमोर आपला आवाज पोचवण्याची गरज , प्रयोग अशी अनेक प्रामाणिक कारणं त्यांमागे असू शकतात जी धंद्याचा विचार आपल्या कलाकृतींच्या आड येऊ देत नाहीत. जाफर पनाहीने आपल्यावर लादलेल्या सरकारी बंदीला न जुमानता सहदिग्दर्शक काम्बोजिया पार्तोवींबरोबर गुप्तपणे आपल्या बंगलीत चित्रीत केलेला ' क्लोज्ड कर्टन' देखील असाच प्रामाणिक म्हणावासा प्रयत्न आहे.
क्लोज्ड कर्टनचं मेटाफिजिकल निवेदन हे सहजपणे काही कलाकृतींची आठवण करुन देणारं आहे. पिरान्देलोचं अजरामर नाटक ' सिक्स कॅरेक्टर्स इन सर्च आॅफ अॅन आॅथर ' , जेम्स मॅन्गोल्डचा अॅगाथा क्रिस्टी छापाच्या रहस्याला मानसशास्त्रीय रंग देणारा चित्रपट  'आयडेन्टिटी' किंवा स्टीवन किंगने आपल्याच ' द डार्क टाॅवर' मालिकेच्या उत्तरार्धात स्वतःसाठी निवडलेली भूमिका या सार््यांची आठवण तो पाहाताना होणं स्वाभाविक आहे, पण चित्रपटाचा यातल्या कशाशीही दूरान्वयानेही संबंध नाही. या चित्रपटात त्याच्या दोन्ही दिग्दर्शकांच्या भूमिका आहेत तसंच सत्य आणि प्रतिकांचा वेधक खेळही आहे. एका एकाकी बंगल्यावर लपून पटकथा लिहीणारा लेखक आणि पोलिसांपासून पळत तिथे आसरा शोधायला आलेल्या जोडप्याची रहस्यकथा इथे कधी दिग्दर्शकाच्या अस्तित्वासाठी चाललेल्या संघर्षाला येऊन भिडते हे आपल्याला कळतही नाही. आपली कला हा जगण्यामरण्याचा प्रश्न बनलेल्या या कलावंतांना आपल्यासारख्या चैनी चित्रपटउद्योगाकडे पाहाताना कसं वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
कॅन चित्रपट महोत्सवात हजेरी लावलेल्या चित्रपटांचा एक मोठा संच इथे पाहायला मिळाला. त्यात जसे उत्तम चित्रपट होते तसेच सामान्य, अपेक्षाभंग करणारे, स्टायलिश परंतू उथळ चित्रपटही होते. उत्कृष्ट प्रथम चित्रपटासाठी कॅनमधे देण्यात येणारा कॅमेरा ड'ओर पुरस्कार मिळवणारा अँथनी चेनचा 'इलो इलो' आणि ' ए सेपरेशन' साठी परभाषिक चित्रपटाचं आॅस्कर मिळवणार््या असगर फरहादीचा ' द पास्ट' हे दोन सरळच उत्तम चित्रपट होते. इलो इलो मला स्वतःला खूप आवडला तो त्यात ठेवल्या जाणार््या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींच्या अचूक तोलामुळे. सिंगापूरमधे बहुधा दोन्ही पालक ननोकर््या करतात आणि घरी मुलांना सांभाळण्यासाठी परदेशातून नोकरीसाठी बोलावलेल्या आया ठेवण्याची पध्दत आहे. ही पालकांच्या अपरोक्ष वाढणारी मुलं आणि त्यांचं विश्व इलो इलोमधे दिसतं. मात्र त्यापलीकडेही त्यात पाहाण्यासारखं खूप काही आहे. सध्याच्या घसरत्या अर्थकारणावर, आधुनिक शहरी जोडप्यांमधे दिसणार््या दुराव्यावर, निराशा आणि श्रध्दा या आपल्या आजूबाजूला नित्य असणार््या भावनांवर त्यात भाष्य आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही व्यावसायिक हिशेबात न बसणार््या एका मैत्रीची अतिशय तरल गोष्ट त्यात आहे. यातली माणसं खरीखुरी आहेत. सिंगापूरच का, आपण आपल्या आजूबाजूच्या घरांमधेही त्यांना पाहू शकतो.
फरहादीच्या सेपरेशन प्रमाणेच ' द पास्ट'  देखील घटस्फोटाभोवती फिरणारा, प्रामुख्याने दोन घरांची गोष्ट असणारा, आणि तिथल्याप्रमाणेच़ एक छोटेखानी पण मध्यवर्ती रहस्य असणारा आहे. फरक हा, की त्यातल्याप्रमाणे इथे सोशल कमेन्टरी नाही. इथलं नाट्य हे प्रामुख्याने भावनिक आणि त्या व्यक्तिंपुरतं आहे. त्यामुळे त्याचा अवाका हा काहीसा मर्यादित, या व्यक्तिरेखांपुरता आहे.
या दोघांबरोबर कॅन ग्रुपमधला थिअरी ड' पेरेटी दिग््दर्शित  ' ले अपाचिज' लक्षवेधी म्हणण्यासारखा होता. बर््याचदा छोटेखानी जीव असल्याचा आभास ठेवत चित्रपट अधिक विस्तृत आशय सांगू पाहातो, अपाचिज त्याच प्रकारचा चित्रपट आहे. श्रीमंती वीकेन्ड होम छापाच्या घरात झालेल्या चोरीभोवती गंुफलेला हा चित्रपट वर्गभेद, तरुणांमधे आलेलं वैफल्य, हिंसेचं सार्वत्रीकरण, मतलबापूरता विचार करण्याची नव्या पिढीची पध्दत अशा अनेक बाजूंनी एका विशिष्ट वर्गातल्या तरुण पिढीचं चित्र तपशीलात मांडतो. त्यात म्हणण्यासारखं रहस्य नाही वा  भाष्य करण्याचा प्रयत्न नाही, पण त्याचा सेट अप आणि शेवटाकडे चढत जाणारा प्रवास अंगावर येणारा आहे.
कॅन पॅकेजमधे मला फसवल्यासारखं वाटवून गेले ते दोन चित्रपट. मी मामीला पाहिलेला पण इफ्फीमधे असणारा पाम ड' ओर हा कॅनचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारा  'ब्लू इज द वाॅर्मेस्ट कलर' आणि वेगळ्या चित्रपटांसाठी दिल्या जाणार््या उन सर्टन रिगार्ड विभागात दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवणारा ' स्ट्रेन्जर बाय द लेक' . अनुक्रमे लेस्बिअन प्रेमकथा आणि होमोसेक्शुअल मर्डर मिस्ट्री असणार््या या दोन चित्रपटांचा भर हा मूळातच सेम सेक्स कथासूत्रांचा वापर विषयाच्या अपरिहार्यतेपेक्षा चित्रपटांना सेन्सेशनलाईज करण्यासाठी केलेला आणि अनावश्यक पोर्नोग्राफिक दृश्यांना महत्व देणारा होता. सेक्सला म्हंटलं तर स्थान कोणत्याही चित्रपटांमधे असू शकतं कारण निदान एेशी टक्के चित्रपट हे या ना त्या मार्गाने प्रेमकथा मांडतच असतात. ते त्या दृश्यांत रमत नाहीत कारण त्यांना त्यापलीकडे जाऊन गोष्ट सांगायची असते. याच न्यायाने जेव्हा एखादा चित्रपट या दृश्यांना खास महत्व देतो तेव्हा त्यांमधून तो काही निश्चित सांगू पाहात असेल अशी अपेक्षा तयार होते. ( या प्रकारची उदाहरणं आहेत. लास्ट टँगो इन पॅरीस किंवा इर्रिव्हर्सिबल सारख्या चित्रपटांमधे हा वापर काही एका अर्थाने केलेला दिसतो) या दोन्ही चित्रपटांत मला असा आशयप्रधान दृष्टीकोन दिसला नाही. ब्लू मधे या दृश्यांमधे वेळ घालवल्याने चित्रपटाची लांबी तासाभराने वाढली पण तरीही त्यातली प्रेमकथा सामान्य असूनही भावनिक परिणाम असणारी होती. त्यामुळे तुलनेने तो अधिक बरा.  स्ट्रेन्जरचा सारा भर हा इन्टरप्रिटेशनवर आहे. अर्थच काढायचा तर कोणीही कसाही काढू शकतो, त्यामुळे कौतुक करणार््यांनी त्याचंही कौतुक केलेलच आहे .मुळात ही कल्पना टाकाऊ नाही. एक तलाव, त्याच्या काठावर शरीरसंबंधांच्या आशेने जमणारी पुरुष मंडळी आणि त्यात एका सिरीअल किलरचा प्रवेश हा सेट अप चांगली गोष्ट घडवण्यासारखा आहे. मात्र चित्रपट ते न करता केवळ होमोसेक्शुअल पोर्नोग्रफीवर भर देतो. स्ट्रेन्जरची उत्तम समीक्षणं ही मला तरी कळू शकलेली नाहीत. मला तरी हा एक अत्यंत आळशी चित्रपट वाटला. आणि पोर्नोग्रफीच बघायची तर साध्या चित्रपटांचा आव कशाला. इन्टरनेटच्या कृपेने तशीही सारी दारं उघडीच आहेेत.
ताकाशी मिकेचा 'शील्ड आॅफ स्ट्राॅ' आणि बर्ट्रन्ड टॅवर्नीए चा 'क्वे ड'ओरसे' ही त्यामानाने सरळ करमणूकप्रधान चित्रपटांची उदाहरणं म्हणावी लागतील. एक अॅक्शन तर दुसरा राजकीय विनोदी. मात्र दोन्ही चांगली उदाहरणं. विशिष्ट प्रेक्षक असणारी पण तो तो प्रेक्षक खूश होईलसं पाहाणारी. 'शील्ड आॅफ स्ट्राॅ' बराचसा आपल्या 'खाकी' नामक चित्रपटासारखा. एका कैद्याला घेऊन धाडसी पोलिसांनी जिवावरच्या संकटातून केलेला प्रवास मांडणारा. पण अधिक जमलेला. नाट्य आणि अॅक्शन दोन्ही बाबतीत. 'क्वे' ची जात थोड 'येस मिनीस्टर ' प्रकारची. राजकारणातल्या विसंगतींवर बोट ठेवत केलेल्या टीकेची. पण आधी म्हणाल्याप्रमाणे दोन्ही चित्रपट रंजक. गंमत म्हणजेे टेक्निकली ' शिल्ड' देखील कॅन पॅकेजमधलाच . त्यांच्या अलीकडल्या किंचित व्यावसायिक धोरणाकडे निर्देश करणारा.
पीटर ब्रोस्नेन आणि जेसिका वुडवर्थ दिग्दर्शित 'द फिफ्थ सीझन' या बेल्जिअम फिल्मला आपण इको-हाॅरर फिल्म म्हणू शकतो. तिचं स्वरुप एखाद्या शोकांत परीकथेसारखं आहे. त्यातल्या संकटाचे तपशील, कारणं आपल्याला पुरवली जात नाहीत, पण दाखवले जातात ते परिणाम. साधारण वर्षभरात एका छोटेखानी गावाचा होणारा र््हास आपल्याला दिसतो. हे गाव केवळ प्रतिनिधी आहे. प्रत्यक्षात जगभरात हीच परिस्थिती असल्याचं चित्रपट सूचित करतो. परिस्थिती आहे ती निसर्गाने केलेल्या कोपाची. कोप सारं ओसाड करणारा. जणू माणसांचा सूड घेण्यासाठी अवतरलेला. या परिस्थितीत हसता खेळता हा गाव दिवसंदिवस खराब होत जातो. गायी दूध देत नाहीत, पीकं येत नाही, खाण्यापिण्याचं वांदे. गावाबाहेरच्या जंगलात झाडं पडायला लागतात, आणि गावातल्या तरुण प्रेमी जोडप्याचं प्रेमही दिवसेंदिवस नासत जातं. ' द व्हाईट रिबन' आणि 'विकर मॅन' या दोन चित्रपटांची आठवण इथे होणं अपरिहार्य, परंतु इथला आशय वेगळा आहे. काही चित्रपट प्रेक्षकाला आत ओढतात, तसं फिफ्थ सीझन करत नाही. त्याचा सूरच काहीसा इंपर्सनल, परका आहे. आपल्या जाणिवांपलीकडलं पण काही विशेष दाखवत असल्याचा. मात्र त्याचं सूचक भाष्य, सुंदर दृश्ययोजना, आशयाचं क्षणाक्षणाला गडद होत जाणं आपल्याला खिळवून ठेवतं.
या इफ्फीच्या निमित्ताने माझे बॅकलाॅगमधले दोन चित्रपट पाहून झाले, ते म्हणजे योजिरो ताकिताचा परभाषिक चित्रपटांचा आॅस्कर पुरस्कार मिळवणारा ' डिपार्चर्स' (२००८) आणि किआरोस्तामीचा 'क्लोज अप'(१९९०). हे तुमच्यातल्या अनेकांनी पाहिले असतील. माझ्याकडेही त्यांच्या काॅपीज होत्या. पण काही गोष्टी राहिल्या की राहातात, तसंच काहीसं. या दोघांबद्दलही खूप काही लिहीण्यासारखं, पण वेगळ्या, स्वतंत्र लेखातून.
मी असं एेकतो की यंदाचा इफ्फी नेहमीइतका चांगला नव्हता. कदाचित त्यात तथ्या असेल, किंवा कदाचित नसेल. महोत्सवात नेहमीच चांगले चित्रपट मूठभर आणि मध्यम चित्रपटांचा भरणा अशी परिस्थिती असते. सगळंच भारी पाहयला मिळेल या अपेक्षेतच तथ्य नाही. असो, माझ्यापुरता तरी हा महोत्सव असा होता, आणि तो न चुकवल्याचा मला आनंद आहे.
- गणेश मतकरी 

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP