सिनेमाचा पडदा- मोठा आणि छोटा

>> Tuesday, December 17, 2013



सिनेमा कसा मोठ्या पडद्यावरच पाहिला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही ! हे वाक्य मी किती वेळा एेकलं असेल त्याला गणतीच नाही.
या वाक्यात तथ्य नाही, असं मी म्हणणार नाही. नसेल कसं, चित्रपट हा जर मुळात मोठा पडदा विचारात घेऊन केलेली कलाकृती असेल,  तर ती त्या फाॅरमॅटमधे पाहायला मिळावी, यात गैर ते काय? मात्र ती तशी पाहायला मिळणं हा चित्रपट पाहाण्या नं पाहाण्याचा एकमेव निकष होऊ शकतो का, हा खरा अधिक महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
आपली मूळ परंपरा आहे, ती लोकप्रिय व्यावसायिक सिनेमाची. ज्यात विचाराचं स्थान दुय्यम आणि करमणूक सर्वात महत्वाची. सत्तर एेशीच्या दशकात समांतर चित्रपटांनी डोकं वर काढलं, आणि काही एका प्रमाणात स्वतःची जागा तयार केली, केवळ स्वप्नरंजनात न रमणारा अमुक एक प्रेक्षकवर्ग तयार केला, पण तो तेवढ्यापुरता.  यथावकाश टिव्ही रंगीत होणं, अधिक चॅनल्स सुरू होणं यासारख्या  गोष्टींनी तोही मागे पडत गेला. टिकला तो भव्य अनुभव देणारा छानछोकीचा  सिनेमा. आपल्याला स्वप्न दाखवूनही आपल्या आयुष्याशी तसा संबंध नसलेला, आलिप्त सिनेमा.
हे केवळ हिंदी, मराठी आणि बर््याच प्रमाणात प्रादेशिक चित्रपटांचच झालं असं नाही, तर आपल्याकडे येणार््या परदेशी चित्रपटांचही झालं. एकतर आपल्याकडे परदेशातून येणारा चित्रपट म्हणजे मुख्यतः इंग्रजी. हाॅलिवुड किंवा क्वचित ब्रिटिश. आपल्या प्रेक्षकाने रुढ केलेल्या लोकप्रिय चित्रपटांना डोक्यावर घेऊन आशयघन चित्रपटांना बाजूला ठेवण्याच्या परंपरेला अनुसरूनच वितरकांनी या चित्रपटांच्या आयातीचे नियमही ठरवले. त्यानुसार ब्लाॅकबस्टर वर्गातले, मोठे नायक/नायिका असणारे, नेत्रदीपक दृश्यमांडणी असणारे चित्रपटच आपल्याकडे यायला लागले.  काही नवं देण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकन इंडिपेन्डन्ट सिनेमा मधले किंवा कर्तबगार पण आपल्याकडे माहीत नसलेल््या दिग्दर्शकांचे चित्रपट आपल्याकडे येत नाहीत कारण ते पाहिले जातील असा वितरकांना विश्वास नाही. स्टीवन स्पीलबर्गसारख्या लोकप्रिय दिग्दर्शकाचा चित्रपट येईल पण रिचर्ड लिन्कलेटरचे मिनिमलीस्ट चित्रपट येणार नाही, सुपरहिरो/ थ्रिलर्स यांसारखे हमखास धंदा करणारे चित्रप्रकार येतील पण निवेदनात वा रचनेत प्रयोग करणारा, विषयाच्या निवडीत वेगळेपणा असणारा चित्रपट येणार नाही. थोडक्यात आपल्याकडे  मोठ्या पडद्यावर दिसणारा चित्रपट चांगला असो वा वाईट, तो एका विशिष्ट जातकुळीचा असणार हे नक्की. ( याला अपवाद आहेत. प्रामुख्याने चित्रपट महोत्सव वा फिल्म सोसायट्यांमधून पाहायला मिळणारा सिनेमा, इत्यादी, मात्र ते अपवादच, नियम नव्हेत). मग अशा परिस्थितीत, ज्यांना या विषयात खरोखरच रस आहे, त्यांनी केवळ मोठ्या पडद्यावर दिसेल तेच पाहावं असं म्हणणं हे अर्थहीन आहे.
याचं सोपं कारण असं की व्यावसायिक चित्रकर्ते आणि प्रेक्षक हे कायम एका व्हिश्यस सर्कलमधे अडकलेले असतात. चित्रकर्ते  / वितरक आव आणतात की प्रेक्षकांकडून विशिष्ट प्रकारच्या चित्रपटाला असलेली मागणीच त्यांनी तसे चित्रपट बनवण्याला, वितरीत करण्याला उद्यूक्त करते, कारणीभूत ठरते, मात्र प्रेक्षकांना जर या एकाच प्रकारचे चित्रपट पाहायला मिळत असतील तर ते तरी वेगळ्या प्रकारची मागणी कशी करणार?
यावर उपाय हाच, की प्रेक्षकांनी मोह हा मोठ्या पडद्याचा न ठेवता, चित्रपटांपासून त्यांना काय मिळतं याचा ठेवायला हवा. काही वेगळं पाहाण्याची सवय जाणूनबुजून लावून घ्यायला हवी.  आजवर आपल्यापासून अधिकृतपणे दूर राहिलेला सिनेमा पाहाण्याचा प्रयत्न करायला हवा.माझ्या मते जर आपल्या चित्रपटांमधे पुढेमागे काही दर्जात्मक बदल व्हावा असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असेल तर हा आपल्यापासून दडलेला, आपल्याला नियमितपणे पाहायला न मिळणारा चित्रपट आपल्यापर्यंत पोचणं हे सर्वात अधिक महत्वाचं आहे.
प्रेक्षकांना वेगळ्या चित्रपटाचं मिळणारं एक्स्पोजर, त्यांच्या आवडीनिवडीत अधिक प्रगल्भ करु शकते, त्यांच्या चित्रपटापासून असलेल्या अपेक्षा रुंदावू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या काही वर्षांमधे प्रामुख्याने मल्टीप्लेक्सच्या आणि काहीशा मर्यादित प्रेक्षकवर्गासाठी तयार होणारा ,डोक्यावर लेबल नसूनही समांतर चित्रपटांच्याच जवळ जाणारा आपल्याकडला नवा सिनेमा. आता जर चित्रकर्ते आणि प्रेक्षक एका दुष्टचक्रात अडकले आहेत असं म्हंटलं तर मग हा सिनेमा आला कुठून ? तो केला कोणी आणि त्यासाठी प्रेक्षक तयार कसा झाला ?
याचं उत्तर सोपं आहे. चित्रपट तयार केला तो त्याच साच्यातल्या व्यावसायिकतेला कंटाळलेल्या दिग्दर्शकांच्या नव्या पिढीने आणि त्याचं स्वागत केलं ते गेल्या पंधरा वीस वर्षात आपल्या चित्रपटापलीकडे वेगळं काही आहे याची जाणीव व्हायला लागलेल्या प्रेक्षकाने. ही जाणीव करुन दिली ती वेगवेगळ्या मार्गांनी आपल्यापर्यंत पोचलेल्या जगभरातल्या चित्रपटांनी. त्यातले काही वैध तर काही अवैध. टिव्हीवर नव्वदीत सुरू झालेले मुव्ही चॅनल्स आणि त्यांच्या आसपास प्रचंड प्रमाणात डोकं वर काढलेली डिव्हीडी पायरसी या दोघांचा यात प्रमुख हात होता.
आपल्या चित्रपटांकडून 'पैसा वसूल' करुन घ्यायचा तर चित्रपटात सारंच काही हवं असा एक अलिखित नियम आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटांचं दुसरं नाव मसाला फिल्म्स हेच आहे. आता मसाला  म्हणजे काय तर सारंच. करमणूक या शब्दाखाली जे जे येऊ शकतं ते सारं या चित्रपटांमधे यायला हवं अशी कल्पना होती. यात फॅमिली ड्रामा पासून गुन्हेगारीपर्यंत आणि नाचगाण्यापासून मारामारीपर्यंत सारं काही आलं. प्रेक्षक बदलायचा तर या पैसे वसूलीच्या कल्पना बदलणं पहिल्यांदा आवश्यक होतं. पारंपारिक कल्पनांंना जपणारे आपले दिग्दर्शक तर पहिलं पाउल उचलणं शक्य नव्हतं, तर ते उचललं गेलं , ते मुव्ही चॅनल्स वर सतत दिसणार््या सर्व प्रकारच्या चित्रपटांमधून आणि पायरसीतून हळूहळू घराघरात पोचलेल्या जागतिक सिनेमातून. चॅनल्सचा पहिला प्रेफरन्स होता, तो उघडच मल्टीस्टारर, ब्लाॅकबस्टर चित्रपटांना. मात्र चॅनल्सचं आर्थिक गणित चालवायचं तर सर्वच प्रकारचे चित्रपट दाखवणं त्यांनाही भाग होतं. यातून प्रेक्षक अशा चित्रपटांपर्यंत पोचला, जो पाहाण्यासाठी तो मुद्दाम पैसे खर्चून थिएटरमधे गेला असता का, कुणास ठाऊक, पण घरबसल्या हा चित्रपट पाहून घेण्याची त्याची तयारी होती. या खुल्या झालेल्या नव्या दालनात त्याला अनेक चित्रपट सापडले, ज्यातून त्याचा चित्रपटांकडे पाहाण्याचा मर्यादित दृष्टिकोन विस्तारायला लागला.
एकीकडे हे सुरू असताना डिव्हिडी पायरसीने, जी पुढे फाॅर्म बदलून इन्टरनेटवर सुरू राहिली, जागतिक सिनेमा फॅशनेबल केला. पूर्वी फिल्म सोसायट्यांनी चालवलेल्या कामाला, त्यांनी आखलेल्या मार्गावर नाही, तरी बूस्ट मिळाला. फेलिनी, कुराेसावा, जाॅन फोर्ड, किसलोव्स्की ही नावं चोप्रा, कपूर, सिप्पी, भंसाळीच्या जिव्हाळ्याने घेतली जायला लागली. ही लोकप्रियता इतकी वाढली की जागतिक सिनेमाला वाहिलेले चॅनल्स आणि अधिकृतपणे डिव्हिडी रिलीजही काही प्रमाणात सुरु झाले.तरी मोठी अडचण होती, ती म्हणजे या नवरसिकांना दिशा मिळण्याची. आता प्रश्न पूर्वीपेक्षा उलट झाला होता. पूर्वी काहीच उपलब्ध नसल्याने काय पाहावं कसं पाहावं कळत नसे, आता सारंच उपलब्ध असल्यानेही एका परीने तीच परिस्थिती उद्भवली. तरीही एक झालंच. फिल्म सोसायट्यांचा काही दिग्दर्शकांवरचा, विशिष्ट प्रकारच्या सिनेमावरचा फोकस या नव्या मार्केटमुळे मोकळा झाला. आजवरची पारंपारिक लोकप्रियतेची व्याख्या बदलायला लागली. वेगळं काही पाहाण्याची मानसिक तयारी झाली. यामुळे नव्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपटांमधे होणारा  बदल लोकांपर्यंत पोचण्याची, नवा सिनेमा रुजण्याची शक्यता तयार झाली.
अनुराग कश्यपचा पाँच बनला तेव्हा कोणाचीच काही वेगळं पाहाण्याची फार तयारी नव्हती. सेन्साॅर बोर्डही त्यातल्या हिंसक दृश्यांना आणि शिवराळ भाषेला बिचकलं आणि चित्रपट बॅन करुन टाकला. तो पुढे बॅन्डच राहिला. कालांतराने तो (बहुधा दिग्दर्शकाच्या आशिर्वादानेच) इन्टरनेटवर पोचला आणि त्यामार्गाने आज तो पाहायला मिळू शकतो. ( आणि त्याच मार्गाने, मोठ्या पडद्याच्या प्रतिक्षेतल्यांसाठी हा चित्रपट नाही. ) त्याचा दुसरा वेगळा प्रयत्न, म्हणजे मुंबई बाॅम्ब स्फोटांवर  बेतलेल्या लेखमालेवर आधारीत ' ब्लॅक फ्रायडे' देखील खटला न्यायप्रविष्ट असल्याने काही काळ बॅन्ड राहिला. कश्यपला खरा सूर सापडला तो देवदासची  आधुनिक आवृत्ती असलेल्या 'देव डी' पासून, आाणि या चित्रपटाला प्रेक्षक असल्याचही तिथेच सिध्द झालं.
आज या प्रकारचा आशय आणि तंत्रात प्रयोग करणारा सिनेमा अनेक दिग्दर्शक बनवताना दिसताहेत. रजत कपूर ( रघू रोमिओ, मिक्स्ड डबल्स, मिथ्या) , दिबाकर बॅनर्जी ( खोसला का घोसला, लव्ह, सेक्स और धोखा) , रीमा कागती ( हनीमून ट्रॅवल्स प्रायव्हेट लिमिटेड, तलाश), किरण राव ( धोबी घाट), विक्रमादित्य मोटवानी ( उडान), बिजाॅय नाम्बियार ( शैतान) , आनंद गांधी ( शिप आॅफ थिसिअस),  रितेश बत्रा ( द लन्चबाॅक्स) अशी अनेक नावं आज आपल्याला पाहायला मिळतात. या नावांना आज काम करणं, यशस्वी होणं शक्य झालं याला मोठ्या पडद्याइतकाच छोटा पडदाही जबाबदार आहे. मात्र त्यांनी आपलं काम सुरु ठेवावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण शक्य तेव्हा ते मोठ्या पडद्यावर पाहाणं आवश्यक हेही तितकच खरं.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP