धूम ३- देखणा बुध्दीभ्रष्ट आविष्कार
>> Sunday, December 22, 2013
हल्ली व्यावसायिक हिंदी चित्रपट पाहताना मी स्वत:ला एक प्रश्न नेहमी विचारुन बघतो, की या चित्रपटांकडे पाहाताना बर््या-वाईटाचा निकष काय असावा? म्हणजे असं तर नाही, की केवळ हाॅलिवुडच्या ग्लॅमरखाली येऊन आपण एकाच प्रकारचा मसाला तिथे चालवून घेतो आणि बिचार््या बाॅ़लिवुडमधे त्यावरच आक्षेप घेतो? नायकाची अविश्वसनीय कामगिरी, अशक्य भासणारे स्टंट्स हे आपल्याला तिथे चालतं मग इथे का नाही?
यावर उत्तर आहे ते हे, की प्रेक्षकाकडून अपेक्षित असणार््या विलिंग सस्पेन्शन आॅफ डिसबिलीफचा , किंवा दुसर््या शब्दात सांगायचं तर प्रेक्षकाला काय पटू शकतं याचा हाॅलिवूडने चांगला अभ्यास केला आहे. त्यासाठी चित्रपटात घडणार््या लार्जर दॅन लाईफ घटनांना ते त्या चित्रपटाच्या चौकटीपुरतं तर्कशास्त्र आणून देऊ शकतात. 'डाय हार्ड' मधे इमारतभर पसरलेल्या खलनायकांना तोंड देणारा जाॅन मॅक्लेन हा सतत वल्नरेबल वाटत राहातो, 'मेट्रिक्स'मधे ट्रिनिटीने दोन मिनीटात हेलिकाॅप्टर शिकणं चित्रपटात गुंफलेल्या संगणकीय परिभाषेतून शक्य होतं, 'ग्रॅव्हिटी'मधे अंतरिक्षात भरकटणार््या डाॅ. रायन स्टोनला खाली आणताना मदत होते ती अनुभवी मॅट कोवाल्स्कीच्या प्रत्यक्ष आणि मानसिक आधाराची. हे सारं प्रत्यक्ष घडू शकणार नाही हे माहित असून चित्रपटांनी पुरवलेल्या लाॅजिकच्या सोबतीने प्रेक्षक तेवढ्यापुरतं ते पटण्याजोगं मानू शकतो. हिंदी चित्रपट ते करु पाहात नाहीत. त्यांचा भव्यतेवर विश्वास आहे, पण तिला तेवढ्यापुरतं का होईना शक्य कोटीचं कोंदण चढवण्यावर नाही. यामुळेच बरेचसे हिंदी चित्रपट हे आपल्याला उत्तम दृश्य दाखवतात मात्र त्याप्रसंगाशी समरस होऊ देत नाहीत. कथानकापेक्षा दूर ठेवतात, या व्यक्तिरेखांपर्यंत पोचू देत नाहीत. धूमचा तिसरा भाग याच परंपरेत मोडतो. तो आपल्याला छायाचित्रणातलं, स्टंट्समधलं कसब दाखवतो, पण त्यामागचं तर्कशास्त्र स्पष्ट न केल्याने कथानकात आेढू शकत नाही.
बहुतेक चित्रपटात हा गोंधळ सामान्यत: पटकथेपासून सुरू होतो, जसा तो इथेही होतो. याचं एक कारण आहे आपला स्वत:च्या सर्जनशीलतेवर नसणारा विश्वास. आपण जेव्हा स्वतंत्रपणे काही लिहायला घेतो, तेव्हा त्याचं लाॅजिक हे आपसूक डेव्हलप होत जातं. याउलट जेव्हा आपण अमूक चित्रपटातल्या कल्पना छान आहेत आणि त्या घेऊन आपण चित्रपट बनवू अशी सुरुवात करतो, तेव्हा उरते ती कारागिरी. ( ही कारागिरीही उत्तम रितीने करणारे लोक आहेत. धूम मालिकेचा लेखक आणि या भागाचा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य मात्र त्यातला नाही) धूमचे सर्व भाग हे अक्षरश: शेकडो चित्रपटीय संदर्भांची कोलाजेस आहेत. यातले काही संदर्भ अधिक ठाम, पटकथेला दिशा देणारे आहेत, काही निव्वळ दृश्य संदर्भ आहेत, तर काही इन जोक्स. पण ते संदर्भ सुटे जाणवत राहातात, चित्रपटात एकजीव होत नाहीत.
धूम ३ ला महत्वाचे , कथेसाठी दिशादर्शक संदर्भ आहेत ते दोन, क्रिस्टफर नोलनचा दोन जादूगारांमधल्या वैराविषयी असणारा कल्ट फेवरिट चित्रपट ' द प्रेस्टिज आणि ' थ्री. . एक्स्ट्रीम्स' या हाॅरर अॅन्थोलाॅजीमधली कोरिअन दिग्दर्शक ताकाशी मिकेची गोष्ट ' बाॅक्स'. जिज्ञासूंनी हे दोन्ही चित्रपट पाहावेत जे यातल्या (कधीकधी) जादूगार असलेल्या आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी जोडलेले आहेत. त्याहून अधिक इथे लिहीणं, चित्रपटातला ट्विस्ट शाबूत ठेवायचा तर शक्य होणार नाही. मात्र मला वैयक्तिक रित्या या रहस्याचं इथलं प्रत्यारोपण क्षणिक प्रभाव साधूनही अंतिमत: फसल्यासारखं वाटलं , एवढंच नोंदवतो.
'धूम ३' हा धूम मालिकेचा भाग का आहे याबद्दल मला काही मूलभूत शंका आहेत. सामान्यत: मालिका तरतात त्या प्रोटॅगाॅनिस्टच्या जीवावर. अभिनेता म्हणून वा व्यक्तिरेखा म्हणून. धूम मालिका तरते, ती दर भागात वेगळ्या असणार््या खलनायकांच्या जोरावर. तीन भागात अनुक्रमे जाॅन एब्राहम, ह्रृतिक रोशन आणि आता आमिर खान यांच्या व्यक्तिरेखांनी ही मालिका चालवलेली आहे. पहिल्या भागात खलनायकाइतकीच महत्वाची असणारी पोलिस अधिकारी जय ( बच्चन) आणि त्याचा विनोदी साईडकिक अली ( चोप्रा) ही कॅरेक्टर्स दिवसेंदिवस कमी कमी महत्वाची होत चालली आहेत. (हीच गत रहिली तर 'ओम शांती ओम' मधल्या डमी ट्रेलरच्या भविष्याप्रमाणे धूम ५ पर्यंत 'धिस टाईम, ही इज नाॅट इन द फिल्म' असं म्हणायची पाळी बच्चनवर नक्कीच येईल. चोप्राला घरचंच प्रोडक्शन असल्याने ती भिती नाही.) असो , इथेही, ही दोघं असून नसल्यासारखीच आहेत. इथे खानची व्यक्तिरेखा खरं तर नायक ( किंवा अँटीहिरो म्हणू हवं तर) आहे, आणि त्याला सोडून कोणालाच वाव नाही. त्यामुळे हा चित्रपट स्वतंत्रही होऊ शकला असता. केवळ मालिकेची लोकप्रियता पाहून त्याला इथे जागा तयार करण्यात आली असावी.
धूम सुरू होतो शिकागोमधे , साहीर ( आमिर खान) या व्यक्तिरेखेच्या भूतकाळाची एक झलक दाखवून. त्याच्या वडिलांची सर्कस ( जिला सर्कस का म्हणावं हा संशोधनाचा भाग आहे !) बंद पाडून त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरणार््या बँके विरोधात साहीर एक लूटालूट मोहीम उभारतो. त्यांचे पैसे चोरतो किंवा रस्त्यावर उधळतो आणि सर्वांसमक्ष भर रस्त्यावरुन पळ काढतो. हे सुरु असताना, म्हणजे तो स्कायस्क्रेपरच्या भिंतीवरुन ( 'एम आय ४' मधल्या टाॅम क्रूजसारखा) उभा धावत येत असताना वा रस्त्यावर उतरताना वा दोरावरुन बाईक चालवण्यासारखे स्टंट करताना , कोणीही त्याला मोबाईल कॅमेरा अथवा नाॅर्मल कॅमेरावर शूट करत नाही. त्यामुळे पोलिसांना ही अज्ञात व्यक्ती कोण, हे अजिबातच कळत नाही.
मग काही अगम्य कारणासाठी मुंबईहू जय आणि अलीला या केससाठी बोलावलं जातं . (असा प्रवाद आहे, की चोराने हिंदीत लिहीलेला मेसेज वाचण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. पण खरं तर तितपतही कारण चित्रपटात दिलेलं नाही. बोलावतात, कारण पटकथेची सोय. ) यानंतर जय गुन्हेगाराला पकडण्यासाठी करतो काय तर टिव्हीवर मुलाखत देतो आणि चोर कसा सामान्य आहे हे सांगतो. मग साहीर लगेच त्याचं आव्हान स्वीकारतो आणि त्याच्यावर कुरघोडी करायचं ठरवतो. मध्यंतरी साहीर आपल्या वडिलांची सर्कसही सुरू करतो आणि अालिया नामक मुलीला ( कटरीना) त्यात मध्यवर्ती भूमिका देऊ करतो.
अॅरिस्टाॅटलच्या काव्यशास्त्राप्रमाणे प्रत्येक कथेला सुरूवात, मध्य आणि शेवट असतो किंवा असावा. धूमचा मुख्य प्राॅबलेम हा की त्याला फक्त मध्यच आहे. सेट अप आणि कन्क्लूजन या दोन्ही गोष्टी बर््यापैकी दुर्लक्षित आहेत. चित्रपटाला जो चढता ग्राफ हवा तो इथे दिसत नाही. नाही म्हणायला इन्टरवल पाॅईंटला रहस्याचा उलगडा आणि बरीच स्पष्टीकरणं दिली जातात, पण तो भाग तुकड्यासारखा वाटतो. त्याआधी आणि नंतर गतीत काही फरक पडत नाही. साहीरची व्यक्तिरेखा जरातरी आगापिछा घेऊन येते. पण जय आणि अली मागील चित्रपटावरुन चालू असल्यासारखे येतात. ते कोण आहेत, ते असे असे का वागतात, त्यांची मोटीव्हेशन्स, हे नव्या प्रेक्षकाला सांगायला नको का? केवळ अॅक्शन वा विनोद, हे कॅरेक्टर डेल्हलपमेन्टची जागा कसे घेतील? आणि आलियाही केवळ व्हिजुअल रिलीफ म्हणून येते. यात आमिर खान सोडता इतर कोणाची छाप पडत नाही हे खरं, पण छाप पडायची, तर त्यांच्या भूमिका लिहायला नकोत का? अभिनेते, जे द्याल ते करणार. काही दिलंच नाही तर ते करणार काय?
धूम मधल्या बँक राॅबरीज हा एक खूपच विनोदी प्रकार आहे. त्या कशा होतात , योजना काय असते, काय अडचणी येतात, यातलं काही काही कळत नाही. आकाशातून पैशांचा पाऊस पडतो ( 'नाउ यू सी मी' मधल्यासारखा) मग साहीर कुठेतरी पळताना दिसतो, मग सगळे आपापल्या बाईक्स आणि गाड्या काढतात आणि चकरा मारत सुटतात. मग कधीतरी बँकेच्या आत सेफ डिपाॅझिट लाॅकर्स वर लिहीलेला संदेश दाखवला जातो. आता याबद्दल प्रश्न अनेक. साहीरला बँकेच डिटेल्स कसे मिळाले? तो आत कसा शिरला? बाहेर कसा पडला? पैसे असणारी सेफ ते गच्ची यांमधे काय अंतर आहे? ते पार कसं केलं? पैसे वार््यावर कसे उधळले गेले? लाॅकर्स फोडून त्यावर मेसेज लिहिताना आवाज झाला नाही का? झाला तेव्हा सिक्युरिटी गार्ड झोपले होते का?
चांगले बँक दरोडे , चोर््या यांची चित्रपटात उदाहरणं कमी नाहीत. इनसाईड मॅन, द बँक जाॅब, थाॅमस क्राऊन अफेअर, नाउ यू सी मी अशी कितीतरी उदाहरणं गेल्या दहा पंधरा वर्षातच पाहाता येतील. आणि दिग्दर्शकाने ती पाहिली असतीलच. मात्र त्यांच्याकडून वरवरचा लुक आणि फील उचलण्यापेक्षा त्यांची रचना , त्यात गेलेला तपशील हे दिग्दर्शकाने पाहायला हवं होतं. अगदी फरहान अख्तरच्या डाॅन टू मधला बँक दरोडाही याहून तर्कशुध्द होता. आमिर खानने म्हणे कुठेसं म्हंटलय की त्याने हा सिनेमा स्क्रिप्टसाठी केला. त्याने या वाक्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं तर उत्तम होईल. माझ्या मते, त्याला संहिता चांगली, म्हणजे व्यक्तिश: त्याला काहीतरी करायला वाव देणारी असं म्हणायचं असावं. बहुधा मंगल पांडे आणि गजनीच्या संहिताही त्याला अशाच आवडल्या असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.
चेज हा प्रकार इनोव्हेटीव आणि मोनोटोनस या दोन्ही प्रकारे करता येतो. परवाच मी पीटर जॅक्सनच्या द हाॅबिट मालिकेच्या दुसर््या भागात एक अफलातून पाठलाग पाहिला. एल्व्ह्जच्या राज्यातून पिंपात बसून नदीच्या पात्रामार्गे पळणारी थाॅरीनची ड्वार्फ टीम, त्यांच्या मागावर जमिनीवरून पळणारे आॅर्क्स आणि त्यांना संपवायला आलेले लेगोलास आणि तोरिएल हे एल्व्ह्ज यांच्यात काय काय परम्युटेशन्स काॅम्बिनेशन्स करता येतील याचा इतका विचार या पाठलागात होता, की चित्रीकरण सोडा, याचं वर्कींग तरी कसं केलं असेल अशा विचारात पाहाणारा पडावा. धूममधले पाठलाग हे एकदा त्यांच्या सुंदर बाईक्सची सवय झाली की कंटाळवाणे होतात. तेच स्लो मोशन, तसंच गाड्यांखालून स्लाईड करणं, तसंच मागच्या चाकावर गाडी उचलणं आणि कधी हवेत उडवणं. संपलं. नाही म्हणायला साहीरची बाईक मधेच बाँड ते बॅटमॅन परंपरेप्रमाणे काय काय वेषांतर करते, तेवढाच वेगळेपणा. बाकी दोघांच्या बाईक्स त्यांच्या भूमिकांप्रमाणेच नावाला आहेत.
सध्या आपला सिनेमा एका स्थित्यंतरातून जातोय. तांत्रिक दृष्ट्या तो खूप चांगला आहे आणि दिवसेंदिवस अधिक चांगला होतो आहे. नवनवे कॅमेरे आणि एकूणच तंत्रज्ञान आपल्याकडे येतय, ते कसं वापरायचं हे जाणणारे तंत्रज्ञ आपल्याकडे आहेत. चित्रीकरणापासून प्रोजेक्शन पर्यंत जागतिक स्टँडर्ड्सना आपण पोचावं यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण हाच उत्साह आशयाच्या पातळीवर काही नवं , स्वतंत्र सोडा पण चांगलं तर्कशुध्द करण्यातही दिसून येत नाही . तंत्रज्ञान आवश्यक आहेच आणि या घडीला आपण त्या पातळीवर सेफ आहोत. धोका आहे तो आशयात वाढत चाललेल्या मिडिओक्रिटीमुळे.
चांगला सिनेमा म्हणजे मोठं बजेट नाही. स्टार्स नाहीत. स्टन्ट्स नाहीत. अद्ययावत कॅमेरे नाहीत. स्टेट आॅफ द आर्ट स्पेशल इफेक्ट्स नाहीत. तो या सार््याच्या पलीकडे कुठेेतरी असतो. त्याला निश्चितच या सार््याची मदत होते आणि त्याचा परिणाम कितीतरी वाढू शकतो. मात्र आशयाच्या पातळीवर कमकुवत असणारा सिनेमा, त्यात बाकीचा मसाला कितीही घालून सुधारु शकत नाही. धूम मालिका आणि आपला बराच बाॅलिवुड सिनेमा याच फेर््यात अडकलेला आहे. तो त्यातून सुटावा अशी आपण आशा बाळगू शकतो, मात्र सुटेल याची खात्री बाळगू शकत नाही.
- ganesh matkari
15 comments:
नेहमीप्रमाणेच अतिशय जबरदस्त लिहिलंय!!
Baap re.......:))
१००% सहमत. मस्त परीक्षण!
सगळ्या चुका पकडल्या.. सिनेमा कसा असू नये याचे चांगले उदाहरण आहे.
वाईट या गोष्टीच वाटतय की चीत्रकर्त्यांनी निर्मितीवर मेहनत घेतलीये हे कळतंय.. आणि त्यामुळेच सिनेमाची जी यथेच्छ धुलाई करायची होती ती करता येत नाहीये. जर मला त्याच्या निर्मितीमुल्यांबाबत सहानुभूती नसती तर या सिनेमाच्या मधून उठून जाऊन याची अवहेलना केली असती.
आमीर खान सारखा नटही चुकीचे सिनेमे करून त्याची पाठराखण पण करतो आणि प्रेक्षकांना निर्लज्जपणे सिनेमा पाहण्याचे आवाहन करतो? डोक्यावर पडलाय का तो?
असे सिनेमे जागतिक स्तरावर पाहिले गेले तर भारतीय सिनेमाबाबत किती घाणेरडी मते तयार होतील याचा थोडासुद्धा विचार करू नये?
मस्तच... :) :)
Hello Ganesh,
Good blog. I willl not watch the movie. Did not intend to watch it either earlier. :).
It is difficult to read your blog posts because the fonts are not rendered properly. I have checked in Mozilla, IE and Safari. Doesn't look like browser issue. Can you please check?
Thanks,
Ranjan
अगदी..अगदी, एकदम पटलं. अलिकडे बहुतांशी भर सिनेमा चकाचक बनवण्यावर असतो. तो परिपुर्ण बनवण्यापेक्षा फ़क्त शोशागिरीच जास्त होते.
नमस्कार,
आपला लेख आवडला. सुंदर लेखनशैली. असेच लिहित राहा. आपले लिखाण आपण मराठी कॉर्नरच्या सभासदांशी देखिल share करू शकता . मराठी कॉर्नरच्या वतिने हे आमंत्रण स्विकारावे.
- मराठी कॉर्नर टिम
http://www.marathicorner.com/
चांगला सिनेमा म्हणजे मोठं बजेट नाही. स्टार्स नाहीत. स्टन्ट्स नाहीत. अद्ययावत कॅमेरे नाहीत. स्टेट आॅफ द आर्ट स्पेशल इफेक्ट्स नाहीत. तो या सार््याच्या पलीकडे कुठेेतरी असतो.
1 no.
I am not agreeing with your review. Though there is some non logic in the movie. But it also happened in Hollywood movies. Your review is your expectation from movie. Not the review of actual movie. It is better to review whatever shown in Dhoom 3 is performed well by actors & technicians or not.
I am wondering why all critics finding logic in every scene of Dhoom 3 instead of just watching film as commercial bollywood film. It requires a lot of risk, pain and extreme hard work to create a big budget movie like Dhoom 3. May be it lacks logic, after all moviegoers don’t go to multiplexes to attend a physics class to analyse if everything is correct and logical. Entertainment is the sole purpose because people want full value for their money.
Regarding script selection of Aamir Khan
Aamir Khan has the right & freedom to play any role in a any commercial movie. Film after film, Aamir Khan proved that not only he is best actor in bollywood today but bankable superstars. Every time we cannot expect from him to do logical & meaningful movies.
Thanks all,
Priyadarshan, actually, I am too unfamiliar with these technicalities as a friend of mine actually deals with the blog. I will bring your comment to his notice.
Marathi Corner,
Like mentioned above, I will bring your comment to the notice of the responsible person.
Hitesh,
You are free to disagree with anything and everything. it is ,after all , a personal opinion, just like what you mention is your personal opinion. however, let me bring some points to your notice.
1. I have mentioned how logic gaps are supported in Hollywood. There has to be that effort. Just saying we won't do it makes no sense. not only in films, but in other cases like comics, see the effort put in. The entire mythology of a popular icon like superman is supporting the impossibilities of the stories. they don't just say he can do everything, and keep quite about it. there will be no story in that case.
2. I am looking at it as a commercial film and not as art film. I have also mentioned that I liked Dhoom 1 which also had immense problems if one looks at it realistically but it was possible to ignore and achieve a willing suspension of disbelief.
3. Big budget does not justify a bad film. bad film is a bad film no matter how much it costs and good film is good no matter how cheaply produced.
4. Objection is not for his taking stupid scripts but to our assumption that he is better than others. He is no better or worse than SRK or Saif or Ajay Deogan . Just that he has created an aura of perfection around him. he has done many average, ordinary and terrible films like all the others. And obviously he is bankable. Hasn't he fooled all of the people all of the time?
Hi Ganesh,
I am regular reader if your blog. I want to request you to write an article on movies that are screening in PIFF. i.e. which movies will worth to see.
"…तो त्यातून सुटावा अशी आपण आशा बाळगू शकतो, मात्र सुटेल याची खात्री बाळगू शकत नाही." खरंय, खरंय.
मायबोलीवर आपल्या या ब्लॉग चा दुवा मिळाला. परिक्षण वाचले, आवडलेही तेच सांगण्यासाठी हा प्रतिसाद. या चित्रपटाच्या वाटेला जाणार नाही.
बाकीही तुमचा पूर्ण ब्लॉग वाचून काढला त्यामध्ये सगळ्यात जास्त आवडलेले परिक्षण म्हणजे बिफोर मिड्नाइट . त्यादिवशीच रोमेडी नाऊ वाहिनीवर बिफोर सनराइज सिनेमाची जाहिरात बघितली . आवर्जून सिनेमा बघितला आणि त्या चित्रत्रयीही नेटवर बघितल्या. तीनही चित्रपट फार आवडले.
धन्यवाद एका सुंदर चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
Post a Comment