थप्पड - नोराच्या लेकीची गोष्ट
>> Tuesday, March 3, 2020
इब्सेनने ‘अ डाॅल्स हाउस’ हे नाटक लिहिलं १८७९ मधे, पण दुर्दैवाची गोष्ट ही, की ते काही केल्या जुनंच होत नाही. नाटकाच्या अखेरीला भ्रमनिरास झालेल्या नोराने घर सोडून जाताना धाडकन आपटलेल्या दाराचे पडसाद आधी युरोपभर आणि मग जगभर उमटले असले, आणि त्यातला संदेश हा स्पष्ट असला, तरी आजही बहुसंख्य घरांमधे स्त्रीयांना गृहीत धरलं जाणं , हा जीवनशैलीचाच एक भाग बनून गेलेला आहे. त्यांची भूमिका ही पतीच्या तुलनेत दुय्यम आहे, तो मिळवता पण घराची देखभाल करणं ही प्रामुख्याने पत्नीची जबाबदारी आहे,मग ती स्वत: शिकलेली , करीअर करणारी असली तरीही, हा सुखी संसारांच्या गृहीतकाचाच एक भाग मानला जातो. ही परंपरागत शिकवण एव्हाना कधीच कालबाह्य व्हायला हवी होती, पण ती झालेली नाही, निदान पुरेशा प्रमाणात झालेली नाही, हेच आपण आजूबाजूला पाहू शकतो. अनुभव सिन्हा च्या ‘थप्पड’ चित्रपटाचं सत्यही याहून वेगळं नाही.
‘थप्पड’मधली ट्रॅजिडी ही या व्यक्तीरेखांमधे आहे त्याहून अधिक या व्यक्तीरेखा ज्या परंपरेचा भाग आहेत, त्यात अधिक आहे. मुळात ही घरं, ही माणसं, काही वाईट नाहीत. पण परंपरेने त्यांना ज्या भूमिका आखून दिल्या आहेत, त्या आहेत तशा स्वीकारणं, हा या ट्रॅजिडीचा भाग आहे. चित्रपटातली अमृता, किंवा अमू ( तापसी पन्नू) जेव्हा तिच्या वैयक्तिक भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करते, तेव्हा या वरवर सुखी दिसणाऱ्या संसाराची घडी विस्कटायला लागते. पुढे प्रश्न उरतो, तो घडी विस्कटली जाण्याचा नाही, तर मुळातच आपण या संसाराला सुखी मानू शकतो का, हा !
हा चित्रपट काही रहस्यप्रधान नाही. तो कशाविषयी आहे हे आपल्याला ट्रेलर्सपासून माहीतच आहे. वर नंतर आलेल्या रिव्ह्यूजनी हे चित्र अधिकच स्पष्ट उभं केलय. अमू आणि तिचा पती विक्रम ( पवेल गुलाटी ) यांचा एक कन्वेन्शनली सुखी संसार आहे. तो एका मोठ्या कंपनीत वरच्या पदावर आहे, आणि लवकरच एका मोठ्या जबाबदारीवर परदेशात जाणार आहे. ती त्याच्या स्वप्नांना आणि त्याच्या घरच्यांना आपलं आयुष्य मानून आनंदाने जगतेय. त्याची डायबेटीक आई ( तन्वी आजमी ) त्यांच्या बरोबर रहाते, तिचीही काळजी अमूच घेते. पण एका पार्टीत घरी जमलेल्या पाहुण्यांसमोर विक्रम तिच्यावर हात उचलतो, आणि आपल्या जगण्याचा पायाच तकलादू आहे असं तिच्या लक्षात येतं. चित्रपटाच्या पटकथेची विशेष गोष्ट ही, की अमू आणि विक्रम या नि:संशय इथल्या प्रमूख व्यक्तीरेखा असल्या, तरीही ती सर्व स्तरांमधल्या स्त्री-पुरुषांना प्रातिनिधिकदृष्ट्या समोर आणत या प्रश्नाचं व्यापक रुप आपल्यासमोर उभं करते.
चित्रपटाला सुरुवात होताना आपल्याला स्त्री पुरुषांच्या अनेक जोड्या दिसतात, आणि त्यांच्यातल्या किंचित संवादांमधून त्या कशा आहेत, आणि त्यांचे एकमेकांबरोबरचे संबंध काय हे आपल्याला दाखवलं जातं. कथा सुरु होताच लक्षात येतं, की आधी दिसलेली माणसं ही विक्रम अमृताच्या जवळच्या लोकांमधली आहेत. चित्रपट जसा पुढे सरकतो, तसे अमूला पडलेले प्रश्न कसे आजच्या समाजालाच पडायला हवेत, हे या अनेकपात्री योजनेतून दाखवलं जातं. या त्यामानाने लहान व्यक्तिरेखांमधे तिचे आईवडील ( रत्ना पाठक शाह, कुमूद मिश्रा ) आहेत, पुढे अमूने नेमलेली वकील ( माया सराओ) आहे, अमू -विक्रमकडली वरकामाची बाई ( गीतिका विद्या ) आहे, विक्रमच्या शेजारच्या घरात आपल्या मुलीसह रहाणारी शिवानी (दिया मिर्जा ) आहे. शिवानीचा आता हयात नसलेला पती जेम्स, हे बहुधा चित्रपटातलं सर्वगुणसंपन्न पतीचं एकमेव उदाहरण आहे, यावरुनही चित्रपटाला हा मुद्दा किती गंभीर वाटतो याची कल्पना यावी. त्यानंतरचा नंबर आहे, तो अमूच्या वडीलांचा. त्यांच्याकडून अन्याय झालेला नाही असं नाही, पण त्यांचा दृष्टीकोन हा अधिक मोकळा आहे. जर हातून चूक झाली असेल तर ती स्वीकारणं, आणि जे योग्य वाटतं, त्याची कोण काय म्हणेल याची पर्वा न करता बाजू घेणं, हे या व्यक्तीरेखेचे महत्वाचे गुण आहेत. काही व्यक्तीरेखा या थोडक्यात रेखाटण्यात आल्याने मोजक्या वेळात , आणि अवकाशात त्या रंगवणं भाग पडलय, त्यामुळे हे प्रसंग थोडे अधिक नाट्यपूर्ण ( भडक नाही ) होतात. पण ते वगळता चित्रपटाचा सूर वास्तवाचं अचूक भान ठेवणारा आहे, जो कधीही बदलत नाही. हा सूर, ही ‘थप्पड’ मधली सर्वात जमलेली गोष्ट आहे. तो जर आक्रस्ताळा, किंवा तर्क सोडून बाजू घेणारा झाला असता, तर चित्रपटाचा तोल गेला असता.
सामान्य चित्रपट करता करता अचानक ‘मुल्क’ पासून योग्य वाटेला लागलेल्या अनुभव सिन्हाचा हा तीन वर्षात तिसरा चांगला, समाजाचं भान असलेला चित्रपट आहे. ‘आर्टीकल १५’ हा मुल्कपेक्षा अधिक संयतपणे राजकीय विचार मांडणारा होता. ‘थप्पड’मधे जेन्डर पाॅलिटीक्सकडेही त्याच संवेदनशीलतेने पहात, त्याने आपला अवाका विस्तारतोय हे दाखवून दिलय. पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय, या तिन्ही जागांकडे पाहिलं तर लक्षात येईल, की थप्पड मारणं या एका घटनेमधून आत्मपरीक्षणाचा मुद्दा आणणं आणि पुढे तो चढवत नेणं, हे काम सोपं नाही. तो जर नीट उतरला नाही, तर ही घटना क्षुल्लक वाटू शकते. अमूची व्यक्तिरेखा आक्रस्ताळी, अविचारी वाटू शकते. प्रेक्षकांमधेही पुरुषसत्ताक संस्कृतीचे प्रतिनिधीच अधिक प्रमाणात आहेत, आणि त्यांच्यावर पाळी आल्यास तेही इथल्या विक्रमपेक्षा वेगळे वागणार नाहीत ही शक्यता लक्षात घेऊनच ही मांडणी केलेली आहे. अमू आणि विक्रम या दोघांच्याही भूमिका त्यामुळे अवघड आहेत. तापसीची व्यक्तिरेखा निदान सुरुवातीपासून एका भूमिकेवर ठाम आहे, पण पवेलला बदल दाखवायचा आहे. त्याची व्यक्तीरेखा प्रेक्षकाला पटण्यासारखी तर हवी, खलनायकी तर व्हायला नको, आणि शेवटी त्याने आपल्यात घडवलेला बदल, हा प्रेक्षकांना त्यांच्या वागण्याचा विचार करायला लावणारा हवा, अशी ही अवघड जबाबदारी या अभिनेत्याने पेलली आहे. कुमुद मिश्रा ‘आर्टीकल १५’ मधेही फार प्रभावी होता. इथेही त्याची भूमिका परिणामकारक आहे. तो आणि रत्ना पाठक शाह यांच्यामार्फत गेल्या पिढीचा दृष्टीकोन समोर येतो आणि त्या पिढीने अशा परिस्थितीत जी भूमिका स्वीकारायला हवी ती अधोरेखित होते.
‘थप्पड’मधे मला थोडी खटकण्यासारखी एकच जागा वाटली आणि ती म्हणजे अमूच्या वकीलाने अखेर स्वीकारलेला एक युक्तीवाद. चित्रपट त्या ठिकाणी पोचेपर्यंत अमूने घेतलेली एक विशिष्ट भूमिका इथे किंचित बदलते. प्रत्यक्षात असा प्रसंग येताच एखादी व्यक्ती या प्रकारची तडजोड स्वीकारेलही, परंतु चित्रपट हा विशिष्ट विचार पुढे नेणारा आहे. त्यामुळे हा बदल थोडा अनपेक्षित वाटला. पण पुढल्या भागात दोन्ही प्रमुख व्यक्तीरेखांनी शब्दात मांडलेल्या भूमिका, विशेषत: अमूचा सासूबरोबरचा संवाद आणि विक्रमने अमूपुढे दिलेली कबूली, या गोष्टी थप्पडचा मुद्दा व्यवस्थित समोर आणतात.
‘थप्पड’ चित्रपटाचा दृष्टीकोन हा योग्य आहे. त्याने क्रांती घडेल, घराघरात आत्मपरीक्षण होईल, पुरुष आपल्या वागण्यात आणि स्त्रीया आपल्या भूमिकेत बदल घडवतील असं काही मला वाटत नाही. इब्सेनच्या नाटकाला आता दीडशे वर्ष व्हायला आली. आतापर्यंत जो बदल नाटक, चित्रपट, लेख, पुस्तकं, यांमधून झाला नाही तो आणखी एका चित्रपटाने होईल असंही नाही. पण तरीही हिंदी सिनेमा पोचतो, आणि चित्रपट हे जनसामान्यांच्या प्रबोधनाचं माध्यम तर आहेच. या निमित्ताने जर घराघरात काही एक विचार सुरु झाला, संवाद सुरु झाला, तरीदेखील ते थप्पडचं यश मानता येईल. तिने ओढून घेतलेल्या दाराचे पडसादही काही प्रमाणात देशभरात उमटोत. नोराच्या या नव्या लेकीकडून तेवढी अपेक्षा आपण जरुर करु शकतो.
- गणेश मतकरी
1 comments:
खूप सुंदर लिहिलेत!
Post a Comment