२०१९ च्या फेब्रुवारीत मी ऑस्कर्सचा विचार करत बसलो होतो. नाॅमिनेशन्स माहीत होती. बऱ्याचशा फिल्म्स पाहिलेल्या होत्या. ‘रोमा’, ही अल्फोन्जो क्वारोनची फिल्म परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा दोन्ही वर्गात नाॅमिनेशन मिळवून होती. प्रश्न होता, की यातल्या कोणत्या विभागात ती ऑस्कर पटकवेल. याआधी परभाषिक चित्रपट मुख्य विभागात नाॅमिनेट झालेले होते. १९३८ मधेच रेन्वारची ‘द ग्रॅन्ड इल्यूजन’ ही फ्रेंच फिल्म सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत होती, पण तिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार न मिळता, तो फ्रॅंक काप्राच्या ‘ यू कान्ट टेक इट विथ यू’ ला मिळाला. तेव्हा परभाषिक चित्रपट हा विभागच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे त्यांना तो पुरस्कार मिळणंही शक्य नव्हतं. आज ‘ग्रॅंड इल्यूजन’ जागतिक चित्रपटांमधला महत्वाचा चित्रपट मानला जातो. आणि काप्रा हा मोठा दिग्दर्शक असला, तरी त्या वर्षीचा त्याचा चित्रपट आज फार कोणाच्या लक्षातही नसेल.
ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स ॲन्ड सायन्सेसने १९४७ मधे परभाषिक चित्रपटांचा स्पेशल अवाॅर्ड देऊन सन्मान करायला सुरुवात केली ती विटोरिओ डे सिकाच्या ‘शूशाईन’ पासून आणि पुढे १९५६ पासून हा स्वतंत्र विभाग म्हणूनच अस्तित्वात आला. त्या पहिल्या वर्षी हा सन्मान मिळवणारा चित्रपट होता, तो फेलिनीचा ‘ला स्ट्राडा’. यानंतरही वेळोवेळी परभाषिक चित्रपटांचा मुख्य वर्गात समावेश होत गेला, त्याबरोबरच काही वेळा त्यांना केवळ मुख्य स्पर्धेतही ( त्या विभागाच्या अटी पाळल्या असल्यास ) प्रवेश मिळत असे. पण आजवर यातल्या एकाही इंग्रजीतर चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला नव्हता. झी (१९६९), लाईफ इज ब्युटीफूल (१९९८) , क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन (२०००) अशा अनेक प्रसंगी चित्रपट परभाषिक आणि सर्वोत्कृष्ट अशा दोन्ही भागात नाॅमिनेट झालेले होते , मात्र अशा वेळी बहुतेक चित्रपटांना परभाषिक चित्रपटाच्या पुरस्कारावर समाधान मानावं लागलं. तुलनेने दुय्यम चित्रपटाकडूनही सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात हार मानावी लागली. आन्ग ली च्या ‘क्राउचिंग टायगर,...’ ला दहा विभागात नामांकन असूनही त्याला ही कोंडी फोडता आली नाही. ‘रोमा’ हे करुन दाखवेल, इंग्रजी नसणारा पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरेल अशी अपेक्षा गेल्या वर्षी तयार झाली होती. एक तर क्वारोन बरीच वर्ष अमेरिकेत चित्रपट करत होता. त्याला ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटासाठी दिग्दर्शनाचं ऑस्करही मिळालं होतं, आणि रोमाचा आशय, हा तत्कालिन सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर उठून दिसणारा होता. वर्तवल्या गेलेल्या अंदाजांमधेही तसं मानलं जाण्याचं प्रमाण बरच होतं. माझाही कल तसाच होता.
पुरस्कारांच्या दिवशी मी एबीपी माझा चॅनलवर ऑस्कर चर्चेत सहभागी होतो. पण लवकरच कळलं, की रोमाला परभाषिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, आणि लक्षात आलं, की नेहमीप्रमाणेच यावेळीही ‘रोमा’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत उरणार नाही. तसच झालं, आणि पीटर फारेली दिग्दर्शित ‘ग्रीन बुक’, हा त्या मानाने कमी प्रतीचा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. ऑस्कर आपल्या संकेतांवर ठाम होतं. त्यामुळेच यावर्षी जेव्हा ऑस्करबद्दल अंदाज वर्तवले गेले, तेव्हा बाॅंग जून-हो च्या ‘पॅरासाईट’ या साऊथ कोरिअन चित्रपटाची मजल परभाषिक चित्रपटापलीकडे जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण ती गेली. पॅरासाईट या वेळच्या ऑस्कर स्पर्धेतला सर्वात महत्वाचा चित्रपट ठरला. दिग्दर्शन आणि पटकथा, या दोन अतिशय महत्वपूर्ण विभागाबरोबरच सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ( म्हणजेच परभाषिक विभागाचं नवं नाव ) , या चार पुरस्कारांसह तो या वर्षीचा सर्वोत्तम काम करणारा चित्रपट ठरला.
हा निर्णय उघडच ऐतिहासिक आहे. एक तर इंग्रजीतर भाषेतल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याबरोबरच एकाच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हे दोन्ही पुरस्कार मिळण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. त्याबरोबरच एकाच चित्रपटाला ऑस्करसारख्या मुख्य धारेतल्या स्पर्धेतला प्रमुख पुरस्कार मिळणं, आणि कॅन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रयोगाला महत्व देणाऱ्या स्पर्धेतला प्रमुख पुरस्कार ‘पाम ड’ओर’ मिळणं, अशीही बहुधा ही पहिलीच वेळ असावी. सर्वप्रथम या निर्णयाचं स्वागतच व्हायला हवं, कारण पॅरेसाईटची निवड ऑस्करच्या एरवीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे, आणि ती हा केवळ वेगळ्या भाषेतला चित्रपट आहे म्हणून नाही. ऑस्कर आजवर हिंसक, वादग्रस्त आशयाहून दूर रहायचं. त्या दृष्टीनेही पॅरासाईट हा धीट विचार मांडणारा, हिंसेची अपरिहार्यता अधोरेखित करणारा, समाजाचं वास्तव टोकदारपणे समोर ठेवणारा चित्रपट आहे. त्याला सर्वोच्च स्थान देत, त्यांनी आपल्या भूमिकेतला बदल दर्शवला आहे. ऑस्कर एकूणच बदलतय. त्याचं धोरण अधिक उदारमतवादी होतय हेही आपण गेली काही वर्ष पहातो आहोत. मध्यंतरी कृष्णवर्णीयांचा नाॅमिनेशन्समधे आणि विजेत्यांमधे पुरेसा सहभाग नसल्याबद्दल ऑस्करविरोधात अनेकांनी भूमिका घेतली होती, आणि ॲकेडमीने ती परिस्थिती सुधारण्यासाठी घाईत पावलं उचलली होती. यावेळची यादी पाहिली, तर त्यातही कृष्णवर्णीयांचं प्रमाण अत्यल्प आहे, पण कोरिअन चित्रपटाला आपला प्रमुख, आणि इतरही महत्वाचे पुरस्कार देऊन , त्यांनी आपलं धोरण उदार, सर्वसमावेशक असल्याचा पुरावाच समोर ठेवला आहे.
आता यात अडचण कुठे आहे ? तर सांगतो! ऑस्करच्या या एकदम पॅरासाईटकडे झुकण्यामुळे ज्या चित्रपटांचा मुळात अधिक विचार होऊ शकला असता त्याच्याकडे दुर्लक्ष झालय. खरं म्हणजे एकाच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, या दोन्ही पुरस्कारांची आवश्यकता आहे का ? एकदा का तुम्ही त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून त्या समारंभातला सर्वोत्कृष्ट अशी मान्यता दिल्यावर मग त्याला वेगळा, विशिष्ट विभागापुरता वेगळा पुरस्कार का देणं आवश्यक ठरतं ? तो जर दिला नसता, तर आंतरराष्ट्रीय विभागातल्या इतर चार चित्रपटांपैकी कोणालातरी हा पुरस्कार मिळू शकला असता. उदाहरणार्थ हनीलॅन्डसारख्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट माहितीपट अशी दोन नाॅमिनेशन होती. त्याला एकही पुरस्कार मिळाला नाही. जर आंतरराष्ट्रीय चित्रपटाची जागा रिकामी झाली असती, तर त्याच्यासारख्या चित्रपटाची वर्णी लागू शकली असती. किंवा मग मुख्य पुरस्काराची जागा मोकळी झाली असती, तर तो सर्वांनाच अपेक्षित असलेल्या सॅम मेन्डेसच्या ‘1917’ ला मिळणंही न्याय्यच ठरलं असतं. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या आणि युद्धभूमीचं विदारक चित्र रेखाटणाऱ्या या चित्रपटालाही तो शोभून दिसला असता.
असं असतानाही, हे का झालं हे समजण्यासारखं आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटाची निवडप्रक्रिया आणि मुख्य चित्रपटांची निवडप्रक्रिया यात फरक असतो. आंतरराष्ट्रीय चित्रपट हे जगभरातून पाठवलेल्या , त्या त्या देशातल्या सर्वोत्तम चित्रपटाच्या यादीतून निवडले जातात, तर मुख्य धारेत चित्रपट निवडला जाण्यासाठी तो आदल्या वर्षी लाॅस एंजेलिसमधे प्रदर्शित होणं आवश्यक असतं. असं असल्याने योगायोगाने एकाच चित्रपटाला दोन्ही विभागात स्वतंत्रपणे सर्वाधिक मतं मिळण्याची शक्यता, ही असतेच. पण त्यावरही ॲकेडमीचा काही अंकुश हवा. निवडप्रक्रियेचाही तर्कशुद्ध विचार करणारे काही ज्येष्ठ आवाज हवेत, जे या प्रकारचे अन्याय टाळू शकतील. या वेळचा निकाल हा क्रांतिकारी असला, तरी संपूर्णपणे तर्काला आणि न्यायाला धरुन होता, असं मी तरी म्हणणार नाही.
जर एकाच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट असल्याचे दोन पुरस्कार असतील, तर ज्याला या माध्यमात ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणतात त्या दिग्दर्शकाला, म्हणजेच इथे बाॅंग जून-होला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळणं क्रमप्राप्तच आहे. पण त्याचा दुसरा अर्थ असाही घेता येईल, की ज्या प्रकारे 1917 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून डावलला गेला, तसाच त्याचा दिग्दर्शक सॅम मेन्डेस सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणूनही डावलला गेला. तशीही यंदा दिग्दर्शकांची नावच अशी होती, की कोणालाही पुरस्कार देणं चालू शकलं असतं. त्यातल्यात्या मला टॅरेन्टीनोचं विशेष वाटतं. त्याने ‘मी दहाच चित्रपट करुन निवृत्त होणार’, असं आधीच जाहीर केलय. ‘वन्स अपाॅन ए टाईम...इन हाॅलिवुड’ हा त्याचा नववा चित्रपट. हा महत्वाचा समकालीन दिग्दर्शक असून त्याला आजवर दिग्दर्शनाचं ऑस्कर मिळालेलं नाही. त्याच्या पुढल्या चित्रपटाला ते मिळायलाच हवं, असं आत्ताच वाटायला लागलय.
स्वतंत्र पटकथेचा पुरस्कार ‘पॅरासाईट’ला मिळाला हे ठीकच, पण आधारीत पटकथेसाठी खूप चांगले उमेदवार होते. स्टीवन झेलिअनला तो ‘द आयरिशमन’साठी मिळू शकला असता, किंवा ग्रेटा गर्विगला ‘लिटल विमेन’साठी. त्याचं जोजो रॅबिटसाठी टायका वायटिटिला मिळणं काही वाईट नाही, पण दिग्दर्शनासाठी स्त्रीपात्रविरहित यादी काढल्याने चांगला चित्रपट करुनही गर्विगला तिथे आधीच नाॅमिनेशन नव्हतं. मग पटकथेचा पुरस्कार तिला मिळणं, अधिक योग्य ठरलं असतं.
आता हे झालं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं, लेखना दिग्दर्शनाचं. पण इतरांचं काय ? ऑस्करचं मी एक पाहिलय, की जेव्हा नाॅमिनेशनची यादी आपण पहातो तेव्हा आपल्यापुढलं चित्र अनेकदा फार स्पष्ट नसतं. अर्थातच , कारण यातले सगळे चित्रपट आपल्याकडे आलेले नसतात, आपण पाहिलेले नसतात, पण आपण जसजसे ते पहातो, तसतसं आपलं मत तयार होत जातं. त्याचबरोबर त्यांच्याकडेही अनेक प्रमुख स्पर्धांचे निकाल लागतच असतात. मग ते कसे लागतात आणि कोण पुरस्कारप्राप्त ठरतं याची सांगड जर आपण आपल्यावर या चित्रपटांचा जो प्रभाव पडतो त्याच्याशी घालू शकलो, तर आपल्याला निकालाचे बराचसा अंदाज येऊ शकतो. अर्थात ॲकेडमीने पॅरासाईटसारखा प्रचंड धक्का देण्याचं ठरवलं नसेल तरच. यंदाची कलावंतांची चारही नावं अशी ठरल्यासारखीच होती. स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड, गोल्डन ग्लोब, बाफ्टा , या ठिकाणी या नावांचा यथोचित सन्मान झालेला होता.
‘जोकर’ हा चित्रपट मुळातच ॲकेडमीने यादीत घेण्यासाठी खूप हिंसक होता, आणि तरीही त्याचा इथे केलेला समावेश हा ‘पॅरासाईट’च्या समावेशाप्रमाणेच थोडा बिचकवून गेला. असं असतानाही वाकीन फिनिक्सचं नाव सुरुवातीपासूनच यादीत अग्रणी होतं. जोकरचा विशेषच हा होता की प्रत्यक्षात तो एका सुपरहिरो विश्वाचा भाग असला, बॅटमॅनमधल्या खलनायकाची ओरिजिन/मूळकथा हा त्याचा विषय असला, तरी हा चित्रपट अतिशय वास्तववादी पद्धतीने आणि त्या व्यक्तिरेखेच्या मानसिक आलेखाचा विचार करुन घडवण्यात आला होता. पॅरासाईटप्रमाणेच हे विश्वही आजच्या समाजाचं प्रतिबिंब होतं. इतक्या तपशीलात व्यक्तिरेखेची असलेली गुंफण , आणि फिनिक्ससारख्या महत्वाच्या अभिनेत्याने तिला उभं करणं हे ऑस्करप्राप्त ठरणारच होतं. अनेकांना या विभागात ‘मॅरेज स्टोरी’ मधे ॲडम ड्रायव्हरने उभा केलेला हतबल नवरादेखील पुरस्काराला पात्र वाटत होता, पण एकूण कौल स्पष्ट होता.
‘ज्यूडी’बाबतही असच काहीसं म्हणता येईल. ज्युडी हा देखील कथेपेक्षा व्यक्तीरेखेचा सिनेमा होता. जोकर हे जसं काल्पनिक आयकाॅनिक पात्र आहे, तशी ज्युडी गार्लंड ही आयकाॅनिक अभिनेत्री होती. तिच्या आयुष्यातल्या अखेरच्या काळाबद्दलचा हा सिनेमा हे मुळात रेने झेल्वेगरसाठीही आव्हान होतं, आणि ॲकेडमीसाठी ही एक आदराची व्यक्तीरेखा होती. तिचं अचूक चित्रण हे ऑस्करप्राप्त ठरलं हे योग्यच होतं.
या दोघांची ऑस्कर्स जितकी अचूक वाटतात, तितकी सहाय्यक भूमिकेतल्या अभिनेत्यांची निदान मला तरी वाटली नाहीत. ‘वन्स अपाॅन ए टाईम...इन हाॅलिवुड’ साठी ब्रॅड पिट, आणि ‘मॅरेज स्टोरी’साठी लाॅरा डर्न, यांची निवड अपेक्षितच होती, पण मुळात या भूमिकाच मला तितक्या प्रभावी वाटलेल्या नाहीत. लाॅरा डर्नची भूमिका आहे ती एका स्मार्ट डिवोर्स लाॅयरची, जी चित्रपटात भाव जरुर खाते, पण ‘जोजो रॅबिट’मधली, दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाकडल्या दिवसांत ज्यूंबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या जर्मन स्त्रीची स्कार्लेट जोहान्सनने केलेली भूमिका नक्कीच अधिक कठीण आहे. तीच गोष्ट ब्रॅड पिटची. त्याच्या ‘वन्स अपाॅन ए टाईम...’मधल्या हाॅलिवुड स्टन्टमनपेक्षा ‘ द आयरिशमन’ मधे जो पेशीने साकारलेली वृद्ध गॅंगस्टरची भूमिका खूपच अधिक परिणामकारक आहे. हा पुरस्कार पेशीऐवजी पिटला जाण्याचं कारण बहुधा आयरिशमनला सहाय्यक भूमिकेसाठी असलेली दोन नामांकनं हे असावं. पेशी, आणि बरोबर अल पचिनोने साकारलेला जिमी हाॅफा, हे दोघंही एकाच चित्रपटासाठी स्पर्धेत असल्याने ही मतं विभागली गेली असावी ज्याचा फायदा ब्रॅड पिटला मिळाला, असं मानलं जातं. प्रत्यक्षात काय असेल कोणाला माहीत !
अभिनेत्यांप्रमाणेच राॅजर डिकीन्सला 1917 च्या छायालेखनासाठी , मार्क टेलर/ स्टुअर्ट विल्सनला त्याच चित्रपटाच्या साउंड मिक्सिंगसाठी आणि मायकेल मॅककस्कर/ॲन्ड्रू बकलन्ड यांना फोर्ड वर्सेस फेरारीच्या संकलनासाठी असे बरेच पुरस्कार हे वाटलं तसेच होते. पण असं असतानाही आपण अशा काही चित्रपटांकडे काणाडोळा करु शकत नाही ज्यांच्याकडे ऑस्करने मुळातच दुर्लक्ष केलं. यातला सर्वात महत्वाचा होता तो ‘अनकट जेम्स’. अनेक पुरस्कार मिळवलेल्या आणि इंडी, म्हणजे समांतर वळणाच्या चित्रपटांसाठी असलेल्या, ऑस्कर्सच्या आदल्या दिवशीच मंचित होणाऱ्या ‘इंडीपेन्डन्ट स्पिरीट अवाॅर्ड’ मधे दिग्दर्शक, प्रमुख अभिनेता, संकलन अशी कमाई करणाऱ्या या चित्रपटाला ऑस्करमधे नाॅमिनेशनच नव्हतं. तीच कथा स्पिरीट अवाॅर्डमधे सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या ‘द फेअरवेल’ची. या दोन्ही चित्रपटांचा समावेश मुख्य पुरस्कारांच्या नाॅमिनेशन्समधे असणं अपेक्षित होतं, पण त्यांना बाजूला ठेवलं गेलं. यांना सोडूनही अनेक चर्चित पटकथाकार, दिग्दर्शक, अभिनेते या ऑस्करमधे मुळातच बाजूला पडले. सर्वांचा सन्मान हा चित्रपटांच्या प्रचंड संख्येमुळे शक्य नाही, पण महत्वाची नावं खटकतात हेही खरच. असो. शेवटी काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट व्हायच्याच.
तरीही, एका अर्थी या वर्षापासून ॲकेडमीने हा नवा अध्याय सुरु केलाय, एक नवं धोरण स्वीकारलय असं म्हणता येईल. आजवर वेगळ्या भाषेतून चित्रपट करणाऱ्या कोणाही दिग्दर्शकाला आपण या प्रचंड ग्लॅमरस पुरस्कारांमधला सर्वोच्च पुरस्कार कधी पटकवू असं वाटलं नव्हतं. आता ते वाटू शकेल. बाॅंग जून-हो या नव्या ऑस्कर्सचा पोस्टर बाॅय झालाय. अनेकांना त्याचा हेवा वाटत असेल आणि इतर अनेक जण त्याच्यापासून प्रेरणा घेतील. आपल्या दिग्दर्शकांनी यातून काय घ्यायचं, ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे.
1 comments:
ऑस्करचे दरवर्षीचे परिमाण मी सरत्या वर्षाच्या सामाजिक आलेखच प्रतिबिंब म्हणून बघतो. त्यातून माझ्यापुरत्या सांस्कृतिक प्रवाहाची दिशा वगैरे अधोरेखित केली जाते. आता दुसऱ्या लॉकडाउनच्या एका आड्यानंतर 'parasite' च ऑस्कर, फेब्रुवारीसारखंच मला विकेंद्रीकरणाची सुरुवात वाटते. New World Order ची ही सिनेमपूरती सुरुवात असेल कदाचित.
Post a Comment