न्याय, सूड आणि हन्टर्स

>> Monday, March 23, 2020



  १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिक्सदरम्यान पॅलेस्टीनी दहशतवाद्यांनी इस्त्राएलच्या टीममधल्या अकरा खेळाडूंची हत्या केली. स्टीवन स्पीलबर्गने २००५ साली दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘म्युनिक’ या घटनेच्या काही अंशी सत्याधारीत असलेल्या पडसादांवर बेतलेला आहे. चित्रपटात, मोसादसाठी कार्यरत असलेला हेर ॲवनर काॅफमन या भयानक घटनेचा सूड घेण्याची कामगिरी पत्करतो आणि राजीनामा देऊन  पॅलेस्टीनी गुन्हेगारांना संपवण्यासाठी आपला एक स्वतंत्र चमू तयार करतो. मात्र कामगिरीला सुरुवात झाल्यानंतर मात्र आपण निवडलेला मार्ग योग्य का अयोग्य, याचा संभ्रम ॲवनरला ग्रासून टाकतो. दहशतीला दहशत हे उत्तर असतं का ? आणि मूठभर लोकांना मारण्यामुळे खरोखर आपलं उद्दीष्ट साध्य होणार आहे का ? असा नैतिक पेच ॲवनरच्या हातातल्या शस्त्राची धार बोथट करुन सोडतो. याऊलट क्वेन्टीन टेरेन्टीनोच्या ‘इनग्लोरीअस बास्टर्ड्स’(२००९) मधल्या ल्युटनंट ॲल्डो रेनला, आणि त्याच्या चमूला असं काही वाटत नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरल्या या थ्रिलरमधे नाझींचा नायनाट एवढच त्यातल्या नायकांचं उद्दीष्ट असतं. जितके अधिक मरतील तितके उत्तम , एवढीच त्यांची भूमिका. नाझींवर सूड घेण्याची भावना अनेकांच्या मनात असतेच. बास्टर्ड्स या भावनेला पडद्यावर प्रत्यक्ष उतरवतो. तुमच्या हातात पिस्तुल देत, तुम्हालाच बदल्याचा आनंद मिळवून देतो. तुम्हाला ॲमेझाॅन प्राईम व्हिडीओ वर आलेली ‘हन्टर्स’ ही सिरीज आवडेल का नाही, हे बहुधा तुम्हाला वर उल्लेखलेल्या कोणत्या चित्रपटाचा दृष्टीकोन अधिक पटतो, यावर अवलंबून असेल.

 हन्टर्सच्या कथानकाचा काळ आहे तो १९७७ हा. न्यू याॅर्क मधे रहाणारा १९ वर्षांचा तरुण जोना हिडलबाॅम ( लोगन लर्मन ) हे यातलं प्रमुख पात्र म्हणता येईल. प्रमुख अशासाठी, की ते पात्र प्रेक्षकांसाठी हुक आहे. प्रेक्षक त्या पात्राच्या नजरेतून कथेकडे पहातो. त्याच्या भल्याबुऱ्याच्या जाणीवा, त्याचं सुखदु:ख हे प्रेक्षकांपर्यत सर्वप्रथम पोचतं. जोनाची आजी रुथ, हिचा राहत्या घरात खून होतो, आणि तो या प्रकरणाच्या मूळाशी जायचं ठरवतो. या मार्गावर त्याची गाठ पडते, ती मायर ऑफरमन ( अल पचिनो) या श्रीमंत आणि रहस्यमय इसमाशी, ज्याचा सध्याचा उद्योग अमेरिकेत दडलेल्या नाझींना शोधून त्यांना संपवणं हा असतो. चित्रविचित्र व्यक्तीमत्वांनी भरलेल्या त्याच्या टोळीत जोना सामील होतो, आणि त्यांच्यातलाच होऊन जातो.

 मालिकेच्या पहिल्याच प्रसंगात आपल्याला भेटतो तो सरकारात उच्चपदावर असलेला बिफ सिम्प्सन (डिलन बेकर ). पार्टीला आलेल्या पाहुण्यांपैकी कोणाच्यातरी बिफचा नाझी भूतकाळ लक्षात येतो आणि केवळ नाईलाजापोटी बिचारा बिफ आपल्या कुटुंबासह सर्व उपस्थितांना शांतपणे गोळ्या घालतो. क्रौर्य, विनोद आणि धक्कातंत्र या तिन्ही गोष्टी अधोरेखित करणाऱ्या या प्रसंगावरुनच आपल्या लक्षात येतं की हन्टर्सचा दृष्टीकोन जराही संयत असणार नाही, आणि पुढे ते लगेच सिद्धही होतं. हाॅलोकाॅस्टसारख्या भयानक घटनेची पार्श्वभूमी, १६०० नाझी युद्धकैद्यांना अमेरिकेत आसरा देणारं कुप्रसिद्ध ‘ऑपरेशन पेपरक्लिप’ , आणि ज्यू समाजाने या छुप्या नाझींना शोधण्यासाठी दिलेलं योगदान अशा अत्यंत गंभीर ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी असतानाही ‘हन्टर्स’ कुठेही गंभीर सूर लावत नाही, तर सत्तर ऐशीच्या दशकातल्या थरारक हेरपटासारखी ती उलगडत जाते. तिचा प्रवास तीन वाटांनी होतो. मायर ऑफरमन आणि त्याची टोळी यांनी अमेरिकेवर अपेक्षित असलेला हल्ला थांबवण्यासाठी केलेली धाडसं, कर्नल ( लीना ओलिन ) या नावाने ओळखली जाणारी नवनाझी साम्राज्याची प्रमुख आणि तिची कारस्थानं, आणि या झगड्याला तसच जोनाच्या वागण्याला संदर्भ आणून देणारी तीस वर्षांपूर्वी छळछावणीत घडलेली रुथ आणि मायर यांची प्रेमकथा.
  हन्टर्सचा सिरीज क्रिएटर डेव्हिड वाईल  असला तरी त्याच्याबरोबर निर्मात्यांमधलं एक नावही हन्टर्ससाठी चर्चेत आहे, आणि ते म्हणजे जाॅर्डन पील. पीलचं नाव अलिकडे त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘गेट आऊट’ (२०१७) आणि ‘अस’ (२०१९) या भय-रहस्य पटांसाठी गाजतय. या दोन्ही चित्रपटांमधे दुभंगलेल्या , किडलेल्या समाजाचं दर्शन होतं. जरी तिथला भर हा वर्णभेद, वर्गभेद, सामाजिक अन्याय यावर असला, तरी शिकार आणि शिकारी यांच्यामधलं लवचिक नातं, त्या चित्रपटांमधेही होतं. ‘हन्टर्स’चा दृष्टीकोन पीलच्या नजरेशी सुसंगत आहे. प्रेक्षकाला सहज शांतपणे पाहू द्यायचं नाही , धक्के देत रहायचं हे हन्टर्सने स्वीकारलेलं धोरणदेखील पीलच्या कामाशी सुसंगत आहे. वरवर पहाता ही एक प्रक्षोभक मालिका आहे. ती हिंसक आहे यात वादच नाही, टेरेन्टिनोच्या चित्रपटाप्रमाणेच या पडद्यावरल्या हिंसेतून ती न्याय घडवते असंही मानता येईल, मात्र तिच्या चित्रणावर दोन प्रमुख ठिकाणून प्रश्न उपस्थित झाले आहेत जे नाकारता येत नाहीत.
  पहिला आक्षेप आहे तो ऑशवित्झ मेमोरिअलने घेतलेला, सत्याच्या विपर्यासाबद्दल. पोलंडमधली ऑशवित्झ ही सर्वात कुप्रसिद्ध छळछावणी म्हणता येईल.नाझींनी जे अत्याचार केले त्यांना तोडच नाही पण ऑशवित्झ मेमोरिअलच्या आरोपानुसार हन्टर्समधलं चित्रण हे त्यांच्याही पुढे जाणारं आहे. विशेषत: मालिकेतलं एक बुद्धीबळाचं दृश्य त्यांना खासच खटकलय. हे बुद्धीबळ आहे ते माणसांनी खेळलेलं. एका बाजूला जर्मन अधिकारी, दुसऱ्या बाजूला ज्यू ग्रॅंडमास्टर आणि प्यादी म्हणजे हातात ब्लेड घेतलेले कैदी असा हा भयानक खेळ आहे. या प्रकारच्या आक्षेपावर मालिकेचं म्हणणं आहे की तपशीलाकडे न पहाता भूमिकेकडे पहावं, जी अर्थातच अत्याचारांची भयानकता दाखवणारी आहे. दुसरा आक्षेप आहे तो स्टीवन स्पीलबर्गने काढलेल्या शोआ फाउंडेशनच्या स्टीवन स्मिथ, या संचालकांचा. त्यांनी तर थेट ॲमेझानलाच विनंती केलीय की एक सीझन केलात तो बस झाला, आता दुसरा करु नका. त्यांचं म्हणणं की ज्यूंना सूड नकोय, न्याय हवाय. त्यामुळे मालिकेचा मुळातच दृष्टीदोष आहे.
  मला स्वत:ला हे मान्य आहे की मालिका प्रत्येकाला झेपणारी नाही. हेदेखील खरं, की ती काही ठिकाणी फार अतिरंजीत होते, शेवटचा भाग तर गौप्यस्फोटांच्या नावाखाली मालिकेचा मुद्दाच घालवतोय की काय अशा टोकाला पोचतो. पण यासाठी मालिका असून नये, असं काही मी म्हणणार नाही. उलट मालिकेने उपस्थित केलेले काही प्रश्न तर मला खासच महत्वाचे वाटतात. उदाहरणार्थ, भलं आणि बुरं यांची व्याख्या काय ? जर दोन्ही बाजूच्या लोकांना टोकाच्या कृतीवाचून पर्याय नसेल तर चांगलं कोणाला म्हणायचं आणि वाईट कोणाला? भल्याची भूमिका आपण किती ताणू शकतो? कोणकोणती कृष्णकृत्य या आवरणाखाली लपू शकतात? यालाच जोडलेला प्रश्न आहे तो हिरो या संकल्पनेबद्दलचा. आपण हिरो कोणाला म्हणू शकतो, असा. जोना हा काॅमिकबुक्सच्या दुकानात काम करतो, त्यामुळे त्याच्या लेखी हिरो हा कायम सकारात्मक आहे, भल्याच्या सेवेला वाहिलेला. त्याचं उत्तर मालिकेत मिळतं ते वेगळच. हिरो म्हणजे केवळ चांगलं काम करणारा नाही, तर जे आवश्यक आहे ते करणारा. मग ती कृती प्रत्यक्षात कितीही गडद का असेना.
  आजचा समाज हा काळ्या पांढऱ्याच्या गणितापलीकडे पोचलाय. ढोबळ, आपल्याला माहिती असलेली उत्तरं कोणी देण्याची आवश्यकताच नाही. उलट गरज आहे, ती अवघड प्रश्न विचारण्याची ज्यांना कदाचित उत्तरच नसतील. ‘हन्टर्स’ मालिका असे काही प्रश्न विचारते, आणि तेवढ्यासाठी तरी तिचं असणं, पाहिलं जाणं आवश्यक आहे.

 -गणेश मतकरी

1 comments:

Rutuja Bagul March 22, 2022 at 11:17 AM  

Thanks for reviewing the series. A balanced view. I haven't watched it yet. But will do now.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP