चित्रपट समीक्षेचा प्रश्न

>> Monday, April 27, 2020




.

समीक्षा या शब्दाचे आपल्याकडे माध्यमानुसार वेगवेगळे अर्थ काढले जात असावेत. साहित्याबाबत समीक्षेचा अर्थ हा साहित्यात जाणकार मानल्या जाणाऱ्या व्यक्तींनी आपल्या अधिकारात विशिष्ट साहित्यकृती अथवा एकूण साहित्य यावर मांडलेले मौलिक ( क्वचित दुर्बोध ) विचार, असा घेतला जातो. वर्तमानपत्रांमधे किंवा मासिकात येणाऱ्या पुस्तकांच्या रिव्ह्यूजना कायम परीक्षण म्हंटलं जातं. त्यांना समीक्षा वर्गात टाकलं जात नाही. नव्या पुस्तकाची थोडी चिकित्सा इतकीच या परीक्षणांकडून अपेक्षा असते. काही नियतकालिकं तर त्यांना सोयीस्करपणे जाहिरात समजून छापायलाही नकार देतात. नाटकं आणि चित्रपट यांबद्दलची वृत्तपत्रांची भूमिका थोडी वेगळी आहे. ती आवर्जून छापली जातात. नव्या नाटकाचित्रपटाबद्दल वृत्तपत्रांमधून आलेल्या चिकित्सक मजकूरालाही पूर्वी परीक्षण म्हंटलं जायचं हे माझ्या आठवणीत आहे. पण आजकाल या सगळ्याला सरसकट समीक्षा या वर्गात टाकलेलं दिसतं. चित्रपटांबद्दल लिहिणारा तो चित्रपट समीक्षक , मग तो अभ्यासकाच्या भूमिकेतून विद्वत्तापूर्ण लेख लिहित असेल, वृत्तपत्रांमधून स्टार रेटींग टाकत बरेवाईट रिव्ह्यू लिहीत असेल, किंवा आपल्या आनंदासाठी ब्लाॅग किंवा सोशल नेटवर्कवर चित्रपटांना भलंबुरं म्हणत असेल. आता या प्रकारचं सरसकटीकरण खरं तर व्हायला नको, पण होतं हे सत्य आहे. हा चित्रपटसमीक्षेकडे पहाण्याचा कॅजुअल अप्रोच हा मला वाटतं आपला सर्वात मोठा प्राॅब्लेम आहे

एकदा का समीक्षेच्या चौकटीत कशालाही टाकता आलं की ती वाचणाऱ्याचा आणि काही प्रमाणात लिहिणाऱ्याचा समीक्षेबद्दलचा दृष्टीकोन सोपा होऊन जातो. ती वाचताना फारशी गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे असं ती वाचणाऱ्याला वाटत नाही, किंबहुना अनेकांचा समज चित्रपटांची समीक्षा म्हणजे चित्रपटाची कथा, त्याच्या ढोबळ गुणावगुणांचा पाढा आणि त्या चित्रपटांबद्दल रंजक माहिती एवढ्यापुरता मर्यादीत असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. वाचणाऱ्यांचं सोडा, लिहिणाऱ्यांकडे तरी हे गांभीर्य कितपत आहे हा प्रश्नच आहे. सध्या, किंवा खरं तर गेली अनेक वर्ष चित्रपट समीक्षा हे काहीतरी सोपं, कोणालाही लिहिता येण्यासारखं काहीतरी आहे असा प्रचलित समज आहे

याला काही प्रमाणात जबाबदार आहे ते या कलेचं आधुनिक असणं. साहित्य वा चित्रकला यांचा अभ्यास, त्याबद्दल मांडले गेलेले विचार यांना जशी काही शतकांची परंपरा आहे, तशी ती चित्रपटांना नाही. मुळात चित्रपट  हे माध्यमच शंभर सव्वाशे वर्षात विकसित झालं असल्याने त्याबद्दलच्या विचारांना घडायला फार वेळ मिळालेला नाही. रशिया, अमेरिका , जर्मनी, फ्रान्स सारख्या देशांमधून जसा या माध्यमाचा विचार गंभीरपणे केला गेला तसा आपल्याकडे केलाच गेल्याने त्याबद्दलची तात्विक बैठक आपल्याकडे तयार झाली नाही. यथावकाश या देशांमधला विचार आपल्याकडे इंग्रजीत भाषांतरीत होऊन पोचला, पण तो फिल्म स्कूल्सच्या पलीकडे किती पोचला असेल याबद्दल शंका आहे. बरं विचार बाजूला ठेवू, पण तो विचार ज्या चित्रपटांवर आधारीत आहे, तो जागतिक सिनेमा तरी आपल्यापर्यंत किती प्रमाणात पोचला , तर फारच कमी. नव्वदच्या दशकात डिव्हीडी पायरसीचं जे लोण आलं, त्याने खरं तर आपल्याकडे जागतिक चित्रपटाचा प्रसार केला. त्याआधी हा सिनेमा कुठे उपलब्ध होता ? नॅशनल फिल्म आर्काईव्ज सारख्या संस्थेत या चित्रपटांची रीळं उपलब्ध होती, क्वचित कधीतरी तो टिव्हीवर दाखवला जात असे ( मी अकरावीत असताना दिग्दर्शक सर्गेई आयझेन्श्टाईन यांचाबॅटलशिप पोटेम्किन हा महत्वाचा रशियन मूकपट दूरदर्शनने रात्री दहा वाजता लावलेला पाहिला आहे ) , फिल्म सोसायट्या या चित्रपटाला एका निवडक पण संख्येने फारच मर्यादित असणाऱ्या प्रेक्षकवर्गापुढे आणत आणि फिल्म स्कूल्स च्या विद्यार्थ्यांना तो अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पहायला मिळत असे हे खरं, पण इतरांचं काय ? महत्वाचे चित्रपट आणि महत्वाचे विचार या दोन्हींची सहज उपलब्धता नसताना आपल्याकडे चित्रपट समीक्षेचा विकास खरोखर संभवत होता का ? या परिस्थितीमुळे मराठीतलं चित्रपटविषयक समीक्षा आणि इतर लेखनही एका मर्यादेतच होऊ शकलं हे खरं, आणि खंत करण्यासारखं

.

मराठीमधल्या चित्रपटविषयक लिखाणाचा एकूण आढावा घ्यायचा तर मासिकांमधून वेळोवेळी लिहिलं गेलेलं पण असंगृहीत राहिलेलं, पुस्तकरुपात प्रकाशित झालेलं ( यात आधी विविध ठिकाणी आलेल्या लेखांचे/ रिव्ह्यूजचे संग्रह आणि स्वतंत्र लिहिली गेलेली पुस्तकं असे दोन्ही प्रकार आले ) आणि काही प्रमाणात सोशल नेटवर्कवर किंवा ब्लाॅग स्वरुपात चित्रपटाबद्दल लिहिलं जातं ते, या सगळ्याच रुपांमधे वाचकांना उपलब्ध असलेल्या लिखाणाचा विचार करावा लागेल. वरवर पहाता मुळातच पुस्तकरुपातच लिहिलं गेलेलं लिखाण अधिर गंभीरपणे आलेलं, तर सोशल नेटवर्क/ ब्लाॅग हे अधिक तत्कालिन, आणि लेख हे या दोन्हीत कमीअधिक प्रमाणात मोडणं शक्य असलेले असू शकतील. पण त्यामुळे इन्टरनेटवरच्या लिखाणाला पूर्णपणे वगळा असं म्हणणंही योग्य ठरणार नाही. या लेखनातलं बरचसं लेखन फुटकळ असतं हे गृहीत धरलं तरीही या लेखनाचा विस्तार एवढा आहे, वाचकसंख्या इतकी प्रचंड आहे , आणि सोशल नेटवर्कद्वारे  थेट वाचकापर्यंत पोचून लेखक आणि वाचक यात संवाद घडवण्याची जी शक्यता आहे , त्यामुळे या माध्यमाकडे आजतरी संपूर्ण दुर्लक्ष करता येणार नाही. माझं स्वत:चं छोट्या फाॅरमॅटमधलं ( आठशे ते हजार शब्दापर्यंत ) चित्रपटांबद्दलचं लिखाण वाचकांपर्यंत पोचायला ब्लाॅग आणि सोशल नेटवर्क या दोन्हीची मदत झाली आणि त्यातून ज्या चर्चेच्या शक्यता उपलब्ध झाल्या , त्या स्वानुभवाच्या आधारेच मी हे म्हणू शकतो. आज सोशल नेटवर्कमधून चित्रपटांवर जे लिखाण होतं त्यात बहुतांश प्रमाणात चटकन व्यक्त होणं, नकारात्मक पद्धतीने व्यक्त होणं आणि चमकदार शैलीला आशयापेक्षा अग्रक्रम मिळणं हेच अधिक प्रमाणात पहायला मिळतं हे काळजीचं कारण आहे. कारण या वृत्तीमधून आपण संवादाची फार मोठी शक्यता गमावून बसतो आहोत. यापूर्वी कोणत्याच लेखी प्लॅटफाॅर्मवर चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित व्यक्ती, समीक्षक आणि आस्वाद घेणारे प्रेक्षक एकत्र येऊन मुद्द्यांची देवाणघेवाण करु शकले नव्हते. जसजसा सोशल नेटवर्कचा सूर अधिकाधिक नकारात्मक होत जाईल, तसतशी आता अल्प प्रमाणात का होईना पण सुरु असलेली ही देवाणघेवाण संपुष्टात येऊ शकेल

वर सांगितलेल्या कारणांमुळेच आपण जर केवळ मराठीत होणाऱ्या समीक्षापर लिखाणाकडे पाहिलं, तर त्याचं प्रमाण अत्यल्प असेल. पण त्याऐवजी चित्रपटविषयक होणाऱ्या एकूण लिखाणाचा विचार केला, तर थोडं वेगळं चित्र आहे. अशा लिखाणाची लांबी आणि प्रकाशनाचा फाॅरमॅट क्षणभर बाजूला ठेवून विचार केला तर लक्षात येईल ती या लेखनात विविधता आहे. या एकूण चित्राकडे पहाताना सुरुवात मात्र आपण समीक्षेनेच करु. कारण ते लिखाण अधिक आहे


कोणत्याही भाषेत चित्रपट समीक्षा ही वेगवेगळ्या फाॅरमॅट मधे होत असते. वृत्तसमीक्षा ( हा शब्दप्रयोग मी निव्वळ वृत्तपत्रातली समीक्षा या अर्थी योजलेला नाही. विविध प्रकारच्या नियतकालिकातही तिला स्थान असू शकेल. हा शब्द मी  तत्कालिन समीक्षा या दृष्टीने वापरतो आहे. ), हे त्याचं सर्व प्रकारच्या वाचकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोचणारं स्वरुप. वृत्तसमीक्षा ही समीक्षेच्या अवाक्यातच येते, पण ती मूळ कलाकृतीचा विचार एका विशिष्ट स्वरुपातच करु शकते. तिच्यावर काही अशी बंधनं तिला असतात जी मोडणं तिला शक्य होत नाही, तर काही अशी असतात जी मोडणं त्या कलाकृतीवर आणि ही समीक्षा वाचणाऱ्या प्रेक्षकासाठीही अन्यायकारक ठरेल

आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की वृत्तसमीक्षेचा हेतू निरपेक्ष समीक्षा असा नाही. त्यात व्यक्त केलेलं मत शंभर टक्के प्रामाणिक असायलाच हवं, पण त्याचबरोबर अमुक एक चित्रपट या घडीला चित्रपटगृहात लागलेला आहे आणि त्याच्या संभाव्य प्रेक्षकापर्यंत आपण हे विचार पोचवतो आहोत हे आपण विसरु शकत नाही. मग ही काही प्रमाणात चित्रपटाची जाहिरात ठरु शकेल का ? मी तसं म्हणणार नाही, कारण अनुकूल मत जसं प्रेक्षकांना उत्तेजन देणारं ठरु शकेल, तसच प्रतिकूल मत हे प्रेक्षकांना रोखणारंही ठरु शकेल. प्रेक्षकांना अमुक चित्रपट पहावा किंवा नाही यासाठी मार्गदर्शन करणं हा समीक्षेचा निश्चित हेतू आहे. पण हे करतानाही लिहिणाऱ्याने तारतम्य बाळगणं अपेक्षित आहे

विशिष्ट चित्रपटाबद्दल लिहिताना तो कोणत्या प्रकारचा चित्रपट आहे, आणि दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर असलेला प्रेक्षकवर्ग कोणता आहे याचा विचार वृत्तसमीक्षेत अतिशय आवश्यक आहे. त्याबद्दल लिहितानाया प्रकारचा , या विशिष्ट चित्रप्रकारातला चित्रपट मला व्यक्तीश: आवडतो का?’, हा विचार दुय्यम आहे. आपल्याला तो चित्रप्रकार आवडत नसला, तरीही त्या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन त्या चित्रप्रकाराच्या चौकटीत तो जमलेला आहे किंवा नाही याबद्दल विचार मांडणं अपेक्षित आहे. मला वास्तववादी चित्रपट आवडत असले, तर त्याचा अर्थ मी सुपरहिरोपट किंवा सायफाय चित्रपटांना सरसकट सुमार ठरवू शकत नाही. किंवा मला माझ्यापुरते व्यावसायिक, करमणूक प्रधान चित्रपट आवडत असले, तर मी समांतर सिनेमाला झटकून टाकू शकत नाही. मी अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत की जिथे वृत्तसमीक्षकांनी आपली आवड हीच ग्राह्य मानून त्या दृष्टीने इतर चित्रपटांविषयी लिहिलय जे अन्यायकारक आहे. उदाहरणार्थ २००५ मधेस्टार वाॅर्सप्रिक्वल ट्रिलजी चा तिसरा भागरिव्हेन्ज ऑफ सिथआला. त्या वेळी एका वास्तववादी / समांतर वळणाचे चित्रपट आवडणाऱ्या समीक्षकांनी एका लोकप्रिय मराठी वृत्तपत्रात त्याच्या चिंध्या केल्या ते सांगता येईल. हा चित्रपट सायन्स फिक्शन वाटला तरी प्रत्यक्षात तो त्या चित्रप्रकारातला नाही , हे पूर्ण कथानक नऊ चित्रपटांचं असून १९७०/८०  च्या दशकात आलेल्या // या भागांपासून त्याला सुरुवात झाली, नंतर आलेल्या प्रिक्वल त्रयीच्या निर्मितीमागचा इतिहास काय आहे, या भागातला कॅरेक्टर ग्राफ कोणाचा आहे आणि हा चित्रपट मूळ त्रयीशी कसा जोडला जातो, मुळात या मालिकेचं अमेरिकन चित्रपटांच्या इतिहासात काय स्थान आहे, यातलं काहीच यांना माहीत नव्हतं. केवळ हा आपल्याला परिचीत ( आणि प्रिय) वळणाचा सिनेमा नाही , हे त्यांना पुरेसं होतं. मग या मालिकेचे जे लाखो फॅन्स आपल्याकडे आहेत , आणि जे अजूनही मराठी पेपरातली समीक्षा वाचत असतील, त्यांना यातून मार्गदर्शन होणं कसं अपेक्षित आहे ? अलीकडेच आलेल्यासोनचिडीयाया अभिषेक चोबे च्या ब्रिलिअंट चित्रपटाबद्दलहीतो टिपिकल डाकूंचा सिनेमा आहे, त्याची गती कमी आहे, व्यावसायिक सिनेमाकडून अपेक्षित करमणूक त्यातून होत नाही’, या प्रकारची विधानं मराठी वृत्तसमीक्षेत दिसून आली

यात मला एक नेहमीची अडचण दिसते जी केवळ वृत्तसमीक्षेला नाही, तर एकूणच चित्रपट समीक्षेला लागू पडू शकते. आणि ती म्हणजे आपण दिग्दर्शकाचा सिनेमा पहातच नाही. आपण आपल्या मनात एक वेगळा सिनेमा पहात असतो. आणि जर समोर उलगडणारा सिनेमा त्याच्याशी तंतोतंत जुळला नाही तर तातडीने त्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो, जी बहुधा नकारात्मक असते. या मनात चाललेल्या चित्रपटामुळे आणखी एक घोळ संभवतो, तो इंटरप्रिटेशनचा. चित्रपटात दिसणाऱ्या दर गोष्टीचा आपण आपल्या दृष्टीकोनाला सुसंगत असा अर्थ लावायला लागतो. त्यातून चुकीचं इंटरप्रिटेशन, किंवा ओव्हरइन्टरप्रिटेशन होण्याची शक्यता खूप असते. मी अनेक वर्षांपूर्वी श्यामलाताई वनारसेंचं एक व्याख्यान ऐकलं होतं. त्यात त्या म्हणाल्या होत्या की जेव्हा आपल्याला वाटतं की चित्रपटात अमुक एक गोष्ट सुचवली आहे. तेव्हा केवळ आपल्या तशा वाटण्यावर अवलंबून रहाता चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनाच्या दृष्टीने ती जागा पडताळून घ्या. जर तसा अर्थ अभिप्रेत असेल, तर पटकथा आणि  दिग्दर्शनात ते स्पष्ट होईल. आणि जर ते तसं होत नसेल, तर ते आपल्याला  त्या वेळी वाटलं एवढाच त्याचा अर्थ. मग ते तसं आहेच असं समजून चित्रपटाला डोक्यावरही घेऊ नका किंवा पायदळीही तुडवू नका

या मुद्द्याचा एक काॅन्व्हर्स मी गेल्या काही वर्षांमधे पाहिला आहे. आणि तो म्हणजे समीक्षकाने काढलेल्या कोणत्याही मुद्द्याला वाचकांनी ओव्हरइन्टरप्रिटेशन समजणं. मध्यंतरी मला अतिशय आवडलेल्या मराठी चित्रपटाबद्दल मी एक लेख लिहिला होता. त्यात चित्रपटाच्या शेवटाचा मला लागलेला अर्थ मी मांडला होता. काही दिवसांनी एक वाचक मला म्हणाला, कीतुमचा लेख आवडला, पण त्या दिग्दर्शकाला तसं म्हणायचय असं काही मला वाटत नाही. तो काही एवढा हुशार दिग्दर्शक नाही. मी परवा त्याला फेसबुकवर एक प्रश्न विचारला त्याचं उत्तरही त्याला देता आलं नाही.’ मला थोडी गंमतच वाटली. दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटाबद्दल जरुर बोलावं, पण जर ते चांगलं बोलू शकत नसतील, तर त्याचा अर्थ त्यांचा चित्रपट चांगला नाही असा होत नाही. त्यांचा चित्रपट हेच त्यांचं स्टेटमेन्ट आहे. आणि त्या माध्यमातून ते बोलले तर पुरे आहे. सुमार चित्रपट करुन खूप विद्वत्तापूर्ण बोलणारे दिग्दर्शक, आणि आपल्या चित्रपटालाच आपलं विधान मानणारे दिग्दर्शक यांमधला फरक समीक्षकांना कळणं अपेक्षित आहे, आणि तो कळायचा, तर चित्रपट काय सांगतोय हे , त्याची टेक्स्ट त्यांना कळणं आवश्यक आहे


चित्रपटांची मराठी वृत्तसमीक्षा गेली अनेक वर्ष बदनाम आहे, ती कथा सांगून जागा भरण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे. कथेबद्दल, व्यक्तीरेखांबद्दल खोलात जाऊन , डिस्क्रिप्टीव लिहिणं ही समीक्षा नव्हे, पण केवळ पेपरातच नाही, तर चित्रपटविषयक अनेक पुस्तकांमधे हे करुन पानं भरलेली आपल्याला दिसतात, आणि त्यात आश्चर्य नाही. फार कष्ट घेता चित्रपटाविषयी समीक्षापर लिहायचं तर कथा लिहिण्याइतकं सोपं दुसरं काही नाही. क्रिश्चन मेट्झ म्हणतातसिनेमा इज इझी टु अन्डरस्टॅन्ड ॲन्ड डिफिकल्ट टु एक्स्प्लेन’ , ते उगाच नाही. चित्रपट पाहिल्यावर आपल्याला त्यातलं काय आवडलं हे निश्चित लक्षात घेणं आणि ते स्वच्छ शब्दात मांडता येणं हे म्हंटलं तर कठीण आहे. त्यामानाने सोपं काय आहे, तर गोष्ट सांगणं. किंवा इतर, कोणाही प्रेक्षकाला सहज कळू शकेलशी टिप्पणी करणं. कथेबरोबरच चित्रपटातले अभिनय, संवाद किंवा दृश्ययोजना या घटकांबद्दलची ढोबळ निरीक्षणं मांडणंही सापं असतं, पण प्रत्यक्षात जे पाहाणाऱ्या कोणालाही सहज दिसत असेल तेच समीक्षेत येण्यात काय मुद्दा ? असो, गेली अनेक वर्ष आणि आताही आपल्याकडे काही मोजके वृत्तसमीक्षकच या ढोबळपणाच्या सापळ्यातून सुटलेले आपल्याला दिसतात. याची काही कारणं आहेत

चित्रपटाचं समीक्षण/परीक्षण वर्तमानपत्रांसाठी करणं ही तुम्हाला जर चित्रपटांमधे रस असेल तर फार इन्टरेस्टिंग ठरु शकणारी गोष्ट आहे. आणि त्याचं एक कारण म्हणजे जागेची मर्यादा. जर हवी तेवढी जागा दिली, तर आपण काहीही, कितीही पसारा मांडू शकतो, पण सहाशे ते आठशे शब्दात काही सांगण्याचं बंधन येतं तेव्हा तुम्ही काय निवडता आणि ते सांगायला किती जागा देता याला महत्व येतं. मग प्रत्येक शब्द तुम्ही मोजून मापून वापरायला लागता. या समीक्षावजा लेखनात चित्रपटाची कथा सांगण्याला स्थानच नसावं असं मला वाटत नाही. ‘प्रेक्षकांना मार्गदर्शनहा जर या समीक्षेचा एक हेतू असेल, तर पोटेन्शीअल प्रेक्षकाला तो बघावा किंवा नाही हे सांगणंही या मार्गदर्शनाचाच भाग आहे, आणि लेखात कथेचा उल्लेखही करता हे जमवणं कठीण आहे. माझ्या ओळखीच्या एका मुलीने काही वर्षांपूर्वीविदाऊट गिव्हिंग मुव्ही अवेनावाची एक वेबसाईट काढली होती आणि त्यात ती कथा देणं पूर्णत: टाळत असे. पण ते दुसरं टोक झालं. माझ्या मते एखादा परिच्छेद कथेला देणं हे पुरेसं आहे. तो सोडून उरलेली जागा तुम्ही कशी वापरता, हे मात्र काळजीपूर्वक पहायला हवं. आणि ते आजच्या वृत्तसमीक्षेत आज होताना दिसत नाही


बरेचदा पेपरमधून चित्रपटांविषयी लिहिणारे हे ते काम इतर कामाबरोबर एक म्हणून करत असतात. त्यांना चित्रपटात रस असेलच, किंवा त्यांचा अभ्यास , व्यासंग असेल, असं काहीच सांगता येत नाही. त्यांना इतरही अनेक कामं असतात. चित्रपटक्षेत्रातलच बोलायचं तरीही प्रेस काॅन्फरन्सेस, मुलाखती, चालू घडोमोडींबद्दलच्या बातम्या, कधी गाॅसिप, अशा बऱ्याच गोष्टींबद्दल त्यांना लिहायचं असतं. काहीजण पेपरची संपादकीय कामं करतात, पान लावण्याची जबाबदारी घेतात, शिफ्ट्समधे कामं करतात. यात चित्रपटाचं रसग्रहण करण्याला ते महत्व तरी कितीसं देणार ? ज्यांना चित्रपटात विशेष रस असतो त्यांनाही हे सगळं सांभाळून समीक्षा करायला कितीसा वेळ होणार ? त्यात जेव्हा साधे एकरेषीय, कथाप्रधान चित्रपट असतात तेव्हा लिहीणं शक्य तरी असतं. पण अदिश केळूस्करचाकौल’, उमेश कुलकर्णीचाहायवेकिंवा मंगेश जोशीचालेथ जोशीयासारखे उत्तम पण त्यांच्या परिचयापलीकडे चित्रपट समोर येतात तेव्हा काय लिहायचं हा प्रश्न अवघड होतो. या लक्षवेधी चित्रपटांना वृत्तसमीक्षेत कशाकशाला तोंड द्यावं लागलं, ते जिज्ञासूंनी जरुर पहावं

मी असं पाहिलय, की चित्रपटाची आवड असणाऱ्या अनेक तरुण वृत्तसमीक्षकांना सिनेमाबद्दल एक इन्स्टींन्क्ट आहे. पण रिव्ह्यूज करण्याचं काम त्यांच्यावर अपेक्षितपणे आल्याने त्यांचा आवश्यक तो नाॅलेज बेस तयार नाही. ते नवीन फिल्म्स पहातात, पण थिअरीबद्दलचं , इतिहासाबद्दलचं काही वाचन करावं, किंवा काही महत्वाच्या दिग्दर्शकांच्या फिल्म्स पहाव्यात यासाठी जो वेळ द्यावा लागेल, तो आज त्यांना देता येत नाही. या सगळ्या अभ्यासाचा त्यांना पुढल्या शुक्रवारी जी फिल्म लागेल त्याबद्दल लिहिताना उपयोग होईल का ? तर नाही. पण ही माहिती, हे पहाणं-वाचणं यामधून त्यांचा दृष्टीकोन घडायला मदत होईल. आपण जे पहातोय त्याचा सांस्कृतिक संदर्भ त्यांच्या लक्षात येईलजो आपल्या लिखाणात त्यांना फायद्याचा ठरेल

जागतिक समीक्षकांमधे महत्वाचं नाव मानला जाणारा पुलित्झर पुरस्कार विजेता राॅजर इबर्ट याने आपल्याआय हेटेड, हेटेड, हेटेड धिस मुव्हीया पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हंटलय की पर्पज ऑफ मुव्ही क्रिटीक इज टु एन्करेज गुड फिल्म्स ॲन्ड डिस्करेज बॅड वन्स. ऑफ कोर्स, देअर इज मच डिसअग्रीमेन्ट अबाऊट विच इज विच.’ यातल्या पहिल्या वाक्याला जागत त्याने पुष्कळ उत्तम सिनेमाला प्रोत्साहन देण्याचं, आणि वाईट, किंवा त्याला आवडलेल्या सिनेमाला झोडून काढण्याचं काम केलं आहे. इतक्या हिरीरीने, की त्याने लिहिलेल्या चित्रपटाच्या चिंध्या करणाऱ्या रिव्ह्यूजचे तीन लोकप्रिय संग्रह आहेत. पण वरच्या उधृतातलं दुसरं वाक्य हे मला अधिक महत्वाचं वाटतं . तुम्ही विरोध करत असाल तो का याबद्दल तुमचं मत स्पष्ट हवं, आणि तो कोणत्या शब्दात करायचा, याचा विचारही तुम्ही करायलाच हवा, कारण तुम्ही ज्याला वाईट म्हणाल तो अखेर तुमच्या मतानुसार वाईट सिनेमा आहे. मग भले हे मत एजुकेटेड का असेना. विरोधी प्रतिक्रिया चालते, त्यावर विचारही होतो जेव्हा तुम्ही सभ्य शब्दात बोलता . नाहीतर अरेला कारे होणं स्वाभाविक आहे. समीक्षकाच्या भूमिकेतून जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा तुमच्या मताला एक वजन असतं, आणि या ऑथाॅरिटीच्या बळामुळे आपला विचार मांडताना तुम्ही वहावत जाण्याचीही शक्यता असते. ते होणार नाही याची खबरदारी आज घेणं आवश्यक आहे. इथेआजया शब्दाला अधिक महत्व आहे, कारण आज समीक्षेचं लोकशाहीकरण झालय. पूर्वी समीक्षक आणि प्रेक्षक या दोन पूर्णपणे वेगळ्या संस्था होत्या. प्रेक्षकाचं मत हे बाॅक्स ऑफिसवर दिसत असे, पण त्यापलीकडे ते तो सार्वजनिक रित्या शब्दात मांडत नसे. आज फेसबुक आणि ट्विटर यांनी प्रेक्षकांनाही समीक्षकाचं स्थान दिलय. आणि जेव्हा प्रत्येक जण समीक्षक असतो, तेव्हा कोणाच्याच मताला फारशी किंमत रहात नाही. आज जर समीक्षकाला आपलं स्थान जपायचं असेल, तर त्याने लिहिलेला समीक्षापर लेख आणि सर्वसाधारण  प्रेक्षकाने फेसबुकवर मांडलेलं मत यातला फरक वाचणाऱ्याला जाणवला पाहिजे. हे जितक्या प्रमाणात व्हायला हवं तितक्या होत नाही.

फेसबुकवर लिहिण्याच्या जागेची तशी अडचण नाही, जरी स्क्रोल करताना थांबून वाचक किती वाचेल याला मर्यादा आहे. इथे अभ्यासपूर्ण लेखन टिकेलच असं सांगता येत नाही, पण तुम्ही जर गंभीरपणे लिहित असाल , तर तुमचा वाचकवर्ग तयार होऊ शकतो. ब्लाॅग्जच्या माध्यमातून लिहिणं, आणि या लिंक्स फेसबुकवर टाकून प्रतिसाद आणि चर्चा यांना सुरुवात करणं , हेदेखील एक ऑप्शन आहे. याचा फायदा म्हणजे संपादकीय संकलन इथे टळतं. वृत्तपत्रात संभवणारी काटछाट, शीर्षकबदल, विशिष्ट कलाकृतीच्या बाजूने वा विरोधात असण्याची प्रकाशनाची भूमिका, या सगळ्याचा त्रास इथे लिहित्या व्यक्तीला  होत नाही, हा विशेष. सकारात्मक मार्गदर्शनही होत नाही, हा या माध्यमाचा तोटा

समीक्षा म्हणून गंभीरपणे घेता येईलशा लिखाणाला चित्रपट प्रदर्शनानंतर काही काळाने लिहिलं जाणं आणि त्यासाठी पुरेशी जागा घेणं आवश्यक असतं. असं केलं तर तत्कालिन समीक्षेच्या बंधनांमधे समीक्षक अडकत नाही. चित्रपट लागलेला असेल तर आपण त्याबद्दल फार लिहू शकत  नाही कारण त्यातून वाचणाऱ्याला चित्रपटाच्या पूर्ण कथाभागाचा अंदाज येऊ शकतो. चित्रपटाच्या रचनेवर, त्याच्या शेवटावर काहीही तत्कालिन समीक्षेत लिहिता येत नाही. या साऱ्याकडे नंतर पहाणं शक्य होतं. समीक्षेने चित्रपट बरा - वाईट सांगणं हा समीक्षेचा मर्यादित उपयोग आहे. त्यापलीकडे जात कलाविश्वातलं एखाद्या कलाकृतीचं स्थान पडताळून पहाणं, विशिष्ट चित्रपटाकडे किंवा चित्रप्रकाराकडे पहाण्याचा दृष्टीकोन तयार करणं, चित्रपटाची मांडणी किंवा त्यातले पटकथा, छायाचित्रण, दिग्दर्शन यासारख्या स्वतंत्र घटक यांचं विश्लेषण करुन पहाणं, अशा अनेक अंगांनी चित्रपटाचा वेध घेण्याची शक्यता असते. खूप जणांना वाटतं, तसं समीक्षा हे स्टार रेटींगवर सिनेमाला जोखणारं प्रगती पुस्तक असू शकत नाही

.

समीक्षेपलीकडे जाऊनही ब्लाॅग्ज, विविध ठिकाणची सदरं, आणि दिवाळी अंकामधे येणारे लेख यांमधून चित्रपटांवर बरच लिखाण होतं. चित्रपट हा तसा लोकप्रिय विषय आहे, त्यामुळे त्याला वाचक आहे. आता या लिखाणाचा दर्जा काय? बहुतेक वेळा लेखनाची लांबी, त्यांच्यातून तयार होणाऱ्या पुस्तकांच्या शक्यता, शिवाय लेखकाने स्वत: विषय निवडल्याने तो आवडीचा असणं, या गोष्टींमुळे यातलं बरचसं लिखाण हे निश्चितच काही एका गांभीर्याने केलेलं असतं. वृत्तसमीक्षा जशी काम म्हणून करण्याचं काही एक प्रमाण आहे, तसं इथे क्वचित दिसतं. त्यामुळे लेखनाच्या गुणवत्तेवर निश्चितच फरक पडतो. पण तरीदेखील यातलं सगळच लिखाण उल्लेखनीय म्हणता येईलसं नाही

चित्रपटांबद्दल कुतूहल, आवड ही आपल्या लेखकांमधे आधीपासून आहेच. त्यामुळे जरी समीक्षात्मक पद्धतीचं नसलं, तरी या माध्यमाबद्दलचं, आणि विशेषत: आपल्याला आवडणाऱ्या चित्रपटांबद्दलचं लिखाण अनेक साहित्यिकांनी केलेलं आहे. सुरुवातीच्या काळात रसग्रहणात्मक पद्धतीने कथा सांगणं, हा एक प्रकार आपल्याला दिसतो. त्यानंतर विविध चित्रपटांच्या निर्मितीबद्दलचा काहीसा रेकाॅर्डेड, तर काही दंतकथांच्या स्वरुपातला भाग या लेखांमधून आलेला दिसतो. यात बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांची माहिती, त्याच्या निर्मितीशी संबंधित लोकांविषयीच्या कथा, तत्कालिन सामाजिक वातावरण, चित्रपट एखाद्या पुस्तकावर आधारीत असेल तर त्याच्या रुपांतराचा प्रवास, या पद्धतीच्या कहाण्या यात येतात. स्मरणरंजनात्मक पद्धतीने आपल्या भारतीय चित्रपटांची आठवण काढणारीही पुस्तकं आहेत. कधीकधी विशिष्ट दिग्दर्शकांच्या कामाचा विचार दिसतो. यात चित्रपटांच्या मूलभूत संकल्पनांवर भाष्य करणारं, किंवा नव्याने काही विचार मांडणारं लिखाण जितक्या प्रमाणात हवं तितकं पहायला मिळत नाही. प्रभात चित्र मंडळाने चालवलेलं  ‘वास्तव रुपवाणी’  ( संपादन - सुधीर नांदगावकर / अभिजीत देशपांडे ) वगळता सातत्याने चित्रपटाबद्दलच्या गंभीर लिखाणाला वाहिलेली नियतकालिकंही मराठीत नाहीत. त्यामुळे आहे हे लिखाण विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात आहे. पूर्वी चित्रानंद , चंदेरी अशा किंवा अलीकडे तारांगण, प्रिमिअर अशी चित्रपटांबद्दलची नियतकालिकं आहेत पण त्यात गंभीर लिखाण क्वचित सापडतं. काही वेळा सदरांमधून, चित्रपट विशेषांकांमधून , किंवा दिवाळी अंकांमधूनही चित्रपटाबद्दल लिहिलं गेलं आहे. पण त्यातलं फार थोडं लेखन आवश्यक त्या संपादकीय संस्कारांसह पुस्तकरुपाने वाचकांपर्यंत आलेलं आहे. माणूसमधे आलेल्या चित्रपटविषयक लेखांचं संपादन झालेलं आहे, विविध ठिकाणी प्रकाशित झालेल्या काही सदरांची पुस्तकं स्वतंत्रपणे आलेली आहेत, पण रुपवाणीसारख्या मासिकातल्या लेखांचं संपादन अजून आवश्यक त्या प्रमाणात आलेलं नाही. माझा रुपवाणीबरोबर अनेक वर्षांचा संबंध आहे, त्यामुळे हे किती आवश्यक आहे हे मला दिसतं. अनेक मोठ्या साहित्यिकांनी, अभ्यासकांनी , दिग्दर्शकांनी चित्रपटांवर मांडलेले विचार या मासिकात येऊन गेले आहेत. यात प्रसिद्ध झालेल्या श्यामलाताई वनारसेंच्यासत्यजित राय आणि भारतीय मन्वंतरया राय यांच्या कारकिर्दीचा वेगळा विचार करणाऱ्या सदराचं पुस्तक झालं आहे. पण अरुण खोपकरांचं चित्रपटाबद्दलच्या मूलभूत संकल्पनांचा विचार करणारंचौकटीच्या आतबाहेरहे सदर, फिल्म थिअरीतल्या महत्वाच्या संकल्पना मांडणारं अभिजीत देशपांडेचं सदर, आणखी अशी कितीतरी सदरं, लेख अजून पुस्तक स्वरुपात उपलब्ध नाहीत

फिल्म थिअरीबद्दल आपल्याकडे एकूणच उदासीनता आहे. फिल्म थिअरी ही मुळात दोन प्रकारची आहे. गेल्या शतकाच्या पूर्वार्धातलं याबद्दल जगभरात झालेलं लेखन आज लिहिणाऱ्यांनी वाचायला हवं, कारण ते लेखन या माध्यमाबद्दलचे विचार मांडणारं आहे. चित्रपटाचा शोध लागल्यावर त्याची कथनात्मक रचना प्रचलित होणं, मूकपटांचा प्रवास, संकलनातले प्रयोग, चित्रपटातल्या ध्वनीचं शास्त्र, असं विविध चित्रप्रकारातलं मूलभूत काम घडत असताना सहभागी कलावंत, दिग्दर्शक आणि या  चित्रपटांचे अभ्यासक यांनी मांडलेल्या संकल्पना, या माध्यमाची ओळख आपल्याला नव्या प्रकारे करुन देतात. हे वाचन टाळलं, तर आपली समज अपुरी रहाण्याची शक्यता असते. शतकाच्या उत्तरार्धातलं थिअराॅटिकल लिखाण हे अधिक क्लिष्ट आणि माध्यमाचा विकास पूर्ण झाल्याने चित्रपट आणि तत्वज्ञान, जेंडर थिअरी, अशा माध्यमबाह्य विविध गोष्टींना स्पर्श करणारं आहे, जे वाचलं तर उत्तम, पण वाचल्याने आपली माध्यमसमज घसरेल असं काही नाही. आता प्रश्न उरतो की यातल्या कोणत्याच प्रकारचं लेखन आपल्याकडे फार का झालं नाही


अरुण खोपकरांनीगुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका’ (१९८५) हे पुस्तक लिहिताना त्यांचा थिअराॅटिकल बेस वापरला होता पण भारतीय संदर्भात त्याचा नव्याने विचार केला होता. आपल्याकडे तेव्हा ज्या प्रकारचं चित्रपटविषयक लेखन होत होतं, त्यापेक्षा हे खूपच वेगळं लेखन होतं. त्यापासून स्फूर्ती घेऊन नवीन काही लिहिण्याची संधी तत्कालिन समीक्षक/अभ्यासक/ लेखकांना होती. हा एक पायंडा पाडून दिलेला होता. पण दुर्दैवाची गोष्ट ही, की तब्बल तीस वर्षांनी त्याची नवी आवृत्ती २०१५ मधे आली तोवर या तोडीचं दुसरं मेजर समीक्षालेखन आपल्याकडे आलेलं नव्हतं. गुरुदत्त आणिचलत- चित्रव्यूहया खोपकरांच्या दोन पुस्तकांना आपल्याकडच्या चित्रपटविषयक लेखनात महत्वाचं स्थान आहे. त्याबरोबरच त्यांनी संपादीत केलेल्या भास्कर चंदावरकर यांच्या चित्रपटसंगीताबद्दलचे विचार मांडणाऱ्याचित्रभास्करया ग्रंथालाही. चंदावरकरांनी ज्याप्रमाणे आपल्या अनुभवातून चित्रभास्करमधले लेख लिहिले तसच त्यांच्या बरच आधी केशवराव भोळेंनी आपल्यामाझे संगीतमधे केलेलं लिखाणही विशेष आहे. पण त्याचा भर आठवणींवर अधिक आहे. दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत परंतू चित्रभास्करमधे अधिक अभ्यासपूर्ण मांडणी आहे

मराठीत पुस्तकस्वरुपात उपलब्ध असलेल्या लिखाणात चित्रपटांच्या इतिहासावरची पुस्तकं, हिचकाॅकपासून सत्यजित राय पर्यंत काही प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या कामाचा आढावा घेणारी पुस्तकं, सतीश बहादूर / चिदानंद दासगुप्ता/ एच एन नरहरी राव अशा इतर भाषेत लिहिणाऱ्या अभ्यासकांची काही भाषांतरीत पुस्तकं, विशिष्ट चित्रपटांच्या निर्मितीची कहाणी सांगणारी/ त्यांचं महत्व विषद करणारी काही पुस्तकं, काही विशिष्ट सूत्रांभोवती बांधलेले लेखसंग्रह अशी विविधता आहे, पण हे लिखाण पुरेसं वाटत नाही. त्यातून आता तर चित्रपटांबद्दल लिहिताना नवा पेच तयार झाला आहे

डिव्हीडी पायरसीने जगाचा सिनेमा आपल्यासमोर खुला करण्याआधी, आणि इन्टरनेटमार्फत माहितीचा तसच परभाषिक चित्रपटविषयक पुस्तकांचा खजिना आपल्यासमोर खुला होण्याआधी चित्रपटांबद्दल काहीही, म्हणजे समीक्षा किंवा इतरही लिहिणं एकाच वेळी सोपं आणि अवघड होतं. अवघड अशासाठी, की लिहिण्यासाठी काहीही पहाणं, त्यावर वाचन करणं यासाठी सोर्सेस फार कमी उपलब्ध होते. आणि सोपं अशासाठी, की मराठीत लेखन कमी असल्याने लेखकाला नवी मांडणी करण्याच्या शक्यता अधिक होत्या. आता सगळं उपलब्ध झाल्याने अशीही एक वृत्ती वाढीला लागली आहे की इन्टरनेटवरुन माहिती मिळवून ती जशीच्या तशी भाषांतरीत वा थोड्याफार बदलांसह रुपांतरीत करुन स्वतंत्र लेखन म्हणून खपवायची. जी माहिती कोणालाही इंग्रजीत सहज उपलब्ध आहे तीच मराठीत पुस्तकरुपाने आणण्यात काय मुद्दा आहे, पण हे प्रमाण आता वाढत चाललेलं दिसतय. ही सवय धोकादायक आहे जिच्यामुळे स्वतंत्र विचार मांडण्याची सवय दिवसेंदिवस कमी होत जाईल. माहितीचा जेव्हा सुकाळ होतो तेव्हा महत्व त्या माहितीला उरत नाही तर लेखक स्वत: काय इनसाईट मांडू शकतो याला येतं. हेच जर आपण लक्षात घेतलं नाही तर स्वतंत्र समीक्षेची अपेक्षा आपण कशी करु शकणार

गेल्या पंधरावीस वर्षातला प्रश्न हा अती उपलब्धतेचा आहे. पूर्वी आपल्याला मर्यादीत गोष्टी मिळत ही आपल्यापुढची अडचण होती. आता सारच उपलब्ध असल्याने आपल्या पहाण्याला, वाचनाला दिशा कशी द्यावी हा एक प्रश्न आहे. पूर्वी लिहिण्यासाठी सर्वांना संधी उपलब्ध नव्हत्या. आता फेसबुक सारख्या माध्यमातून प्रत्येक जण इतका आणि इतक्या विषयांवर लिहितो की त्याला थांबून आपल्या कल्पनांचा संपूर्ण विचार करायला फुरसत मिळत नाही. वाचक इतक्या गोष्टी वाचतायत की दरेक गोष्टीकडे पहायचा त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतोय. या सगळ्यात लिहिणाऱ्यांनी वाचणाऱ्यांनी एक पाॅज घेण्याची , आपण जे लिहितोय, वाचतोय त्याकडे नव्याने बघण्याची गरज आहे. चित्रपट हा मुळातच प्रत्येकाला इतका जिव्हाळ्याचा, हक्काचा विषय वाटतो, कीत्यावर मत मांडताना कसला विचार करायचा?’, हा ॲटीट्यूड बळावतोय जो धोकादायक आहे. तो जितक्या लवकर नाहीसा होईल, तितकं समीक्षेला बळ येईन, त्यात नवे आवा ज येतील, नव्या महत्वाकांक्षेसह येतील. पण हे कधी होईल

या प्रश्नाचं सध्या दिसणारं उत्तर फारसं आशादायक नाही


-गणेश मतकरी


0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP