नेटफ्लिक्स वर दिसणाऱ्या दोन मालिका ‘आफ्टर लाईफ’ आणि ‘द कोमिन्स्की मेथड’ यांच्यात थेट संबंध आहे असं काही म्हणता येणार नाही. काही वरवरच्या गोष्टी आहेतही. दोन्ही मालिका काॅमेडी आणि ड्रामा, या दोन चित्रप्रकारांची सरमिसळ करतात. हातून निसटलेल्या कशाचातरी शोध, या दोन्हीतल्या प्रमुख व्यक्तिरेखांना आहे. दोन्ही मालिकांचे आजवर दोन सीझन आलेले आहेत. कोमिन्स्कीच्या दर सीझनमधे आठ भाग आहेत, तर आफ्टर लाईफ च्या सहा. दोन्हीही मालिकांच्या भागांची लांबी ही साधारण अर्ध्या तासाच्या आसपास आहे. पण यापलीकडे जाऊन एक मोठं साम्य या दोन्ही मालिकांमधे आहे. अतिशय प्रेम असलेल्या पत्नीच्या मृत्यूनंतर निराशाग्रस्त झालेल्या पतीने पुन्हा एकदा आयुष्याकडे वळणं, हा दोन्ही मालिकांच्या कथानकातला महत्वाचा धागा आहे. कोमिन्स्कीमधे दोन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत, सॅन्डी कोमिन्स्की( मायकल डग्लस) हा ॲक्टींग कोच, आणि त्याचा मित्र आणि एजन्ट नाॅर्मन न्यूलॅन्डर (ॲलन आर्कीन ). या दोघांतल्या नाॅर्मनच्या व्यक्तीरेखेचा प्रवास हा संपूर्णपणे या अंगाने होतो. आफ्टर लाईफ मधे हा धागा, हेच संपूर्ण कथानक आहे.
टोनी जाॅन्सन ( रिकी जव्हेस) हा वार्ताहर ‘आफ्टर लाईफ’ मालिकेच्या केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा. टोनी एका छोट्याशा गावात, छोट्याशा लोकल पेपरमधे काम करतोय. त्याचा मेव्हणा मॅट ( टाॅम बॅसडेन) हाच पेपरचा संपादक आहे. टोनीची पत्नी लिजा ( केरी गाॅडलीमन)कॅन्सरने वारल्यापासून त्याची जगण्याची इच्छाच संपलेली. मॅट आणि काही जवळचे त्याला निराशेच्या खोल गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत पण काहीच उपयोग नाही. टोनीचं या परिस्थितीत जगत रहाणं, आयुष्यात त्याला काही सकारात्मकता सापडणं, हाच मालिकेचा विषय आहे. रिकी जव्हेस हा लोकप्रिय विनोदी नट आहे खरा, पण या विषयावर आधारीत मालिकेत विनोदाला काय स्थान असणार, असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. तर यात विनोद आहे, आणि तो जोडलेला आहे आयुष्यातल्या विसंगतींशी. तो केवळ शाब्दिक नाही, आणि खो खो हसवणारा तर अजिबातच नाही. तो तयार होतो तो योगायोग, व्यक्तिरेखांचे प्रकार, टोनीची मनस्थिती सुधारण्यासाठी केलेले आणि फसलेले प्रयत्न, अशा नैसर्गिक/ अपेक्षित गोष्टींमधून. विनोदासाठी केलेली म्हणण्याजोगी एक हमखास जागा आहे ती म्हणजे टोनी लिहित असलेल्या बातम्या. तो काम करत असलेला पेपर छोटा असल्याने गावातल्याच बातम्या त्यात अधिक असतात आणि त्यातही कोणी वयाची शंभरी गाठली, कोणाला लाॅटरी लागली, यासारख्या बातम्या कौतुकाच्या सुरात छापण्याचं काम टोनीकडे आहे. टोनीचा स्वत:चा दृष्टीकोन, बातमीतल्या व्यक्तीचा/ विषयाचा विक्षिप्तपणा, तसच टोनी आणि त्याचा फोटोग्राफर लेनी (टोनी वे) यांच्यातल्या संवादातले चढउतार, यांमुळे हे मुलाखतींचे प्रसंग विशेष गंमतीदार वाटतात.
‘द कोमिन्स्की मेथड’ आणि ‘आफ्टर लाईफ’ यातली तुलना मी आणखी एका कारणासाठी केली आणि ती म्हणजे अमेरिकन मालिका आणि ब्रिटीश मालिका यांमधला फरक त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतो. कोमिन्स्कीला गोष्ट आहे. त्यातल्या व्यक्तीरेखांचं काय चाललय, काय घडतय, मालिका कुठून कुठे चाललीय , याबद्दलचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यात दिसतो. आफ्टर लाईफ ही संपूर्णपणे व्यक्तीकेंद्रीत आहे. प्रेक्षकांच्या मालिकेकडून काय अपेक्षा असतील हा विचार इथे दिसत नाही. मालिका काही घडवायबिडवायचा प्रयत्न करत नाही. ती फक्त टोनीच्या आयुष्याकडे संवेदनशील नजरेने पहात रहाते. अमुक वेळात प्रेक्षक हसणं, हे तिच्यासाठी महत्वाचं नाही. प्रेक्षकाला अंतर्मुख करण्यालाही ती तितकच महत्व देते. मला या दोन्ही मालिका आवडतात, पण ‘द कोमिन्स्की मेथड’ मागे व्यावसायिक समीकरणं आहेत, आणि ‘आफ्टर लाईफ’, अधिक मोकळी, अधिक खरी आहे, हे माझं मत आधीपासूनच आहे.
‘आफ्टर लाईफ’च्या प्रत्येक भागाचा एक ठराविक ढाचा आहे. तिचा दर भाग, हा टोनीच्या आयुष्यातला दिवस जसा उलगडेल तसा उलगडतो. टोनीचं सकाळीच लिजाची आठवण काढत तिचे व्हिडिओ पहात रहाणं, कुत्र्याला फिरवणं, ऑफिसमधले प्रसंग, बातमीसाठी फिरण्याचे प्रसंग, असं काय काय. दोन ठिकाणी त्याचा भावनिक प्रवास आपल्याला दिसतो. पहिलं ठिकाण आहे, ते त्याच्या वडिलांना ठेवलय तो वृद्धाश्रम. त्यांना स्मृतीभ्रंश झालाय आणि लिजाचं जगात नसणंही ते विसरुन गेले आहेत. टोनीलाही ते क्वचितच ओळखतात. त्यांच्याशी होणाऱ्या संभाषणाबरोबर टोनीची इथे गाठ पडते ती एमा ( ॲशली जेन्सन) या नर्सशी. त्यांची ही मैत्री आपण हळूहळू पुढे सरकताना पहातो. टोनीची दुसरी मैत्रीण आहे ती स्मशानात त्याला भेटणारी ॲन ( पेनेलपी विल्टन ). आपल्या बायकोची आठवण काढायला टोनी रोज स्मशानात जातो, तिथे ॲन तिच्या गेलेल्या पतीची आठवण काढत बसलेली असते. टोनी आणि एमा यांचे प्रसंग टोनीला एका अंगाने जगण्याशी बांधून ठेवतात, तर टोनी आणि ॲन यांचे दुसऱ्या अंगाने. ॲनशी बोलताना टोनी जगाचा अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करायला लागतो. या सगळ्याबरोबरच आणखी एक पात्र मालिकेत महत्वाचं आहे आणि ते आहे लिजाचं. टोनी आणि लिजाच्या आयुष्यातले अनेक प्रसंग, आनंदाचे, तसेच तिच्या आजारादरम्यानचेही, टोनीने व्हिडिओ शूट केले आहेत आणि तो त्या क्लिप्स वेळीअवेळी लॅपटाॅपवर पहात बसतो. खरे आनंदाचे क्षण आपल्याला इथेच दिसतात. पण त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्याला टोनीची खरी ओळख इथे होते. त्याचा वर्तमान समजून घ्यायचा, तर हा भूतकाळ लक्षात घेणं आवश्यक ठरतं.
वास्तववादी चित्रपटांचं एक असतं, की ते कृत्रिम नाट्यपूर्णतेपेक्षा अस्सल निरीक्षणावर भर देतात. जे चित्रपटाला खरं, ते मालिकेलाही. हे निरीक्षण हाच या मालिकेचा वेगळेपणा आहे. स्वत: लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत असलेला रिकी जव्हेस हा विनोदी नट असून, आणि मालिकेत विनोदाचा अंत:प्रवाह असूनही यात कोणीही खास विनोदनिर्मितीचा प्रयत्न करत नाही, उलट या प्रसंगांमधे वास्तवाच्या चौकटीत जे घडू शकेल ती त्यांनी घालून घेतलेली मर्यादा आहे. ‘आफ्टर लाईफ’च्या पहिल्या सीझनबद्दल जितक्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या तेवढ्या दुसऱ्या सीझनबद्दल आल्या नाहीत, कारण काही दुय्यम पात्रांच्याआयुष्यातल्या घटना , आणि रिकीचं एक पायरी पुढे जाणं, यापलीकडे काही विशेष त्यात घडलं नाही. मला विचाराल, तर हे न घडणं हेच मी विशेष मानतो. ते घडवण्याचा मोह शक्य होता, कारण मालिकेतल्या पात्रांचं जग आता छान विस्तारलं आहे, आपली त्यांच्याशी ओळखही बरीच झाली आहे. अशा वेळी मालिकेने गती घेणं अनपेक्षित नव्हतं. पण जव्हेसने हे टाळून टोनीच्या पात्रामधला बदल हा जेवढ्यास तेवढा, आणि प्रामाणिक ठेवला आहे. फार विशेष काही न घडता सिट काॅम्सना (म्हणजे सिचुएशनल काॅमेडीजना) काही घडण्याचा आभास असतो आणि त्या आभासाच्या आणि हास्यनिर्मितीच्या जीवावर त्या वर्षानुवर्ष चालू रहातात. ते टाळल्यानेच इथला प्रयत्न पुरेसा गंभीर असल्याचं स्पष्ट होतं. मालिकेला तिसरा सीझन असावा असच रिकी जव्हेसचं मत आहे, आणि त्या मताला दुजोरा आहे. आतापर्यंतचा भाग हा अपूर्ण निश्चितच नाही, पण गतीशी तडजोड न करता त्यातली नाती पूर्णत्वाला जाऊ शकली, तर ते पहायला निश्चित आवडेल.
-गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment