चार महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस

>> Wednesday, March 5, 2008


1940 च्या सुमारास इटलीमध्ये जन्म घेतलेल्या एका नव्या चित्रप्रवाहाचं नाव होतं. नववास्तववाद. विस्कोन्तीच्या ओसेसिओने चित्रपटाने सुरू झालेल्या आणि पुढे रोझेलिनीच्या "रोम- ओपन सिटी' आणि विटोरिओ हे सिकाच्या "बायसिकल थिफ'ने जागतिक कीर्तीला पोचवलेल्या या प्रवाहातल्या चित्रपटांची खासीयत होती, ती चित्रपटांसाठी वेगळं नाट्य रचण्यापेक्षा आपल्या एरवीच्या आयुष्यातलं नाट्य पारखणं आणि ते बाहेर आणणं. सामान्य, गरिबीतलं, जिकिरीचं आयुष्य जगणारे नायक/नायिका आणि तितकेच सामान्य असणारे त्यांचे प्रश्न, यांचं त्यांच्या आयुष्यातलं समीकरण उलगडून पाहण्याचा प्रयत्न करणारे आणि प्रेक्षकाला निरुत्तर करणारे हे चित्रपट निश्चितच सर्व चित्रप्रेमींनी पाहायला हवेत असेच आहेत. नववास्तववाद प्रत्यक्षात दहा वर्षांच्या कालावधीनंतर संपुष्टात आला, असं मानलं जातं. मात्र त्याचे पडसाद या ना त्या स्वरूपात जगभर उमटत राहिले. अनेकदा याला अनुकरण म्हणता येणार नाही. मात्र त्या त्या देशांमध्ये या प्रकारच्या दृष्टीला पूरक परिस्थिती आपसूकच तयार होत गेली, असं म्हटलं तरी चालेल. मध्यंतरी आपल्या नवसामर्थ्याने सर्वदूर पोचलेला इराणीयन सिनेमा हा यायचं एक उदाहरण मानता येईल. सध्या हे लोण पोचलं आहे ते 1989 मध्ये कम्युनिस्ट राजवटीपासून मुक्ती मिळवलेल्या रुमेनियापर्यंत. गोव्यात झालेल्या अडतिसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद् घाटन करणारा "फोर मन्थ्स, थ्री वीक्स अँड टू डेज' हा चित्रपट याची साक्ष ठरावा. रुमेनियातल्या कम्युनिझमची पार्श्वभूमी असलेल्या सामान्य नागरिकांच्या कहाण्यांवर आधारित असणाऱ्या, अन् उपरोधाने "टेल्स फ्रॉम ए गोल्डन एज' असं भव्य नाव दिलेल्या चित्रपटमालिकेतला हा पहिलाच चित्रपट. दिग्दर्शक ख्रिश्चन मन्थ्यू. घटनाकाळ 1987. हा चित्रपट पाहताना मला त्याबद्दल जराही माहिती नव्हती. अगदी महोत्सवाच्या कॅटलॉगमध्ये छोट्या परिच्छेदात त्रोटकपणे लिहिलेली गोष्टदेखील मी वाचलेली नव्हती. ना विषय माहिती होता, ना चित्रप्रकार. आणि बहुधा ही गोष्टच चित्रपट माझ्यापर्यंत अधिकच चांगल्या रीतीने पोचायला कारणीभूत ठरली असावी. नावावरून चित्रपटाच्या विषयाची कल्पना येत नसली, तरी ते एक अत्यंत चपखल नाव आहे. अर्थात हेदेखील आपल्या लक्षात येतं ते थोड्या वेळानं. लगेच नाही. प्रकार मात्र लगेचच लक्षात यायला लागतो. गाबिता (लॉरा रासिल् ) आणि ओटिलिआ (आनामारिआ मारिंका) या दोघींची गोष्ट असलेला हा चित्रपट वास्तववाद आणि रहस्यपट यांच्या अजब मिश्रणाने सुरू होतो आणि हे रसायन तो शेवटच्या फ्रेमपर्यंत टिकवतो. होस्टेलमध्ये राहणाऱ्या या दोन मुली कुठेतरी जायच्या तयारीत आहेत, असं कळतं. कुठे ते मात्र कळत नाही. मग ओटिलिआ जाऊन आपल्या आदी नावाच्या प्रियकराकडून पैसे आणते आणि काही जुजबी गोष्टींची खरेदी करते. आदीलाही ती आपल्या योजनांबद्दल सांगणं नाकारते. मग एका हॉटेलमध्ये खोली मिळवायचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर दुसरीकडे खोली मिळवते आणि बेबे नावाच्या रहस्यमय माणसाला आणायला एका पूर्वनियोजित ठिकाणी रवाना होते. अनिश्चितता, सतत जाणवणारा आणि घटनांच्या गुंतागुंतीबरोबर वाढत जाणारा ताण आणि ओटिलिआच्या नजरेत होणारं अंतर्बाह्य परिवर्तन या तीन गोष्टी फोर मन्थ्समध्ये सर्वांत महत्त्वाच्या ठरतात. ढोबळमानाने पाहायचं तर ही एका बेकायदा गर्भपाताची गोष्ट आहे (चित्रपटाच्या नावाचा संदर्भ कसला आहे, हेदेखील यावरून स्पष्ट व्हावं), मात्र केवळ या एका दृष्टीने त्याकडे पाहणं अन्याय्यच नाही, तर तसं करणंही अशक्य आहे. प्रमुख व्यक्तिरेखांच्या अडचणींमधून तो नागरिकांना कम्युनिस्ट राजवटीत ज्या प्रकारचं भयभीत आयुष्य जगायला लागत असे त्याचं चित्र मांडतो अन् अप्रत्यक्षपणे राजकीय सूत्रांवर हल्ला चढवतो. समाज आणि त्यातलं स्त्रियांचं स्थान हा या चित्रपटाचा आणखी एक रोख. ओटिलिआ जेव्हा आदीच्या घरच्या पार्टीला हजेरी लावायला जाते, तेव्हा याची एक जोरदार झलक पाहायला मिळते. मानवी आयुष्याची क्षणभंगुरता अन् मृत्यूचं आपल्या आसपासचं असणंदेखील दिग्दर्शक प्रेक्षकांच्या लक्षात आणून देतो. चित्रपटातले प्रश्न, त्यातल्या व्यक्तिरेखा आणि जाणिवा या कायम वास्तववादाकडे झुकणाऱ्या राहतात, तर त्याच्या संहितेतले धक्के आणि वळणं, चित्रणशैलीचं चातुर्य आणि दृश्य संकल्पनेतला गडदपणा यांची सरमिसळ रहस्यपटाकडे बोट दाखवते. कथानक कायम गतिमान राहतं आणि आपल्याला पुढे काय होणार, या संभ्रमात सातत्याने ठेवतं. तणावाचं प्रमाण तर एखाद्या थ्रिलरला लाजवेलशा तयारीने येतं. दिग्दर्शक आपल्या रहस्यपटाचा बाज ठेवण्यासाठी काही सांकेतिक रहस्यकथांमधल्या क्लिशेंचाही वापर करतो. बेबेच्या गाबिता अन् ओटिलिआबरोबर झालेल्या वादानंतर ओटिलिआ हळूच त्याची बॅग तपासते आणि बंद करण्याच्या गडबडीत त्याचा चाकू तिच्याकडे राहतो. पुढे बेबे आपलं ओळखपत्र एका मोक्याच्या जागी विसरतो. खराखुरा रहस्यपट कदाचित या प्रकारच्या धाग्यांवरच मजबूत होत जाईल, पण फोर मन्थ्सचा मूळ अजेंडा रहस्यविषयक नसल्याने तो या सर्व घटकांचा तितक्या गंभीरपणे विचार करत नाही. त्यातले काही वापरतो, तर काही सहजपणे सोडून देतो. चित्रपट ज्या सत्य घटनेवरून स्फुरला आहे, त्या मूळ घटनेचा दाखला देत. चित्रणशैलीतला लांब सलग शॉट् सचा वापर ताबडतोब जाणवतो. इथे शक्य तेव्हा प्रसंग कुठेही न तोडता कॅमेऱ्याच्या आवाक्यातल्या अवकाशाचा वापर करत सुरवातीपासून शेवटपर्यंत चित्रित केले जातात. जेव्हा ते फारच मोठे असतात तेव्हाही जोडकाम जाणवणार नाही, अशा बेताने त्यांची मांडणी केलेली दिसून येते. मात्र याचा अर्थ संकलन नाही, असा नाही. इथे प्रत्यक्ष संकलन कमी आहे, आणि दिग्दर्शकाने मनातल्या मनात केलेलं संकलन, अधिक कॅमेरा कोणत्या रीतीने वळवून शॉटमधलं फ्रेमिंग बदलतं ठेवायचं, कधी कोणत्या पात्रांना कॅमेऱ्याच्या टप्प्यात ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवून प्रेक्षकाला केवळ संवाद ऐकवायचे, याचं एक निश्चित गणित इथे पाहायला मिळतं. अनेकदा दोनहून अधिक पात्रांच्या प्रसंगांत दिग्दर्शक प्रत्येक पात्राला दाखवून आपल्या सवयीला अन् संकलकाच्या चातुर्याला खाद्य पुरवत नाही, तर संवादाच्या अन् मुद्राभिनयाच्या गरजेनुसार तो महत्त्वाची पात्रं निवडून इतरांना पडद्यामागे राहणं भाग पाडतो. कॅमेरा अनेकप्रसंगी जराही हालचाल न करता कितीतरी वेळ जसाच्या तसा राहतो, मात्र यातली प्रत्येक जागा काळजीपूर्वक निवडलेली दिसते. आदीच्या घरच्या पार्टीदरम्यान आदी ओटिलिआ आणि आदीचे आई-वडील या चौघांचा असाच अनंतकाळ चालणारा शॉट या दृष्टीने अभ्यासण्यासारखा आहे. पडद्यावर उघड कलात्मक असं काही नाही. रांगेत बसलेली चार पात्रं आणि थेट समोर लावलेला कॅमेरा, डावी-उजवीकडे बसलेले पाहुणे, अर्धेमुर्धे दिसणारे वर वर नैसर्गिकपणे चालणारे संवाद आणि त्यातून नायिकेपर्यंत पोचणारे अर्थ, तिचं सतत आपल्या मैत्रिणीच्या काळजीत असणं, आदीचा हरवलेपणा आणि ओटिलिआविषयी वाटणारी सांकेतिक वळणाची काळजी, आणि इतरांचं स्वतंत्र विश्व या दृश्यात फार निश्चितपणे येतं. खेरीज आपल्याला माहीत आहे, की ओटिलिआने ताबडतोब घराबाहेर पडणं आवश्यक आहे. त्यामुळे तिचं या नको असलेल्या मेजवानीत अडकून राहणं हे कॅमेऱ्याच्या स्तब्धतेने अधिकच टिपेला पोचतं, आणि या तणावात आपण पुरते ओढले जातो. आनामारिआ मारिंकाचा अस्सल अभिनय आणि दिग्दर्शकाने निवडलेली दृश्य योजना यांमधून घेणारा परिणाम एरवीच्या दिग्दर्शकीय अन् संकलकीय क्लृप्त्यांच्या कितीतरी पलीकडे पोचणारा आहे. फोर मन्थ्सचा शेवट हा मी अर्थातच सांगणार नाही, पण तो आपल्याला सुन्न करून जातो. गर्भपाताच्या प्रत्यक्ष घटनेहून अधिक महत्त्व इथे आहे, ते ही घटना नायिकेला जे शिकवून जाते त्याचा. कान चित्रपट महोत्सवाला सर्वोच्च पुरस्कार पटकावून आलेल्या फोर मन्थ्सने आपल्याकडले सर्वच प्रेक्षक प्रभावित झाले असतील, असं मात्र नाही. त्याचा थेटपणा, त्रयस्थ राहूनही मानवी मनाच्या अंतरंगात शिरण्याची वृत्ती आणि आपल्या माणूसपणाआडचं मूलभूत सत्य उघड करण्याची धमक ही सर्वांना मानवणारी नाही. ज्यांना ती मानवेल त्यांनी मात्र हा चित्रपट जरूर पाहावा. निराशा होणार नाही.
-गणेश मतकरी

4 comments:

Meghana Bhuskute March 10, 2008 at 7:02 PM  

ajun ek post hoti ti kay zali? asa ka delete karun takal? mala wachaych hot na..

सिनेमा पॅरेडेसो March 10, 2008 at 11:42 PM  

tyat najarchuk kiva zapadamule mothi chuk hoti sandhrbhachi.
correction hoina. manun delet karun navayne takva lagla ahe.

Snehal Nagori March 13, 2008 at 12:25 AM  

khoop surekh zalay... khrach ha chitrapat baghitalyawar hich janeev hote ki wastawat ashya kiti tari goshti kititari wela ghadat astil pan tyachi dhag tyat guntalelya manasasathi farach teevra aste. kititari deshatle kititari kayde samanya manasacha aayushya mushkil karun taktat yachi udaharana kay thodi nahit.

vishay mandanyachi paddhat ani prekshakana khilawun thewachi takad yasathi director la salam...

हेरंब February 29, 2012 at 7:04 PM  

जब्बरदस्त लिहिलं आहे. लांबच लांब सीन्स, न हलणारा कॅमेरा, वातावरणातले ताण, मुख्य नायिकेचा मुद्राभिनय हे सगळंच विलक्षण तणावात टाकणारं आहेच आणि त्यावर कडी म्हणजे शेवट !!

चित्रपट संपतो तोवर आपण हादरून गेलेलो असतो. इतक्या अप्रतिम चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP