एक वास्तव परीकथा

>> Sunday, March 23, 2008

नागेश कुकनूरच्या चित्रपटांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या त्रुटी विसरूनही त्याला दोन गोष्टींचं श्रेय अवश्य द्यावं लागतं. एक तर परदेशस्थ भारतीयांचे चित्रपट, असा जो चित्रपटांचा उपप्रकार आपल्याकडे तयार झाला, ज्याने क्रॉसोव्हर फिल्म्सना सुरवात केली, तो सुरू करणाऱ्या तीन चित्रपटांतला एक म्हणजे "हैदराबाद ब्लूज' त्याचा होता. उरलेले दोन, म्हणजे देव बेनेगलचा "इंग्लिश ऑगस्ट' आणि कैझाद गुस्तादचा बॉम्बे बॉईज'. दुसरं म्हणजे या दिग्दर्शकांत ओरिजिनॅलिटी आहे. तो जे काय करतो ते स्वतंत्रपणे. बॉलिवूडमध्ये ट्रेंड कोणते आहेत, किंवा तिकीट-खिडकीवर चाललेला शेवटचा चित्रपट कसा होता, किंवा जागतिक चित्रपटांच्या कोणत्या डीव्हीडी अजून हिंदीत शिरलेल्या नाहीत, वगैरे प्रश्न त्याला पडत नसावेत. त्यामुळे त्याचे चित्रपट हे त्याच्या गतीने आणि मनाप्रमाणे बनत असतात. त्याची इतरांबरोबर स्पर्धाच नसल्याने त्याला इतर दिग्दर्शकांच्या यशापयशाचा हिशेब ठेवण्याची गरज वाटत नसावी. "इकबाल'च्या आधीच्या नागेशच्या चित्रपटांनी त्याला एक नाव म्हणून प्रेक्षकांच्या ओळखीचं बनवलं असलं, तरी आतापर्यंतचा त्याचा कोणताच चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकांनी आपला म्हटला नव्हता. हे अमुक एका वर्गातल्या प्रेक्षकांसाठी बनतं, आणि तोच प्रेक्षक त्यांचा आश्रयदाता ठरे. इतरांना हे चित्रपट फार झेपत नसत. वैयक्तिकदृष्ट्या सांगायचं, तर मलाही ते कधी फार आवडले नाहीत. कदाचित त्यामुळे असेल, पण "इकबाल' प्रदर्शित झाला तेव्हा माझ्या त्यापासून फार अपेक्षा नव्हत्या. क्रिकेटवर "लगान'नंतर काही अधिक वेगळं पाहण्यात येईल, यावर माझा विश्वास नव्हता. "इकबाल' हे नुकत्याच येऊन गेलेल्या "मकबूल'शी साम्य असणारं नाव का दिलं, हे कळायला मार्ग नव्हता, आणि चित्रपटाच्या पोस्टरवरल्या चेहरा न दाखवणाऱ्या नायकाच्या प्रतिमेवर "प्लटून'च्या पोस्टरची छाप होती. या गोष्टीही माझं नागेशच्या नव्या चित्रपटाबद्दलचं मत सुधारायला फार उपयुक्त नव्हत्या. समीक्षकांची उत्तम परीक्षणं येऊनही हा पूर्वग्रह कमी झाला नाही, कारण नागेश हा तसाही समीक्षकांचा लाडकाच, त्यामुळे त्याच्या चित्रपटांना मिळणारं कौतुकही फार अनपेक्षित नाही. खरा अनपेक्षित होता तो चित्रपटच. तो सुरू होताच पहिल्या पाच मिनिटांत मी त्याच्यात गुंतून गेलो, आणि तो कधी संपला हे मला कळलं नाही. "इकबाल' हा एक अल्टिमेट फिलगुड चित्रपट आहे. तो बॉक्स ऑफिसच्या नियमांना धरून जात नाही. त्यातल्या व्यक्तिरेखा या अतिशय खऱ्या आणि कोणत्याही व्यावसायिक हिंदी चित्रपटांत न आढळणाऱ्या आहेत. त्याला सांकेतिक अर्थाने नायिका (म्हणजे नायकाची प्रेयसी या अर्थी. कारण इकबालची बहीण खदिजा ही कोणत्याही नायिकेपेक्षा कमी नाही.) नाही, आणि नायकही खेडेगावातला साधासा मुका-बहिरा मुलगा आहे. (याची "ब्लॅक'बरोबर कोणत्याही प्रकारे तुलना योग्य होणार नाही. कारण ब्लॅक हा परदेशी दिग्दर्शकांच्या प्रभावाखाली, परदेशी प्रेक्षकांचा विचार करून मांडलेला तद्दन खोटा डोलारा होता. इकबाल हा अस्सल भारतीय आहे. त्याच्या संकल्पनेपासून व्यक्तिरेखांपर्यंत सर्वच बाबतींत कदाचित त्यामुळेच तो जागतिक चित्रपटांना अधिक जवळचा आहे.) इकबाल (श्रेयस तळपदे) एका छोट्या खेडेगावात आपल्या आई (प्रतीक्षा लोणकर), वडील (यतीन कार्येकर) आणि बहिणीबरोबर (श्वेता पंडित) राहतो. ऐकू किंवा बोलू न शकणाऱ्या इकबालमध्ये क्रिकेटचं वेड आलंय आईकडून, जे त्याच्या वडिलांना बिलकुल पसंत नाही. तो अठरा वर्षांचा घोडा झाल्यामुळे आता त्यानेही आपल्याबरोबर शेतावर कामाला यावं, ही त्यांची माफक आणि रास्त अपेक्षा. इकबाल मात्र भारतीय टीममध्ये बोलर म्हणून जाण्याची स्वप्नं पाहतोय. स्वप्नंच ती. कारण प्रत्यक्षात त्या दृष्टीने आजवर त्याने काहीच हालचाल केलेली नाही. नाही म्हणायला गावात कोचिंग करणाऱ्या हिशेबी गुरुजींना (गिरीश कर्नाड) लांबून पाहत, एकलव्य स्टाईल धडे गिरवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. गुरुजींचं बोलणं खुणांच्या भाषेत इकबालला सांगून कंटाळलेली खदिजा शेवटी गुरुजींनाच विश्वासात घेते आणि इकबालचं आपल्या प्रवासावरलं पहिलं पाऊल पडतं. पण लवकरच एका श्रीमंत विद्यार्थ्याशी पंगा घेतल्यामुळे त्याची हकालपट्टी होते, आणि सगळं घरच निराश होतं. अर्थात वडील सोडून. कारण हे सगळे प्रयत्न त्यांना अंधारात ठेवूनच सुरू असतात. या संकटावर अचानक मार्ग मिळतो तो दारूड्या मोहित (नसरुद्दीन शहा) च्या रूपाने. आता दारूत स्वतःला बुडवून ठेवणारा मोहित एके काळचा उत्तम बोलर असतो, आणि त्याच्यावर ही पाळी येण्याला अप्रत्यक्षपणे गुरुजीच जबाबदार असतात. इकबालमधली सर्वांत जमलेली गोष्ट म्हणजे त्यातलं वास्तव आणि परीकथेचं मिश्रण. खऱ्या आयुष्यात या खेळामधलं आणि एकूणच समाजव्यवस्थेतलं राजकारण व इतर अनेक अडचणी पाहता या चित्रपटासारख्या घटना प्रत्यक्षात उतरणं अशक्यच; पण इकबाल पाहताना हे आपल्याला शक्यतेच्या कोटीतलं वाटतं आणि तेदेखील त्याचा इतर सर्व बाज हा पूर्णपणे कल्पित नसताना. शेतकऱ्यांची दुरवस्था, क्रिकेटमधला भ्रष्टाचार, खेड्यातलं वातावरण, या गोष्टींना ही कथा जरूर स्पर्श करते, मात्र आपला सकारात्मक चित्रणाचा मूळ हेतू ध्यानात ठेवूनच. नागेश कुकनूरने आपला मिस्कीलपणा आणि दृश्य भाषा यांनी इकबालला जिवंत केलंय. इथला विनोद हा पूर्णपणे नैसर्गिक, अकृत्रिम आहे आणि त्यासाठी विनोदी पात्र घालण्याची गरज कुठेही भासलेली नाही. म्हशींना दिलेली क्रिकेटर्सची नावं, ओठांच्या हालचाली आणि खुणांची भाषा समजण्यातल्या अडचणी, इकबालच्या वडिलांपासून क्रिकेटसंबंधी सर्व गोष्टी लपवण्याचे प्रयत्न, मोहितवरचा दारूचा अंमल आणि त्याची खदिजाबरोबरची खडाजंगी, अशा अनेक जागी हा विनोदाचा वापर दिसून येतो. आपल्या दृश्य भाषेत दिग्दर्शकाने गोष्टीला भव्यपणा आणून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सामान्यांमधल्या असामान्यत्वाच्या या गोष्टीत प्रामुख्याने क्रिकेट हे या असामान्यत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे जिथे क्रिकेटसंबंधीचे प्रसंग येतात, तिथे चित्रणशैलीही बदलत राहते. टॉप अँगल्स, लो अँगल्स, हळुवार सरकत जाणारा कॅमेरा, जलद संकलन, विविध लेन्सेसचा वापर, आणि त्या सगळ्याची संगीताबरोबरची सांगड, यामुळे इकबालसाठी असलेलं क्रिकेटचं महत्त्व आणि या खेळामधली या कुटुंबाला मदत करण्याची शक्ती, या दोन गोष्टी अधोरेखित होतात. याची लक्षात येण्याजोगी दोन उदाहरणं म्हणजे, आपल्या फांद्या तासून बसवलेल्या स्टंम्प्सना घेऊन इकबाल पहिल्यांदा बोलिंग करताना दिसतो तो, आणि चित्रपटाचा शेवट. हा शेवट चित्रपट बरोबर जिथे संपायला हवा तिथेच येतो. त्या दृश्याच्या थोडंफार पुढंमागं सरकण्यानंही परिणाम कमी होण्याची शक्यता होती. सर्वच व्यक्तिरेखांचं सखोल चित्रण फार कमी चित्रपटांत आढळतं. इकबालच्या विरोधातल्या श्रीमंत मुलाचा अपवाद वगळता इथल्या सर्वच व्यक्तिरेखा हाडामांसाच्या आहेत. गुरुजी आणि वडिलांचं काम थोडं कमी आहे, पण लक्षात राहतात सर्वच जण. श्रेयस तळपदेसाठी हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे, आणि त्याने यातल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. अनेक प्रसंगांत त्याचा वावर इतका आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी आहे, की त्या भूमिकेची संवाद नसणं, ही मर्यादा आपण विसरून जातो. नसिरुद्दीन शहा आणि श्वेता पंडित यांच्या भूमिका त्याच्या बरोबरीने परिणामकारक ठरतात. क्रिकेट म्हणताच आपल्याला लगानची आठवण येणं साहजिक आहे, पण लगानहून हा चित्रपट खूपच वेगळा आहे, आणि तरीही यात क्रिकेट केवळ तोंडीलावणं म्हणून वापरलेलं नाही. संहितेत येणारे खेळाचे संदर्भ हे जाणकाराने लिहिल्यासारखे आहेत. खेळाचा पवित्रा ठरविणं, खेळाडूंचा आर्थिक दृष्टिकोन, भ्रष्टाचार यामुळे इथली खेळाची बाजू, ही लगानहून अधिक आधुनिक आहे. यामुळे लगानचं महत्त्व कमी होत नाही. ते आहेच. इकबाल हा असा चित्रपट आहे, की ज्याच्या प्रेक्षक वर्गाला मर्यादाच नाही. समाजाच्या सर्व थरांना तर तो आपला वाटेलच, वर त्यातला संदेश हा जागतिक असल्याने त्याला भाषेचीही मर्यादा नाही. थोडीफार अधिक रेखीव असली, तरी त्याची शैली ही बऱ्याच प्रमाणात इराणी चित्रपटांच्या आणि खासकरून मजिद मजिदींच्या चित्रपटांची आठवण करून देणारी आहे. या प्रकारच्या चित्रपटांना ऑस्करच्या पाच नामांकनांत येण्याची संधी असते. (जरी अधिक प्रभावी राजकीय व सामाजिक बाजू मांडणाऱ्या चित्रपटांमुळे अंतिम पुरस्काराला ते बहुधा पात्र ठरत नाहीत.) अर्थात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणं वा न मिळणं, हा दुय्यम भाग झाला. इकबालच्या निर्मितीत तरी असा विदेशी प्रेक्षकांना भुलवण्याचा प्रयत्न दिसत नाही.

-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

1 comments:

मोरपीस March 26, 2008 at 4:35 AM  

फ़ार छान आहे इकबाल

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP