शाळेच्या आवारात पोचवणारा ः ब्रिक
>> Friday, March 28, 2008
चित्रपट जसे अनेकदा काही कथानक, काही व्यक्तिरेखा यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न रिमेक्स किंवा सिक्वल्समधून करताना दिसतात, त्याचप्रमाणे काही चित्रप्रकारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्नही ते विविध मार्गांनी करताना दिसतात. एखाद्या चालू यशस्वी चित्रप्रकारावर तोच तोचपणाची पुटं चढल्यावर जसा एखादा दिग्दर्शक त्यात नव्या जागा शोधून प्राण फुंकू पाहतो, त्याचप्रमाणे कधी कधी काळाच्या पडद्याआड गेलेल्या सिनेशैलीलाही कोणी पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोचवू पहातं... ऑलिव्हर (1968) नंतर विस्मृतीत गेलेल्या म्युझिकल्सना पुन्हा आपल्या बहारदार रूपांत पेश करण्याचा बज लुहरमनचा प्रयत्न हे याच तऱ्हेचं एक उदाहरण म्हणता येईल. पण लुहरमनने काळानुसार म्युझिकलची गती किंवा रंगरंगोटी बदलली असली, तरी काही अगदीच वेगळा प्रयोग त्यात संभवत नव्हता. असा प्रयोग करणारे दोन चित्रपट पटकन आठवतात. मस्तवाल गुंडांऐवजी अगदी लहान पोरांना उभं करून बनवलेलं गॅंगस्टरपटांचं वेगळं रूप बग्जी मलोन (1976) आणि रहस्यप्रधान गुन्हेगारी विश्वाला रचना, व्यक्तिरेखा आणि संवादांसकट कॅलिफोर्नियातल्या एका शाळेच्या आवारात पोचवणारा ब्रिक (2005).
हॅमेट चॅंडलरच्या साहित्यकृती किंवा "मालीज फाल्कन', बिग स्लीप' यासारख्या चित्रपटांशी परिचय असणाऱ्यांना मी कोणत्या साच्याबद्दल बोलतोय हे अचूक ध्यानात येईल. ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातले हे अट्टल गुन्हेगारीपट भ्रष्ट शहरातल्या एकाकी धाडसी गुप्तहेरांची साहसं प्रेक्षकांसमोर मांडत प्रत्येक पात्रावर आळीपाळीने येणारा संशय, कट कारस्थानांचा गुंता, अनपेक्षित उत्तरं आणि स्वच्छ काळ्या-पांढऱ्या प्रवृत्तींना बाजूला सारणारा ग्रे शेडसचा मुबलक वापर ही या चित्रपटांची जशी वैशिष्ट्यं, तसेच त्यातले संवादही एका गुजऱ्या जमान्याशी नातं सांगणारे हे संवाद, त्यांची लय आणि खास वेगळ्या शब्दांचा वापर यासाठीही लक्षात यावेत असे. या सर्व गोष्टी आजच्या काळात तेही वयोगट सरसकट बदलून आणायच्या, आणि परिणाम मात्र तसाच ठेवायचा हे काम वाटतं जेवढं सोपं नाही. खास करून दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असेल तर. दिग्दर्शक रियान जॉन्सन यांचा "ब्रिक' हा 1929 ते 1934 च्या दरम्यान लिहिलेल्या डॅशेल हॅमेटच्या गुन्हेगारी कादंबऱ्यांवर आधारित आहे. मात्र ही परिअड फिल्म नाही. चित्रपटाचा काळ आहे तो आजचाच. आणि एका दृष्टीने तो पटण्यासारखाही आहे. चित्रपटाचा पहिलाच प्रसंगी आपल्याला नायक ब्रेंडन (जोसफ गॉर्डन-लेव्हिट) आणि त्याची काळजी (म्हणजे दोनेक महिन्यांपूर्वीपर्यंतची) मैत्रीण एमिली यांना भेटवतो. एमिलीचा खून झालेला आहे. एका नाल्यात तिचं प्रेत पडलेलं आहे, आणि ब्रेंडन ते वरवर शांतपणे पाहतो आहे. त्याची अस्वस्थता मात्र आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी आहे.
ब्रिक यानंतर दोन दिवस मागे जातो. ब्रेंडनला एमिलीचा एक फोन येतो ज्यात ती त्याची मदत मागते, आणि ती देऊ करण्यासाठी ब्रेंडन एमिलीला शोधत राहातो. शाळेत अमली पदार्थ पुरवणाऱ्या एका श्रीमंत मुलांच्या गटाशी तिची मैत्री असल्याचं कळताच तो हुशारीने या गटातल्या लॉराच्या पार्टीमध्ये प्रवेश मिळवतो.
तिथे ब्रॅड या सिनिअर मुलांशी पंगा घेतो. दुसऱ्या दिवशी तळागाळात अमली पदार्थ पुरवणाऱ्या डोडला धमकावतो. आणि कशीबशी एमिलीशी भेट मिळवतो. मात्र ही भेट त्याला फार उपयोगाची ठरत नाही. एकतर आता तिला त्याची मदत नको असते. त्यातून तिच्या बोलण्यातूनही साऱ्या गोष्टी त्याला नीटशा कळत नाहीत. तेवढ्यापुरता ब्रेंडन तिला जाऊन देतो, पण या गोष्टीचा पुढे त्याला पश्चात्ताप होतो. दुसऱ्याच दिवशी एमिलीचा मृत्यू होतो. आता ब्रेन्डन पूर्णपणे डिटेक्टीव्ह मोडमध्ये जातो. एका रिकाम्या भिंतीपुढे सारा वेळ मांडी घालून बसणाऱ्या ब्रेनच्या मदतीने तो या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा छडा लावतो. एमिलीच्या मृत्यूला कोण जबाबदार हे रहस्य उलगडतो आणि संबंधितांचा नायनाट करतो.
"ब्रिक' हा लो बजेट चित्रपट आहे, पण त्याचं कमी बजेट तो कुठेही जाणवू देत नाही. त्यातला विस्मृतीत गेलेल्या शैलीचा वापर, तो प्रत्येक प्रसंगावर सारखीच पकड ठेवून करताना दिसतो. अर्थात चित्रपट रंगीतच आहे, पण त्यातला वेगळेपणा आहे तो काळजीपूर्वक दृश्यरचनांमध्ये आणि सतत वापरलेल्या निळसर रंगछटेमध्ये अनेक प्रसंग अंधाऱ्या जागांमध्ये घडत असल्याने तिथे तो प्रकाशयोजनांमध्येही वेगवेगळे प्रयोग करत असल्याचं जाणवतं. एकच उदाहरण म्हणजे ब्रेंडनला ब्रिकचा शोध लागतो. तो प्रसंग. हा शोध लागतो. तळघरातल्या एका अंधाऱ्या खोलीत. विविध प्रकारचं सामान पडलेली ही खोली निळसर अंधाराने भरलेली आहे. दिवा चालू नाही. पण एका झरोकेवजा खिडकीतून एक प्रकारची तिरीप येतेय. मग ब्रेंडन कोपऱ्यातल्या एका उंच आरशाला खोलीच्या मध्यभागी आणतो. आणि ती तिरीप परावर्तीत करून सगळी खोली शोधतो. एकूण रंगसंगती आणि प्रकाशयोजना या सर्वच दृष्टीने हा प्रसंग लक्षवेधी ठरतो.
संवादांमध्ये मूळ लय सांभाळल्याने आणि स्लॅंगचा एरवीपेक्षा अधिक वापर केल्याने प्रेक्षक सुरवातीला थोडे बिचकतात. पण साधारण विसेक मिनिटांनी आपल्याला भाषेची सवय होते आणि थोडी गंमतही वाटायला लागते. ब्रिकमधील पात्रयोजना पाहिली तर गुन्हेगारी कादंबऱ्यांचा प्रभाव अधिक जाणवतो. डिटेक्टिव्ही (ब्रेंडन) रहस्यमय सौंदर्यावती (लॉरा), खरभ्या (ब्रेन) गुन्हेगारी टोळीचा प्रमुख (पिन), त्याचा भडक डोक्याचा हस्तक (टग) शोगर्ल (कारा) आणि संशय घेण्याजोगा दुय्यम खलनायक (डोड) या व्यक्तिरेखा त्यांची पार्श्वभूमी आपसकंच स्पष्ट करतात. त्या शाळकरी विद्यार्थ्यांत आणणं हे कौशल्याचंच काम. पण ते इथे पटवून घेता येतं. पटवून घेता येण्याचं एक कारण असंही म्हणता येईल, की आजचा समाज हा पूर्वीइतक साधाभोळा राहिलेला नाही. एके काळी साधी माणसं आणि गुन्हेगार हे एकमेकांपासून पूर्ण वेगळे असतं. त्या काळी ही त्यांच्या विश्वात घडणारी सेल्फ कन्टेन्ड कथानकं शक्य होती. आज समाजाच्या सर्व थरांमध्ये दुष्प्रवृत्तीचा अंश आहे. आज खरोखरंच शाळा कॉलेजांतली मुलं पाहिली तर राजकारण, गुन्हेगारी प्रवृत्ती, व्यसनाधीनता यांची लागण सर्वत्र झालेली दिसते. त्यामुळे शाळेतलाच मुलगा हा पोचलेला ड्रग डीलर दाखवणं, हे कदाचित आपल्याला पटकन पटलं नाही. तरी कदाचित वास्तवाच्या खूप जवळ जाणारं आहे. त्यामुळेच ब्रिकचा शैलीबाजपणा सोडला तर इतर बाबतीत तो सत्याच्या नको इतका जवळ आहे. एका परीनेही रहस्यकथा आजच्या काळाची शोकांतिका आहे, असं म्हणलं तरी चालेलं.
गणेश मतकरी (साप्ताहिक सकाळमधून)
0 comments:
Post a Comment