एक हट्टी मुलगी

>> Sunday, March 16, 2008

जुनो (एलन पेज) अमेरिकेतल्या एका उपनगरातल्या छोट्या सुखवस्तू घरात राहते. ती सोळा वर्षांची आहे. ती हुशार आहे, थोडी विक्षिप्त, खूपशी हट्टी आणि गरोदर. "जुनो' चित्रपटाची नायिका अल्पवयीन असतानाच गरोदर राहिली असली, तरी हा चित्रपट सामाजिक नीतिमत्तेच्या प्रश्नाला तोंड फोडणारा नाही, यात गर्भाचं काय करावं याची चर्चा नाही, आई-वडिलांना सांगावं न सांगावं याचा घोळ नाही, घरातल्या ताण-तणावाचे प्रसंग नाहीत. यात हलक्या विनोदाला जागा आहे, पण खुर्चीतून पाडणाऱ्या विनोदाला स्थान नाही.
हा चित्रपट म्हणजे जुनोचं व्यक्तिचित्र आहे. तिला जेव्हा कळतं, की आपल्याला दिवस गेलेत तेव्हा मैत्रिणीच्या सल्ल्यावरून ती एकदा गर्भपाताच्या दवाखान्यात जाऊन येते; पण तिथलं अस्वस्थ वातावरण तिला सहन होत नाही. ती तडकाफडकी ठरवते, की आपण मुलाला जन्म द्यायचा. अर्थात, एवढ्या लहान वयात आपण ते सांभाळू शकू यावर तिचा विश्वास नसतो. त्यामुळे ते जन्मल्याबरोबर दत्तक द्यायचं हेही ती ठरवते. वर्तमानपत्रात पाहून इच्छुक पालकांशी संपर्क साधते आणि आई-वडिलांना सांगूनही टाकते.
थोडक्यात म्हणजे अशा विषयांवरच्या चित्रपटांमध्ये वेळ काढकाढून शेवटपर्यंत ताणलेल्या गोष्टी इथं दहा-पंधरा मिनिटांत उरकल्या जातात. जुनो वडिलांना (जे. के. सिमन्स) घेऊन मार्क (जेसन बेटमन) आणि लॉरी (जेनिफर गार्नर) या इच्छुक पालकांकडं जाते आणि त्यांच्या वकिलाबरोबर सगळं ठरवून टाकते. काही दिवसांनी पोट दिसायला लागल्यावरही ती पूर्वीप्रमाणेच शाळेत जाणंही सुरू ठेवते. मात्र, ज्याच्यापासून जुनोला दिवस गेले आहेत, त्या पॉली ब्लेकर (मायकेल सेरा)बरोबरचे तिचे संबंध मात्र थोडे बिघडायला लागतात. इकडं लॉरी लवकरच घरी येणाऱ्या मुलाची तयारी करायला लागते. मात्र, आपलं म्युझिक, आपले चित्रपट आणि आपल्या कॉमिक्समध्ये रममाण असणाऱ्या मार्कला मात्र आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावासा वाटायला लागतो.
दिग्दर्शक जेसन राईटमन यांच्या याआधीच्या "थॅंक यू फॉर स्मोकिंग'मधला बोचरा उपहास जुनोमध्ये पाहायला मिळत नाही. इथली त्यांची हाताळणीही अगदी साधी आहे. नाही म्हणायला दोन्हींत काही साम्य आहेत. दोन्ही चित्रपट हे एका व्यक्तिरेखेभोवती गुंफलेले आहेत. दोन्हींत विनोदाला स्थान आहे आणि दोन्ही चित्रपट हे विषयातून येणाऱ्या उघड शक्यतांपलीकडे जाऊन भाष्य करणारे आहेत.
जुनोची "डिआब्लो कोडी' यांची पटकथा म्हणजे पटकथा कशी असावी याचा वस्तुपाठ आहे. ती कुठेही रेंगाळत नाही. खास नाट्यपूर्ण प्रसंगांचा आधार नसतानाही पाहणाऱ्याला गुंतवून ठेवते. तिचा प्रवास हा अनपेक्षित वळणांनी जातो. मात्र, शेवट सर्वांनाच पटण्यासारखा प्रामाणिक आहे. जुनो आणि पॉली तसेच मार्क आणि लॉरी यातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही चित्रपटाच्या सुरवातीपासून शेवटापर्यंत बदलत जाते. या बदलांच्या जागा स्पष्ट, लक्षात येण्यासारख्या आहेत. त्यांच्या बदलाच्या पूर्वसूचनाही पटकथेत अस्तित्वात आहेत आणि लक्षपूर्वक पाहणाऱ्याला त्या कळणंही सहज शक्य आहे.
इथले अनेक प्रसंग चित्रपट संपल्यावरही आपल्याबरोबर राहतात. जुनो आपल्या वडिलांबरोबर मार्ककडे जाते तेव्हा वकील, लॉरी आणि जुनोच्या वडिलांना खाली बसवून मार्क आणि जुनोचं गिटार म्युझिक रूममध्ये गिटार वाजवत बसणं, जुनोचं आपल्या पालकांपुढे सत्य उघड करणं, मॉलमधली लॉरी आणि जुनोची भेट अशा अनेक जागा सांगता येतील आणि या जागा स्वतंत्र आहेत. बेतीव नाहीत. या प्रसंगातल्या घटना या व्यक्तिरेखांच्या स्वभावाशी जोडलेल्या आहेत; विनोदनिर्मिती वा अन्य हेतू त्यामागं नावाला नाही.
गेल्या वर्षी मी हार्ड कॅंडी नावाचा चित्रपट पाहिला होता. एक चौदा-पंधरा वर्षांची मुलगी आणि लहान मुलींना जाळ्यात ओढणारा एक तरुण यांच्यातला उंदरा-मांजराचा खेळ असं या चित्रपटाचं स्वरूप होतं आणि त्यातल्या छोट्या नायिकेनं चित्रपट भारून टाकला होता. त्या नायिकेचाच हा दुसरा चित्रपट. एलेन पेजची ही भूमिका हार्ड कॅंडीमधल्या नायिकेहून संपूर्णपणे वेगळी आहे आणि तिनं ती ज्या ताकदीनं पेलली आहे, ती पाहता तिचं नाव ऑस्कर नामांकनात नसतं तरच नवल. इथं जुनोच्या तोंडचे संवाद काहीसे विनोदी, थोडे आगाऊ, समोरच्याला अचंबित वा निरुत्तर करणारे आहेत. मात्र, हे संवाद अपेक्षित परिणामासह बोलतानाही ती आपल्या मनातल्या प्रेमाच्या, मैत्रीच्या, असुरक्षिततेच्या विविध भावना इतक्या सहजपणे कशी दाखवते ते कळायला मार्ग नाही. चित्रपट हा जुनोच्या परिस्थिती लक्षात येण्यापासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या कालावधीतला आहे. हा आलेख तिच्यापुरता अनेक बाबतीतचे चढउतार दर्शवणारा आहे. शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे बदल इथं दिसतात. त्यामुळे भूमिका जितकी सहज भासते तितकी ती निश्चितच नाही.
इतरही पात्रं इथं आहेत आणि त्या सर्वांनी बजावलेली कामगिरी उत्तमच आहे. मात्र, चित्रपट, त्याचं कथानक सर्वांचं मिळून बनलेलं नाही. ते जुनोचं आहे. चित्रपट हा तिच्या आयुष्यातल्या एका तुकड्याची तिच्याच नजरेतून केलेली सफर आहे.
अल्पवयीन मुलींमधलं प्रेग्नन्सीचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय तर आहेच, मात्र जुनो तो गृहित धरून परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. कधी-कधी तो त्याची टिंगल करतो. (उदाहरणार्थ "सेक्शुअली ऍक्टिव्ह' या वाक्प्रचाराचा वारंवार येणारा वापर किंवा जुनोच्या आई-वडिलांनी ती गरोदर असल्याचं कळल्यावर दिलेली प्रतिक्रिया). मात्र, त्याचं गांभीर्य तो विसरत नाही. त्याचबरोबर तो असंही सांगतो, की ही परिस्थिती म्हणजे जगाचा अंत नव्हे. त्यामुळेच जुनोला पडलेला प्रश्न हा तिच्या गरोदर असण्यातून काय अडचणी येतील हा नसून दोन माणसं खरंच एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात का अन् प्रेमात राहू शकतात, असा आहे. तिच्या इतर अडचणींना तोंड ती गरजेपोटी देते, भावनिक गुंतागुंतीच्या भानगडीत ती पडू इच्छित नाही.
साधारणपणे ऑस्करला ज्या प्रकारचे चित्रपट नामांकनात घेतले जातात, त्यातला "जुनो' नाही. तो अतिभव्य किंवा अतिसंवेदनशील विषय मांडत नाही. त्याची निर्मिती नेत्रदीपक नाही. तो समस्याप्रधान (सांकेतिक अर्थाने) नाही. हे असूनही त्याला या यादीत का स्थान मिळालं हे तो पाहिला, की सहज स्पष्ट होतं.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP