विलक्षण अनुभव
>> Thursday, April 3, 2008
फाईट क्लब या नावावरून 1999 मधल्या डेव्हिड फिंचरने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा आवाका आपल्या लक्षात येणं कठीण आहे. फाइट क्लब आधारित आहे, तो चक पालानिक या लेखकाच्या याच नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर. आणि त्याचं नाव हे काही प्रमाणात दिशाभूल करणारं आहे. काही प्रमाणात अशासाठी की नाव प्रतिकात्मक नाही. इथे खरोखरच मारामा-या करण्याच्या हेतूने काढलेला फाइट क्लब आहे. पण चित्रपटाचा हेतू केवळ अशा क्लबची किंवा त्याच्या संस्थापकाची गोष्ट सांगण्याएवढा मर्यादित नाही. त्याला बोट ठेवायचंय ते आज हळूहळू स्वत्व गमावून चाललेल्या समाजावर. आजचा माणूस आपली ओळख विसरत चाललाय, असं या चित्रपटाचं मत आहे, आणि ते मांडण्याची त्याची पद्धत अत्यंत लक्षवेधी व प्रक्षोभक आहे.
जॅक (एडवर्ड नॉर्टन) एका गाड्या बनविणा-या मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. त्याला निद्रानाशाचा विकार जडला आहे. यासंदर्भात तो जेव्हा डॉक्टरचा सल्ला घेतो, तेव्हा डॉक्टर त्याला काहीच न झाल्याचं सांगून त्याची बोळवण करतो. वर सांगतो की, खरा त्रासदायक आजार म्हणजे काय हे पाहायचं असेल, तर टेस्टिक्युलर कॅन्सर पेशंट्सच्या सपोर्ट ग्रूपच्या सभेला जा. जॅक खरोखर जातो आणि या लोकांच्या सहवासाने त्याचा निद्रानाशही कमी व्हायला लागतो.
लवकरच या प्रकारच्या आजाराशी झगडणा-या पेशंट्च्या सभांना जाण्याचं त्याला व्यसनच लागतं, मात्र त्याचा प्रश्न तेवढ्यापुरता सुटतो.
प्रश्न सुटला असं वाटत असतानाच जॅकला मार्था सिंगर (हेलेना बोनहैम कार्टर) भेटते. मार्था केवळ वेळ घालविण्यासाठी या सभांना जात असते, मात्र तिला आपलं गुपित कळल्याचं पाहून जॅकची मनःशांती ढऴते. त्याचा विकार पुन्हा सुरू होतो. शेवटी दोघे वेगवेगळे सपोर्ट ग्रूप वाटून घेतात आणि तात्पुरता तोडगा काढतात.
पण आता पुन्हा मनःस्थिती बिघडलेल्या जॅकला एका चमत्कारिक रात्री,विमान कंपनीने त्याचं सामान हरवल्यावर आणि त्याच्या राहत्या घरी झालेल्या गँस विस्फोटात त्याचं संपूर्ण घर उदध्वस्त झाल्यावर एक नवा मित्र भेटतो. हा मित्र म्हणजे टायलर डर्डन (ब्रैड पीट) असतो, एक साबण विक्रेता. मात्र साबण बनवण्याखेरीज याचे अनेक भलते उद्योग सुरू असतात. त्याने स्वतः पुरतं प्रस्थापित समाजाशी बंड पुकारलेलं असतं. आणि ते तो आपल्या परीने लढत असतो. जॅक निर्वासित झाल्याने टायलर त्याला आपल्या मोडकळीला आलेल्या घरात राहायचं निमंत्रण देतो. हळूहळू आपल्यावरचे तणाव झटकून मनाला मोकळेपणा देण्यासाठी हे दोघे आपसात मारामा-या करायला लागतात. ही असते फाइट क्लबची सुरुवात. पण टायलरच्या डोळ्यातली चक्र एवढ्याने थांबणारी नसतात. त्याला आपलं बंड पुढच्या पातळीवर न्यायचं असतं.
फाईट क्लब ही अनेक सुसंगत आणि क्वचित विसंगत विचारांची मालिका आहे. सामान्यतः थ्रिलरकडून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात वैचारिक सामुग्रीची अपेक्षा ठेवत नाही, पण इथे ते विचार उपरे वाटत नाहीत. फिंचरच्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे याही चित्रपटाचं आशय आणि सादरीकरण दोन्ही गडद आहे. त्याखेरीज फाईट क्लबच्या दृश्यमांडणीतही अनेक गमती केल्या आहेत.लांबच लांब चालणारे शॉटस, रांगेत न चालणारं कथानक, वरवर चित्रित करायला अशक्य वाटणारे (आणि संगणकाच्या मदतीने जमवलेले) शॉट्स या त्यामानाने ब-याचदा पाहायला मिळणाऱया युक्त्या आहेतच. वर आशयाशी थेट संबंध असणारी काही गिमिक्सही आहेत. या चित्रपटाचा बराच भाग निवेदनात येतो, मात्र हे निवेदन फसवं आहे. बोलणारा माणूस आपल्याला सर्व गोष्टी घडल्या तशा सांगतोय का नाही, हे आपल्याला पुढे कळणार आहे आणि हा धक्का कोणत्याही रहस्यपटाहून कमी नाही.
फाइट क्लब हा एक विलक्षण अनुभव आहे. आशय आणि सादरीकरण या दोघांमधून पूर्ण होणारा आणि आपणही आज ज्या सामाजिक सत्याच्या काठावरून प्रवास करतोय त्याच्याशी तो पक्केपणाने बांधलेला आहे. त्यामुळेच महत्त्वाचा.
-गणेश मतकरी (महानगरमधून)
1 comments:
अप्रतिम सिनेमा आहे. चित्रपट बघितल्या नंतर आपल्याला अनपेक्षित शॉक मिळतो . संवाद तर उत्तम आहेत. आता मूळ कादंबरी वाचणार आहे. आणि हो सर ,लेख हि भारीच लिहिला आहे .
Post a Comment