मनोरमा आणि चायना टाऊन

>> Saturday, July 12, 2008


"फिल्म न्वार' (Film Noir) चा शब्दशः अर्थ आहे ब्लॅक फिल्म किंवा काळा सिनेमा. 1940/50 च्या सुमारास अमेरिकेत रुजलेल्या गुन्हेगारीपटांना त्यांची गुणवत्ता ओळखून फ्रेंचांनी हे नाव बहाल केलं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रप्रकार अस्तित्वात आला. हे चित्रपट त्या काळी लोकप्रिय असलेल्या पल्प फिक्शन नामक रहस्य कादंबऱ्यांपासून स्फूर्ती घेऊन पुढे आले, काही तर थेट त्यावर आधारित होते. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, गुन्हेगार, बदफैली नायिका, फसणारे आणि फसवणारे अशा व्यक्तिरेखांचा सुळसुळाट असणाऱ्या या चित्रप्रकारात जगाकडे पाहण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन होता. त्यांची दृश्यशैली ही जर्मन एक्प्रेशनिझमच्या छायेत राहणारी होती. ग्रे शेड्स कमीत कमी वापरून काळ्या-पांढऱ्याचा ठळक वापर आणि कौशल्यपूर्ण दृश्यरचना हादेखील या चित्रपटांचा विशेष मानला जातो. सुरवातीला प्रत्यक्ष अमेरिकेतही या चित्रपटांना दुय्यम दर्जाचे मानले जात असे. पण फ्रेंच समीक्षकांच्या मतांना पुढे मान्यता मिळाली आणि फिल्म न्वार सर्वत्र मानला गेला. या चित्रप्रकाराचा सुगीचा काळ संपल्यावरही या चित्रपटांचा प्रभाव टिकून राहिला, आणि अनेक नावाजलेले दिग्दर्शक त्यापासून स्फूर्ती घेतच राहिले. काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ माजवणारा क्वेन्टिन टेरेन्टीनोचा "पल्प फिक्शन' आणि दोन वर्षांपूर्वीचा फ्रॅन्क मिलरच्या ग्राफिक नॉव्हेल्सवर आधारित "सिन सिटी'देखील या चित्रप्रकाराचेच वंशज आहेत
. 1974 चा रॉबर्ट टाऊनलिखित आणि रोमन पोलान्स्की दिग्दर्शित "चायना टाऊन' हा अशा वंशजांपैकीच एक... आधुनिक फिल्म न् वार. चायना टाऊनचा हिंदी चित्रपट होईलसं मला कोणी सांगतं, तर विश्वास बसणं कठीण होतं. एक तर मूळ चित्रपटाचं रहस्य हे लॉस एंजेलिसबरोबर फार चपखलपणे जोडलेलं होतं, आणि तो संबंध तोडणं शक्य होईलसं वाटत नव्हतं. दुसरं म्हणजे याचा नायक गाइट्स (जॅक निकलसन) प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होता अन् हा व्यवसाय सामान्यपणे आपल्या चित्रपटांत पाहायला मिळत नाही. बरं, तो बदलणंही सोपं नाही. कारण चित्रपटभर जेक गाईट्स प्रायव्हेट डिटेक्टिव्हला शोभेसे उद्योगच करताना दिसतो. तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे, या गुंतागुंतीच्या रहस्यकथेची सर्वच रहस्यं आपल्या प्रेक्षकाला झेपणारी नाहीत. पण हे सगळं असूनही "चायनाटाऊन' आपल्याकडे अवतरला ... "मनोरमा सिक्स फिट अंडर' या चमत्कारिक नावाने. दिग्दर्शक नवदीप सिंगचं कौतुक करायला हवं, की आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्याने कॉमेडीच्या लाटेत हातपाय न मारत बसता एक गंभीर विषय चित्रपटासाठी निवडला. त्याशिवाय त्याने आपले दोन्ही संदर्भ- पहिला प्रत्यक्ष "चायनाटाऊन', तर दुसरा "फिल्म न्वार
' हा चित्रप्रकार- पूर्ण प्रामाणिक राहून आपल्या चित्रपटात उतरवलेले आहेत. चायनाटाऊनची आठवण म्हणून तो सत्यवीर (अभय देओल) च्या घरच्या टीव्हीवर चायनाटाऊनमधला गाईट्सला गुंडांनी धमकावण्याचा प्रसंगही दाखवून टाकतो- ज्या प्रसंगाचं बदललेलं रूप प्रेक्षकांनी दोन मिनिटं आधीच पडद्यावर पाहिलेलं आहे. चायनाटाऊनप्रमाणेच मनोरमादेखील पाण्याच्या अफरातफरीविषयीच आहे आणि त्यातल्या निसर्गावरल्या अत्याचाराची आपल्या जवळच्या व्यक्तीवर केलेल्या अत्याचाराशी केलेली तुलना इथे शाबूत ठेवण्यात आलेली आहे. न्वारच्या नियमांप्रमाणे त्यातली कोणतीही व्यक्तिरेखा पूर्णपणे भाबडी, पूर्णपणे प्रामाणिक असू शकत नाही. इथला नायक सत्यवीर त्याला अपवाद नाही. पीडब्ल्यूडीमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून त्याला तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे. त्याच्या पत्नीचाही (गुल पनाग) भ्रष्टाचार करण्याला विरोध नाही, तर सगळेच पैसा खात असून केवळ सत्यवीर पकडला जाण्याला आहे. आता हा डिटेक्टिव्ह नसून, त्याला डिटेक्टिव्ह कसा बनवायचा, तर उत्तर म्हणजे दोन मनोरमा. एक मनोरमा आहे ती सत्यवीरने लिहिलेली पडेल कादंबरी- जिचा नायक डिटेक्टिव आहे आणि दुसरी आहे ती त्याच्याकडे एका भ्रष्ट मंत्र्याचे फोटो काढण्याचं काम सोपवणारी स्त्री (सारिका. केवळ दोन-तीन प्रसंगांत असूनही लक्षात राहणारी भूमिका)- जिचा हेतू जो दिसतो, तो असणं शक्यच नाही
मनोरमाने सत्यवीरमधला डिटेक्टिव जागवल्यावर तो हे वरवर सरळ वाटणारं काम स्वीकारतो आणि तत्परतेनं पूर्णही करतो. मात्र केस इथं संपत नाही, तर सुरू होते. नावावरून चित्रपटाची प्रवृत्ती कळली नाही, अन् पोस्टर्सवरून तो विनोदी वाटला तरी प्रत्यक्षात तो विनोदी करण्याचा प्रयत्न कुठेही केलेला दिसत नाही. भेजा फ्रायच्या कृपेने गाजत असलेला विनय पाठकदेखील ब्रिजमोहन या सत्यवीरच्या पोलिसात असलेल्या मेव्हण्याच्या भूमिकेत असून, आणि हे पात्र खरोखरच माफक विनोदी असूनही, ते अर्कचित्र होऊ न देण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा इरसालपणा हा त्या विशिष्ट व्यक्तिरेखेपुरता मर्यादित राहतो आणि कथानकाचा तोल ढासळू शकत नाही. ही व्यक्तिरेखा महत्त्वाची ठरते, मात्र ती स्वतःकडे महत्त्व खेचून घेत असल्याचं दिसत नाही. चित्रकर्त्यांनी चित्रपटात दोन नवीन गोष्टी आणल्यात. ज्या त्याला काही प्रमाणात चायनाटाऊनहून वेगळा बनवतात. पहिला आहे तो कादंबरीचा ट्रॅक, तर दुसरा माशांचा. कादंबरीचा केवळ सत्यवीरला डिटेक्टिव बनवण्यासाठी वापर असता तरी आपण (बॉलिवूड लॉजिकला सरावल्यामुळे) समजून घेऊ शकलो असतो. इथे मात्र तिचा वापर जागोजाग होतो. काही पात्रांनी ती वाचलेली असते, काहींना चक्क ती आवडलेली; सत्यवीर स्वतः तिच्याविषयी एक कलाकृती म्हणून किंवा फसलेली महत्त्वाकांक्षा म्हणून बोलतो, आणि पुढे तर एकदा रहस्य सोडवण्यातला महत्त्वाचा दुवा म्हणून वापरली जाते
. माशांची गोष्ट तर अधिकच अर्थपूर्ण आणि रचनेत काळजीपूर्वक गुंफलेली. चायनाटाऊनचा पूर्ण भर हा भ्रष्टाचारावर होता. इथे तो नेमकेपणाने थोडा सरकवून "छोटे मासे मोठे मासे' या काही प्रमाणात अधिक युनिव्हर्सल विषयावर नेला आहे. प्रत्येक जण हा कसा कोणाचा तरी बळी घेतो आणि कोणाचा तरी बळी ठरतो, हा विषय पटकथा काळजीपूर्वक तपासते. प्रत्येकाच्या घरचे फिश टॅंक, त्यातल्या माशांची वागणूक, ब्रिजमोहनचं हे सूत्रं शब्दांत मांडणं आणि अखेर सत्यवीरने घेतलेला माफक बदला, या सर्व गोष्टी या सूत्राला अधोरेखित करतात. बदल माफक राहतो हेदेखील कौतुकास्पद, नेहमीच्या पद्धतीने तो पारंपरिक हिरो ठरता तर चित्रपट अप्रामाणिक ठरता. अभय देओलचे दोन चित्रपट "एक चालीस की लास्ट लोकल' आणि "मनोरमा' त्याला एक लक्षवेधी अभिनेता आणि धर्मेंद्रचा लायक वारस म्हणून उभे करणारे तर आहेतच, वर काळाबरोबर असलेल्या चित्रनिर्मितीची दोन महत्त्वाची उदाहरणं आहेत. अंडरवर्ल्ड आणि राजकारण या दोन प्राचीन पण चिरतरुण विषयांकडे ते अगदी आजच्या नजरेतून पाहतात. काही प्रमाणात, खास करून सुरवात आणि नायकाच्या निवेदनातून तर ते एकमेकांची आठवण करून देणारेही आहेत. मात्र पुढे संपूर्ण वेगळे. चायनाटाऊनसारख्या एखाद्या मूळ चित्रपटाचा थेट संबंध सांगता आला नाही तरी एक चालीसदेखील फिल्म न्वारशी नातं सांगतो... त्याच्या व्यक्तिरेखांमधून
, प्रसंगांमधून, सुरामधून आणि दृश्यरूपातून, हेदेखील एक महत्त्वाचं साम्य. हे दोन्ही चित्रपट त्यांच्या दिग्दर्शकांच्या पुढच्या कामाची नांदी मानायला हरकत नाही आणि त्यांच्या तरुण नायकाच्याही कामाची.
- गणेश मतकरी

1 comments:

Abhijit Bathe July 12, 2008 at 12:03 PM  

गणेश - Bingo!
'मनोरमा’ पाहिला होता, आवडला होता, तो ’चायना टाऊन’ वरुन टेपलाय हे पहिल्या सीनमध्येच कळलं होतं, तरिही अभय देओल आणि मनोरमा आवडले होते. पिक्चर दोन वेळा पाहण्याएवढे आवडले होते. पण चायना टाऊन किंवा मनोरमा पाहताना त्यातले nuances आयदर दिसले नव्हते किंवा कळले नव्हते. उदा. मनोरमा मधला फिश टॅंक्सचा वापर!
आता नेहमीप्रमाणेच हजार विचार बाहेर पडण्याच्या नादात डोक्यात तुंबुन बसलेत, पण नेहमीप्रमाणेच मी हा रिव्ह्यु ’मला’ का आवडला ते सांगतो.
हा रिव्ह्यु मला (म्हणजे माझ्यासारख्या ordinary viewer ला) एक वेगळा आणि सही फंडा सांगतो. म्हणजे चायना टाऊन आणि मनोरमा दोन्ही पाहुनही न कळलेला किंवा दोघांच्यात असलेल्या चपलख pattern ला हा लेख अलगद मांडतो. मनोरमा बनवण्याबद्दल डायरेक्टरचं कौतुक तर केलं पाहिजेच, पण नुसतं लई भारी म्हणण्या पलिकडे जाऊन हा लेख डायरेक्टरने influences मान्य करुनही कथेशी प्रामाणिक रहात, प्रत्येक व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत हा पिक्चर कसला ईमानदारीत बनवलाय आणि ’म्हणुन’ तो कौतुकास कसा पात्र आहे हे सांगतो.

त्याबद्दल - ’जियो!’

ता.क. I hope लोक इतर आंडुपांडु पोस्ट्सवर हजाम comments टाकण्याचं सोडुन यावर लिहीतील. मला बरंच लिहावंसं वाटतंय पण मी सुटलो तर ही कमेंट न रहाता तुझ्या पोस्टपेक्षाही बराच मोठा लेख होईल. (आणि तरी लेखाएवढी ’उंची’ जमणार नाही).

लोकहो - हे वाचा! याला ’क्वालिटी’ म्हणातात!!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP