एक छोटा राक्षस
>> Wednesday, July 2, 2008
तंत्रातली सफाई ही चित्रपटात प्रकट होणाऱ्या आशयाला मारक ठरते का, हा महत्त्वाचा प्रश्न; निदान आताच्या काळात तरी. संगणकांचा वाढता आणि सफाईदार वापर. निष्णात सल्लागार आणि तंत्रज्ञांचा निर्मितीतला सहभाग. यामुळे दिग्दर्शकाला स्वतंत्र दृष्टिकोन असण्याची गरज ही पूर्वीइतकी उरलेली नाही आणि केवळ अनुभवाने सर्जनशीलतेची जागा घेतल्याची उदाहरणंही समोर यायला लागली आहेत. अनेक चित्रप्रकारांत हे स्पष्ट दिसून येतं आणि ज्या चित्रपटांचा प्राणच मुळी स्पेशल इफेक्ट्स आहेत, तिथं तर ते आहेच, असं आपण गृहीत धरतो. आणि मग जेव्हा अपेक्षेपलीकडचं काही समोर येतं, तेव्हा आश्चर्य वाटतं. असंच आश्चर्य वाटतं "द होस्ट' हा बोंग जुन- हो दिग्दर्शित साउथ कोरिअन चित्रपट पाहून. नावावरून वाटत नसला, तरी द होस्ट आहे "मॉन्स्टर मूव्ही'. खरं सांगायचं, तर मॉन्स्टर मूव्ही हा चित्रप्रकार आता पूर्वीइतका एक्सायटिंग उरलेला नाही. जे ते पडद्यावर दाखवणं शक्य झाल्यानं आता प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वावच उरलेला नाही. आणि हे भव्य राक्षस पाहून आता कंटाळाही यायला लागलाय. बहुधा म्हणूनच गॉडझिला आणि किंग कॉंग या दोन्ही अजरामर राक्षसांच्या चित्रपटांना रिमेक्सदरम्यान अपेक्षेइतकं यश मिळालं नाही. किंग कॉंग हा खरोखरच मेहनतीनं आणि मानवी व्यक्तिरेखांना महत्त्व देऊन बनवलेला असूनही, त्यातला संगणकच वरचढ ठरला. आणि ब्यूटी ऍन्ड द बीस्टचं कथानक प्रेक्षकांना पुरतं मोहवण्यात यशस्वी ठरलं नाही. या घडामोडींबरोबरच पडद्यावरचे राक्षस नामशेष होणार, अशी चिन्हं दिसायला लागली असताना होस्ट हा चित्रपट मॉन्स्टर मूव्हीचा फॉर्म्युला पूर्णपणे डोक्यात ठेवतो आणि त्यात असे काही बदल करतो, की त्याचा प्राण हा केवळ संगणकाच्या तावडीत जाणार नाही. "होस्ट' हा पूर्णपणे मॉन्स्टर मूव्ही नसून, तो तीन चित्रप्रकारांचं मिश्रण आहे, ज्यातला प्रत्येक प्रकार हा काळाबरोबर आणि इतर दोन प्रकारांपुढे राहण्याचा प्रयत्न करणारा आहे. हे तीन प्रकार म्हणजे मॉन्स्टर मूव्ही, राजकीय उपहासिका आणि डिस्फंक्शनल कुटुंब कथा. आणि हे सगळं असूनही चित्रपट प्रामुख्यानं विनोदी आहे. त्यात गंभीर स्वरूपाचा भावनिक भाग आहे, मूळ चित्रप्रकाराला शोभण्याजोग्या घाबरवण्याच्या जागा आहेत, संदेशबिंदेशही आहे. पण हे सगळं साधणारा धागा आहे, तो विनोदाचा. कोरिआच्या हान नदीत काही दूषित रसायन सोडण्याची एका उन्मत्त अमेरिकन (ही द्विरुक्ती झाली का?) शास्त्रज्ञाची आज्ञा चित्रपटाला सुरवात करते. या रसायनांचा परिणाम म्हणून काही वर्षांनी या नदीकाठी नजरेला पडतो एक अजस्त्र प्राणी. मोठ्या माशासारखा दिसणारा, पण जमिनीवर वास्तव्य करू शकणारा, अतिशय चपळ आणि काहीसा चलाख असलेला हा राक्षसी जीव म्हणजे "होस्ट'मधली एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. इतर महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत हान नदीजवळ एक छोटे दुकान चालवणाऱ्या हाय बॉंग (ब्यून हाय बॉंग) च्या कुटुंबातल्या हाय बॉंगला सर्वांत जवळचा आहे, तो त्याचा काहीसा मतिमंद मुलगा कंग-डु (कंग- गो सॉंग). कंग- डु हा दुकान चालवायला मदत करण्याचा प्रयत्न करतो; पण प्रत्यक्षात त्याचा त्रासच अधिक आहे. त्याच्या बुद्धीभ्रष्टतेला हाय-बॉंग स्वतःला जबाबदार मानत असल्याने त्याच्यावरचं प्रेम थोडं अधिक कंग- डुला एक शिक्षित बेकार भाऊ आहे; आणि निष्णात परंतु विजेतेपदापासून चार हात दूर राहणारी धनुर्धारी बहीण आहे. एकमेकांशी फारसं न पटणाऱ्या या सर्वांना एकत्र ठेवते ती कंग- डु ची मुलगी ह्यून सीओ (आह सुंग को) मात्र राक्षसी प्राण्याच्या हातून पहिल्याच फटक्यात तिचं अपहरण होतं आणि उरलेले चौदा हवालदिल होतात. कुटुंबातल्या चौघांचे ह्यून- सीओला सोडवण्याचे प्रयत्न आणि ह्यून-सीओची जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड "होस्ट'चा प्रमुख भाग व्यापते. मात्र या सगळ्याला गंभीरपणे मांडण्याऐवजी दिग्दर्शक विनोदाची मदत घेतो. या दिग्दर्शकाच्या "मेमरीज ऑफ मर्डर' नावाच्या चित्रपटातही त्याने गंभीर विषयाकडे विनोदी पद्धतीने पाहण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.) आशय हा इथेही जवळपास गंभीर असल्यानं, हे वाटतं तितकं सोपं नाही. पण शोकसभेपासून ते प्राणी आणि ह्यून सीओच्या चाललेल्या डावपेचांपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे दिग्दर्शक तिरकसपणे पाहताना दिसतो. यात भर म्हणून प्राण्यांविषयीचं सरकारी धोरण आणि त्यात चाललेली अमेरिकेची लुडबूड याचाही वापर दिग्दर्शक राजकारणावर टीका करण्यासाठी करतो. सरकार अमेरिकेच्या सल्ल्यावरून घोषित करतं, की या प्राण्यामुळे एक व्हायरस पसरलाय, ज्याचा बंदोबस्त अधिक महत्त्वाचा आहे. मग प्रत्यक्षात प्राण्याकडे दुर्लक्ष करून ही मंडळी कल्पित व्हायरस संपवण्याच्या तयारीला लागतात. समोर दिसत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून खूप काही करत असल्याचा आव आणणाऱ्या आणि प्रश्न सोडवण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे करणाऱ्या सरकारची ही टिंगल साऊथ कोरियाच नव्हे, तर जगभर कुठेही लागू पडणार आहे. "होस्ट'च्या पटकथेचा रोख एका वेळी अनेक जागी असला, तरी राक्षसाकडे दुर्लक्ष केल्यामुळे चित्रपट फसला असता, ते चित्रपट होऊ देत नाही. इथे राक्षसाची केलेली संकल्पना ही पाहण्यासारखी आहे. तो मोठा आहे, पण अमेरिकी संकल्पनांइतका भव्य नाही. खरोखर जितपत असू शकेल तितका आहे. भीतीदायक आहे तो त्याचा चपळपणा, किंवा डूख धरण्याची वृत्ती. एका महत्त्वाच्या प्रसंगी चित्रपटातली एक व्यक्तिरेखा त्याला संपवण्याच्या अगदी जवळ येते; पण तिच्या हातातली बंदूक दुर्दैवाने रिकामी असते. एरवी माणसांना बरोबर नेऊन आपल्या खास जागी लपवणारा हा प्राणी इथे त्या व्यक्तिरेखेला शेपटीचा विळखा घालून झपाट्याने उचलतो आणि किनाऱ्यावर आपटून तिचा कपाळमोक्ष करतो. ही त्याची उघड खलप्रवृत्ती त्याला अधिक मोठ्या राक्षसांहूनही भीतीदायक बनवते. "होस्ट'मध्ये स्पेशल इफेक्ट् सचा वापर मर्यादित आहे, पण जो आहे तो पटण्यासारखा आहे. जागा शोधून शोधून घातलेले इफेक्ट्स शॉट्स इथे नाहीत आणि हेच उत्तम आहे. चित्रपटाची विनोदाची बाजू सोडली, तर त्याची तुलना ही स्पिलबर्गच्या जॉर्जशी होऊ शकेल. (जॉर्जचा प्रभाव "होस्ट'मध्ये अनेकदा जाणवण्यासारखाही आहे.) जॉर्जदेखील खरं तर नुसता मॉन्स्टर मूव्ही नव्हता. भयपट, मॉन्स्टर मूव्ही आणि सागरी साहस यांचं ते उत्तम जमलेलं मिश्रण होतं. "जॉर्ज' आणि "द होस्ट' यामध्ये महत्त्वाची साम्ये आहेत, ती प्राण्यांचा मर्यादित वापर आणि मानवी व्यक्तिरेखांना येणारं महत्त्व. तिथं शार्कनं प्रेक्षकांना कितीही घाबरवलं, तरी अखेर महत्त्व येतं, ते शार्कच्या शिकारीला निघालेल्या नावेतल्या तीन प्रवाशांना, जसं इथं ते येतं ह्यून - सीओला सोडवायला आपसातले मतभेद विसरून निघालेल्या चार कुटुंबीयांना. दोन्ही चित्रपटांचा भर हा भव्यतेवर नाही, तर प्रेक्षकांना या व्यक्तिरेखांबरोबर ठेवण्यावर आहे. मानवाचा दुर्दम्य आशावाद हा दोन्हीकडे महत्त्वाचा आहे. त्याची परिस्थितीवर मात करण्याची जिद्द प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्याचे हे दोन्ही प्रयत्न आहेत. अमेरिकन प्रयत्नांच्या मानाने "द होस्ट' ही छोटी निर्मिती आहे; पण त्रयस्तपणे पाहायचं, तर या चित्रप्रकाराकडे एका नव्या नजरेनं पाहून, काही नवं देण्याचा तिचा प्रयत्न दृष्टीआड करण्याजोगा नाही. अमेरिकन रत्नपारख्यांच्या नजरेतून ती सुटणार नाही, आणि बहुधा लवकरच ही कथा इंग्रजीतून ऐकाय-पाहायला मिळेल. या दिग्दर्शकासह, किंवा या दिग्दर्शकाशिवाय.
-गणेश मतकरी
3 comments:
सुंदर परीक्षण, आवडले.
thanks raj,
u seem to have read some of our newer posts. have u checked out the older ones?
I have checked some of them, they are quite nice. Keep writing!
Post a Comment