भाबडा- सोपा, पण बहारदार...

>> Saturday, June 14, 2008

हलकं-फुलकं, देखणं, श्रीमंत जग दाखवणारी सिनेमांची एक जात असते. त्यांचा शेवट बहुधा गोडच होतो. त्यांचा आशय सखोल, गंभीर असतोच असं नाही. नातेसंबंधांबद्दल ते काही मूलभूत महत्त्वाचं सांगतात असंही नाही. पण दोन-अडीच तास ते तसा यशस्वी आभास मात्र निर्माण करतात. थोडा नर्मविनोद, थोडा चवीपुरता उपरोध, रोमान्स, हळवेपणा, भाव-भावना अशा सगळ्या गोष्टी त्यात असतातच असतात. पण आपल्याला कंटाळा येऊ न देता ते दोन तास घट्ट पकडून ठेवतात हे मात्र खरंच. तोच त्यांचा यूएसपी. "दी डेव्हिल वेअर्स प्रादा' हा त्याच जातकुळीचा सिनेमा आहे. याचा अर्थ तो वाईट आहे, असा अजिबात नाही. पण तो भाबडा-सोपा आहे. काही ठिकाणी तो उगाच इमोशनल होत लांबतो. गाभ्याला हात न घालता विषयाला वरवर स्पर्श करत जातो. लॉरेन विस्बर्गरच्या कादंबरीवर बेतलेली त्याची गोष्ट. ऍण्ड्रिया (ऍना हॅथवे) ही पत्रकार होण्याची स्वप्न बघणारी मुलगी. तिच्यात लिहिण्याची कला आहे. नवं ते शिकायची तयारी आणि स्मार्टनेस आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याची चिकाटीही. फॅशन आणि फॅशन मॅगझिन्स यांच्या जगाबद्दल तिच्यात एक प्रकारची तुच्छतादर्शक बेपर्वाई आणि उघड अज्ञान आहे. कुठल्याही बुद्धिजीवी माणसाला असेल तसंच. अशात तिला "रनवे'या फॅशन मॅगझीनच्या संपादिकेच्या मदतनीसाची नोकरी मिळते. "रनवे'ची संपादिका आहे मिरांडा (मेरिल स्ट्रिप) (या भूमिकेसाठी मेरिल स्ट्रिपला घेऊन खरं तर दिग्दर्शकानं निम्मं काम केलं आहे!) तिचा नखरा, हाताखालच्या माणसांना कःपदार्थ मानण्याची तिची सवय, तिचा दहशतीच्या जवळ जाणारा दरारा. "दॅट् स ऑल' असं म्हणून संभाषणाला एकतर्फी पूर्णविराम देऊन टाकण्याची तिची लकब आणि या साऱ्याबरोबरच आपल्या कामात तन-मन-धन देण्याची - सर्वश्रेष्ठ असण्याची वृत्ती. या दोन टोकाच्या दोन बायका एकत्र येतात, यातच गोष्टीची गंमत वाढत जाते. सुरुवातीला मिरांडाच्या फॅशनप्रेमाला तुच्छ लेखणारी ऍण्ड्रिया हळूहळू ते जग समजून घ्यायला लागते. आत्मतृप्तीतून थोडी बाहेर येते. "गबाळेपणा म्हणजे हुशार असणं नव्हे' हे समजून घेते. मिरांडाच्या तोफखान्यापुढे तगून राहायचं आव्हान स्वीकारते. आणि मग बघता बघता तिला या विक्षिप्त बाईचं - मिरांडांच - अंतरंगही हळूहळू उमगू लागतं. सुरुवातीला तिला चक्रम-सॅडिस्ट-विक्षिप्त बया असं संबोधणारी अँड्रिया मिरांडाला चक्क डिफेण्ड करायला लागते! या स्थित्यंतरात अर्थात ऍण्ड्रियाचं भावविश्वही ढवळून निघतं. साधा-सरळ, तिच्या गबाळग्रंथी सौंदर्यावर प्रेम करणारा तिचा मित्र, तिच्या करियरिस्ट धडपडीत दुखावला जातो. तिचे मित्र-मैत्रिणीही तिला तसं सुनावतात. तू पूर्वीची राहिली नाहीस. ऍण्ड्रियालाही ते जाणवतं. "पण या टप्प्यावर असे निर्णय तर घ्यावेच लागतात. कुणीतरी दुखावलं जाणं अपरिहार्यच...' असं स्वतःचं समर्थन करत असतानाच तिला जाणवतं, "म्हणजे मिरांडाही...' या टप्प्यावर ती थबकते. आपल्याला खरंच मिरांडासारखं असायचं होतं? आपल्या स्वप्नापासून किती लांब भरकटत आलो आपण? चांगुलपणा-नाती-स्वप्नं सोडून यशस्वी होऊ आपण? आणि मिरांडाला समजून घेण्याच्या, लौकिकार्थानं यशस्वी होण्याच्या, श्रीमंतीच्या उंबरठ्यावर ती "रनवे' आणि "मिरांडा' दोघींनाही रामराम ठोकते. पत्रकारितेच्या विश्वात परतते. फार सखोल गंभीर आशय हे "डेव्हिल वेअर्स प्रादा'चं बलस्थान नव्हेच. त्यातली गंमत आहे ती त्यातल्या चमकदार व्यक्तिरेखांमध्ये. त्यांच्यातल्या ठिणगीदार चकमकींमध्ये. ऍना हाथवे आणि मेरिल स्ट्रिप या दोघींचा हा सिनेमा. त्यांनी तो आपल्या कामानं पुरा रंगतदार केला आहे. ऍण्ड्रियाची स्वप्नाळू-स्वच्छ नजर, पाहता पाहता भरून येणारे तिचे डोळे, काहीसा गबाळा अवतार आणि त्यात खुलणारं तिचं रूप ऍनानं साकारलंय. "गबाळेपणा म्हणजे बुद्धिमत्तेचं सर्टिफिकेट नव्हे' हे जितकं खरं, तितकंच "स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत्व सोडून देणं म्हणजे यश नव्हे' हेही खरं. या दोन जाणिवांच्या मधला प्रवास ऍड्रियाचा. मेरिल स्ट्रिपला तर बोलून चालून भावखाऊच भूमिका आहे. मुळातच तुसडा स्वभाव आणि आपल्याभोवती माणसं नाचवण्याची तिची लकब बघता ती खलनायिका वाटण्याचा धोका होता. पण या सवयी काम ठेवूनही ही बाई "मिरांडा'ला एक माणूसपण सहजगत्या देते. एका विशिष्ट सुरात, समोरच्याला जराही बोलण्याची संधी न देता - आपलंच खरं करत बोलायची तिची शैलीदार लकब तर निव्वळ लाजवाब. या दोघींच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखाही. मग त्या किती लहान का असेनात - आपापले गुणदोष- प्रकृती घेऊन येतात. कागदी वाटत नाहीत. ही कारागिरी करून अखंड दोन तास आपल्याला बांधून ठेवणं, हेही काही कमी सोपं नसतंच!
-मेघना भुस्कुटे

Read more...

थिंग्ज टू डू इन डेन्वर...

>> Thursday, June 12, 2008

काही चित्रपटांविषयी आपण ऐकतो, पण काही कारणानं ते पाहण्याची संधी मिळत नाही. मग हे चित्रपट आपल्या डोक्‍यात राहून जातात. कालांतरानं जर हे नाव आपल्या कानावर पडलं तर ती आठवण जागी होते. आपल्याकडं केबल टीव्ही आले आणि आपल्याला काय पाहू आणि काय नको झालं. त्या सुमारास बी. बी. सी.वरचा एक कार्यक्रम मी नेहमी पाहत असे. "फिल्म सीरिज' नावानं ओळखली गेलेली ही मालिका बॅरी नॉर्मन हे नावाजलेले समीक्षक चालवत आणि थोडक्‍यात पण अतिशय योग्य त्या मुद्द्यांना स्पर्श करणारी समीक्षा ते करत. अर्थात, आपल्यासाठी यातले बहुसंख्य चित्रपट हे पाहायला न मिळणारेच असत. कारण तेव्हा चित्रपटांची मोठ्या प्रमाणातली आयात सुरू व्हायला वेळ होता आणि डी. व्ही. डी. क्रांती किंवा मल्टिप्लेक्‍सेस हीसुद्धा दूरच होती. तरी हा कार्यक्रम उद्‌बोधक ठरतो एकूण चित्रजगताच्या घडामोडींबद्दल होत राहणाऱ्या माहितीने आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे नॉर्मनच्या शैलीनं.
1996 मध्ये म्हणजे "फिल्म 96'च्या एका भागात ऐकलेलं चित्रपटाचं नाव माझ्या डोक्‍यात राहिलं ते राहिलंच. राहण्यामागं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे नाव तसं विचित्र आणि लांबलचक होतं. त्याचा सरळ अर्थ पाहिला तर चित्रपट अतिमानवी कथावस्तूवर बेतला असेलसं वाटणं स्वाभाविक होतं; पण नॉर्मनच्या म्हणण्यानुसार चित्रपट काही भुतांचा वगैरे नव्हता, तर ही एक गॅंगस्टर फिल्म होती. मात्र, फॉर्म्युलात न बसणारी. त्या सुमारास शक्‍य ते सर्व प्रयत्न करूनही हा चित्रपट मी पाहू शकलो नाही आणि परवा अचानक त्याची डी. व्ही. डी. समोर आली. नाव माझ्या लक्षात होतंच - "थिंग्ज टू डू इन डेन्वर व्हेन यू आर डेड!'
गॅरी फ्लेडर दिग्दर्शित चित्रपटाच्या नावाबद्दल मी एक मात्र म्हणेन, की ते बुचकळ्यात टाकणारं असलं, तरी खोटं नाही. त्याचा अर्थ शब्दशः घेणं योग्य नाही एवढंच. कथानक गडद आहे. जिमी द सेन्ट ही प्रमुख व्यक्तिरेखा सोडता इतर व्यक्तिरेखाही काळ्या रंगाच्या विविध छटांनीच रंगवलेल्या आहेत. एकूण चित्रपटावर प्रभाव आहे तो फिल्म नूवार (Film Noir) नावानं ओळखल्या जाणाऱ्या गडद अमेरिकन गुन्हेगारीपटाचा ज्यांनी 1940 च्या आसपासचा काळ गाजवला; पण आपला प्रभाव पुढं कायम ठेवला. पोलान्स्कीचा चायना टाउन, रॉबर्ट रॉड्रिग्जचा सिन सिटी आणि क्वेन्टीन टेरेन्टीनोचा प्रत्येक चित्रपट हा अखेर नूवार चित्रपटांशीच नातं सांगतो. त्यामुळे इथंही तो प्रभाव दिसण्यात आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही.
इथला नायक आहे जिमी द सेन्ट (ऍन्डी गार्शिआ) जो एकेकाळी गॅंगस्टर असला तरी आता सभ्य होण्याचा प्रयत्न करतोय. त्याची कंपनी मरणोन्मुख माणसांचा सल्ला त्यांच्या वारसांसाठी व्हिडिओटेप करून ठेवण्याचं काम करते. दुर्दैवानं हा धंदा फारसा यशस्वी नाही आणि तो करताना जिमी कर्जबाजारी झालेला आहे. यातून सुटण्याचा उपाय म्हणजे "मॅन विथ 9 प्लान' (क्रिस्टोफर वॉफन) या चमत्कारिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या एकेकाळच्या बॉसनं सांगितलेली कामगिरी पुरी करणं. कामगिरी तशी फारच सोपी. बॉसच्या अर्धवट मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं, जी आता दुसऱ्याच कोणाच्या प्रेमात आहे. त्या दुसऱ्या माणसाला धमकावून बाजूला करायचं आणि बॉसच्या मुलाचा रस्ता मोकळा करायचा.
नाइलाजानंच जिमी कामगिरी स्वीकारतो आणि आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांना घेऊन कामगिरीवर निघतो. चित्रपटीय तर्कशास्त्राला अनुसरून कामगिरी पुरी होत नाहीच, वर तिचा उलटाच परिणाम होतो. बॉस पिसाळतो. सहभागी झालेल्या सर्वांच्या मृत्यूचं फर्मान काढतो आणि जिमीचा डेन्वर कायमचं सोडून जायला थोडा अवधी देतो.
टेरेन्टीनोचा फसलेल्या दरोड्याविषयीचा रिझरवॉयर डॉग्ज 1992 चा, तर हा 1996 म्हणजे अशी शंका घ्यायला जागा उरते, की हा चित्रपटही आधुनिक गुन्हेगारीपटांवर टेरेन्टीनोनं टाकलेल्या सर्वव्यापी प्रभावाचा एक भाग आहे. शंकेचं कारण म्हणजे शैलीतलं साम्य. दोन्ही चित्रपटांचा विषय तसा जवळचा. काळजीपूर्वक आखलेली गुन्ह्याची योजना फिसकटणं आणि त्यात सहभागी गुन्हेगारांचं भवितव्य हेच दोघांच्याही केंद्रस्थानी. चलाख संवाद, ब्लॅक ह्यूमरचा मुक्त वापर हेदेखील तसंच. तत्कालीन समीक्षकांनी साहजिकच उपस्थित केलेल्या या शंकेवर उत्तर म्हणून दिग्दर्शक फ्लेडर यांनी दाखवून दिलं होतं, की "थिंग्स टू डू इन डेन्वर...' जरी नंतर बनला असला, तरी त्याची पटकथा काही वर्षांपूर्वी लिहिली गेली होती. "रिझरवॉयर डॉग्ज'च्याही आधी. त्यामुळे प्रभाव असला, तरी तो इतका थेट नाही आणि टेरेन्टीनोचा म्हणावा असा नाही. तर दोन्ही चित्रपटांच्या कर्त्यांची स्फूर्तिस्थानं साधारण त्याच प्रकारची असल्यामुळे होणारा हा आभास आहे.
फ्लेडरचा हा चित्रपट आणि टेरेन्टीनोचे चित्रपट यांमध्ये एक मोठा फरक मात्र दिसतो, तो खरं तर याला ठळकपणे वेगळा असल्याचं दाखवून देतो. टेरेन्टीनोची पात्रं ही केवळ त्या क्षणाचा विचार करणारी आहेत. "स्वार्थ' या एकाच गोष्टीभोवती त्यांची प्रत्येक हालचाल फिरताना दिसते. पाप-पुण्याच्या संकल्पनेपेक्षा चाली-प्रतिचालींची संकल्पना त्यांना कळायला अधिक सोपी आहे. याउलट जिमी द सेन्टच्या कथेचा संपूर्ण उत्तरार्ध हा समीप आलेल्या मृत्यूच्या पलीकडं जाऊन हातून काही चांगलं घडवण्याचा प्रयत्न करण्याबद्दलचा, मोक्षप्राप्तीबद्दलचा आहे. आयुष्यातल्या पापाचं परिमार्जन होऊ शकेल का, हा प्रश्‍न जिमीला पडतो, जो टेरेन्टीनोच्या कोणत्याही पात्राला पडेलसं वाटत नाही. नेमका हाच भाग या चित्रपटाला महत्त्व आणून देतो.
सामान्यतः बॉसनं सोपवलेली कामगिरी पुरी करण्यात अयशस्वी झालेला नायक हा चित्रपटाच्या अखेर बॉसवर कुरघोडी करून आपलं बस्तान पुन्हा तरी बसवील किंवा मोठा डल्ला मारून फरार तरी होईल. जिमी यातली कोणतीच गोष्ट करत नाही. आपला मृत्यू समोर दिसत असतानाही तो शांतपणे आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. चित्रपटाच्या नावाला संदर्भ आहे तो त्याच्या या वागण्याचाच. तो आपल्या प्रयत्नांत यशस्वी होतो का, हे मी सांगणार नाही. तो मुद्दाही नाही. महत्त्व आहे ते या प्रकारचं पात्र याप्रकारे वागण्याचं ठरवतं यालाच.
या एका गोष्टीवर चित्रपट पाहणाऱ्यांची मतं आपोआप विभागली जातात. जे प्रेक्षक आपल्याला स्मार्ट गुन्हेगारीपट पाहायला मिळेलशा आशेनं आले आहेत, ते गोंधळतात आणि चित्रपटाच्या दर्जाला नावं ठेवणं पसंत करतात. याउलट जे काही विशिष्ट अपेक्षा न ठेवता मोकळ्या मनानं चित्रपट पाहतायत ते या नव्या दिशेचं स्वागत करतात आणि कोणत्या मुक्कामाला घेऊन जाते हे पाहतात.
"थिंग्ज टू डू इन डेन्वर व्हेन यू आर डेड' पाहावा असं मी सुचवण्यामागं हे महत्त्वाचं कारण आहे. एका विशिष्ट चित्रप्रकाराच्या ठरलेल्या चौकटीपेक्षा बाहेरचं सामावून घेताना त्या चित्रकर्त्यांना काय तडजोडी कराव्या लागतात आणि एक प्रेक्षक म्हणून हा चौकट मोडणारा चित्रपट आपण काय प्रकारे पाहू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. नव्वदीमध्ये अमेरिकन गॅंगस्टरपटात काय बदल होत गेले याची नोंद म्हणूनही हा चित्रपट योग्य उदाहरण ठरेल. अखेर चित्रपट आपल्याला काय देतो हे बऱ्याचदा आपण त्याच्याकडून काय घेण्याची क्षमता ठेवतो, यावरही अवलंबून असतं. "थिंग्ज टू डू इन डेन्वर...' त्याला अपवाद असायचं काहीच कारण नाही.
-गणेश मतकरी

Read more...

दृष्टिकोनातला वेगळेपणा

>> Monday, June 9, 2008

2001च्या स‌प्टेबर महिन्यात ज्युल्स आणि मिडीयन हे बंधू अग्निशमन दलाच्या जवानांवर एक माहितीपट करत होते. अकरा तारखेच्या स‌काळी एका गँस लीकच्या तक्रारीमुळे हे जवान न्यूयॉर्कमधल्याच एका मध्यमवस्तीच्या भागात पोचले. तेव्हा ज्युल्स यांच्यात बरोबर होता. अचानक आलेल्या विमानाचा घरघराट ऎकून त्याने कॅमेरा फिरवला आणि त्यात दिस‌लेल्या दृश्याने जग हादरून गेलं.वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिलं विमान आदळतानाचा हा शॉट होता. दुस-याच क्षणी स‌र्व जवान आणि ज्युल्स‌ वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने सुसाट निघाले. आणि कॅमेरा या भयानक घटनेचा अवशेष टिपत राहिला.
9-11या माहितीपटात दिस‌णारे ज्युल्स आणि मिडीयन बंधू आणि त्यांचं फूटेज आठवण्यामागचं कारण म्हणजे 2008च्या जानेवारीत अमेरिकेत प्रदर्शित झालेला क्लोवरफिल्ड. क्लोवरफिल्ड हा कोणत्याही स‌त्य घटनांवर आधारित असण्याची शक्यताच नाही. कारण तो मुळात आहे एक मॉन्स्टर मुव्ही आणि न्युयॉर्कच काय पण कोणत्याहीन शहरात किंग काँग- गॉडझिलाचा नातलग शोभण्याजोग्या प्राण्याने धुमाकूळ घातल्याची घटना झालेली नाही, होण्याची शक्यता नाही, तरीही 11 स‌प्टेंबरच्या घटनेचे अनेक संदर्भ इथे अतिशय वास्तववादी पद्धतीने पाहायला मिळतात.
प्रत्यक्ष कथानकाकडे वळण्याआधी आणखी एका संदर्भाचा उल्लेख आवश्यक आहे. ज्याची क्लोवरफिल्डच्या संकल्पनेत मोलाची भूमिका आहे. तो म्हणजे ब्लेअर विच प्रोजेक्ट हा चित्रपट. एका गावातल्या चेटकीच्या दंतकथेवर माहितीपट करण्यासाठी गेलेले काही विद्यार्थी बेपत्ता झाले अन त्याचं मिळालेलं फूटेज केवळ संकलनानंतर प्रेक्षकांसमोर आणलं जातंय अशी ब्लेअर विचमागची कल्पना होती. यातली घटना ही केवळ कॅमेराच्या लेन्समधून सांगितली गेली होती, भीती जे दिसतंय त्यातून तयार होण्यापेक्षा जे दिसण्याच्या परिघापलीकडे आहे. त्यातून तयार होत होती. आणि अऩेक प्रश्न अनुत्तरीत ठेवूनही एक धक्कादायक अनुभव देणारा हा चित्रपट होता. स्पेशल इफेक्ट्स,नीट गोष्ट मांडणारी पटकथा किंवा स्टार्स यांचा संपूर्ण अभाव असूनही मी पाहिलेला स‌र्वोत्कृष्ट भयपटातला ब्लेअर विच प्रोजेक्ट हा एक.
तर क्लोवरफिल्ड, केवळ कॅमेराच्या नजरेतून घटना सांगितली जाणं आणि स‌र्व प्रश्नांना उत्तरे देणारी पटकथा नसणं या गोष्टी इथे ब्लेअर विचच्या संकल्पनेतून थेट आलेल्या आहेत. तर जवळजवळ माहितीपटात शोभण्यासारखं एका शहराचं (खरं तर प्रसिद्ध शहराचं म्हणजे, न्यूयॉर्कचं) नेस्तनाबूत होणं सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून दाखवलं जाणं. 9-11ची आठवण देणारं आहे.
मला वाटतं क्लोव्हरफिल्डला मॉन्स्टर मूव्ही न करता 9- 11च्या घटनेप्रमाणेच दहशतवादी हल्ल्याची गोष्ट करणं स‌हजशक्य झालं असतं. जो प्रत्यक्ष शक्यतेच्या कोटीतला नक्कीच आहे. मात्र कदाचित ते अमेरिकन प्रेक्षकांसाठी फार त्रासदायक, कदाचित न पाहावणारं झालं अस‌तं.
एक लक्षात घ्यायला हवं की, दोन इतके मजबूत संदर्भ असूनही क्लोव्हरफिल्ड हा रचायला आणि प्रत्यक्षात आणायलाही अत्यंत कठीण चित्रपट आहे. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट दिग्दर्शक मॅट रिव्हज आणि पटकथाकार डू गोदार यांना द्यायला हवं. पटकथा कठीण अशासाठी की ती कुठेही रचल्यासारखी न वाटता पुढेपुढे जायला हवी. ती कॅमेरावर चित्रीत करण्यामागे चित्रपटातल्या पात्रांनाच काही विशिष्ट कारणं हवीत. हे चित्रण अतराअंतराने तुटक होत असूनही त्याला एकसंघता हवी आणि घटनेचे स‌र्व पैलू त्यात यायला हवेत.
क्लोव्हरफिल्डच्या सुरुवातीलाच सांगितलं जातं की हे एका कॅमेरावर मिळालेलं फूटेज आहे. पूर्वी सेंट्रल पार्क म्हणून ओळखल्या जाणा-या या भागात सापडलेल्या. मग आपण केवळ हे फूटेज पाहतो.एका प्रस‌न्न पहाटे सुरू झालेल्या, एखाद्या प्रेमकथेत शोभणा-या पहिल्या दृश्यानंतर कॅमेरा पोचतो तो जेसनच्या (माईक व्होगेल) हाती. तो आणि लिली (जेसिका ल्यूकस‌) जेस‌नच्या भावाच्या म्हणजे रॉबच्या (मायकेल स्टाल- डेविड) घरी स‌रप्राईझ पार्टीसाठी निघालेत. रॉब जपानला निघालाय. अन लिलीची योजना आहे की पार्टीतल्या मंडळींचे निरोपाचे संदेश चित्रित करून रॉबला ही टेप भेट द्यायची. पुढे आपण अर्थात कॅमेरा पार्टीत पोहोचतो. इथे रॉबची मैत्रिण बेथ (ओडेन यूस्टमन), पुढे बराच वेळ कॅमेरा चालवणारा हड (टी.जे मिलर) आणि मार्लिना (लिझी काप्लान) यांची थोडक्यात ओळख होते. क्लोव्हरफिल्डचा हा भाग थोडा रेंगाळतो, पण पुढल्या भागासाठी हा सेटअप आहे. हा जमला नाही, अन व्यक्तिरेखांची ओळख, त्यांच्या प्रवासामागची कारणं ठरली नाहीत तर चित्रपट पकड घेणार नाही. लवकरच टीव्हीवर एक बातमी येते. आणि शहरात काही घडत असल्याची कल्पना सर्वांना येते. मंडळी आधी गच्चीत आणि मग रस्त्यावर उतरतात आणि चित्रपट गती घेतो.
क्लोवरफिल्डमध्ये न्यूयॉर्कवर हल्ला करणारा राक्षस हा गॉडझिला वैगैरे चित्रपटातल्याप्रमाणेच प्रचंड आणि नासधूस करणार अस‌ला तरी कथा घडते ती सामान्य माणसांना प्रमुख भूमिकेत ठेवून.त्यामुळे अशा चित्रपटांमधील मीडिया-आर्मी- राजकारणी वैगेरेंच्या स्ट्रेटे ज्यांना आपसूक कात्री लागते. आणि कॅमेराधारकांच्या आपला अन आपल्या मित्रांचा जीव कसा वाचवायचा, या प्रश्नांना महत्त्व येतं. प्रेक्षकांची नजरही कॅमेराच्या मर्यादित आल्याने त्याला फार काही दिसू शकत नाही. मात्र ही मर्यादाच खरी भीती तयार करते.जी एरवी मॉन्स्टर मुव्हीजमध्ये बहुदा वाटतच नाही.
दिग्दर्शकाने चित्रपट वास्तव वाटण्यासाठी कॅमेरा हँन्डिकॅमच्या स‌हजतेने तर वापरला आहेच.वर हँडिकँमच्या अनेक गुणदोषांचाही वापर सामावून घेतला आहे. जेसनने लिलीशी बोलताना तिच्या नकळत मागच्या सुंदर मुलींचं चित्रण करणं, नाईट व्हिजनचा वापर, काही चित्रीत केलेल्याच टेपवर ही नवी दृश्य चित्रीत करण्यात आल्याने मधेच काही सेकंदांसाठी दिसलेला पूर्वीच्या दृश्यांचा भाग आणि त्यांचा व्यक्तिरेखांसाठी लागणारा संदर्भ अशा अनेक ठिकाणी हँडीकँमच्या वापराच्या खूणा सोडलेल्या दिस‌तात. प्रत्यक्षात अनेक कॅमेरांनी शूट केलेल्या दृश्यांना एकजीव करून एका कॅमे-याचं म्हणून वापरणं, दृश्यांनी ग्रेनी करणं. असे तांत्रिक चमत्कारही आहेत. त्याशिवाय स्पेशल इफेक्ट्सच्या मर्यादित आणि पटण्यासारखा वापर ही क्लोवरफिल्डची खासियत आहे. माझं वैयक्तिक मत विचाराल,तर मी म्हणेन की शेवटाकडे हेलिकॉप्टरमधून दिसणारं प्राण्याचं जवळजवळ संपूर्ण दर्शन नस‌तं. तर बरं झालं असतं. मात्र मॉन्स्टर मुव्ही या चित्रप्रकाराचाही एक प्रेक्षकवर्ग आहेच. त्यामुळे दिग्दर्शकाला त्यांचाही विचार थोड्या प्रमाणात करायला हवा. हे तर उघड आहे.
क्लोवरफिल्ड आपल्याकडे अजून का आला नाही कोण जाणे. पण माझ्या मते तो येण्याची शक्यता नक्कीच आहे. काही अपेक्षेबाहेरचं पाहण्याची तयारी असलेल्यांनी त्याची वाट पाहायला हरकत नाही.
-गणेश मतकरी

Read more...

वॉर पीस आणि सेन्सॉर!

>> Friday, June 6, 2008

आपण एका लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या देशाचे नागरिक आहोत, आणि व्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य यासारख्या काही घटकांना आपण मानणं गरजेचं आहे, हे आपल्या सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या कधी लक्षात येणार कोण जाणे! समाजाच्या सांस्कृतिक वाढीसाठी काही गोष्टी समाजापासून दूरच ठेवलेल्या बऱ्या, असं या मंडळींचं मत असावं. हे मत कितीही फसवं, ढोबळ आणि स्वतःकडे महत्त्व घेणारं असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर करताना बोर्ड काही तारतम्य वापरेल अशी अपेक्षा आपण करतो, आणि तिचा भंग करून ते आपल्याला अनेकवार तोंडघशी पाडायला कमी करत नाही. मागे, मी बोर्डाने "क्लोजर' या विवाह (आणि विवाहबाह्य) संबंधांवर आधारित चित्रपटावर घातलेल्या बंदीविषयी लिहिलं होतं. नात्याच्या बदलत्या चेहऱ्यांनी ओढवणाऱ्या प्रेम या प्राचीन भावनेच्या ऱ्हासाचा उतरता आलेख दाखवणारा हा चित्रपट दृश्यात्मक पातळीवर कधीही सवंग होत नव्हता, पण केवळ प्रेमात संभवणाऱ्या वैचारिक द्वंद्वाला वाचा फोडणारा होता. कदाचित त्याचं विचारप्रवर्तक असणंच त्याला मारक ठरलं असावं. कारण विचार या संस्थेशीच बोर्डांचं वाकडं. असो, आपण क्षणभर गृहीत धरून चालू, की एका व्यक्तीच्या कल्पनेतून निघालेला चित्रपट त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित असतो, अन् म्हणूनच तो इतरापर्यंत पोचताना त्याच्या योग्यायोग्यतेचा सर्वांगीण विचार होण्याची गरज असते. पण माहितीपट? त्यांचं काय? सर्वसाधारणपणे माहितीपट हे लोकांना वरवर माहीत असणाऱ्या गोष्टींचाच खोलात अभ्यास करून काढल्याचं दिसतं. बहुतेकदा या प्रकारच्या निर्मितीमागे निर्मात्याने, दिग्दर्शकाने ठरवलेली एक दिशा असते, त्यांना उपलब्ध असणाऱ्या माहितीमधून काही विशिष्ट मुद्दा मांडायचा असतो, आणि त्या मुद्द्याला अनुसरूनच माहितीपटांचा अंतिम आकार ठरवला जातो. पण शेवटी हे लक्षात घ्यायला हवं, की हा आकार काही निव्वळ कोणाच्या सुपीक डोक्यातून तयार होत नाही. (मायकेल मूरसारख्या काही डोक्यांचा सन्मान्य अपवाद वगळता) तर त्याची बीजं, ही घडलेल्या घटनांमध्ये आणि सामाजिक परिस्थितीत पाहायला मिळतात. बहुसंख्य वेळा या डॉक्युमेंटरीमध्ये दिसणारा दृश्य भाग हा टेलिव्हिजन, वर्तमानपत्रांसारख्या माध्यमांद्वारे आधीच जनतेपर्यंत पोचलेला असतो, आणि फिल्ममेकर केवळ या भागाची पुनर्रचना करून आपला कार्यभाग साधताना दिसतो. अशा परिस्थितीत एखाद्या माहितीपटावर- तेही कोणा केवळ सिद्धीच्या मागे असणाऱ्या ऐऱ्यागैऱ्याने नव्हे, तर एका प्रथितयश सिद्धहस्त माहितीपटकर्त्याने बनवलेल्या माहितीपटावर बंदी घालून, सेन्सॉर बोर्ड काय साधतं? आशयप्रधान आणि संवेदनशील विषय हाताळणाऱ्या डॉक्युमेंटरी मेकर्समध्ये, आनंद पटवर्धनांचं नाव आदरानं घेतलं जातं. गेल्या तीस वर्षांत त्यांनी सामाजिक जाणिवा आणि राजकारणी डावपेचांकडे लक्ष देत अनेक महत्त्वाचे विषय यशस्वीपणे हाताळले आहेत. प्रिझनर्स ऑफ द कॉन्शन्स (1978), इन द नेम ऑफ गॉड (1992) फादर सन अँड होली वॉरसारख्या माहितीपटांनी त्यांचे नाव चर्चेत राहिलं आहे. सेन्सॉर बोर्डानं यापूर्वी अनेकदा पटवर्धनांच्या कामावर आक्षेप घेतला आहे, पण त्यांच्या "वॉर अँड पीस'चा सेन्सॉरबरोबरचा लढा आजवरचा सर्वांत तापदायक असावा. जेव्हा "वॉर अँड पीस' सेन्सॉरला दाखवला गेला, तेव्हा बोर्डानं सहा जागा आक्षेपार्ह ठरवल्या. पटवर्धनांनी हे अमान्य करताच एका मोठ्या झगड्याला सुरवात झाली. जिचा शेवट अखेर केला तो न्यायसंस्थेनं. या चोवीस एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयानं हा माहितीपट जसाच्या तसा संमत करण्याचा आदेश सेन्सॉर बोर्डाला दिला आणि या लढ्याचा शेवट झाला. आश्चर्याची गोष्ट अशी, की सामान्य प्रेक्षकाच्या दृष्टीनं यात आक्षेप घेण्याजोगी कोणतीही जागा नाही. एके काळी महात्माजींच्या अहिंसेच्या संदेशानं प्रभावित झालेल्या भारताला आज लाखो माणसांचा क्षणात बळी घेण्याची शक्ती असणारी अण्वस्त्रं प्रिय झाली असल्याचं सत्य नोंदवणारा हा माहितीपट, केवळ भारत-पाकिस्तानच्या युद्धविषयक धोरणांना स्पर्श करून थांबत नाही, तर एकूण जगातच आज युद्धाचा व्यापार होऊन राहिल्याचं स्पष्ट करतो. अमेरिकेसारख्या महाशक्तीनं केलेल्या शस्त्रास्त्र उद्योगाच्या खासगीकरणातून उद् भवलेल्या तोट्याबरोबरच, तो त्यांच्या सरकारी धोरणातल्या विसंगतीवरही बोट ठेवतो, आणि हिरोशिमा नागासाकीसारख्या अण्वस्त्रांमधून ओढवलेल्या भीषण संहारावरही एक नजर टाकतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, की पटवर्धनांचा रोख हा संपूर्ण युद्धसंस्कृतीवर आहे, प्रादेशिक आणि जागतिक. माझ्या मते, यातली चित्रकर्त्यांना वाटलेली आवाका वाढवण्याची गरज, हा या माहितीपटाचा सर्वांत गोंधळाचा भाग आहे, जो त्याच्या एकूण परिणामाला पसरट करतो. जोवर चित्रपट युद्धाकडे केवळ आपल्या आणि पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा तो सर्वांत प्रभावी ठरतो. या भागातही त्याच्या सादरीकरणाचे मुद्द्यांप्रमाणे तुकडे झालेले दिसतात. तरीही हे सर्व तुकडे हे प्रामुख्यानं एका प्रश्नाच्याच अनेक बाजू असल्याचं स्पष्ट होतं. किरणोत्सर्गाच्या परिणामाचे बळी ठरणारे सामान्य नागरिक, या शस्त्रांच्या भांडवलावर निवडणुका जिंकू पाहणारे राजकारणी, त्यांच्या दुष्परिणामाचं भांडवल करू पाहणाऱ्या विरोधी बाजू, दोन देशांतल्या वैरानं अकारण शत्रू पक्षात गेलेली जनता, नव्या पिढीची या वैराकडे पाहण्याची दृष्टी, अशा विविध अंगांनी जाणारा हा भाग, या द्वेषाच्या आणि शक्तिप्रदर्शनाच्या राजकारणाचं एखाद्या कोलाजसारखं चित्र उभं करतो. त्या मानानं आंतरराष्ट्रीय घडामोडींवर रेंगाळणारा भाग हा स्वतंत्रपणे लक्षवेधी असला, तरी डिसकनेक्टेड वाटतो. कदाचित त्याची स्वतंत्र डॉक्युमेंटरी अधिक चांगली वाटली असती. पण तो वेगळा मुद्दा. महत्त्वाचं हे, की यात कोणताच भाग समाजमानसासाठी अडचणीचा नसल्यानं, सेन्सॉर बोर्डनं सुचवलेल्या कट् समागच्या प्रेरणा स्पष्ट होत नाहीत. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते फिल्ममुळे समाजावर होणाऱ्या एकूण परिणामावर नजर टाकतात, आणि हा परिणाम नकारात्मक असला, तर चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारण्यात येते. आता "वॉर अँड पीस' बद्दल बोलायचं, तर त्याचा परिणाम हा नकारात्मक कसा? किंवा कोणासाठी? हा चित्रपट प्रामुख्यानं युद्धविरोधी असून, युद्धविषयक धोरणांमधल्या विसंगती सांगणारा आहे. त्यातला अतिरिक्त किरणोत्सर्गाविषयीचा भाग तर समाजाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि तो सिद्ध करणंही सोपं आहे. राजकारण्यांचा भाग हा पब्लिक रेकॉर्डचा भाग असल्यानं, तो तर बहुतांशी लोकांना आधीच माहिती आहे. त्यातलं राजकारण्यांचं वागणं स्वार्थी आणि मूर्खपणाचं असलं तरी ते काही पटवर्धनांनी तयार केलं नाही, राजकारणी मुळातच तसे असल्याची ही चिन्हं आहेत. थोडक्यात, "वॉर अँड पीस' ही एका प्रश्žनाची सुविहीत रचना आहे. हा प्रश्न समाजापर्यंत पोचण्यासाठी ती तशी असणं गरजेचं असल्यानं ती समाजासाठी नकारात्मक नाही. ती तशी असलीच, तर राजकारण्यांसाठी काही प्रमाणात आहे. म्हणजे बोर्डानं घेतलेला आक्षेप, हा राजकारण्यांचा फायदा मनात ठेवून घेतला असल्याचीच ही चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत निरपेक्ष नजर न ठेवता पक्षपात करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाची गरजच काय, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. "वॉर अँड पीस' हा चित्रपटाप्रमाणे चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा पहिला माहितीपट ठरला आहे. मायकेल मूरच्या "फॅरेनहाईट 9/11' नंतर या प्रकारच्या प्रयोगानं मूळ धरणं स्वागतार्ह आहे. मात्र वॉर अँड पीसच्या बाबतीत तो कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणं गरजेचं आहे. फॅरेनहाईटला प्रेक्षक मिळणं त्यामानानं सोपं होतं ते अनेक कारणांसाठी. एक तर तो त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या उघड विरोधात असल्यानं मुळातच वादग्रस्त होता. (आपल्याकडे अशा प्रकारचा माहितीपट सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटणं, केवळ अशक्य) शिवाय मायकेल मूर हा त्याच्या विशिष्ट प्रकारच्या माहितीपटांचा स्टार असल्यानं, त्याचा स्वतःचा प्रेक्षक आहे. त्याखेरीज मूरच्या शैलीतच एका प्रकारचा उपहासात्मक विनोद पाहायला मिळतो, जो त्याच्या माहितीपटांचं मनोरंजनमूल्यही वाढवतो. तुलनेनं "वॉर अँड पीस' हा अधिक सांकेतिक अर्थानं माहितीपट आहे. त्याला येणारा प्रेक्षक हा केवळ त्यातल्या प्रश्नाची हाक ऐकून येऊ शकतो, त्यापलीकडे वेगळ्या कारणांसाठी नाही. सेन्सॉरच्या अडचणीचा त्यातल्या त्यात फायदा म्हणजे, त्या निमित्तानं "वॉर अँड पीस'चं वादग्रस्त असणं थोडंफार अधोरेखित केलं आहे. त्यामुळे एरवी माहितीपटांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रेक्षकालाही यात थोडाफार रस तयार झाला असल्याची शक्यता आहे. प्रसिद्धीचा एक नेहमीचा नियम आहे, की "नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी', त्यामुळे बोर्डानं केलेल्या आरोपांचा झाला तर फायदाच होईल. त्या निमित्तानं काही अधिक लोकांपर्यंत या माहितीपटाचं नाव पोचेल, आणि तो अधिक प्रमाणात पाहिला जाईल. वाईटातूनही काहीतरी चांगलं निघू शकतं ते असं.
गणेश मतकरी

Read more...

चौकटीबाहेरचा थ्रिलर

>> Tuesday, June 3, 2008

इ न्टरप्रिटेशन हा शब्द वरवर साधा आणि नेहमीच्या वापराचा असला तरी प्रत्यक्षात खूपच गुंतागुंतीचा आहे. डिक्शनरीत पाहायचं तर त्याचा अर्थ हा "अर्थ सांगणे' या सोप्या क्रियेपासून ते "दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे, विवरण करणे' यासारख्या थोड्या अधिक गंभीर गोष्टींना स्पर्श करत थेट एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने समजणे, अर्थ लावणे इथपर्यंत पोचतो. त्यामुळे महत्त्वाचा ठरतो तो संदर्भ. आपण हा शब्द वापरताना तो कोणत्या संदर्भात वापरतो त्यावरून या शब्दाचं, विषयापुरतं वजन ठरतं. सिडनी पोलाक दिग्दर्शित " इन्टरप्रिटर' हा चित्रपट या शब्दाच्या संदर्भासहित बदलत जाणाऱ्या अर्थाशी वेगवेगळ्या पद्धतीने खेळून आपलं नाव सार्थ ठरवतो. वरवर पाहता हे यातल्या नायिकेचं जॉब डिस्क्रिप्शन किंवा तिचा हुद्दा आहे. UN मध्ये किंवा संयुक्त राष्ट्रसंघात ती दुभाषाचं काम करते. मात्र चित्रपटातलं इन्टरप्रिटेशन तेवढ्यापुरतं सीमित नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाच्या अंतर्गत आणि वैश्विक पातळीवरच्या प्रश्नांकडे पाहिलं जातं तेव्हा असं लक्षात येतं, की त्या देशाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांचा अर्थ हा अनेक प्रकारे लावता येतो. या वेळी जागतिक महासत्तांनी किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या महासंस्थांनी लावलेला अर्थ, त्यांचं इन्टरप्रिटेशन हे जागतिक इतिहासालाच वेगळं वळण लावणारं असू शकतं. या परिस्थितीत या महासत्ता अन् महासंस्थाच इन्टरप्रिटर ठरतात. इथे नेते आणि जनता यांमधलं नातंही इन्टरप्रिटेशनसाठी अभिप्रेत आहे. या चित्रपटातल्या "मरोबो' काल्पनिक देशाचा हुकूमशहा राष्ट्राध्यक्ष एडमन्ड झुवानी याच्या सत्तासंघर्षात अनेक निरपराध्यांचे बळी गेले आहेत. त्याचे समर्थक, विरोधक आणि जनता हाही "इन्टरप्रिटर'चा एक पैलू आहे आणि त्यांचे झुवानीकडे पाहण्याचे स्वतंत्र दृष्टिकोन हादेखील यातल्या इन्टरप्रिटेशनचा एक भाग आहे. अर्थात, एक लक्षात घ्यायला हवं, की इन्टरप्रिटरची पार्श्वभूमी, त्यातली राजकीय गुंतागुंत आणि विषयाची व्याप्ती हे सर्व गृहीत धरूनही हा चित्रपट मुळात एक थ्रिलरच आहे. मात्र त्याच्या काळाबरोबर असण्याने आणि रहस्यापलीकडे जाऊन विचार करण्याची त्याची तयारी असल्यामुळेही तो देत असलेला अनुभव हा अधिक परिपूर्ण आहे. इथली नायिका सिल्व्हिया (निकोल किडमन) ही मूळची आफ्रिकेतल्या मरोबो देशाची नागरिक आहे आणि तिचे आई-वडील अन् बहिणीच्या मृत्यूला मरोबोचा राष्ट्राध्यक्ष झुवानी हा अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरलेला आहे. सध्या सिल्व्हिया संयुक्त राष्ट्रसंघात दुभाषाची नोकरी करते आणि तिच्या देशासारख्या भरकटलेल्या देशांना केवळ शांतिपूर्ण तडजोडींनीच योग्य मार्गावर आणता येईल हा तिचा ठाम विश्žवास आहे. झुवानीच्या कारकिर्दीत ओढवलेल्या मनुष्यहानीमुळे आता त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे, ज्यातून सुटण्याच्या आशेवर संयुक्त राष्ट्रसंघासमोर आपली बाजू मांडायला तो अमेरिकेत येणार आहे. एके रात्री आपलं सामान आणायला संघात परत गेलेल्या सिल्व्हियाच्या कानावर अपघाताने एक संभाषण पडतं, जो झुवानिच्या हत्येचा कट असतो. सहभागी व्यक्तींचे चेहरे पाहू शकत नाही, पण त्यांना मात्र तिचा छडा लगेचच लागतो. सिक्रेट सर्व्हिसच्या केलर (शॉन येन) या अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या तपासासाठी बोलावण्यात येतं, पण त्याचा सिल्व्हियावर विश्žवास बसत नाही. दिवस जातात तसा केलर सिल्व्हियाला समजून घ्यायला लागतो, पण सिल्व्हियानेही आपल्या जबाबात काही गोष्टी लपवलेल्या असतात, ज्या त्या दोघांनाही अनेकवार अडचणीत आणत राहतात. सध्या, म्हणजे खरं तर गेले बरेच दिवस चित्रपटातलं रहस्य हे केवळ धक्का देण्यासाठीच असल्याचा चित्रकर्त्यांचा समज झाला आहे. गुन्हेगारावर संशय येऊ न देणं हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाल्यामुळे अनेकदा चित्रपट त्याच्या कथेला पूर्ण न्याय देण्याऐवजी संशयितांमध्ये खो-खोचा खेळ करताना दिसतात. इंटरप्रिटर तसं करीत नाही. त्याच्या प्रवासात अनपेक्षित वळणं आहेत, पण केवळ धक्के देण्यावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तो पटकथा एका निश्चित आलेखात चढवत नेऊ शकतो. इंटरप्रिटर पाहताना अनेकांना 1998 मधल्या एडवर्ड झ्विक यांच्या "द सीज' या चित्रपटाची आठवण होणं शक्य आहे. सीज हादेखील पोलिटिकल थ्रिलर होता; पण त्यात रहस्याचा भाग हा इन्टरप्रिटरहून कमी होता आणि दहशतवादाच्या सार्वत्रिक परिणामांवर त्याचं लक्ष अधिक केंद्रित झालं होतं. या दोन्ही चित्रपटांत अनेक साम्यस्थळं आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवादाचा आसरा घेणाऱ्या राजकीय शक्ती, हतबल सरकारी यंत्रणा आणि अमेरिकेपर्यंत पोचलेले परकीय दहशतवादाचे पडसाद या गोष्टी दोन्ही चित्रपटांत आहेत; तरीही दोन लक्षणीय म्हणावेसे फरकही आहेत. "द सीज'ची रचना ही समाजाभिमुख आहे, तर "द इन्टरप्रिटर'ची व्यक्तिभिमुख. इन्टरप्रिटरमधली नायिका ही चित्रपटाचा जीव आहे. त्यातल्या सर्व वैचारिक प्रश्नांचा विचार हा प्रामुख्याने तिच्या दृष्टिकोनातून होतो आणि इतरांची कामं मोठी असली तरी दुय्यम राहतात. सीजमध्ये अनेकांचे समांतर दृष्टिकोन त्यातल्या घटना पुढे नेतात आणि पटकथा विविध पातळ्यांवर पुढे सरकते. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे सीज 9-11 च्या आधीचा होता, तर इन्टरप्रिटर नंतरचा आहे. हा फरक ढोबळ स्वरूपात जाणवत नाही, पण तपशिलात डोकावतो. अमेरिकेच्या परकीय धोरणाविषयीचे विचार, सुईसाईड बॉम्बर्सना थांबवण्यासाठी देण्यात येणारं प्रशिक्षण, चित्रपटातला सामोपचाराचा संदेश अशा अनेक ठिकाणी 9/11 चे पडसाद हलकेच उमटतात. आजकाल बहुसंख्य थ्रिलर्स हे एकप्रकारच्या निर्वातात घडताना दिसतात. त्यांना जगात काय चाललं आहे याचं भान नसतं. ना आपण चित्रपटातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दाखवत असलेल्या गोष्टींच्या प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामाची फिकीर. त्यांच्या नायकांची ओळख त्यांच्या कमावलेल्या शरीरयष्टीपुरती असते आणि खलनायकांची त्यांच्या अद्ययावत शस्त्रसामग्रीपुरती. त्यांच्या चित्रपटातलं ना राजकारण योग्य असतं ना समाजकारण. अशा अनेक चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर "द इन्टरप्रिटर'सारख्या चित्रपटांचं यश हे अधिकच प्रशंसनीय वाटतं. कारण त्यांनी घेतलेली थ्रिलरची चौकट ही त्यांची मर्यादा ठरत नाही, केवळ आपली मतं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी घेतलेली दिशा होऊन जाते.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP