वॉर पीस आणि सेन्सॉर!

>> Friday, June 6, 2008

आपण एका लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या देशाचे नागरिक आहोत, आणि व्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य यासारख्या काही घटकांना आपण मानणं गरजेचं आहे, हे आपल्या सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या कधी लक्षात येणार कोण जाणे! समाजाच्या सांस्कृतिक वाढीसाठी काही गोष्टी समाजापासून दूरच ठेवलेल्या बऱ्या, असं या मंडळींचं मत असावं. हे मत कितीही फसवं, ढोबळ आणि स्वतःकडे महत्त्व घेणारं असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर करताना बोर्ड काही तारतम्य वापरेल अशी अपेक्षा आपण करतो, आणि तिचा भंग करून ते आपल्याला अनेकवार तोंडघशी पाडायला कमी करत नाही. मागे, मी बोर्डाने "क्लोजर' या विवाह (आणि विवाहबाह्य) संबंधांवर आधारित चित्रपटावर घातलेल्या बंदीविषयी लिहिलं होतं. नात्याच्या बदलत्या चेहऱ्यांनी ओढवणाऱ्या प्रेम या प्राचीन भावनेच्या ऱ्हासाचा उतरता आलेख दाखवणारा हा चित्रपट दृश्यात्मक पातळीवर कधीही सवंग होत नव्हता, पण केवळ प्रेमात संभवणाऱ्या वैचारिक द्वंद्वाला वाचा फोडणारा होता. कदाचित त्याचं विचारप्रवर्तक असणंच त्याला मारक ठरलं असावं. कारण विचार या संस्थेशीच बोर्डांचं वाकडं. असो, आपण क्षणभर गृहीत धरून चालू, की एका व्यक्तीच्या कल्पनेतून निघालेला चित्रपट त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित असतो, अन् म्हणूनच तो इतरापर्यंत पोचताना त्याच्या योग्यायोग्यतेचा सर्वांगीण विचार होण्याची गरज असते. पण माहितीपट? त्यांचं काय? सर्वसाधारणपणे माहितीपट हे लोकांना वरवर माहीत असणाऱ्या गोष्टींचाच खोलात अभ्यास करून काढल्याचं दिसतं. बहुतेकदा या प्रकारच्या निर्मितीमागे निर्मात्याने, दिग्दर्शकाने ठरवलेली एक दिशा असते, त्यांना उपलब्ध असणाऱ्या माहितीमधून काही विशिष्ट मुद्दा मांडायचा असतो, आणि त्या मुद्द्याला अनुसरूनच माहितीपटांचा अंतिम आकार ठरवला जातो. पण शेवटी हे लक्षात घ्यायला हवं, की हा आकार काही निव्वळ कोणाच्या सुपीक डोक्यातून तयार होत नाही. (मायकेल मूरसारख्या काही डोक्यांचा सन्मान्य अपवाद वगळता) तर त्याची बीजं, ही घडलेल्या घटनांमध्ये आणि सामाजिक परिस्थितीत पाहायला मिळतात. बहुसंख्य वेळा या डॉक्युमेंटरीमध्ये दिसणारा दृश्य भाग हा टेलिव्हिजन, वर्तमानपत्रांसारख्या माध्यमांद्वारे आधीच जनतेपर्यंत पोचलेला असतो, आणि फिल्ममेकर केवळ या भागाची पुनर्रचना करून आपला कार्यभाग साधताना दिसतो. अशा परिस्थितीत एखाद्या माहितीपटावर- तेही कोणा केवळ सिद्धीच्या मागे असणाऱ्या ऐऱ्यागैऱ्याने नव्हे, तर एका प्रथितयश सिद्धहस्त माहितीपटकर्त्याने बनवलेल्या माहितीपटावर बंदी घालून, सेन्सॉर बोर्ड काय साधतं? आशयप्रधान आणि संवेदनशील विषय हाताळणाऱ्या डॉक्युमेंटरी मेकर्समध्ये, आनंद पटवर्धनांचं नाव आदरानं घेतलं जातं. गेल्या तीस वर्षांत त्यांनी सामाजिक जाणिवा आणि राजकारणी डावपेचांकडे लक्ष देत अनेक महत्त्वाचे विषय यशस्वीपणे हाताळले आहेत. प्रिझनर्स ऑफ द कॉन्शन्स (1978), इन द नेम ऑफ गॉड (1992) फादर सन अँड होली वॉरसारख्या माहितीपटांनी त्यांचे नाव चर्चेत राहिलं आहे. सेन्सॉर बोर्डानं यापूर्वी अनेकदा पटवर्धनांच्या कामावर आक्षेप घेतला आहे, पण त्यांच्या "वॉर अँड पीस'चा सेन्सॉरबरोबरचा लढा आजवरचा सर्वांत तापदायक असावा. जेव्हा "वॉर अँड पीस' सेन्सॉरला दाखवला गेला, तेव्हा बोर्डानं सहा जागा आक्षेपार्ह ठरवल्या. पटवर्धनांनी हे अमान्य करताच एका मोठ्या झगड्याला सुरवात झाली. जिचा शेवट अखेर केला तो न्यायसंस्थेनं. या चोवीस एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयानं हा माहितीपट जसाच्या तसा संमत करण्याचा आदेश सेन्सॉर बोर्डाला दिला आणि या लढ्याचा शेवट झाला. आश्चर्याची गोष्ट अशी, की सामान्य प्रेक्षकाच्या दृष्टीनं यात आक्षेप घेण्याजोगी कोणतीही जागा नाही. एके काळी महात्माजींच्या अहिंसेच्या संदेशानं प्रभावित झालेल्या भारताला आज लाखो माणसांचा क्षणात बळी घेण्याची शक्ती असणारी अण्वस्त्रं प्रिय झाली असल्याचं सत्य नोंदवणारा हा माहितीपट, केवळ भारत-पाकिस्तानच्या युद्धविषयक धोरणांना स्पर्श करून थांबत नाही, तर एकूण जगातच आज युद्धाचा व्यापार होऊन राहिल्याचं स्पष्ट करतो. अमेरिकेसारख्या महाशक्तीनं केलेल्या शस्त्रास्त्र उद्योगाच्या खासगीकरणातून उद् भवलेल्या तोट्याबरोबरच, तो त्यांच्या सरकारी धोरणातल्या विसंगतीवरही बोट ठेवतो, आणि हिरोशिमा नागासाकीसारख्या अण्वस्त्रांमधून ओढवलेल्या भीषण संहारावरही एक नजर टाकतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, की पटवर्धनांचा रोख हा संपूर्ण युद्धसंस्कृतीवर आहे, प्रादेशिक आणि जागतिक. माझ्या मते, यातली चित्रकर्त्यांना वाटलेली आवाका वाढवण्याची गरज, हा या माहितीपटाचा सर्वांत गोंधळाचा भाग आहे, जो त्याच्या एकूण परिणामाला पसरट करतो. जोवर चित्रपट युद्धाकडे केवळ आपल्या आणि पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा तो सर्वांत प्रभावी ठरतो. या भागातही त्याच्या सादरीकरणाचे मुद्द्यांप्रमाणे तुकडे झालेले दिसतात. तरीही हे सर्व तुकडे हे प्रामुख्यानं एका प्रश्नाच्याच अनेक बाजू असल्याचं स्पष्ट होतं. किरणोत्सर्गाच्या परिणामाचे बळी ठरणारे सामान्य नागरिक, या शस्त्रांच्या भांडवलावर निवडणुका जिंकू पाहणारे राजकारणी, त्यांच्या दुष्परिणामाचं भांडवल करू पाहणाऱ्या विरोधी बाजू, दोन देशांतल्या वैरानं अकारण शत्रू पक्षात गेलेली जनता, नव्या पिढीची या वैराकडे पाहण्याची दृष्टी, अशा विविध अंगांनी जाणारा हा भाग, या द्वेषाच्या आणि शक्तिप्रदर्शनाच्या राजकारणाचं एखाद्या कोलाजसारखं चित्र उभं करतो. त्या मानानं आंतरराष्ट्रीय घडामोडींवर रेंगाळणारा भाग हा स्वतंत्रपणे लक्षवेधी असला, तरी डिसकनेक्टेड वाटतो. कदाचित त्याची स्वतंत्र डॉक्युमेंटरी अधिक चांगली वाटली असती. पण तो वेगळा मुद्दा. महत्त्वाचं हे, की यात कोणताच भाग समाजमानसासाठी अडचणीचा नसल्यानं, सेन्सॉर बोर्डनं सुचवलेल्या कट् समागच्या प्रेरणा स्पष्ट होत नाहीत. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते फिल्ममुळे समाजावर होणाऱ्या एकूण परिणामावर नजर टाकतात, आणि हा परिणाम नकारात्मक असला, तर चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारण्यात येते. आता "वॉर अँड पीस' बद्दल बोलायचं, तर त्याचा परिणाम हा नकारात्मक कसा? किंवा कोणासाठी? हा चित्रपट प्रामुख्यानं युद्धविरोधी असून, युद्धविषयक धोरणांमधल्या विसंगती सांगणारा आहे. त्यातला अतिरिक्त किरणोत्सर्गाविषयीचा भाग तर समाजाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि तो सिद्ध करणंही सोपं आहे. राजकारण्यांचा भाग हा पब्लिक रेकॉर्डचा भाग असल्यानं, तो तर बहुतांशी लोकांना आधीच माहिती आहे. त्यातलं राजकारण्यांचं वागणं स्वार्थी आणि मूर्खपणाचं असलं तरी ते काही पटवर्धनांनी तयार केलं नाही, राजकारणी मुळातच तसे असल्याची ही चिन्हं आहेत. थोडक्यात, "वॉर अँड पीस' ही एका प्रश्žनाची सुविहीत रचना आहे. हा प्रश्न समाजापर्यंत पोचण्यासाठी ती तशी असणं गरजेचं असल्यानं ती समाजासाठी नकारात्मक नाही. ती तशी असलीच, तर राजकारण्यांसाठी काही प्रमाणात आहे. म्हणजे बोर्डानं घेतलेला आक्षेप, हा राजकारण्यांचा फायदा मनात ठेवून घेतला असल्याचीच ही चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत निरपेक्ष नजर न ठेवता पक्षपात करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाची गरजच काय, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. "वॉर अँड पीस' हा चित्रपटाप्रमाणे चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा पहिला माहितीपट ठरला आहे. मायकेल मूरच्या "फॅरेनहाईट 9/11' नंतर या प्रकारच्या प्रयोगानं मूळ धरणं स्वागतार्ह आहे. मात्र वॉर अँड पीसच्या बाबतीत तो कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणं गरजेचं आहे. फॅरेनहाईटला प्रेक्षक मिळणं त्यामानानं सोपं होतं ते अनेक कारणांसाठी. एक तर तो त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या उघड विरोधात असल्यानं मुळातच वादग्रस्त होता. (आपल्याकडे अशा प्रकारचा माहितीपट सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटणं, केवळ अशक्य) शिवाय मायकेल मूर हा त्याच्या विशिष्ट प्रकारच्या माहितीपटांचा स्टार असल्यानं, त्याचा स्वतःचा प्रेक्षक आहे. त्याखेरीज मूरच्या शैलीतच एका प्रकारचा उपहासात्मक विनोद पाहायला मिळतो, जो त्याच्या माहितीपटांचं मनोरंजनमूल्यही वाढवतो. तुलनेनं "वॉर अँड पीस' हा अधिक सांकेतिक अर्थानं माहितीपट आहे. त्याला येणारा प्रेक्षक हा केवळ त्यातल्या प्रश्नाची हाक ऐकून येऊ शकतो, त्यापलीकडे वेगळ्या कारणांसाठी नाही. सेन्सॉरच्या अडचणीचा त्यातल्या त्यात फायदा म्हणजे, त्या निमित्तानं "वॉर अँड पीस'चं वादग्रस्त असणं थोडंफार अधोरेखित केलं आहे. त्यामुळे एरवी माहितीपटांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रेक्षकालाही यात थोडाफार रस तयार झाला असल्याची शक्यता आहे. प्रसिद्धीचा एक नेहमीचा नियम आहे, की "नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी', त्यामुळे बोर्डानं केलेल्या आरोपांचा झाला तर फायदाच होईल. त्या निमित्तानं काही अधिक लोकांपर्यंत या माहितीपटाचं नाव पोचेल, आणि तो अधिक प्रमाणात पाहिला जाईल. वाईटातूनही काहीतरी चांगलं निघू शकतं ते असं.
गणेश मतकरी

4 comments:

Abhijit Bathe June 7, 2008 at 12:58 AM  

मतकरी -
’वॉर ऍन्ड पीस’ मी पाहिलेला नाही - त्यामुळे ही कमेंट त्याबद्दल नाही, पण इन जनरल ’माहितीपटांबद्दल आहे’. मी आनंद पटवर्धन, त्यांचे माहितीपट आणि त्यांचे सेन्सॉर बोर्ड आणि राजकारण्यांशी होणारे वाद याबद्दल बरेच वर्ष वाचत आलोय (इतर सामान्य प्रेक्षकही माझ्यापेक्षा वेगळे नसावेत). खरं सांगायचं तर मराठी किंवा जनरल भारतीय माहितीपट - एके काळी पिक्चर सुरु होण्यापुर्वी थिएअटर मध्ये दाखवायचे म्हणुन पहायला तरी मिळायचे - हल्ली तर ते ही होत नाही.
मायकल मूर वगैरे लांब राहिले - आणि तसाही मायकल मूर सोडला (ते ही Fahrenheit 9/11 - आणि त्याच्या entertainment value मुळे) तर जगभर documentary हा प्रकार फारसा 'revenue making' नाही. असं असताना, आणि कुठल्या महत्वाच्या सामाजिक हेतु कडे जनतेचं लक्ष आकर्षित करणे हा उद्देश असताना (असं माझं assumption) पटवर्धन किंवा त्यांच्या सारखे इतर लोक आपापल्या documentaries youtube वर का टाकत नसावेत? मला त्यांच्या सगळ्या documentaries पहायच्यात आणि मला त्यातली एकही मिळत नाहिए. Meanwhile - war and peace चा एक तुकडा youtube वर मिळाला. त्यातलं anti-nuclear stand आणि ’सध्याचं अमेरिका आकर्षण’ हे relation हास्यास्पद वाटलं. (But then again it was just a 2.5 min clip so it is entirely possible that I am taking it out of context).
पटवर्धनांना कधी भेटलात तर हे youtube चं प्रकरण त्यांना पटतंय का विचाराल का?

(Coming to think of it - Moore seems to be the only one who makes oodles of money screening his documentaries/propaganda. However, its not entirely true that documentaries dont make money. I guess you wrote about 'born into brothels' sometime back - I see that the DVD of it is in high demand in the video stores and libraries here. I am sure the producer has made a fair amount of money with it, though I dont think it was ever screened anywhere).
The point being - who cares about the sensor board anyhow in this day and age? You want to inform us - inform us, why are you wasting (your) time fighting against the sensor board?

ganesh June 7, 2008 at 4:48 AM  

bathe,
i dont know patwardhan personally, but know someone who knows him well. will try to get the issue across.

docus generally do not make much money. there are a few like farenheit, moore's bowling for columbine, BOB, and i am sure there are others. these are exceptions, not rules. they recover from funding,and selling it to broadcasting companies.

about censor board, i always think its a big contradiction, that we keep censoring some small stuff whereas everything from violence to pornography is available to all ages on the net. this is always at the back of my mind and i talk about it many times. these are just opinions, i am not interested in fighting censor board, if i was, there are other ways. what i am doing is just underlining the nonsense ways they go about doing this, so that anyone who reads will think about it.
that is all.

Abhijit Bathe June 7, 2008 at 10:28 AM  

Oops! My bad. My comment about "why waste time fighting sensor board" was directed to Patwardhan and not you.

Talking of documentaries and (of a few that I have seen) - have you seen Kevin McDonald's (Last King of Scotland) 'One Day in September?' - I found it as interesting as Spielberg's 'Munich' if not more.

In general what happens to the documentaries in India? I mean - not the ones about India, but the ones made by Indians? Who watches them? Where does one get them? Any publicity is good publicity, but after hearing so much about the gravy - I am very interested in knowing if there is any meat in these documentaries.

Unknown June 17, 2008 at 11:40 AM  

http://indiadocu.blogspot.com/
This blog is focused on the documentaries made by Indian film maker and all related issues…also, if you are really keen about this field then join http://movies.groups.yahoo.com/group/docuwallahs2/ to share your thoughts, ideas or queries.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP