क्‍युरिअस केसचं नक्की काय चुकलं?

>> Sunday, March 15, 2009


क्‍युरिअस केसचं नक्की काय चुकलं हे त्याला मिळालेल्या ऑस्कर पारितोषिकांवरून स्पष्ट होतं. कलादिग्दर्शन, मेकअप आणि व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स ही त्यामानाने दुय्यम अन्‌ तांत्रिक स्वरूपाची पारितोषिकं या चित्रपटाला मिळाली. व्यक्तिरेखांच्या आत्म्याशी समरस न होता बाह्यावरणाशी समरस होणं हे बेंजामिन बटनला महागात पडलं.

डेझी या बॅले नर्तिकेच्या आयुष्यातला एक दिवस. ती आपल्या कार्यक्रमाची तयारी करतेय. त्याच शहरात कुठेतरी एक बाई शॉपिंगला निघाली आहे. जिना उतरताना तिच्या लक्षात येतं, की आपण कोट विसरलोय. कोट घेताघेताच तिचा एक फोन येतो. त्याच शहरात एक माणूस ऑफिसला जायला निघालेला. सकाळी उठायला उशीर झाल्याने, आता त्याला बाहेर पडायलाही उशीर झालेला. घाईघाईतच तो बाहेर पडतो. घरातली कामं पूर्ण करून आता पुन्हा शॉपिंगसाठी बाहेर निघालेल्या बाईच्या टॅक्‍सीसमोर गाडी करकचून ब्रेक लावते. माणूस वाचतो.
शॉपिंगवाली बाई एक पार्सल घेण्यासाठी एका दुकानात पोचते. अपेक्षेप्रमाणे पार्सल तयार नाही. जिने ते तयार करणं अपेक्षित आहे त्या बिचारीचा काल रात्रीच प्रेमभंग झालेला. त्याच दुःखात ती पार्सलविषयी विसरून गेलेली. आता पुन्हा उशीर.
डेझी तालीम आटपून निघते तोच बरोबरच्या मुलीच्या बुटाची लेस तुटते अन्‌ तिला थांबणं भाग पडतं. डेझी अखेर जेव्हा बाहेर पडते तेव्हा सर्व कामं आटपून परतणाऱ्या शॉपिंगवाल्या बाईची टॅक्‍सी नेमकी अशा मोक्‍याच्या जागी असते, की होणारा अपघात अटळ. अपघात अटळ हे खरं, पण तो अटळ होण्यात नक्की किती जणांचा हात होता, अन्‌ किती विविध प्रकारे ! शॉपिंगवाल्या बाईला कोट विसरल्याची आठवण होण्यापासून पार्सल करून देणाऱ्या मुलीचा प्रेमभंग होण्यापर्यंत अनेक व्यक्ती अन्‌ त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा पट हा डेझीच्या अपघाताला जबाबदार होणं, ही किती विचित्र गोष्ट! यातली एखादी गोष्ट वेगळी घडती, तर डेझीचं पुढलं आयुष्य वेगळं घडतं का? कदाचित.
वर सांगितलेली प्रसंगमालिका घडते, ती यंदा ऑस्करला 13 विभागात नामांकन मिळालेल्या अन्‌ तीन विभागात पारितोषिक प्राप्त ठरलेल्या दिग्दर्शक डेव्हिड फिंचरच्या "द क्‍युरिअस केस ऑफ बेन्जामिन बटन' चित्रपटात. साधारण दहा एक मिनिटांपलीकडे वेळ ती घेत नाही; पण संपूर्ण चित्रपटातली ही सर्वांत लक्षवेधी आणि आशयापासून सादरीकरणापर्यंत परिपूर्ण अशी दहा मिनिटं. जगण्याबद्दल एक मूलभूत सत्य या प्रसंगमालिकेतून मांडलं जातं. पटकथाकार एरिक रॉथची मोजक्‍या आणि अचूक शब्दांत अन्‌ दृश्‍यरचनेत अवघड कल्पना मांडण्याची ताकद दिसून येते आणि डेव्हिड फिंचर या गिमिकी, परंतु अत्यंत स्टायलिश दिग्दर्शकाची पद्धतही स्पष्ट होते.
हे एकदा सांगितल्यावर उरलेल्या बेन्जामिन बटनवर काय लिहायचं, हा एक मोठाच प्रश्‍न आहे. कारण उरलेल्या भागात पुष्कळ वेळ लावून सांगितलेली, श्रीमंत दृश्‍य शैलीतली परंतु विशेष मुद्दा नसणारी बटनची आत्मकथा मांडण्यामागचा हेतू माझ्या अजून पुरेसा लक्षातच आलेला नाही.
क्‍युरिअस केसबद्दल मला पाहिल्यापासूनच क्युरिसीटी होती, ती मी डेव्हिड फिंचर अन्‌ ब्रॅड पिट या दोघांचाही पूर्वीपासून चाहता असल्याने. "फाईट क्‍लब' आणि "सेव्हन' हे आजच्या समाजाविषयी काही महत्त्वाची निरीक्षणं मांडणारे आणि तरीही त्यातल्या थ्रिलर एलिमेन्टमधून प्रेक्षकाला खिळवून ठेवणारे, ' द गेम' आणि "पॅनिक रूम' हे पूर्णपणे थ्रिलरच्या पातळीवरचे आणि दिग्दर्शकीय क्‍लृप्त्यांनी भरलेले चित्रपट हे फिंचरचं ट्रेडमार्क काम. यानंतरचा "झोडीऍक' हा सिरीअल किलरविषयी असूनही जवळजवळ चरित्रपट म्हणून चालेल असा. सांगितल्याशिवाय फिंचरची ओळख न उघड करणारा, तरीही दर्जेदार. या सर्व चित्रपटांतून फिंचरची प्रतिमा झालेली, ती आजच्या काळात घट्ट पाय रोवलेला, आशय अन्‌ रंजन या दोन्ही पातळ्यांवर कसोटीस उतरणारा दर्जेदार अमेरिकन दिग्दर्शक म्हणून.
ब्रॅड पिटची बिचाऱ्याची ओळखही सुंदर सुपरस्टार म्हणूनच राहिलेली. आपल्या प्रतिमेचा बाजूने आणि विरोधात उपयोग करणं, शोडरबर्गसारख्या दिग्दर्शक मित्रांसाठी " फुल फ्रन्टल'सारख्या चित्रपटात (ज्यात फिंचरही पाहुणा कलाकार होता) स्वतःचीच खिल्ली उडवून घेणं, गाय रिचीच्या स्नॅचमध्ये किंवा शोडरबर्गच्या ओशन्स मालिकेत विनोदी कामही पूर्ण झोकून देऊन करणं अशा गोष्टी पिट सतत करतो. तो स्वतःची प्रतिमा जाणून आहे, मात्र तिच्या प्रेमात पडलेला नाही. आजच्या बुद्धिवान अभिनेत्यांमध्ये तो जरूर आहे. त्यामुळे हे दोघं अन्‌ एफ. स्कॉट फिट्‌झगेराल्डची गोष्ट म्हणजे काही विशेष असेल ही पूर्वकल्पना. अनेकदा पूर्वकल्पना करणं धोक्‍याचं असतं; इथंही तीच 'केस'.
एखादी व्यक्ती ऐंशीच्या घरात जन्माला येणं अन्‌ तिचं वय वार्धक्‍याकडे न जाता उलट्या प्रवासाला निघणं ही कल्पना चमकदार आहे हे निश्‍चितच. गिमिक्‍सची आवड असणाऱ्या फिंचरसारख्या दिग्दर्शकाला तिचं आकर्षण वाटलं यात आश्‍चर्य नाही. पण कल्पना गृहीत धरली की पुढे काय? बरं, ही कल्पना ताटातूट आणि मृत्यू या दोन कल्पनांशी जवळून बांधली गेली आहे. बेन्जामिन (ब्रॅड पिट) अन्‌ त्याची नायिका डेझी (केट ब्लॅन्चेट) यांचा चित्रपटातला प्रवास दोन उलट्या बाजूंनी सुरू होणारा आणि विरुद्ध दिशांना संपणारा आहे हे उघड आहे. त्यामुळे साधारण जवळपासच्या वयातली दहाएक वर्षे सोडता ते एकत्र राहू शकणार नाहीत, हे इथे माहीतच आहे. मात्र हे दुःख उगाळण्यापलीकडे जाऊन त्यावर काही भाष्य होणं गरजेचं नाही का? कारण तसं पाहता वयाचा उलटा प्रवास हा बेंजामिन बटनमध्ये "गिमिक' असण्यापलीकडे जात नाही. त्याचं केवळ शारीरिक वय उलट जातं.
मूळ गोष्टीत त्याची मानसिक जडणघडण ही शारीरिक वयाशी सुसंगत असते. म्हणजे तो म्हातारा दिसत असताना त्याचं वृद्धांशी अधिक पटतं अन्‌ प्रत्यक्ष म्हातारपणी (म्हणजे शरीर तरुण असताना) तो शैक्षणिक महत्त्वाकांक्षा ठेवतो. इथे मात्र त्याचं वय काही असलं तरी मानसिक वयाचा प्रवास हा बाल, तरुण, वृद्ध या पद्धतीनेच जातो. आयुष्यातले महत्त्वाचे टप्पेही, म्हणजे अठरा वर्षांचा असताना घर सोडणं, प्रेमप्रकरण, अधिक पर्मनंट स्वरूपाचे डेझीबरोबरचे संबंध, व्यवसाय अन्‌ अखेर वार्धक्‍य असे सामान्य आयुष्यासारखेच राहतात. त्यामुळे कल्पनेतली ऍब्सर्डिटी ही केवळ वरवरची राहते, जी बेंजामिनचं आयुष्य संपूर्णपणे, सर्वार्थाने बदलू शकत नाही आणि ते जर बदललं नाही तर चित्रपट वेगळा, नवा होऊ शकत नाही.
या प्रकारे नायकाच्या आयुष्याचा प्रवास हा बदलत्या सामाजिक पटलावर दाखवणारे दोन उत्तम चित्रपट हे यापूर्वी येऊन गेले आहेत. झेमेकिसने दिग्दर्शित केलेला 1994 मधला फॉरेस्ट गम्प (ज्याची पटकथादेखील बटन लिहिणाऱ्या एरिक रॉथ यांचीच होती) ज्यात बुद्धीने फार तल्लख नसणाऱ्या भाबड्या फॉरेस्टचा (टॉम हॅंक्‍स) इतिहासाशी समांतर प्रवास होता आणि क्रिस कोलम्बसचं आयझॅक आसिमोव्हच्या बायसेन्टेनिअल मॅनचं चित्ररूप, ज्यात यंत्रमानवाने माणसाच्या स्तराला येण्यासाठी दोनशे वर्षं केलेली काल्पनिक पार्श्‍वभूमीवरली वणवण दाखवली होती. हे दोन चित्रपट हे यातल्या नायकाकडे अधिक सहानुभूतीने पाहणारे होते आणि मूळ कल्पना लक्षात आल्यावरही तिचा बेतीवपणा बाजूला ठेवून व्यक्तिरेखांमध्ये गुंतणं या दोन्ही चित्रपटांत शक्‍य होणारं होतं. बटन हा आपल्या मेकअपच्या प्रयोगांनी व्यक्तिरेखांमध्ये गुंतण्याची शक्‍यताच पुसून टाकतो आणि सतत त्यातल्या विरोधाभासांची लोकांना आठवण करून देतो. अनावश्‍यक स्वरूपाचं वृद्ध डेझीचं विवेचन, हे अधिकच त्रासदायक ठरतं.
क्‍युरिअस केसचं नक्की काय चुकलं हे त्याला मिळालेल्या ऑस्कर पारितोषिकांवरून स्पष्ट होतं. कलादिग्दर्शन, मेकअप आणि व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स ही त्यामानाने दुय्यम अन्‌ तांत्रिक स्वरूपाची पारितोषिकं या चित्रपटाला मिळाली आणि महत्त्वाची कोणाला गेली हे तर आपण जाणतोच! व्यक्तिरेखांच्या आत्म्याशी समरस न होता बाह्यावरणाशी समरस होणं हे बेंजामिन बटनला महागात पडलं. या प्रकारच्या चित्रपटांना ऑस्कर मिळण्याचा प्रीसिडन्ट असूनही, या वेळी ते घडलं नाही. हा निकालातला अन्याय म्हणता येणार नाही. जे झालं ते योग्यच झालं.
- गणेश मतकरी

Read more...

संदिग्ध वास्तवातली घुसमट

>> Monday, March 9, 2009



फिलिप के डिकची संपूर्ण विज्ञानलेखनाची कारकीर्द एका प्रातिनिधिक शब्दात मांडायची तर क्लॉस्ट्रोफोबिया हा शब्द डोळ्यासमोर येतो. त्याच्या सर्व पात्रांचं अस्तित्व हे आधुनिक समाजव्यवस्थेचा बळी असतं अन् या व्यवस्थेशी समरूप होऊ न शकल्याने होणारी घुसमट हा विषय त्याच्या अनेक कादंबऱयांच्या केंद्रस्थानी असतो, असं म्हणता येईल. फिलिप के डिकचं विपूल विज्ञानसाहित्य हे दुर्दैवाने तो असताना फार लक्षवेधी ठरलं नाही. मात्र मृत्यूनंतर हे नाव केवळ साहित्यासाठीच नाही, तर त्या साहित्यावर आधारित चित्रपटांसाठी महत्त्वाचं ठरलं. ब्लेडरनर (मूळ कादंबरी डू अँड्राइड्स ड्रीम आँफ इलेक्ट्रिक शीप) , टोटल रिकॉल (मूळ कथा वुई कॅन रिमेम्बर इट फॉर यू होलसेल), मायनॉरिटी रिपोर्ट (मूळ कथा मायनॉरिटी रिपोर्ट), या चित्रपटांनी केवळ विज्ञानपटातच नव्हे तर एकूण चित्रपट इतिहासात आपलं नाव अजरामर केलं, अन् आपल्याबरोबर फिलीप के डिकचं देखील. आजही अनेक दिग्दर्शक त्याच्या कथा- कादंब-यांवर चित्रपट बनविण्याचे मनसुबे रचताहेत.
फिलिप के डिकच्या सर्व साहित्यात दोन गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. ज्या त्यांच्या रुपांतरासाठी अडचणीच्या ठरतात. घटनांपेक्षा संकल्पनांवर भर ही त्यातली पहिली गोष्ट. या गोष्टीमुळे त्यांच्या विज्ञानकथा विचारांना प्रचंड चालना देणा-य़ा ठरतात. मात्र कथानक ही चित्रपटाची मूलभूत गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे तिस-या अंकाचा किंवा शेवटाचा अभाव. डिक अखेरपर्यंत आपल्या वैचारिक बैठकीला सोडत नाही. त्यामुळे त्याच्या गोष्टीचा शेवटही घटनांना वेग आणणारा असत नाही. साहजिकच त्याच्या गोष्टी रुपांतरित करताना शेवटचा भाग हा जवळजवळ नव्याने लिहावा लागतो, जो दर वेळी कथानकाच्या मूळ संकल्पनेशी सुसंगत असतोच असं नाही( पाहा मायनॉरिटी रिपोर्ट) तरीही त्याच्या संकल्पनांची आणि आशयाची भूलच एवढी मोठी असते की, रिडली स्कॉट, स्टीवन स्पीलबर्गसारखे नावाजलेले दिग्दर्शकही या लेखकाच्या प्रेमात असतात. स्कॉटचा ब्लेडरनर, स्पीलबर्गचा मायनॉरिटी रिपोर्ट आणि व्होरावेनचा टोटल रिकॉल हे आशय अन् संकल्पनांना स्थान देऊन बनले, पण त्यांनी गोष्टींच्या मूळ आकाराशी मोठ्या प्रमाणात तडजोड केली. २००६ च्या ए स्कॅनर डार्कलीमध्ये रिचर्ड लिन्कलेटरने प्रयत्न केला, तोही तडजोड टाळण्याचा.
स्कॅनर मुळातच रुपांतर करायला कठीण कादंबरी आहे. एकतर ती बरीचशी चर्चात्त्मक आहे. दुसरं म्हणजे तिच्यात नाट्यपूर्ण घटना या इतर गोष्टींच्या तुलनेत कमी आहेत, आणि तिसरं म्हणजे इतरांप्रमाणेच, तिच्यातही शेवटाचा गोंधळ आहे. लिन्कलेटर हे नाव व्यावसायिक दृष्टीने फार लोकप्रिय म्हणता येणार नाही. कारण मुळात हा इंडि किंवा इन्डिपेन्डन्ट फिल्ममेकर आहे. बॅ़ड न्यूज बेअर्स किंवा स्कूल आँफ रॉकसारखे काही चित्रपट त्याने व्यावसायिक चौकटीत यशस्वीपणे पार पाडून दाखविले आहेत, हे खरं. पण त्याचं महत्त्वाचं काम हे त्याच्या बीफोर सनराईज/बीफोर सनसेट, वेकिंग लाईफ, स्लॅकर्स किंवा टेप यासारख्या अधिक व्यक्तिगत स्वरूपाच्या इन्डिपेन्डन्ट किंवा हॉलीवूडबाहेर केलेल्या चित्रपटांत दिसून येते. स्कॅनर हा व्यावसायिक अन् इन्डिपेन्डन्ट चित्रपटाची वैशिष्ट्य एकत्र करण्याचा प्रकार असावा, लिन्कलेटरला व्यावसायिक नटमंडळींचं वावडं नाही. कारण इथन हॉक, उमा थर्मन यासारख्या अनेक मोठ्या स्टार्सनी त्याच्या छोट्या चित्रपटांतही पूर्वीपासून कामे केली आहेत. इथे किआनू रिव्हज, रॉबर्ट डाऊन ज्युनिअर, विनोआ रायडर हजेरी लावतात, पण आपल्या मूळ स्वरूपात नव्हे. स्कॅनर एकत्रितपणे दोन प्रकारचे प्रयोग करतो. एक तर तो फिलिप के डिकच्या पुस्तकाला व्यावसायिक फॉर्म्यूलात बसवण्याचा प्रयत्न न करता आहेन तसं वापरतो आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष चित्रीकरणाला अँनिमेशन शैलीत आणण्याचं रोटोस्कोपिंग हे तंत्र वापरतो. लिन्कलेटरनं याआधी गोष्टींचा पूर्णपणे अभाव असलेल्या द वेकिंग लाईफमध्ये रोटोस्कोपिंग वापरलं होतं. कदाचित स्कॅनरची पूर्वतयारी म्हणून. मात्र दोन्ही ठिकाणी ते वापरण्याला कारण आहे. दोन्ही चित्रपटात वास्तवाची संदिग्धता अपेक्षित आहे. जी या अर्धवास्तव दृश्यात्मकतेत शक्य होते.
स्कॅनरमधला समाज हा सब्स्टन्स डी या अमली पदार्थाच्या संपूर्ण अमलाखाली आहे, जवळजवळ सगळेच या ड्रगवर अवलंबून आहेत. सामान्य नागरिकांपासून पोलिसांपर्यंत. त्यामुळे त्यांचं वास्तवच पूर्णपणे भासमय होऊन गेलेलं आहे. बॉब आर्क्टर (किआनू रिव्हज) हा गुप्तपोलीस आहे. गुप्तपोलीस हा जवळजवळ विस्मरणात चाललेला शब्द इथे वापरण्याचं खास कारण म्हणजे इथे बॉबची ओळख ही खरोखरच गुप्त आहे. पोलीस म्हणून तो एक स्क्रॅबल सूट नावाचा पूर्ण शरीर झाकणारा पोषाख घालतो, जो बाह्यांगावर हजारो स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा बदलत ठेवेल. अन् बॉबच्या आवाजालाही थोड्याफार प्रमाणात बदलत राहील. त्यामुळे आँन ड्य़ुटी असताना फ्रेड हे नाव वापरणारा बॉब प्रत्यक्षात कोण आहे, हे त्याच्याबरोबरच्या अधिका-यांनाही माहिती नाही.
आता योगायोगानं बॉबवरच जबाबदारी दिली जाते ती त्याच्याच घरावर नजर ठेवण्याची, जिथे तो बॅरीस (रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर) आणि लकमन (वुडी हॅलरसन) या मित्रांबरोबर अन् डॉना (विनोआ रायडर) या ड्रग डिलर मैत्रिणीबरोबर राहतो. बॉबचं मुळचं गुंतागुंतीचं आयुष्य आता अधिकच गोंधळाचं होतं.
पॉईंट आँफ रेफरन्स हरवलेल्या समाजाचं चित्रण हा स्कॅनरचा विशेष आहे. पुस्तकातही आणि चित्रपटातही. त्याची प्रकृती ही रहस्यपटाची म्हणता येईल. अन् त्यात नाही म्हणायला रहस्य आहेदेखील. मात्र रहस्याचा उलगडा हा समाजचित्रणाच्या तुलनेत दुय्यम म्हणावा लागेल. आपल्याकडे अजूनही अँनिमेशन (मग ते कोणत्याही शैलीतील असेना) हे बाल चित्रपटांशी जोडलं जातं. स्कॅनरसारखे चित्रपट हे या माध्यमाच्या शक्यता पडताळून पाहणारे आहेत, म्हणूनच ते पाहिले जाणं आवश्यक आहे. त्यातला आशय सुबोध असावा या आग्रहाशिवाय.
- गणेश मतकरी

Read more...

क्यूरिअस केस ऑफ स्लमडॉग मिलिअनेअर

>> Sunday, March 1, 2009


ऑस्कर निकालाच्या आदल्या दिवशी अचानक निकाल फुटल्याची बातमी आली. अ‍ॅकेडमी वरिष्ठांच्या सही-शिक्क्यासह जाहीर झालेल्या निकालाकडे सर्वाचंच लक्ष वेधलं अन् विविध वादांना तोंड फुटायला लागलं. अ‍ॅकेडमीने ही यादी खोटी असल्याचं सांगून हात वर केले, पण आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले. ही यादी खरी वाटायला काही प्रमाणात तिचा अस्सल असल्याचा कागदोपत्री आव जरी कारणीभूत असला तरी मला वाटतं खरं कारण होतं ते इथे जाहीर झालेल्या विजेत्यांच्या नावातंच. ही नाव तंतोतंत बांधलेल्या अंदाजांशी जुळणारी होती आणि दुसऱ्या दिवशी खरी यादी येताच दिसून आलं, की खरोखरच अनेक नावं या दोन्ही ठिकाणी उपस्थित होती.
या वर्षीच्या निकालाचं ‘प्रेडिकटेबल’ असणं हे वैशिष्टय़ म्हणावं लागेल. नामांकनं जाहीर होताच काही तांत्रिक पारितोषिकं वगळता कोणाला काय मिळणार हे लख्खं दिसायला लागलं आणि सवरेत्कृष्ट अभिनेता ही कॅटेगरी वगळता इतर कोणत्याच प्रमुख नामांकनात स्पर्धा उरली नाही. अगदी सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठीही खरी स्पर्धा दोनच नावांत होती, ‘मिल्क’मधला शॉन पेन आणि ‘रेसलर’मधला मिकी रोर्क. पेनला हल्लीच ‘मिस्टीक रिव्हर’साठी ऑस्कर मिळाल्याने आणि रोर्क अलीकडच्या काळात चित्रसृष्टीबाहेर फेकला जाऊनही पुनरागमनात चमकल्याने रोर्कचं पारडं थोडं जड होतं, पण शेवटी पेननेच बाजी मारली.
सर्वाधिक महत्त्वाची पारितोषिकं मिळवून या वर्षीचा मोठा विजेता ठरला तो म्हणजे आपल्याकडे विनाकारण वादग्रस्त ठरलेला स्लमडॉग मिलिअनेअर यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करणाऱ्या या छोटय़ाशा निर्मितीचा योग हा जवळपास तिच्या नायकासारखाच निघाला. अशक्य अडचणींवर कुरघोडी करणाऱ्या जमालसारखंच तिचंही नशीब टोकाचं उत्तम निघालं.
खरं तर स्लमडॉगच्या विजयात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, मात्र त्याच्या वादग्रस्त ठरण्यात जरूर आहे. आपल्याकडे कोण कशाला कधी आक्षेप घेईल याचा काही भरवसाच उरलेला नाही. त्यातून स्लमडॉगबद्दल उठणारे आक्षेप तर इतक्या वेगवेगळ्या स्तरांमधून उमटले, की त्यांच्या विविधतेचंच कौतुक वाटावं. कोणाचा भारतातली गरिबी दाखवायला विरोध, तर कोणाचा नायकाच्या धर्माला. कोणाचा बॉलीवूड शैली असल्याने चित्रपटात नावीन्य काय, असा प्रश्न तर कोणी डॅनी बॉइलच्या ब्रिटिश असण्याचा काढलेला तिरकस अर्थ!
या सर्व आक्षेपांनी, प्रश्नांनी अन् लावलेल्या चुकीच्या सूराने चित्रं असं उभं केलेलं, की स्लमडॉगचा सन्मान हा बॉलीवूड अन् भारत यावर एकत्रितपणे केलेला अन्याय आहे, आणि केवळ गोरा दिग्दर्शक हे त्याच्या यशाचं एकमेव कारण आहे. आपल्या दिग्दर्शकांनी जर हा चित्रपट केला असता, तर त्यांचं कुठेही कौतुक होण्याची काहीच शक्यता नव्हती.
या सगळ्या गढूळलेल्या वातावरणात जेव्हा भारतीय प्रेक्षक स्लमडॉग पाहतो, तेव्हा बहुतेकदा तो स्वतंत्रपणे मोकळ्या मनाने आस्वाद घेण्याच्या तयारीत नसतो, तर मनातल्या मनात तो आतापर्यंत चित्रपटाविषयी जे जे ऐकलं त्याचा अर्थ लावत असतो. बऱ्याचदा स्लमडॉगला मिळालेल्या अनेक सन्मानांनी त्याची कल्पना ही ऑस्कर मिळविणारी टिपिकल भव्य निर्मिती असेल, अशी झालेली असते, पण चित्रपट पाहायला लागताच त्याला जाणवतं, की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, बरचसं बॉलीवूड छापाचं. मग तो गोंधळतो अन् आपण ऐकलेले चित्रपट विरोधी सूर त्याला आठवायला लागतात. मग तो फारसा विचार करीत नाही, पटकन निष्कर्ष काढून मोकळा होतो, जो बहुधा चित्रपटाचं अवमूल्यन करणारा असतो.
स्लमडॉग जसा आहे तसा का आहे इथपासून, त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात पारितोषिकं का मिळाली इथपर्यंत सर्व प्रश्नांना सोपी उत्तरं / स्पष्टीकरण आहेत आणि आपण धर्म / देश / आर्थिक स्तरासारख्या गोष्टीनं गुंतवता निरपेक्षपणे पाहिला तर तो सहज आवडण्यासारखाही आहे.
डॅनी बॉइलची स्वत:च्या सिनेमाविषयी काही निश्चित बैठक आहे. १९९४ मधल्या ‘शॅलो ग्रेव्ह’पासून तो दिग्दर्शनात उतरला आणि तेव्हापासूनच त्याची स्वत:ची अशी एक निश्चित शैली ठरून गेली. शॅलो ग्रेव्ह हा म्हटलं तर एका गुन्ह्य़ासंबंधातला चित्रपट होता, म्हटलं तर एक गडद फार्स होता. एका फ्लॅटमध्ये एकत्र राहणारे तिघंजण. दोन मुलं, एक मुलगी. संबंध फक्त मैत्रीचे. तिघं एका चौथ्याला पेइंगेस्ट म्हणून घेतात, ज्याचा तडकाफडकी ड्रग ओव्हरडोसने मृत्यू होतो. मात्र मरताना तो एक पैशानी भरलेली बॅग मागे ठेवून जातो. हा अचानक धनलाभ या तिघांच्या आयुष्यात जी उलथापालथ घडवितो त्याचं चित्रण म्हणजे शॅलो ग्रेव्ह.
या चित्रपटात बॉइलने अशा काही गोष्टी केल्या ज्या त्याच्या पुढल्या अनेक चित्रपटांत कायम राहिल्या आणि त्या पुढे बॉइलच्या शैलीचा ट्रेडमार्ग बनून गेल्या. आताच्या ‘स्लमडॉग मिलिअनेअर’पर्यंत या गोष्टींचा सातत्याने केलेला वापर त्याच्या चित्रपटात दिसून येतो. त्याचे चित्रपट घडण्याला गरज असते ती एका व्यक्तिसमूहाची जो अत्यंत सामान्य आहे. त्यांच्यात कोणत्याच प्रकारचं वैशिष्टय़ नाही. किंबहुना या व्यक्तीही तपशिलात चितारलेल्या थ्री डिमेन्शनल व्यक्तिरेखा नाहीत, तर हे आहेत टाइप्स. अनेक चित्रपटांत वापरले गेलेले, पण अजून वापरले जाण्याच्या शक्यता असलेले. बॉइल हे टाइप्स उचलतो आणि त्यांना एखाद्या अशक्य परिस्थितीत आणून टाकतो. मग या परिस्थितीबरोबर ते कसे रिअ‍ॅक्ट होतात हे पाहणं, हा त्याचा चित्रपट. आता आपल्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात तो हीच गोष्ट करून वेगळेपणा कसा राखू शकला, तर विविध सांकेतिक चित्रप्रकारांचा (जॉनरचा) वापर करून.गुन्हेगारी (रॉलो ग्रेव्ह / ट्रेनस्पॉटिंग), विज्ञानपर (सनशाईन), झोम्बी किंवा वॉकिंग डेड आणि अ‍ॅपोकॅलिप्टिक चित्रपटाचं मिश्रण (२८ डेज लेटर) रोमॅन्टिक कॉमेडी (ए लाइफ लेस ऑर्डिनरी) असे हे प्रकार आहेत.
जेव्हा तो या चित्रप्रकारांचा वापर करतो तेव्हा तो शक्य तितकी या चित्रप्रकाराची मूळ वैशिष्टय़ं कायम ठेवतो. त्यामुळे हे चित्रपट त्यांच्या चित्रप्रकारातले म्हणूनही सहज ओळखता येतात. हे केल्यानंतर मात्र तो स्वत:ची काही ठेवणीतली सूत्रं त्यात मिसळतो आणि बदल साधतो. ब्लॅक ह्य़ुमरचा सततचा वापर नेहमीच बॉइल करताना दिसतो. हा विनोद इतका गडद आहे, की तो दर वेळी तो हसवेल असंही नाही, मात्र तो प्रसंगाची अ‍ॅब्सर्डिटी अधोरेखित जरूर करील. श्ॉलो ग्रेव्हमधला प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रसंग, लक्षावधी रुपये अचानक मिळाल्यावर मुलांनी केलेले गुंतवणुकीचे प्रयत्न, ट्रेनस्पॉटिंग आणि नंतर स्लमडॉगमधली टॉयलेट उडी या सर्व विनोदाचा वापर हा टिपिकल बॉइल आहे. इतर चित्रपटांमधले प्रसंग जर इंग्लंडचा अपमान करीत नसले (आणि तसा ते करीत असल्याची तक्रार कुठेही नोंदविलेली दिसत नाही.) तर स्लमडॉगदेखील भारताचा अपमान करतो असं म्हणायला जागा नाही. हा विनोद वेगळ्या प्रकारचा आहे; पण चित्रपटात सातत्याने वापरलेला आहे- टेक्श्चरशी आणि बॉइलच्या इतर चित्रपटांशी सुसंगत असा. विनोदाबरोबरच हिंसेचा अचानक अंगावर येणारा उद्रेक हे दुसरं साम्यस्थळ. यासाठी बॉइलला त्याची पात्रं गुन्हेगारी वळणाची असण्याची गरज वाटत नाही. कारण ही हिंसा ही दुसऱ्याला इजा पोहोचविण्यासाठी नाही, तर स्वरक्षणासाठी किंवा काही प्रसंगी व्यक्तिरेखेच्या जाणिवांचा एक स्वाभाविक भाग असल्यासारखी वापरली जाते.
फॉल्स एण्डिंग हेदेखील बॉइल नेहमी घडवितो. बहुतेक वेळा त्याचे चित्रपट वरवर सुखान्त वाटणाऱ्या शेवटाशी संपतात, पण विचार केल्यावर लक्षात येतं की, हा खरा सुखान्त नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. आता जरी सारं काही ठीक असलं, तरी हा आभास आहे. चित्र कधी पालटेल सांगता येणार नाही. स्लमडॉगच्या सुखान्त शेवटाला बॉलीवूड हॅपी एण्डिंगचं व्यवच्छेदक लक्षण मानणाऱ्यांनी हा विचार केला आहे का, की स्लमडॉगचा शेवट खरोखर आनंदी आहे का?
ही बॉइलच्या चित्रपटांची पाश्र्वभूमी जर लक्षात घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते, की तो एरवी जसा एक-एक चित्रप्रकार हाताळतो, तसाच इथे त्याने ‘बॉलीवूड फिल्म’ हा एक चित्रप्रकार म्हणून, जॉनर म्हणून हाताळलेला आहे. ज्याप्रमाणे ‘सनशाइन’ सायन्स फिक्शन म्हणून ओळखला जातो किंवा ‘ए लाइफ लेस ऑर्डिनरी’ रोमॅण्टिक कॉमेडी म्हणून ओळखला जातो, तसाच ‘स्लमडॉग’ बॉलीवूड वैशिष्टय़ांसाठी ओळखला जातो. त्याचं तसं असणं हा योगायोग वा अपघात नाही, तर ही हेतूपुरस्सर केलेली योजना आहे.

यावर स्वाभाविकपणे एक प्रश्न असा संभवतो की, आपण जर सामान्य प्रेक्षकाच्या- जो बॉलीवूडपलीकडचे फार चित्रपट पाहत नाही- अशा प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याला बॉइलचा करिअर ग्राफ माहीत असण्याची शक्यता मर्यादित आहे. मग त्याच्या दृष्टीने-स्लमडॉग वेगळा कसा? अन् त्याला भाराभर पुरस्कार मिळत असताना आपल्या बिचाऱ्या बॉलीवूडला कोणी विचारत नाही, असं का?
माझ्या मते, स्लमडॉग वेगळा कसा, हे समजायला बॉइलचा सिनेमा माहीत असण्याची गरजच नाही. जरा जागरूकपणे तो काय दाखवतोय, हे पाहिलं तर त्याचा वेगळेपणा कळण्यासारखा आहे. जरी स्पष्ट शब्दांत मांडता आला नाही, तरी हा आणि टिपिकल बॉलीवूड सिनेमा यांत काहीतरी निश्चित फरक आहे, हे सर्वानाच कळायला काही हरकत नाही. आणि केवळ ही जाणीव होणं, हेदेखील पुरेसं आहे.
एक गोष्ट उघड आहे की, स्लमडॉगमध्ये बॉलीवूडच्या अनेकानेक जागा येतात. बालपणीचं प्रेम, दोन भावांमधल्या परस्परविरोधी प्रवृत्ती, कोठा संस्कृती, भेटणं-बिछडणं, अंडरवर्ल्डची दादागिरी या सगळ्या गोष्टी- ज्या आपण इतरत्र अनेकदा पाहिल्यात- त्या इथेही आहेत. शिवाय परीकथेसारखं नायकाला त्याच्या प्राक्तनाकडे घेऊन जाणंही आहे. मात्र याबरोबरच एक असा ट्रॅकदेखील आहे- जो या सगळ्याला छेद देत राहतो. तो ट्रॅक आहे वास्तवाचा. बॉलीवूडची वळणं घेतानाच दिग्दर्शक अशा अनेक जागाही शोधताना दिसतो जिथे तो बॉलीवूडला पॉझवर टाकून, अशा प्रसंगी खरं काय होईल, याचा विचार करतो. इथल्या भिकाऱ्याचे डोळे काढण्याचा प्रसंग आपल्याला बॉलीवूडमध्ये दिसणार नाही. नायकाच्या भावाने नायिकेला बरोबर ठेवून नायकाला खोलीबाहेर हाकलण्याचाही नाही. दंगली, पोलीस टॉर्चर यासारख्या प्रसंगांची भीषणताही इथे दिग्दर्शक चटकन्, पण थेटपणे दाखवतो. मागे मी एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात वाचलं होतं की, स्लमडॉगमध्ये दाखवलेला पोलीस टॉर्चर किती चुकीचा आहे, आणि खरं तर असं आपल्याकडे होत नाही. मला वाटतं, मरिन लाइन्स पोलीस स्टेशनवरल्या बलात्काराची घटना अजून पुरती विसरली गेली नसताना अशी बेजबाबदार विधानं करू नयेत. स्लमडॉगमधलं वास्तव दर्शन हे वाढवून सांगितलेलं नाही. जे आहे ते खरंखुरं आहे. मात्र स्लमडॉगने या वास्तवात फॅण्टसीचं पाणी मिसळून वास्तवाचा परिणाम थोडा पुसट केलाय. किंवा कोणी असंही म्हणेल की, स्लमडॉगने फॅण्टसीत वास्तवाचं विष ओतून परिणाम थोडा गडद केलाय. शेवटी दोन्हींचा अर्थ तोच. आपण कोणत्या बाजूने पाहतोय, एवढाच फरक. मात्र ही वास्तव आणि फॅण्टसीची सरमिसळ हा स्लमडॉगचा वेगळेपणा आहे, हे निश्चित.
एकदा हे लक्षात घेतलं की, पुरस्काराचं कोडंही उलगडायला मदत होते. खरं तर हा चित्रपट सन्मानप्राप्त ठरायला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर बॉइलचा दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे बॉलीवूडबद्दलचं परदेशी वाढणारं कुतूहल. गेल्या आठ-दहा वर्षांत बॉलीवूड (की हिंदी चित्रपट उद्योग?) आणि हॉलीवूड (की अमेरिकन फिल्म इंडस्ट्री?) ही एकमेकांच्या खूप जवळ आलेली आहेत आणि त्यामध्ये एक प्रकारची सांस्कृतिक देवाणघेवाणदेखील सुरू झालेली आहे. रेहमानसारखे तंत्रज्ञ-कलाकार तर गेली अनेक र्वष त्यांच्याकडे माहीत आहेत, कामंही करताहेत. आपला चित्रपट त्यातल्या नाचगाणी मसाल्यासह परिचित आहे. आणि आता तर संयुक्त चित्रपटनिर्मितीलाही सुरुवात झालेली आहे. असं असूनही आपला (‘लगान’चा काही प्रमाणात अपवाद वगळता) कोणताही चित्रपट त्यांच्याकडे खूप कौतुकप्राप्त ठरलेला नाही. याला एक कारण असं मानता येईल की, जरी आपला मसाला त्यांना परिचित असला तरी आपली पाल्हाळीक मांडणी मात्र फार आवडणारी नाही. काही मर्यादित चित्रपट विद्वान एक शैली म्हणून तिचा अभ्यास करीतही असतील, पण त्यांच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचायचं तर एक परिचित स्वरूप याला आणणं आवश्यक आहे. तेही एरवीची सर्व वैशिष्टय़ं जशीच्या तशी ठेवून. वेळ आटोक्यात आणणं, पटकथेचा पसरटपणा कमी करणं, गाणी ठेवूनही त्यांचं प्रमाण आटोक्यात आणणं, या सगळ्या गोष्टी कोणीतरी करण्याची गरज होती. बॉइलने ते केलं आणि म्हणून स्लमडॉग हा बॉलीवूडची अब्रिज्ड आणि पचायला सोपी आवृत्ती म्हणून ताबडतोब उचलला गेला.
आपले दिग्दर्शक हे करू शकले असते असं नाही. याचं कारण- आपल्या दिग्दर्शकांच्या कुवतीत नसून, त्यांच्या डोळ्यांसमोर कोणता प्रेक्षक आहे, यात दडलेलं आहे. आपले दिग्दर्शक हे (अजून तरी) आपल्या प्रेक्षकांसाठी चित्रपट करतात. त्यामुळे ‘फुल मॉण्टी’सारख्या उत्तम चित्रपटासाठी गाजलेल्या पटकथाकार सायमन बोफॉयने ज्या प्रकारचे बदल विकास स्वरूपच्या कादंबरीत केले, ते त्यांना करताच आले नसते. बोफॉयने ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेली कल्पना- म्हणजे ‘क्विझ शो’मधल्या प्रश्नाच्या निमित्ताने एका मुलाचं आयुष्य समोर उभं करणं- ही कायम ठेवली. तसंच घटनांची त्रिस्तरीय मांडणीही कायम ठेवली, जी आळीपाळीने मुलाच्या आयुष्यात पोलीस स्टेशनवर (कादंबरीत वकिलाच्या खोलीत) आणि ‘क्विझ शो’त डोकावत राहते. मात्र हे सोडून त्याने प्रश्नोत्तरांचे-अर्थातच जमालच्या नावापासून स्वतंत्र घटनांपर्यंत सर्व तपशील- बदलले. जमालच्या आयुष्याची एक भरधाव बॉलीवूड शोकेस केली आणि पटकथेची गती एपिसोडिक न वाटू देणं, शब्दबंबाळ न करता जेवढय़ास तेवढे संवाद वापरणं, अनावश्यक लांबण न लावणं- अशा युक्त्यांमधून एक कॉम्पॅक्ट पटकथा घडविली. तो हे करू शकला, कारण भारतीय प्रेक्षकांना अमुक चालतं, अमुक नाही, या समजुतींनी तो बांधला गेला नव्हता. तो सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या प्रेक्षकाला जे चालेल ते आणू पाहत होता. अखेर आपल्याकडेही ज्यांनी पूर्वकल्पनांची ओझी अंगावर न घेता तो पाहिला, त्यांना तो आवडला. आपल्या पटकथाकारांनीही यापासून काही धडा घ्यायला हरकत नसावी.
हे सगळं असूनही एक लक्षात घ्यायला हवं की, हे जमून येणं हा एक मोठा योगायोग होता. बॉइलने अशा प्रकारचा प्रेक्षक मिळविण्याची योजना करून तो मिळाला असता, असं सांगता येत नाही, किंवा एखादी अधिक महत्त्वाकांक्षी निर्मिती यावर्षी मैदानात उतरली असती तरीही तो टिकला नसता. त्याचं यश हे खरं तर त्याने अशा कोणत्याही प्रकारच्या हिशेबी योजनांमध्ये न पडता मनाला येईल तेच आणि आजवर करीत होता तेच प्रामाणिकपणे आणि त्याच मार्गावरून पुढे जाऊन केलं, यातच आहे.
या वर्षी आपल्या सर्व कलाकार- तंत्रज्ञांना ऑस्कर मंचावर पाहणं ही आनंदाची गोष्ट होती. हॉलीवूड हे आशयघन जागतिक चित्रपटांशी तुलना करण्याचं ठिकाण नसलं तरी ते व्यावसायिक चित्रपटांचा ‘लास्ट वर्ड’ आहे, हेदेखील खरं. आपण नुसतीच हॉलीवूडला नाकं न मुरडता ऑस्करकडे पुढली पायरी म्हणून पाहिलं पाहिजे. तंत्रज्ञ- कलाकारांनी हे आपण करू शकतो, हे सिद्ध केलेलंच आहे. आता दिग्दर्शक-पटकथाकारांची पाळी आहे. त्यादृष्टीने आपला चित्रपटही येत्या काळात घडत जावा, अशी अपेक्षा आहे.
-गणेश मतकरी
(लोकसत्तामधून)


Read more...

आऊटसायडर स्कोर्सेसी

>> Friday, February 27, 2009



गणेश मतकरी लिखित ‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकाचे बुधवारी दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीच्या चित्रपटांचे विश्लेषण करणाऱ्या ‘फिल्ममेकर्स’ मधील प्रकरणाचा हा संपादित अंश.

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट दृश्य. एका नक्षीकाम केलेल्या वॉलपेपरवरून कॅमेरा उजवीकडे सरकतो आणि दृष्टीपथात येते ती समोर चाललेली पार्टी. स्त्रीपात्र विरहीत. उपस्थित सज्जनांचं वय हे साधारण पंचविशीच्या आसपासचं. डावीकडून उजवीकडे सहजगतीने गेलेला कॅमेरा दाखवून देतो या मुलांचे घोळके, त्यांचे चाललेले उद्योग, गप्पा, फोनकॉल्स वगैरे. समोरच बाटल्या, त्यामुळे मद्यपानही जोमाने आलंच. बरोबर संगीत, आता कॅमेरा आपली दुसरी फेरी चालू करतो. पुन्हा डावीकडून उजवीकडे. या खेपेला थोडं अधिक जवळून.
लवकरच या दृश्यासाठी वापरलेली शैली स्पष्ट व्हायला लागते. वर्तुळाकार गतीचा आभास तयार करणारी कॅमेरा मूव्हमेन्ट. एक दुसऱ्यात डिझॉल्व्ह होणारे, मिसळून जाणारे शॉट्स, सलगता आणून देणारे, संवाद ऐकू येत नाहीत, पण संगीताबरोबर आता सुरू झालेलं गाणं हे पार्टीचा मूड पकडणारं. कॅमेरा फिरण्याची गती दर शॉटगणिक थोडी वाढणारी, पण सहभागी पात्रांच्या हालचाली स्लो मोशनमध्ये चाललेल्या. आता जमलेल्या घोळक्यातलं कोणी एक पिस्तुल काढतं. मग थोडा पिस्तुलाशी ढोळ. एकाकडून दुसऱ्याकडे. मग तिसऱ्याकडे. मग एक जण पिस्तुल समोर कोणावर तरी रोखतो. सगळे हसतात, थोडी गंमत. आता कॅमेऱ्याचं वर्तुळाकार फिरणं थांबलेलं, पण डिझॉल्व्हज सुरू. लवकरच एका मुलाला लक्ष्य केलं जातं. भीती घातली जाते. इतरजण मागे पळतात. काही जण हळूच गंभीर झालेली, इतरांच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित. लक्ष्य ठरलेल्या मुलाची मानगूट पिस्तुलवाल्याने धरलेली, मुलगा रडकुंडीला आलेला. थोडी पळापळ. मग मुलाला जमिनीवर ढकलण्यात येतं, आणि पिस्तूल रोखलं जातं, मात्र मुलावर नाही, तर दारूच्या बाटल्यांवर. गोळी सुटते. काच फुटल्याचे आवाज. पडद्यावर आता दिसतात ती ‘रिओ ब्राव्हो’ या वेस्टर्न चित्रपटातली छायाचित्रं. पाश्र्वभूमीला आवाज बंदुकीच्या गोळ्यांचे.
हे दृश्य मार्टिन स्कोर्सेसीच्या ‘हू’ज दॅट नॉकिंग अ‍ॅट माय डोअर?’ (१९६९) चित्रपटातलं. स्कोर्सेसीचा हा पहिला चित्रपट. फिल्म स्कूलमधली ग्रॅज्युएशन फिल्म म्हणून सुरू झालेला. अनेक अडचणींमधून गेलेला. पैशांची चणचण, तुकडय़ातुकडय़ात केलेलं चित्रीकरण/संकलन, नवे कलाकार, वितरकांच्या अटी, असे अनेक प्रश्न. तरीही महत्त्वाचं हे, की पुढल्या काळात एक मोठा दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेला दिग्दर्शक, इथे त्याच्या अनेक वैशिष्टय़ांसह आपल्याला सर्वप्रथम दिसतो. खास करून या दृश्यात फिल्मस्कूलमधल्या शिक्षणाने तयार झालेली प्रयोग करून पाहण्याची वृत्ती, तांत्रिक कौशल्यं, अर्थपूर्ण दृश्यरचना, संगीताचा ठळक वापर, इतर चित्रपटांचा प्रभाव, हॉलिवूडवरचं प्रेम आणि आशयात अचानक समोर येऊन प्रेक्षकांना (आणि क्वचित पात्रांनाही) कोंडीत पकडणारं हिंसेचं टोकदार दर्शन. थोडक्यात म्हणजे अस्सल स्कोर्सेसी.
हॉलिवूडच्या महत्त्वाच्या चित्रकर्त्यांपैकी एक असलेला स्कोर्सेसी हा एका परीने हॉलिवूडच्या तथाकथित परंपरेला उपरा आहे. ज्याला आपण हॉलिवुडपट म्हणतो तो सिनेमा हा प्रामुख्याने चार लोकांच्या मनोरंजनाला वाहिलेला, मुख्य धारेतला, व्यावसायिक सिनेमा आहे. या सिनेमाचं लक्ष्य हे प्रामुख्याने त्यातून होणाऱ्या नफ्यावर केंद्रित झालेलं आहे, आणि हा नफा इथे नेहमीच चित्रकर्त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीहून अधिक महत्त्वाचा मानला जातो. अर्थात हॉलिवूडमध्येही या चौकटीत राहून कलात्मकदृष्टय़ा दर्जेदार निर्मिती करणारे कलावंत आहेत. पण मार्टिन स्कोर्सेसी ही चौकटही मानत नाही. आजवर त्याने केलेले सर्व चित्रपट, क्वचित ‘द कलर ऑफ मनी’ किंवा ‘केप फिअर’ सारखे अपवाद वगळता, स्वत:च्या मनाशी प्रामाणिक राहूनच बनवलेले आहेत. त्या दृष्टीने पहायचं तर त्याचं काम हे मुख्य धारेपेक्षा अमेरिकेतल्या समांतर चित्रपट चळवळीच्या, म्हणजेच इन्डिपेन्डन्ट फिल्ममेकिंगच्या अधिक जवळ जाणारं आहे.
या दिग्दर्शकाच्या संपूर्ण कारकीर्दीकडे एक नजर टाकली तर लक्षात येईल की तिला एक निश्चित आकार आहे. या चित्रपटाच्या विषयाची निवड, त्यांची रचना, त्यातल्या व्यक्तिरेखांचं स्वरूप हे दिग्दर्शकाच्या जाणीवेतून आलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की स्कोर्सेसीने वारंवार तेच विषय त्याच प्रकारे हाताळले. उलट या विषयांमध्ये चिकार विविधता जाणवते. ‘गुडफेलाज’ किंवा ‘मीन स्ट्रीट्स’सारखे गँगस्टर्सचं व्यक्तिगत आयुष्य चित्रीत करणारे, कुंदन किंवा एव्हिएटरसारखे चरित्रात्मक, लास्ट टेम्प्टेशन ऑफ क्राईस्टसारखे धार्मिक कल्पनांचा नव्याने अर्थ शोधणारे चित्रपट आणि ‘केप फिअर’सारखे थ्रिलर्सदेखील त्याने दिले. मात्र या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या विषयांमध्येही काही समान सूत्रं आहेत जी आपल्याला या निवडीमागच्या कारणांपर्यंत घेऊन जाऊ शकतील.
१९४२चा स्कोर्सेसीचा जन्म हा अमेरिकेतल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय इटालियन वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातला. या ठिकाणी पाहायला मिळालेलं वातावरण, घरच्यांचे संस्कार, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्हीवर लहान वयात पाहायला मिळालेले इटालियन नव-वास्तववादी (ठी फीं’्र२३) चित्रपट यांचा स्कोर्सेसीच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. माफिया साम्राज्याच्या एका कोपऱ्यातत असलेल्या वस्तीत त्याला गुन्हेगारीने पोखरलेला समाज पाहायला मिळाला. इथली तरुण मुलं ही गुंडगिरी, लहान प्रमाणातला अमली पदार्थाचा व्यवसाय करताना सर्रास पाहायला मिळतो. या मंडळींमध्येच मोठा होणारा मार्टीन, हा या हळूहळू तयार होणाऱ्या गँग्जमध्ये मिळून मिसळून असे, पण प्रत्यक्षात स्वत:कडे फार लक्ष वेधून न घेता शांतपणे राहण्याचा प्रयत्न करी. मात्र कधीतरी आपणही या दुष्टचक्राचा कायम हिस्सा बनू ही भीती होतीच. या वस्तीत मान होता तो प्रामुख्याने तीन प्रकारच्या लोकांना, माफिया, गँगलीडर्स आणि धर्मगुरू. गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कोर्सेसीने या सुमारास धर्मगुरू होण्याचं ठरवलं ते हा मान मिळवण्यासाठी. हा काळ आणि हे वातावरण या ना त्या मार्गे स्कोर्सेसीच्या कारकीर्दीवर प्रभाव पाडून राहिलेले आहे. पुढे चित्रसृष्टीत जायचं ठरवल्यावर त्याने आपली धार्मिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवली, पण त्याच्या कथासूत्रांच्या निवडीमागे हा भूतकाळ जाणवण्यासारखा आहे. गुन्हेगारी, हिंसाचार आणि धर्म या तीन सूत्रांभोवती स्कोर्सेसीचे चित्रपट फिरतात. ही सूत्रं त्याच्या प्रेरणा आहेत ज्या त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात.
अमेरिकन चित्रपट व्यवसायाकडे ढोबळमानाने पाहिलं, तर १९७० च्या आसपास एक मूलभूत फरक पडलेला आपल्याला दिसून येईल. या आधी आलेली दिग्दर्शकांची पिढी ही मुख्यत: व्यवसायात तयार झालेली होती. त्यांचे आडाखे, कामाची पद्धत ही प्रामुख्याने त्यांच्या स्वत:च्या अनुभवावर आणि आपल्या आजूबाजूला पाहायला मिळणाऱ्या इतर दिग्दर्शक, कलावंतांच्या निरीक्षणातून तयार झालेली होती. या मंडळींनी काही प्रमाणात जागतिक सिनेमा पाहिला होता हे निश्चित, पण त्यापासून काही शिकण्यात त्यांना रस नव्हता. स्टुडिओ सिस्टीमही या काळी जोरात असल्याने दिग्दर्शकांचा कलही निर्मात्यांच्या बाजूने विचार करण्याकडे होता.
१९६०-७० च्या सुमारास स्टुडिओ सिस्टीमचं प्रस्थ कमी झालं आणि चित्रपटांचं पद्धतशीर शिक्षण घेतलेल्या दिग्दर्शकांची एक फळी पुढे आली. फ्रान्सिस फोर्ड कपोला, जॉर्ज लुकस, स्टीवन स्पीलबर्ग अशा नव्या दमाच्या दिग्दर्शकांबरोबरचं स्कोर्सेसीदेखील व्यवसायात उतरला. या सर्वाची चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी ही आधीच्या पिढीपेक्षा खूपच वेगळी होती. त्यांचा जगभरातल्या चित्रपटांचा अभ्यास होता आणि आपल्या हिचकॉक किंवा काप्राबरोबरचं इटलीच्या डेसिका किंवा फेलीनीकडून वा फ्रान्सच्या त्र्युफो किंवा गोदारकडून काही शिकण्यात त्यांना कमीपणा वाटत नव्हता. आशयाबरोबरच तंत्रातही प्रयोग करण्याचा त्यांना उत्साह होता. या दिग्दर्शकांनी तरुण पिढीत आपला नवा प्रेक्षक शोधला आणि चित्रसृष्टीच्या स्वरूपात आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली. या बदललेल्या चित्रसृष्टीने स्कोर्सेसीची दखल घेतली ती १९७३ मधल्या ‘मीन स्ट्रीट्स’मुळे. मीन स्ट्रीट्स हा चित्रपट स्कोर्सेसीच्या कारकीर्दीच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच, वर तत्कालीन तरुण पिढीची दिशाहीनता दाखवणारा आणि समाजाच्या एका विशिष्ट वर्गाचं चित्रण करणारा चित्रपट म्हणून तो उल्लेखनीय आहे. एका परीने तो तथाकथित ‘अमेरिकन ड्रीम’विषयी देखील आहे. समाजाच्या सर्व थरातल्या लोकांना भासणारी सुबत्तेची गरज तो दाखवतो आणि जेव्हा ही गरज कायद्याच्या चौकटीत राहून पुरी करता येत नाही तेव्हा ही चौकट खिळखिळी व्हायला वेळ लागत नाही. या चित्रपटातला तरुण वर्ग हा साधारण ‘हू’ज दॅट नॉकिंग अ‍ॅट माय डोअर? मधलाच आहे. किंबहुना मीन स्ट्रीट्समधली चार्लीची प्रमुख भूमिका हे त्या चित्रपटातल्या जे आरचंच एक रूप आहे. स्कोर्सेसीने दोन्ही चित्रपटांमधल्या भूमिकेसाठी केलेली हार्वी कायटेलची निवडही हेच सांगते. असं असूनही दोन चित्रपटांमधला प्रमुख फरक म्हणजे आता त्याला आलेलं स्पष्ट गुन्हेगारी वळण आणि मजकुराचा, त्याच्या दृश्य परिमाणातही परावर्तित झालेला गडदपणा.
‘हू’ज दॅट.. मध्ये भर होता तो नायक/नायिकेमधल्या भावनिक नातेसंबंधावर. प्रेम आणि शरीरसंबंध याबद्दलचे सांकेतिक आणि आधुनिक विचार, त्याचबरोबर पुरोगामीत्वाच्या आणि पावित्र्याच्या कल्पनांमधून येणारा दुरावा अशा प्रामुख्याने स्त्री-पुरुषांमधल्या जवळीकीसंबंधातल्या मुद्दय़ांवर त्याची बांधणी केली गेली होती. यातले काही मुद्दे मीन स्ट्रीट्समध्येही आहेत. पण नावाला जागून इथला भर आहे, तो स्ट्रीट कल्चरवर. चार्ली हा माफिआच्या जवळच्या संपर्कातला तरुण आणि त्याच्या तेरेसा या खास मैत्रिणीचा विक्षिप्त चुलतभाऊ जॉनी बाय यांची ही गोष्ट आहे. चार्लीचं आपली पत सांभाळत जॉनी बॉयला सावरून घेण्याचा प्रयत्न करणं आणि जॉनी बॉयचं जवळजवळ ठरल्याप्रमाणे विनाशाकडे धावणं असा या चित्रपटाचा आकार आहे.
काळाचा हिशेब ठेवायचा, तर १९९० च्या गुडफेलाजला स्कोर्सेसीच्या कारकीर्दीच्या मध्यावर येणारा चित्रपट म्हणावं लागेल, पण चित्रपटांची संख्या आणि त्यांचा प्रभाव या दोन्ही दृष्टींनी पाहायचं तर गुडफेलाजपर्यंतचा काळ हा कितीतरी यशस्वी म्हणावा लागेल. याचा अर्थ पुढल्या काळात स्कोर्सेसीच्या चित्रपटांचा दर्जा ढासळला असा मात्र नव्हे, किंबहुना ‘केप फिअर’ (१९९१) ही युनिव्हर्सल पिक्चर्ससाठी लगेचच स्कोर्सेसी केलेली निर्मिती ही अनेक बाबतीत विक्रमी ठरली होती. २००२ च्या ‘गँग्ज ऑफ न्यूयॉर्क’ने पुन्हा दिग्दर्शनाचं नामांकन मिळवण्यापर्यंतच्या काळात स्कोर्सेसीने चित्रपट अभ्यासकांना आणि चाहत्यांना उपयुक्त अशा दोन चित्रपटांची निर्मिती केली, खरं तर हे स्वतंत्र चित्रपट नव्हते, तर अमेरिकन आणि इटालियन चित्रपटांच्या इतिहासाचा अनेक चित्रपटांच्या दृश्यासह घेतलेला वैयक्तिक आढावा असं यांचं स्वरूप होतं. ‘ए सेन्चुरी ऑफ सिनेमा : ए पर्सनल जर्नी विथ मार्टिन स्कोर्सेसी थ्रू अमेरिकन मुव्हीज’ (१९९५) आणि ‘माय व्हॉएज टु इटली’ (२००१) हे दोन्ही चित्रपट आवर्जून पाहण्यासारखे आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा केवळ इतिहास मांडण्याचा नसून स्कोर्सेसीच्या नजरेतून तो मांडायचा असला तरी एका परीने हीच त्यांची खासियत आहे. कारण मग तो केवळ अहवाल राहत नाही, तर हा इतिहास जोडत जाणाऱ्या एका तल्लख व्यक्तिमत्त्वाची मदत आपल्याला मार्गदर्शक म्हणून मिळते. या माणसाचा हा गुण त्याच्या समकालीन असणाऱ्या अनेक चित्रकर्मीहून वेगळा आहे. इतिहास जपण्याची, जुने चित्रपट अभ्यासण्याची, ते पुन्हा प्रदर्शित करायला किंवा डीव्हीडीवर उपलब्ध होण्याला मदत करण्याची त्याला मनापासून हौस आहे. फेलिनीला ला स्टड्राच्या डीव्हीडी प्रकाशनासाठी प्रास्ताविक दे, मायकेल पॉवेलच्या पीपींग टॉमला किंवा निकोलस रेच्या जॉनी गिटारला अमेरिकेत प्रदर्शित व्हायला मदत कर, मॉडर्न लायब्ररी ऑफ मुव्हीजसारखी चित्रपटविषयक उत्तम पुस्तकं मालिका संपादित कर असे अनेक उद्योग त्याने केले आहेत, करतो आहे.
मार्टिन स्कोर्सेसीच्या कलाजीवनाचा मोठा भाग आज उरकून गेला असला, तरी त्याची अखेर समीप असल्याची चिन्हं नाहीत. आणखी अनेक र्वष तो याच जोमाने चित्रपट बनवू शकेल. मात गुडफेलाज ही त्याच्या प्रायोगिक चित्रपटांनी भरलेल्या करियरच्या पहिल्या टप्प्याची अखेर मानली अन् डिपार्टेडचं ऑस्कर ही तुलनेने व्यावसायिक म्हणता येईलशा दुसऱ्या टप्प्याची अखेर मानली, तर येणारा काळ त्याच्या खेळीला तिसऱ्या टप्प्यावर घेऊन जाताना दिसेल. हा पुढला टप्पा या सर्जनशील दिग्दर्शकाकडून काय घेऊन येतो हे पाहण्याची उत्सुकता आता आहे. ती शमवण्यात हा सर्जनशील कलावंत कुठेही कमी पडणार नाही याची खात्रीदेखील.

Read more...

आपला सिनेमास्कोपच्या वाचकांना निमंत्रण

>> Tuesday, February 24, 2009


मुंबई, ता. २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी
वर्षभरापासून या ब्लॉगचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या गणेश मतकरी यांच्या फिल्ममेकर्स या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (बुधवार. ता.२५ फेब्रुवारी २००९) दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्याहस्ते होणार आहे. पु.ल. देशपांडे अकादमी संकुल, रविंद्र मिनी थिएटर, प्रभादेवी येथे सायंकाळी ७ वाजता हा प्रकाशनसोहळा होणार आहे. यावेळी मराठीतील चित्रपट समीक्षा या विषयावर एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्यात गणेश मतकरी, अभिजित देशपांडे, संतोष पाठारे, सचिन कुंडलकर आणि मीना कर्णीक यांचा सहभाग असणार आहे. मॅजेस्टिक प्रकाशन आणि प्रभात चित्र मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ब्लॉगच्या वाचकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही विनंती.
फिल्ममेकर्स या पुस्तकात स्टीव्हन स्पीलबर्ग,जॉर्ज लुकस, माजिद माजिदी, मनोज नाईट शामलन, वाचोस्की बंधू, क्लींट इस्टवूड, रॉबर्ट रॉर्ड्रीग्ज, जेम्स कॅमेरॉन, स्कॉर्सेसी आणि बर्गमन यांच्यावरचे अभ्यासपूर्ण आणि गणेशच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील लेख आहेत.
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiAEParaiNVeFGdulE1QPgeWedS5YsQGCpnxbLg97gaWP6U8YG_vLO_9CDjwQoVK4btMhDw6rpbYrL-ai8tqxCVhDZzvT7Rjk3A80Yh8kVh5UW1YzSXyG_97MJk5qAz4JdrujsRyrC9nA/s1600-h/FilmmakersCover-one.JPG">

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP