हिरानीचे इडिअट्स

>> Thursday, January 14, 2010


भारतातल्या एका प्रतिथयश इंजिनिअरींग कॉलेजचे तीन विद्यार्थी नायक असणं, त्यांच्या विरोधातल्या एका खडूस प्राध्यापकाच्या मुलीवर तिघांमधल्या एकाचं प्रेम बसणं, व्यक्तिरेखांचे काही विशिष्ट तपशील आणि आपल्या शिक्षणपद्धतीच्या सांकेतिक नियमावलीकडे असलेल्या ओढ्यावर असणारा टिकेचा सूर या गोष्टी राजकुमार हिरानीचा थ्री इडिअट्स आणि चेतन भगतची फाईव्ह पॉईन्ट समवन ही कादंबरी, या दोन्हीमध्ये पहायला मिळतात. मात्र त्यापलीकडे जाऊन पाहाता, या दोन कलाकृतींमध्ये फार साम्य आढळणार नाही. त्यामुळे ते शोधू नये, हा जो धोशा हिरानी, चोप्रा अन् कंपनीने लावला (त्यावरून झालेला वाद आता शमला असला तरी) त्यात तथ्य़ आहे हे निश्चित. हिरानी किंवा आमिर खान या प्रोजेक्टकडे आकृष्ट का झाले, हे कळणं फार कठीण नाही, अन् त्यांना मूळ कल्पनेत स्वतःची भर घालत राहावी असं का वाटलं, हे देखील स्पष्ट आहे. हिरानी अन् खान या दोघांनीही हल्लीच केलेल्या यशस्वी आणि विचारप्रवर्तक चित्रपटांमध्ये शिक्षणपद्धतीविषयी जे विचार मांडलेले आहेत, त्यांचं थ्री इडिअट्स हे लॉजिकल एक्स्टेंन्शन आहे. हिरानीने मुन्नाभाई एम.बी.बी.एस.मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांवर आपली तिरकी नजर रोखली होती. अन् डॉक्टरांनी माणूसकी शिकण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
आमिर खानने तारे जमीं परमध्ये शालेय शिक्षणातल्या सब घोडे बारा टक्के मानण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले होते. थ्री इडिअट्स याच विचारधारेला पुढे नेतो. त्याचं असं करणं हे मला त्याच्या फाईव्ह पॉईन्ट समवनशी प्रामाणिक असण्यानसण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं वाटतं. कादंबरीच्या गुणदोषाची चर्चा न करताही, ही गोष्ट स्पष्ट व्हावी.
हिरानीच्या आधीच्या दोन चित्रपटांकडे अन् आता इडिअट्सकडे पाहून लक्षात येईल की व्यावसायिक मनोरंजन या गोष्टीवर या माणसाचा पूर्ण विश्वास आहे. त्याचे चित्रपट हे नक्कीच काही विचार मांडणारे असतात, मात्र विचार हे करमणूकीची जागा घेत नाहीत अन् करमणूक देखील कशी , तर खास बॉलीवूड शैलीतली. मोठे स्टार्स, विनोद, मेलोड्रामा, नाचगाणी हे सगळंच इथे पाहता येते. मात्र सर्व व्यावसायिक चित्रपटात सहजासहजी पहायला न मिळणारी प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची क्षमता देखील त्यांच्यात जरूर असते. अनेकदा हे विचार करमणुकीपासून वेगळे काढता येत नाहीत, पण सबकॉन्शस पातळीवर ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात.
चित्रप्रकारांच्या भाषेत बोलायचं तर थ्री इडिअट्स दोन प्रकारांशी नातं सांगतो. त्याचा मूळ जीव आहे तो कॉलेज जीवन चित्रित करणा-या चित्रपटांचा. यात कॉलेजमधल्या मुलांनी केलेली धमाल आहे, प्रोफेसर्सचा खाष्टपणा आहे, रोमान्स आहे, स्पर्धा आहे, माफक गंभीर प्रकरणंदेखील आहेत. थोडक्यात म्हणजे या प्रकाराकडून ज्या अपेक्षा हव्यात त्या सर्व इथे पु-या केल्या जातात.
दुसरा प्रकार आहे, तो रोड मुव्हीचा. दिल चाहता है आठवत असेल, तर नायक तरुण असतानाचा भूतकाळ अन् काही वर्षांनंतरचा वर्तमान असे दोन काळ दाखविलेले आठवतील. मात्र इथला वर्तमान हा केवळ बंपर्ससारखा, सुरुवातीला अन् शेवटी असा वापरलेला नाही. ज्याला दोन मित्रांनी घेतलेल्या तिस-याच्या शोधाचा व्यवस्थित छाया आहे. अनेक ठिकाणं, अनेक व्यक्तिरेखा जोडत तो घेतला गेल्याने, तो लक्षात राहण्यासारखा आहेच, वर व्यक्तिरेखांचे बारकावे दाखविण्यासाठीही त्याचा उपयोग आहे.
त्याला एक बारीकसं रहस्यदेखील जोडलंय, पण ते इतकं बारीकसं आहे, की ते कसं उलगडेल हे कळण्याकरीता हुशार प्रेक्षकाला शेवटपर्यंत थांबावं लागणार नाही.
फरहान (माधवन), राजू रस्तोगी (शर्मन जोशी) आणि रान्चो (आमिर खान) हे आय.सी.इ (वाचा आय.आय.टी) या सुप्रसिद्ध इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणारे मित्र. फरहान आपल्या इच्छेविरुद्ध केवळ वडिलांच्या सांगण्यावरून आलेला, तर राजू आपल्या घरच्या गरीबीवर एकुलता एक उपाय म्हणून. राजूवर उत्तीर्ण होण्याचा इतका ताण आहे, की तो कायम देवधर्माच्या नादी लागलेला. रान्चो मात्र घरचा चांगला, अन् विद्या या गोष्टीवर मुळातंच विश्वास असलेला. केवळ शिक्षण घेणं हा त्याचा एकमेव हेतू आणि परीक्षांमध्येही त्याचा निकाल अव्वल. मात्र कॉलेजमध्ये ज्या प्रकारे शिकवलं जातं, ते त्याला मान्य नाही. त्याच्या स्वतःच्या स्वतंत्र कल्पना आहेत. मात्र त्या कल्पनांमुळेच मुख्याध्यापक वीरू सहस्त्रबुद्धे (बोमन इरानी) यांचं त्याने शत्रूत्व ओढवलेलं. परिस्थिती अधिकच बिकट होते, जेव्हा सहस्त्रबुद्धेंची धाकटी मुलगी (करीना) रान्चोच्या प्रेमात पडते.
थ्री इडिअट्सचा विशेष म्हणजे क्राऊड प्लीजर प्रकारचा चित्रपट असूनही, तो वेळप्रसंगी खूप गंभीर व्हायला घाबरत नाही. इंजिनीअरींग कॉलेजचं तणावग्रस्त वातावरण, विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रयत्न अशा गोष्टी तो न कचरता दाखवितो. त्याबरोबरच शिक्षणपद्धतीविषयी देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडतो. पालकांच्या सुप्त महत्त्वाकांक्षेचा बळी म्हणून मुलांचं इच्छेविरुद्ध शाखा निवडणं, सांकेतिक विचारांमधून केवळ वरवरचं ज्ञान मिळणं, घोकंपट्टीविरुद्ध आत्मसात केलेलं ज्ञान, अशा अनेक मुद्यांना तो प्रसंगांच्या आधारे स्पर्श करतो. काहीवेळा मनोरंजनाचा अट्टाहास या प्रसंगांना नको इतकं टोकाला नेतो. उदाहरणार्थ शेवटाजवळचा सहस्त्रबुद्धेंच्या मोठ्या मुलीचा (मोना सिंग) डिलीवरीचा प्रसंग. मात्र शिक्षणाच्या प्रत्यक्ष (अप्लाईड) वापराचा मुद्दा या प्रसंगामागे आहे हे लक्षात घेतलं, तर तो घालण्यामागचं कारण कळू शकतं.
इडिअट्समधल्या काही गोष्टी मात्र खटकल्या. एक म्हणजे चित्रपट तीन मित्रांवर इतकं फोकस करतो, की ते आणि सायलेन्सर नामक त्यांचा शत्रू (ओमी कपूर अतिशय महत्त्वाच्या लांबीने मोठ्य़ा अन् भयंकर विनोदी भूमिकेत.) सोडता इतर मुलं व्यक्तिरेखा म्हणून उभी राहू शकत नाहीत. थोडक्या प्रसंगात हे करणं शक्य असणाल्याचं हिरानीने मुन्नाभाईच्या पहिल्या (मुन्नाचे सहविद्यार्थी) अन् दुस-या (सेकंड इनींग होमचे रहिवासी आणि रेडिओ शोसंबंधित प्रकरणं) भागात सिद्ध केलंय. इथेही तो ते शक्य होतं, पण केलेलं दिसत नाही.
इंजिनीअरींग कॉलेजमध्ये चार पाच वर्षांचा काळ गेल्याचं योग्य रीतीने सूचित झाल्यासारखं वाटत नाही. जेमतेम एखादं वर्ष वाटतं. काळ महत्त्वाचा अशासाठी, की रान्चो अन् सहस्त्रबुद्धे यांच्या वैराचं परिमाण त्याने बदलत नेलं असतं. इथे ते फार पुढे मागे जात नाही.
त्याचबरोबर राजूच्या घरच्या गरिबीचा इतका विनोद करण्यामागचं कारण लक्षात येत नाही. एखाद्या माणसाच्या ख-याखु-या अडचणींकडे,खासकरून ती एका सामाजिक प्रश्नाशी जोडलेली असताना, चित्रपटासारख्या लोकशिक्षणाशी संबंधित माध्यमांनी सहानुभूतीने पाहाणं अपेक्षित आहे. त्यामुळे ही फिरकी अकारण अन् पोलिटिकली इनकरेक्ट वाटते.
मात्र या काही गोष्टी वगळता इडिअट्स मला पटला. चांगला, अर्थपूर्ण, रंजक अन् शंभर टक्के बॉलीवूड सिनेमा म्हणजे काय हे रसायन राजकुमार हिरानी या माणसाला उमगलेलं आहे. आपल्यावर मुन्नाभाई मालिकेचा छाप पुरता बसण्याआधीच त्याने वेगळी निर्मिती यशस्वीपणे करून दाखवणं हेदेखील त्याच्या आत्मविश्वासाचं आणि आपल्या तंत्रावरल्या भरवशाचं लक्षण आहे. नजिकच्या भविष्यकाळात लक्ष ठेवून राहावं असा विशाल भारद्वाजच्या बरोबरीचा आणखी एक दिग्दर्शक आपल्यापुढे आला आहे, असं खात्रीने म्हणता येईल.

-गणेश मतकरी.

Read more...

नोव्हेंबर- विचाराला चालना देणारा प्रश्न

>> Sunday, January 10, 2010



नीट, लक्षपूर्वक पहा. काय दिसतंय? काय ऐकू येतंय? आवाज येतोय, तो जोरात होणा-या श्वासोच्छवासांचा धाप लागल्यासारखा. पडद्यावर दिसणारी चौकट स्पष्ट नाही. आऊटफोकस. कदाचित छतावरचा दिवा, जमिनीवर झोपलेल्या माणसाला दिसावा तसं काहीतरी दाखवणारी. पुढची चौकटही अस्पष्ट. एक दोन फ्रेम्सनंतर एक कॅलेंडर दिसतं. त्यावर तारीख स्पष्ट दिसणारी. सात तारीख, नोव्हेंबर महिन्यातली. या सर्व सुस्पष्ट/अंधूक तुकड्या-आवाजांमधून अधेमधे श्रेयनामावली सुरू. ती संपताच काही वेळ सांकेतिक निवेदनपद्धती सुरू होते. ही `नोव्हेंबर`ची सुरुवात. एका गाडीतून दोघंजण चाललेली. रात्र. तिचं नाव सोफी (कोर्टनी कॉक्स), त्याचं ह्यू (जेम्स ल ग्रोस). ती गाडी थांबविते. नुकतंच जेवण होऊनही, तिला अजून थोडी भूक आहे. ती ह्यूला काहीतरी खायला आणायला सांगते. ह्यू उतरून शेजारच्या दुकानात शिरतो. ह्यू या दुकानातून बाहेर येत नाही. गल्ला चोरायला आलेल्या भुरट्या चोराच्या गोळीला तो बळी पडतो. आणि सोफीचं आयुष्य बदलून जातं.
इथपर्यंत ठिक. म्हणजे कथेमध्ये दुर्बोधता नाही. सर्व्हायवर गिल्ट नावाचा जो प्रकार ९/११नंतर खास लोकप्रिय झालाय, त्याची सोफी बळी असणार,असं पुढल्या टप्प्याकडे पाहता स्पष्ट व्हावं. या टप्प्यावर सोफी आपलं रोजचं , फोटोग्राफी शिकवण्याचं काम सुरू ठेवते. तिला जगण्यात उत्साह वाटावा यासाठी प्रयत्न करणा-या आईला तोंड देते, अगदी सायकिअ‍ॅट्रिसला सुद्धा भेटते. (एव्हाना आपण श्रेयनामावली दरम्यान ऐकलेली पाहिलेली दृश्य विसरायला लागलेलो असतो. पण नाही, आपण विसरलो तरी ती दृश्य आपल्याला विसरणार नाहीत. चित्रपट संपण्याआधी त्यांची आपली गाठभेट पुन्हा होईलच.
सोफीच्या आय़ुष्यात आता एक वेगळंच वळण येतं. आपल्या फोटोग्राफीच्या वर्गात तिला एक स्लाईड मिळते. स्लाईडमध्ये रात्र, समोर दिसणारं ह्यू चा बळी घेणारं दुकान, अन दुकानाबाहेर थांबलेली सोफीची गाडी. दुकानाच्या काचेमागे अस्पष्ट दिसणारी व्यक्ती, कदाचित ह्यूदेखील असेल.
तसं असेल तर हा फोटो गुन्ह्याच्या वेळी, काहीच क्षण आधी काढलेला. पण कोणी? गुन्हेगाराशी या फोटोचा संबंध आहे, का इतर कोणी तो घेतला? आणि या वर्गात तो कसा आला?
विचार करून डोकं भणभणायला लागल्यावर सोफी पोलिसांना बोलावते, आणि ही स्लाईड कोणी डेव्हलप केली याचा छडा लावायला सांगते.छडा लागतो पण अनपेक्षित. स्लाईड स्वतः सोफीनेच डेव्हलप केलेली असते. अर्थात फोटोही तिनेच काढलेला असणार.
साधारण या वेळेपासून `नोव्हेंबर` सांकेतिक मार्ग सोडतो आणि मुक्त विहार करायला लागतो. सात नोव्हेंबरच्या घटनांकडे तर तो पुन्हा वळतोच वर त्या जशा घडल्या तशाच पुन्हा दाखवण्याचं बंधन स्वतःवर ठेवत नाही. त्या कशा आणि कोणत्या प्रकारे घडू शकल्या असत्या याकडे नजर टाकतो. डिनायल, डिस्पेअर आणि अ‍ॅक्सेप्टन्स या शीर्षकांखाली वेगवेगळे कलर टोन्स,सोफीच्या विविध मनस्थिती, वास्तवाचं किंचित बदलतं रूप घेऊन तो तीन आवृत्त्यांमध्ये यातल्या प्रमुख घटनांचीच वेगवेगळी रुपं मांडतो.
बेन्जमीन ब्रॅन्डने लिहिलेल्या आणि ग्रेग हॅरीसने दिग्दर्शित केलेल्या नोव्हेंबरचा काही तर्कशुद्ध शेवट आहे का, असा प्रश्न इथे कोणालाही पडणं साहजिकच आहे. आता इथे तर्कशुद्ध हा शब्द महत्वाचा.
तर्कशुद्ध म्हणायचं तर कोणत्या दृष्टीने, काऱण वास्तववादी दृष्टीकोनातून पाहता यात घडणा-या सत्तर टक्के गोष्टी या तर्काला धरून नाहीत. मात्र प्रत्येक चित्रपटाचं स्वतःचं तर्कशास्त्र असतं, जे तो पटकथेच्या तपशीलांबरोबर घडवत नेत असतो. नोव्हेंबर तेच करतो. श्रेयनामावलीत दिसणारे तपशील, इतर आवृत्त्यांमधून सुचवलेली दिशा, लहानमोठ्या प्रसंगांना फुटणारे फाटे या सर्व गोष्टी एका विशिष्ट स्पष्टीकरणाकडे निर्देश करतात. या सर्वांपलीकडे जाणारा एक क्लू दडलेला आहे. तो चित्रकर्त्यांनी वापरलेल्या शीर्षकांमध्ये. एलिझाबेथ क्युबर-रॉसच्या १९६९ सालच्या `ऑन डेथ अ‍ॅण्ड डाईंग` पुस्तकात दुःख अन् मृत्यूला तोंड देताना लोक ज्या टप्प्यांवरून प्रवास करतात,त्याविषयी लिहिलं आहे. डिनायल, अ‍ॅन्गर, बार्गेनिंग, डिप्रेशन,अ‍ॅक्सेप्टन्स हे ते टप्पे. नोव्हेंबरमध्ये यातल्या पहिल्या अन् अखेरच्या टप्प्यांचा वापर शीर्षकांसाठी त्याच क्रमाने करणं, हा योगायोग वाटत नाही. क्युब्लर-रॉस मॉडेल नावाने ओळखल्या जाणा-या फाईव्ह स्टेजेस आँफ ग्रीफ चित्रपटातल्या इतर आशयाशी अन् अखेरच्या प्रसंगाशी जोडल्या तर चित्रपटाला, त्याने आखून घेतलेल्या चौकटीत स्पष्ट उत्तर आहे, असं म्हणता येईल.
आणि ज्या त्या गोष्टीत उत्तर मिळायला हवं असं थोडंच आहे. प्रश्न जर पुरेसा विचाराला चालना देणारा असला, तर उत्तरांची अपेक्षा न करताही समाधान मानता येईलच. नोव्हेंबरला असं समाधान देणारा प्रश्न समजायलाही काही हरकत नाही.
-गणेश मतकरी.

Read more...

कॅमेरॉनचा अवतार

>> Monday, January 4, 2010



"अवतार' हा जेम्स कॅमेरॉनने टायटॅनिकनंतर १२ वर्षांनी केलेला चित्रपट पाहावा, की पाहू नये असा प्रश्नच पडण्याची गरज नाही. चित्रपटगृहात जाऊन अनुभवण्याचे, त्यांच्या दृश्यानुभवाने आपल्याला थक्क करून सोडणारे जे विशेष चित्रपट असतात, त्यातला हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. त्यामुळे तो पाहावा हे तर उघड आहे. आता हे देखील खरं, की ज्या प्रमाणात त्याचं मार्केटिंग करण्यात आलंय त्याकडे पाहून हे स्पष्ट आहे की, अवतारचा प्रेक्षक हा मी त्याबद्दल काय मत व्यक्त करतो हे जाणून घेण्यासाठी तो पाहायचा राहणार नाही. त्याने एक तर तो आधीच पाहिलेला असेल, किंवा तो पाहायचा अशी खूणगाठ मनाशी बांधून तिकिटं मिळविण्यामागे लागलेला असेल, त्यामुळे खऱ्या अर्थाने "क्रिटिक प्रूफ' म्हणण्याजोगे जे सिनेमे असतात, त्यातलाच हा एक आहे, हे उघड आहे. मात्र हे सगळं गृहीत धरूनही हा चित्रपट कसा आहे, अन तो अपेक्षा पूर्ण करतो का याविषयी बोलणं आवश्यक आहे, जेम्स कॅमेरॉन या दिग्दर्शकाच्या कारकिर्दीला तो साजेसा आहे, आणि या नावापासून ज्या अपेक्षा आहेत त्या तो पू-या करतो. याची दुसरी बाजू अशी, की कॅमेरॉनच्या चित्रपटांमध्ये ज्या त्रुटी पाहायला मिळतात, त्यादेखील अवतारमध्ये आहेतच.
"एलिअन्स, "टर्मिनेटर' "टायटॅनिक' हे कॅमेरॉनचे सर्वांत महत्त्वाचे चित्रपट पाहता लक्षात येईल, की त्याचा खरा भर दृष्य सादरीकरणावर आहे. लोकांना कुतूहल वाटणाऱ्या संकल्पना यामध्ये जरूर आहेत, त्यांचे अस्तित्त्वही जाणवण्याजोगे आहे. या संकल्पना खोलात जाऊन फुलवण्यापेक्षा त्यांना एका मूलभूत पातळीवर मांडून मग सादरीकरणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणे ही त्याची खासीयत आहे. "अवतार'मध्येही काही निश्‍चित संकल्पना आहेत. त्यातील सर्वच नवीन किंवा स्वतंत्र नाहीत. अनेक जुन्या चित्रपटांचा त्यांना आधार आहे. पहिली तर असंख्य वेळा पाहिलेली आहे. परग्रहवासीयांच्या हल्ल्यांपुढे हतबल झालेल्या ग्रहांच्या मूळ रहिवाशांची ही संकल्पना आहे. इथला वेगळेपणा म्हणजे परग्रहवासी हे पृथ्वीवासीयच आहेत. हतबल रहिवासी आहेत, दूरवरच्या "पॅंडोरा' या चंद्रग्रहावरचे विशिष्ट जमातीचे रहिवासी.
दुसरी संकल्पना आहे, ती "मेट्रिक्‍स' किंवा "ओपन युवर आईज्‌'सारख्या चित्रपटांतून येणाऱ्या वास्तव आणि स्वप्नरूपी वास्तव अशा दुहेरी आयुष्याची. तिसरी आहे, "बेकेट'मधल्याप्रमाणे हेर म्हणून योजलेल्या नायकाने सद्‌सद्विवेकबुद्धी जागृत होताच भल्याची बाजू उचलून धरण्याची. चौथी आहे, "निसर्गाचे रक्षण करा' या आपल्याकडेही अनेक वर्षे लोकप्रिय असणाऱ्या संदेशाची. कॅमेरॉनने या सर्व संकल्पना एकमेकांत गुंफून एक सैल कथानक तयार केले आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन पटकथेची वीण अधिक पक्की करण्यात त्याला रस नाही. तो रमतो तो एका नव्या विश्वाच्या- पॅंडोराच्या निर्मितीत.
पॅंडोरा जिवंत होणे, ही "अवतार'मधील सर्वांत कठीण, जमलेली आणि पाहण्याजोगी गोष्ट आहे. या प्रकारचा प्रयोग इतक्‍या मोठ्या प्रमाणावर केलेला पाहण्यात नाही. एखादी "इकोसिस्टिम' ज्या प्रकारच्या बारकाव्यांनिशी एखाद्या निसर्गकेंद्री चित्रपटात पाहायला मिळू शकेल, तितक्‍याच तपशिलात इथे दिसते. यातल्या प्राणिमात्रांपासून वृक्षवल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्या चमूने डिझाईन केली आहे आणि संगणकाच्या मदतीने पडद्यावर आणली आहे. "लॉर्ड ऑफ द रिंग्ज'मधला "गोलेम', "ज्युरासिक पार्क'मधील डायनासोर असे डिजिटल चमत्कार आपण पाहिलेले आहेत. पोलर एक्‍स्प्रेस किंवा बेओवुल्फसारखे खऱ्याच्या जवळ जाणारे संपूर्ण संगणकीय प्रयत्नही परिचित आहेत; मात्र इथली प्रत्यक्ष चित्रणे आणि संगणकीय विश्‍व यांची सरमिसळइतकी जिवंत आहे, की आपल्याला कल्पना नसेल तर हा तंत्रज्ञानाचा आविष्कार लक्षातही येऊ नये. थोडक्‍यात, टायटॅनिकमध्ये त्या इतिहासप्रसिद्ध बोटीच्या निर्मितीसाठी ज्या प्रकारचा भगीरथ प्रयत्न करण्यात आला होता, त्याच प्रकारचा पण त्याहून कितीतरी अधिक प्रयत्न इथे पॅंडोराच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे. याचा फायदा म्हणजे, प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात मिळणारे नेत्रसुख आणि उघड तोटा म्हणजे, या मेहनतीमुळे कथाबाह्य तपशिलाला मिळणारे प्रमुख स्थान अन्‌ पर्यायाने मूळ कथेच्या रचनेकडे होणारे दुर्लक्ष.
वर वर पाहता "अवतार'ची टर्मिनॉलॉजी विज्ञानपटाची असली तरी त्याचे स्वरूप हे बोधकथा, दंतकथा, परिकथा यांच्या अधिक जवळ जाणारे आहे. त्या दृष्टीने पाहिले, तर "2001 ः ए स्पेस ओडीसी'सारख्या अस्सल विज्ञानपटापेक्षा, तो "स्टार वॉर्स'च्या गटात मोडणाऱ्या, वैज्ञानिक बाज असणाऱ्या; पण प्रत्यक्षात वेगळ्याच प्रकाराशी नाते सांगणाऱ्या चित्रपटांच्या अधिक जवळचा आहे. इथला नायक आहे जेक सुली (सॅम वर्दिंग्‌टन). जेकच्या जुळ्या भावाच्या मृत्यूमुळे तो अचानक कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पॅंडोरा ग्रहाकडे जाणाऱ्या मिशनवर भरती झालाय. पॅंडोरावर असणारा एक विशिष्ट धातू पृथ्वीवासियांसाठी फार मोलाचा आहे अन्‌ तो मिळविण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. मिशनचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. कर्नल माईलून क्वारिच (स्टीव्हन लॅंग) च्या हाताखाली सैन्य या ग्रहावर ताबा घेण्याचा प्रयत्न करतंय, तर ग्रेस (सिगर्नी विव्हर) च्या नेतृत्वाखाली काही संशोधक ना'वी जमातीशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून काही सामोपचाराचा मध्यममार्ग निघतो का, हे पाहत आहेत. या संशोधकांनी "अवतार' या जैविक यंत्राची निर्मिती केली आहे. हे अवतार ना'वींच्याच प्रतिकृती आहेत; मात्र विशिष्ट व्यक्तींच्या बायोलॉजिकल मेकअपच्या साह्याने तयार केलेल्या. संगणकाच्या मदतीने या व्यक्तींना अवताराशी जोडले जाते अन्‌ हे अवतार पँडोरावर जाऊन ना'वींशी संपर्क साधू शकतात. अवतार चालवण्याचे, अन्‌ ना'वींच्या चालीरीतींचे, भाषेचे प्रशिक्षण घेतलेल्या जेकचा भाऊ आकस्मात गेल्याने तोच बायो मेकअप असणारा जेक त्याची जागा घेतो. मात्र, जेकसाठी हा अनुभव अधिक मोलाचा ठरतो. युद्धात पाय निकामी झालेला जेक अवतारांच्या माध्यमातून अपंगत्वावर मात करतो.
पॅंडोरावर उद्‌भवलेल्या एका बिकट प्रसंगातून कसाबसा वाचलेल्या जेकची गाठ नेतीरी (झोई सालदाना) या ना'वी राजकन्येबरोबर होते आणि या जमातीबरोबर राहण्याची, त्यांना समजून घेण्याची दुर्मिळ संधी जेकला मिळते. आपले पाय नीट होण्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया करवून देण्याच्या बोलीवर जेकने ना'वींच्या पाडावासाठी लागणारी माहिती क्वारिचला पुरवायचं कबूल केलेले असतं; मात्र ही आपली चूक असल्याचं लवकरच त्याच्या लक्षात यायला लागतं.
टायटॅनिकप्रमाणे किंवा कॅमेरॉनच्या इतरही अनेक चित्रपटांप्रमाणे तुलनेने दुय्यम महत्त्व असून इथे अभिनयाची बाजू भक्कम आहे. इथे ते अधिक कठीण आहे; कारण नायकाचा अर्धा वेळ अ‍ॅनिमेटेड स्वरूपात आहे, तर नायिकेचा पूर्ण. सिगर्नी विव्हरदेखील अ‍ॅनिमेटेड आहे. केवळ स्टीवन लॅन्गच काय तो पूर्ण वेळ मूळ स्वरूपात आहे, मात्र त्याची व्यक्तिरेखा उघड खलनायकी छापाची असल्याने परिचित आणि भडक आहे. अवतारमध्ये काही दुय्यम संकल्पनाही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. स्टार वॉर्समधल्या फोर्सच्या जातीची, पण अधिक प्रॅक्टीकल उपयोग असणारी सर्वत्र पसरलेली ऊर्जा, मूळात केवळ त्रयस्थ असणा-या निसर्गाने अत्याचार वाढत चालला असताना तो थांबविण्यासाठी प्रत्यक्ष बाजू घेणं, मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या बॉन्डींगचा अधिक स्पष्ट आविष्कार, इत्यादी. या सर्वच कल्पना आशयाशी प्रामाणिक आहेत आणि पटण्यासारख्या.
अखेर पटकथेचं त्याच त्या सांकेतिक वळणांमध्ये अडकून राहणं अन्‌ शक्‍यतांचा पूर्ण वापर न करणं हेच अवतारचे पाय थोडे मागे खेचणारे ठरते. पण हा दोष दिग्दर्शकाच्या प्रत्येक सिनेमासंबंधात दाखवून देता येईल. खरं तर त्याला पटकथेचा अधिक मूलभूत पातळीवर जाऊन विचार करावासा वाटत नाही, हेच खरं. अर्थात आपण कॅमेरॉनच्या सौंदर्यदृष्टीला दाद देत, पॅंडोरावरली छान सहल घडवल्याच्या आनंदात या दोषाबाबत त्याला माफ करू. या निमित्ताने व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स काय करू शकतात, याचा नवा अध्याय आपल्याला पाहायला मिळाला, हे काय कमी आहे?
 - गणेश मतकरी

Read more...

रशमोरः अँडरसनच्या जगात

>> Tuesday, December 22, 2009

वेस अँडरसन या दिग्दर्शकाच्या अनेक फिल्म्स पाहूनही प्रेक्षकाला त्या नक्की कशाविषयी आहेत याविषयीचा संभ्रम राहण्याची शक्यता आहे. म्हटलं तर त्यांना काही प्रमाणात गोष्ट असते, म्हटलं तर विनोदाला काही प्रमाणात स्थान असतं, ब-यापैकी लोकप्रिय अभिनेते असतात, मात्र त्यांना व्यावसायिक कॉमेडी चित्रपट म्हणता येणार नाही. कथाप्रधान नाही, बेतीवदेखील नाही. अँडरसनचा किती मोठा प्रेक्षकवर्ग आहे याची मला कल्पना नाही,पण त्याचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट हा कल्ट वर्गात मोडणारा आहे, अन् एक विशिष्ट वर्ग त्याचे चित्रपट पाहतो हे निश्चित. मी स्वतः त्याच्या रॉयल टेटनबॉम्ब्स (२००१), दि लाईफ अँक्वेटिक विथ स्टीव झिस् (२००४), दि दार्जिलिंग लिमिटेड (२००७) हे पूर्ण लांबीचे चित्रपट पाहिले आहेत. आणि दार्जिलिंगशी जोडलेली शॉर्ट फिल्म हॉटेल शेवालिअरदेखील.
त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट, रशमोर (१९९८) मात्र माझ्या त्यामानाने हल्ली पाहण्यात आला. त्याविषयी ऐकून होतो, अन् अलीकडे त्यावरचं विकीपिडीआ साईटवरलं आर्टिकल वाचताना अँडरसनच्या चित्रपटांच्या वेगळेपणाकडे बोट ठेवणारा एक क्लू मिळाला.
विथ रशमोर,वेस अँडरसन अँन्ड ओवेन विल्सन (प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि रशमोर तसेच रॉयल टेटनबॉम्ब्सचा सहपटकथाकार) वॉन्टेड टू क्रिएट देअर ओन स्लाईटली हायटन्ड रिअँलिटी, लाईक रोआल्ड डाल चिल्ड्रन्स बूक, असे ते वाक्य होतं. बहुदा अँडरसन किंवा विल्सनच्या एखाद्या मुलाखतीचा संदर्भ असलेलं.
रोआल्ड डालटचा अँडरसन वरचा प्रभाव हे जसं त्याने डालची फँन्टॅस्टीक मि.फॉक्स ही मुलांची कादंबरी रुपांतरीत करण्यामागचं कारण असू शकतं, तसंच ते अँडरसनच्या चित्रपटातल्या विक्षिप्त वास्तववादामागचं देखील नक्कीच असणार. डालच्या मुलांच्या/किंवा मोठ्यांच्याही कादंब-या वाचणा-यांना हे ठाऊक आहे की त्यातलं वास्तव हे वास्तवाचा आभास असणारं, पण प्रत्यक्षात त्यांच्या कर्त्याच्या खास चष्म्यातून पाहिलेलं असतं. त्यातल्या पात्रांची स्वतःची अशी चमत्कारिक तर्कशास्त्र असतात. जी प्रत्यक्ष जगात चालून जाणार नाहीत. ही पात्रं, त्यांचे उद्योग आणि त्यांनी व्यापलेलं जग हे डालच्या चाहत्यांना प्रिय आहे. अँडरसनच्या चित्रपटांत या जगाचं निश्चितपणे दिसणारं प्रतिबिंब आहे. रशमोरमध्ये तर खासंच.
रशमोरचा नायक आहे महागड्या शाळेत शिष्यवृत्तीवर शिकणारा मॅक्स फिशर (जेसन श्वार्त्झमन), मॅक्सचं अभ्यासात जराही लक्ष नाही, मात्र एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीजमध्ये त्याचा हात धरणारं कुणीही नाही. तलवारबाजीपासून ते रंगभूमीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याला रस आहे, आणि यातल्या प्रत्येक छंदांसाठी असलेल्या गटाचा (किंवा गट नसल्यास तो तयार करायलाही मॅक्स एका पायावर तयार आहे.) तो प्रमुख आहे. साहजिकच, त्याला अभ्यासासाठी वेळ मिळणार तरी कसा. मात्र या गोष्टींचे त्याला दुःख नाही.
मॅक्सचा आविर्भाव हा आपण खूपच घरंदाज असल्याचा. आपले वडील न्हावी नसून सर्जन असल्याचं तो सर्वांना सांगतो. या आपल्या डोक्यातल्या किंवा समाजातल्या वर्गभेदाचाही तो फार विचार करीत नाही.
अशा या मॅक्सचं आपल्याहून पुष्कळ मोठ्या, खालच्या वर्गांना शिकविणा-या शिक्षिकेवर प्रेम बसतं. रोजमेरी क्रॉस ( आँलिविया विलिअम्स) ते एकतर्फी असल्याचं, अन् मॅक्स वयाने खूप लहान असल्याचं वारंवार सुचवते. पण काही उपयोग होत नाही. तिला मिळवायच्या प्रयत्नात मॅक्सची हर्मन ब्लूम या उद्योगपतीशी मैत्री होते. ब्लूम (बिल मरी) मॅक्सला मदत करता करता स्वतःच रोजमेरीच्या प्रेमात पडतो आणि मॅक्सचं डोकं फिरतं.
हायस्कूलवर आधारलेले अनेक फॉर्म्यूला चित्रपट आपण पाहिले आणि रशमोर पाहिला, तर आपल्या लक्षात येईल की फॉर्म्यूला मधले काही घटक (उदाहरणार्थ अभ्यास न करणारा हुशार मुलगा. विद्यार्थ्यांचं शिक्षिकेवर प्रेम. इत्यादी) त्यात जरुर असले, तरी रचनेसाठी अन् व्यक्तिरेखेसाठी तो फॉर्म्यूला वापरत नाही. किंबहूना तपशिलात व्यक्तिचित्रण हाच त्याच्या रचनेचा भाग आहे. त्यामुळे पुढे, पुढे म्हणजे मॅक्स अन ब्लूममध्ये वैर झाल्यावर जेव्हा चित्रपट रचनेच्या, किंवा काही निश्चित घडवण्याच्या आहारी जातो तेव्हा तो दिग्दर्शकाच्या हातून निसटायला लागतो.
मॅक्सची व्यक्तिरेखा ही तिच्या विरोधात जाणा-या अनेक गोष्टी दाखवूनही चांगली वाटवणं अँडरसनने साधलं आहे. त्याच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी, म्हणजे जितक्या छंदांना तो एकाचवेळी जोपासतो ते किंवा त्याने केलेल्या नाटकांचे विषय अन् सादरीकरण (शाळेच्या रंगमंचावर साकारलेली अत्यंत वास्तववादी इफेक्ट्स अन् हिंसेच्या दर्शनासकट असणारी गँगस्टर्स किंवा युद्धासारख्य़ा विषयांची हाताळणी. हे खरंतर एरवी अशक्य आहे. मात्र अँडरसनच्या जगात मॅक्सला ते करता येतं, मॅक्सच्या नाटकांना शक्य वाटवण्यासाठी केलेला तपशील तर हिंदी चित्रपट दिग्दर्शकांनी जरूर पाहावा. आपल्याकडल्या सिनेमात स्टेज शोच्या नावाखाली वाटेल तेवढ्या मोठ्या सेटवर (उघडपणे स्टुडिओत लावलेल्या) भलीथोरली नृत्य दाखवून प्रेक्षकांचे शॉट अधेमधे लावण्याची एक मूर्ख प्रथा अनेक वर्षे आहे. त्या तुलनेत रशमोरमधल्या नाटकांतील नेपथ्याची, फॉल्स पर्स्प्रेक्टीव्हची जाण ही वाखाणण्याजोगी आहे.
रशमोर सर्वांना आवडेल अशी शक्यता नाही. अँडरसनच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा देखील एका विशिष्ट प्रेक्षकालाच डोळ्यासमोर ठेवून बनवलेला आहे. मात्र एक गोष्ट मी जरूर म्हणेन, की पाहणा-या प्रत्येकाला त्यातलं काही ना काही जरूर आवडेल. त्याचं जवळजवळ अर्ध्यापर्यंत सहजपणे उलगडणारं कथानक, बिल मरीला इन्डीपेन्डन्ट सिनेमा मधला महत्त्वाचा अभिनेता म्हणून सुरुवात करून देणारी ब्लूमची व्यक्तिरेखा,मॅक्सचं वास्तव आणि फँटसीच्या सीमारेषेवरचं जग, या आणि अशा अनेक गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत. आपल्याला त्यातली कोणती अधिक आवडते ते ज्याचं त्याने ठरवावं.
-गणेश मतकरी.

Read more...

सिनेमा ऍट दी एन्ड ऑफ द युनिव्हर्स

>> Thursday, December 10, 2009


मागे एकदा मी एका लेखात डग्लस ऍडम्सच्या "हिचहायकर्स गाईड टु दी गॅलेक्‍सी' या अद्‌भुत विनोदी वैज्ञानिकेचा उल्लेख केला होता. "रेस्टॉरंट ऍट दी एन्ड ऑफ दी युनिव्हर्स' ही त्यातलीच एक अफलातून संकल्पना. काळ आणि विज्ञानाशी अतिशय गमतीदारपणे; पण स्वतःचे एक निश्‍चित तर्कशास्त्र वापरून खेळणाऱ्या या कादंबरी मालिकेतील हे रेस्टॉरंट, जगाच्या विनाशाच्या क्षणासमीप उभे आहे. मात्र, कालप्रवाहाबाहेरच्या एका कृत्रिम बुडबुड्यात (याच तर्काला धरून दुसरे एक रेस्टॉरंट बिग बॅन्गच्या क्षणासमीपदेखील उभे आहेच. मात्र कादंबरीतील पात्रे प्रत्यक्ष भेट देतात, ती याच एका ठिकाणाला) या ठिकाणाहून जगाच्या विनाशकाळी होणारा विध्वंस आपल्या सुरक्षाकवचाबाहेर न जाता वर उत्तमोत्तम खाण्यापिण्याचा अन्‌ संगीताचा आस्वाद घेत घेत पाहता येतो. या विध्वंसाच्या भव्यतेच्या, निसर्गाच्या रौद्ररूपाच्या आकर्षणाबरोबरच आपण स्वतः प्रत्यक्ष त्या घटकेला तिथे नसल्याचा आनंदही या सुरक्षित आस्वादकांना होत असेल का? नक्कीच! 2012 च्या प्रेक्षकांनाही काहीसा याच प्रकारचा आनंद मिळत असल्यास नवल नाही.
या आनंदाचे मुक्त हस्ते वितरण करणारा दिग्दर्शक म्हणून कोणाचा सत्कार करायची वेळ आली, तर दिग्दर्शक रोलन्ड एमरिक इतका उत्तम उमेदवार मिळणार नाही. इन्डिपेन्डन्स डे (1996), गॉडझिला (1998), द डे ऑफ्टर टुमॉरो (2004) आणि आता 2012 (2009) या आपल्या सर्वांत यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांमधून त्याने "विध्वंसाचे प्रलयकारी दर्शन', हा आपला "युनिक सेलिंग पॉईंट' करून टाकला आहे. वर दिलेले चित्रपट प्रदर्शित झालेल्या वर्षांकडे पाहता लक्षात येईल, की यातले दोन चित्रपट 11 सप्टेंबर 2001 च्या आधीचे आहेत; तर उरलेले दोन नंतरचे. मात्र, सर्वांमध्ये मनुष्यहानी, प्रसिद्ध लॅंडमार्क इमारतींचे जमीनदोस्त होणे, वास्तववादी नसणारे परंतु थक्क करून सोडणारे स्पेशल इफेक्‍ट्‌स या सर्वांनाच स्थान आहे. याचा अर्थ, 9/11च्या भयकारी रिऍलिटी टीव्ही शोचा ना दिग्दर्शकांच्या संवेदनशीलतेवर परिणाम झाला, ना प्रेक्षकांच्या अभिरुचीवर, असा काढावा का?
"ऍपोकॅलिप्स' किंवा सगळ्याचा अंत घडवणारा विनाश, हा विषय गेले काही दिवस सातत्याने चित्रपटात हजेरी लावताना दिसतो आहे. एमरिकचे तीन चित्रपट, त्याखेरीज "आर्मागेडन', "डीप इम्पॅक्‍ट'सारखे मिटीओराईट (मार्फत) पृथ्वी उद्‌ध्वस्त करणारे `ट्वेल मन्कीज'सारखे जैविक अस्त्रांचा वापर करणारे, "28 डेज लेटर'सारखे रोमरोच्या झोम्बी फॉर्म्युल्याचे पुनरुज्जीवन करणारे, "टर्मिनेटर' किंवा "मेट्रिक्‍स'सारखे यंत्रयुगात मानवजातीचा विनाश शोधणारे... एक ना दोन, असे कितीतरी चित्रपट गेल्या काही वर्षांत याच सूत्राभोवती फिरताना दिसताहेत. "9'सारख्या मुलांच्या चित्रपटालाही हा विषय दूरचा नाही आणि "ऍन इन्कन्व्हिनिअन्ट ट्रूथ' किंवा "इलेवन्थ अवर'सारख्या माहितीपटांनाही आज पृथ्वीला वेळीच सावध होण्याचा इशारा देण्याची गरज वाटते आहे. "रोड' किंवा "बुक ऑफ इलाय'सारख्या आगामी चित्रपटांमध्येही डोकावत असणारा हा विषय पुढची काही वर्षे निदान 2012 (वन वे ऑर अनदर) सरेपर्यंत तरी हॉलिवूडसेन्ट्रीक चित्रसृष्टीपासून फारकत घेईल, असे वाटत नाही.
मात्र, या विषयाची हाताळणी ही, वाढणारे बजेट अन्‌ स्पेशल इफेक्‍ट्‌सचा दर्जा, यापलीकडे जाऊन अधिक वास्तववादी होताना दिसत नाही. जे "9/11' नंतर काही प्रमाणात होईल अशी अपेक्षा होती. मॅट रिव्हजने आपल्या "क्‍लोवरफिल्ड' या मॉन्स्टर मुव्हीमध्ये याचे पडसाद आणून हे काही प्रमाणात साधले. स्पेशल इफेक्‍ट्‌स वापरून किंवा स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचा शिरच्छेद करूनही त्याने क्‍लोवरफिल्डला (प्रामुख्याने छायाचित्रणाच्या तंत्राचा उत्तम वापर साधून) कायम सामान्य जनतेच्या दृष्टिकोनात रुजवले आणि एक वेगळा चित्रपट दिला. बाकी दिग्दर्शकांनी मात्र वास्तववादाशी जवळीक ही जाणूनबुजून टाळलेली दिसते.
चित्रपटनिर्मात्यांना वा दिग्दर्शकांना पडद्यावर काय आणणे "रिस्की' वाटते अन्‌ काय "सेफ' वाटते, यामध्येदेखील याचे थोडे कारण दडलेले आहे. बहुतेकदा चित्रपट हे मुळातच वास्तवापेक्षा पलायनवादी रंजनावरच आपले प्रेक्षक मिळवतात. त्यामुळे नजीकच्या भूतकाळातल्या विदारक सत्याची आठवण टाळणे, हेच त्यांना अधिक योग्य वाटते. हे असे काही खरेच घडू शकते, असे वाटू देण्यापेक्षा "एकदा काय झाले.... (किंवा एकदा काय होईल....) शैलीतील गोष्ट प्रेक्षकांना दाखवणे, हे व्यवसायाच्या दृष्टीने अधिक परवडणारे असते, असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे प्रेक्षक खऱ्या दहशतीपासून दूर राहून करमणुकीच्या पातळीवर चित्रपट पाहू शकतो.
"2012' मागचे तर्कशास्त्र यापेक्षा वेगळे नाही. हे चित्रपट बहुधा (बहुधा अशासाठी, की "ट्‌वेल्व्ह मन्कीज'सारखे उत्तम अपवाददेखील असू शकतात) "व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट' या प्रकारचे असतात. त्यांच्या जाहिराती किंवा ट्रेलर्स पाहिले, की त्यात काय आहे, याची आपल्याला पूर्ण कल्पना येते आणि चित्रपटगृहात जे पाहायला मिळते, ते या कल्पनेला दुजोरा देणारेच असते. 21 डिसेंबर 2012 या तारखेला जगाचा अंत ओढवेल किंवा त्याचे स्वरूप मूलभूत पातळीवर आमूलाग्र बदलेल, असे भविष्य मायन संस्कृतीने वर्तविलेले आहे. त्याचाच आधार घेऊन हा विनाश मोठ्या प्रमाणात दाखवायचा, हा चित्रकर्त्यांचा उद्देश. तोच मोठ्या पडद्यावर पाहून स्वतःला प्रभावित करून घेण्याचा प्रेक्षकांचाही उद्देश. या पलीकडे जाऊन अधिक वरची सांस्कृतिक कलास्वादात्मक पातळी गाठण्याचा उद्देश या चित्रपटात संभवत नाही. एका परीने त्यामुळे त्याचे गणितही सोपे होते. प्रेक्षकाची दिशाभूल होण्याचा प्रश्‍नच उरत नाही.
मी 2012 पाहिला तेव्हा मला याची पूर्ण कल्पना होती. केवळ छानसे स्पेशल इफेक्‍ट्‌स मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील, एवढीच माझी माफक अपेक्षा होती. इफेक्‍ट्‌स थोडे फार अनइव्हन असूनही, ती पुरी झाली, असे मी म्हणू शकतो. तरीही एका बाबतीत पटकथेने माझी थोडी निराशा मात्र केली. एमरिकच्या वर सांगितलेल्या चित्रपटात "इन्डीपेन्डन्स डे' सोडून इतर दोन चित्रपट मला तितकेसे आवडले नव्हते. त्याचे कारण म्हणजे गोष्ट कमालीची बाळबोध असूनही "इन्डीपेन्डन्स डे'ने चित्रपटातला ताण चढविण्याचे काही निश्‍चित टप्पे ओळखले होते. त्या दृष्टीने पटकथा अधिकाधिक वेधक केली होती. विध्वंसाचा भाग सोडूनही मधला एरिया 51 वरचा भाग किंवा अखेरचा संघर्ष पुरेसे रंगले होते. त्यातल्या व्यक्तिरेखाही थ्री डिमेन्शनल नसल्या, तरी आपल्याला पकडून ठेवणाऱ्या होत्या. प्रचंड मोठी "स्केल', हीदेखील ID-4 (इंडिपेन्डन्स डे)मध्ये प्रथमच वापरण्यात आल्याने नवीन होती.
2012 मध्ये स्केल वापरून जुनी झालेली आहे. ती आता अधिकच मोठ्या प्रमाणात, अधिक भव्य आहे, हे खरे; पण त्यामुळे अनेकदा ती "अति' वाटणारी. त्याखेरीज कथानकाला टप्पे हे जवळपास नाहीतच. म्हणजे संकटाची चाहूल देणारा सेटअप, विविध पार्श्‍वभूमीवर येणारी अनेक बारीकसारीक पात्रे, हे तर थेट "इन्डीपेन्डन्स डे'वरूनच आल्यासारखे आहे; पण एकदा विध्वंसाला सुरवात झाली, की दिग्दर्शक त्यात इतका रमतो, की पुढे नोहाच्या कथेप्रमाणे आर्कसचा सबप्लॉट असला, तरी तो पुरेशा ताकदीने उभा राहत नाही. खरे तर या भागातला सांस्कृतिक ठेवा कसा तयार होतो, या संबंधातले काही विचार किंवा संस्कृती विरुद्ध पैसा यामधला संघर्ष, असे काही मुद्दे लक्षवेधी जरूर आहेत; पण ते पुढे खुलवलेले दिसत नाहीत. अर्थात, मी मघा म्हटल्याप्रमाणे जाहिरात जे प्रॉमिस करते, ते चित्रपट जरूर दाखवतो. तिथे तक्रारीला फारशी जागा नाही.
तरीदेखील मी एका वेगळ्या विनाशकालीन चित्रपटाची वाट पाहतो आहे, जो केवळ कल्पनाविलासापेक्षा, जर खरोखरच अशी वेळ आल्यास काय होईल, याचा पुरेशा गंभीरपणे विचार करेल अन्‌ मग त्या वेळी लोकांपुढे येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी आणि नैतिक प्रश्‍न यावर काही भाष्य करू पाहील. त्यात स्पेशल इफेक्‍ट्‌स वा प्रत्यक्ष विनाश मोठ्या प्रमाणात असण्याचीही गरज नाही; पण मानव त्या अंतिम क्षणी आपल्यापुढचे कोणते पर्याय तपासून पाहतो आहे, अन्‌ आपला आजवरच्या अस्तित्वाचा काय ताळेबंद लावतो आहे, याचा प्रामाणिकपणे आढावा घेईल. आजवर जगात अनेक भल्याथोरल्या संस्कृतींचा अस्त हा अतिशय अनपेक्षितपणे ओढवला आहे. आपणही त्याला अपवाद असू, असे समजण्याचे कारण नाही. त्या शक्‍य कोटीतल्या अस्ताचे चित्रण जर एखादा चित्रपट करणार असेल, तर तो महागातल्या महाग स्पेशल इफेक्‍ट्‌सहून अधिक मोठा परिणाम करून जाईल, हे नक्की.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP