कॅमेरॉनचा अवतार

>> Monday, January 4, 2010



"अवतार' हा जेम्स कॅमेरॉनने टायटॅनिकनंतर १२ वर्षांनी केलेला चित्रपट पाहावा, की पाहू नये असा प्रश्नच पडण्याची गरज नाही. चित्रपटगृहात जाऊन अनुभवण्याचे, त्यांच्या दृश्यानुभवाने आपल्याला थक्क करून सोडणारे जे विशेष चित्रपट असतात, त्यातला हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. त्यामुळे तो पाहावा हे तर उघड आहे. आता हे देखील खरं, की ज्या प्रमाणात त्याचं मार्केटिंग करण्यात आलंय त्याकडे पाहून हे स्पष्ट आहे की, अवतारचा प्रेक्षक हा मी त्याबद्दल काय मत व्यक्त करतो हे जाणून घेण्यासाठी तो पाहायचा राहणार नाही. त्याने एक तर तो आधीच पाहिलेला असेल, किंवा तो पाहायचा अशी खूणगाठ मनाशी बांधून तिकिटं मिळविण्यामागे लागलेला असेल, त्यामुळे खऱ्या अर्थाने "क्रिटिक प्रूफ' म्हणण्याजोगे जे सिनेमे असतात, त्यातलाच हा एक आहे, हे उघड आहे. मात्र हे सगळं गृहीत धरूनही हा चित्रपट कसा आहे, अन तो अपेक्षा पूर्ण करतो का याविषयी बोलणं आवश्यक आहे, जेम्स कॅमेरॉन या दिग्दर्शकाच्या कारकिर्दीला तो साजेसा आहे, आणि या नावापासून ज्या अपेक्षा आहेत त्या तो पू-या करतो. याची दुसरी बाजू अशी, की कॅमेरॉनच्या चित्रपटांमध्ये ज्या त्रुटी पाहायला मिळतात, त्यादेखील अवतारमध्ये आहेतच.
"एलिअन्स, "टर्मिनेटर' "टायटॅनिक' हे कॅमेरॉनचे सर्वांत महत्त्वाचे चित्रपट पाहता लक्षात येईल, की त्याचा खरा भर दृष्य सादरीकरणावर आहे. लोकांना कुतूहल वाटणाऱ्या संकल्पना यामध्ये जरूर आहेत, त्यांचे अस्तित्त्वही जाणवण्याजोगे आहे. या संकल्पना खोलात जाऊन फुलवण्यापेक्षा त्यांना एका मूलभूत पातळीवर मांडून मग सादरीकरणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणे ही त्याची खासीयत आहे. "अवतार'मध्येही काही निश्‍चित संकल्पना आहेत. त्यातील सर्वच नवीन किंवा स्वतंत्र नाहीत. अनेक जुन्या चित्रपटांचा त्यांना आधार आहे. पहिली तर असंख्य वेळा पाहिलेली आहे. परग्रहवासीयांच्या हल्ल्यांपुढे हतबल झालेल्या ग्रहांच्या मूळ रहिवाशांची ही संकल्पना आहे. इथला वेगळेपणा म्हणजे परग्रहवासी हे पृथ्वीवासीयच आहेत. हतबल रहिवासी आहेत, दूरवरच्या "पॅंडोरा' या चंद्रग्रहावरचे विशिष्ट जमातीचे रहिवासी.
दुसरी संकल्पना आहे, ती "मेट्रिक्‍स' किंवा "ओपन युवर आईज्‌'सारख्या चित्रपटांतून येणाऱ्या वास्तव आणि स्वप्नरूपी वास्तव अशा दुहेरी आयुष्याची. तिसरी आहे, "बेकेट'मधल्याप्रमाणे हेर म्हणून योजलेल्या नायकाने सद्‌सद्विवेकबुद्धी जागृत होताच भल्याची बाजू उचलून धरण्याची. चौथी आहे, "निसर्गाचे रक्षण करा' या आपल्याकडेही अनेक वर्षे लोकप्रिय असणाऱ्या संदेशाची. कॅमेरॉनने या सर्व संकल्पना एकमेकांत गुंफून एक सैल कथानक तयार केले आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन पटकथेची वीण अधिक पक्की करण्यात त्याला रस नाही. तो रमतो तो एका नव्या विश्वाच्या- पॅंडोराच्या निर्मितीत.
पॅंडोरा जिवंत होणे, ही "अवतार'मधील सर्वांत कठीण, जमलेली आणि पाहण्याजोगी गोष्ट आहे. या प्रकारचा प्रयोग इतक्‍या मोठ्या प्रमाणावर केलेला पाहण्यात नाही. एखादी "इकोसिस्टिम' ज्या प्रकारच्या बारकाव्यांनिशी एखाद्या निसर्गकेंद्री चित्रपटात पाहायला मिळू शकेल, तितक्‍याच तपशिलात इथे दिसते. यातल्या प्राणिमात्रांपासून वृक्षवल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्या चमूने डिझाईन केली आहे आणि संगणकाच्या मदतीने पडद्यावर आणली आहे. "लॉर्ड ऑफ द रिंग्ज'मधला "गोलेम', "ज्युरासिक पार्क'मधील डायनासोर असे डिजिटल चमत्कार आपण पाहिलेले आहेत. पोलर एक्‍स्प्रेस किंवा बेओवुल्फसारखे खऱ्याच्या जवळ जाणारे संपूर्ण संगणकीय प्रयत्नही परिचित आहेत; मात्र इथली प्रत्यक्ष चित्रणे आणि संगणकीय विश्‍व यांची सरमिसळइतकी जिवंत आहे, की आपल्याला कल्पना नसेल तर हा तंत्रज्ञानाचा आविष्कार लक्षातही येऊ नये. थोडक्‍यात, टायटॅनिकमध्ये त्या इतिहासप्रसिद्ध बोटीच्या निर्मितीसाठी ज्या प्रकारचा भगीरथ प्रयत्न करण्यात आला होता, त्याच प्रकारचा पण त्याहून कितीतरी अधिक प्रयत्न इथे पॅंडोराच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे. याचा फायदा म्हणजे, प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात मिळणारे नेत्रसुख आणि उघड तोटा म्हणजे, या मेहनतीमुळे कथाबाह्य तपशिलाला मिळणारे प्रमुख स्थान अन्‌ पर्यायाने मूळ कथेच्या रचनेकडे होणारे दुर्लक्ष.
वर वर पाहता "अवतार'ची टर्मिनॉलॉजी विज्ञानपटाची असली तरी त्याचे स्वरूप हे बोधकथा, दंतकथा, परिकथा यांच्या अधिक जवळ जाणारे आहे. त्या दृष्टीने पाहिले, तर "2001 ः ए स्पेस ओडीसी'सारख्या अस्सल विज्ञानपटापेक्षा, तो "स्टार वॉर्स'च्या गटात मोडणाऱ्या, वैज्ञानिक बाज असणाऱ्या; पण प्रत्यक्षात वेगळ्याच प्रकाराशी नाते सांगणाऱ्या चित्रपटांच्या अधिक जवळचा आहे. इथला नायक आहे जेक सुली (सॅम वर्दिंग्‌टन). जेकच्या जुळ्या भावाच्या मृत्यूमुळे तो अचानक कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पॅंडोरा ग्रहाकडे जाणाऱ्या मिशनवर भरती झालाय. पॅंडोरावर असणारा एक विशिष्ट धातू पृथ्वीवासियांसाठी फार मोलाचा आहे अन्‌ तो मिळविण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. मिशनचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. कर्नल माईलून क्वारिच (स्टीव्हन लॅंग) च्या हाताखाली सैन्य या ग्रहावर ताबा घेण्याचा प्रयत्न करतंय, तर ग्रेस (सिगर्नी विव्हर) च्या नेतृत्वाखाली काही संशोधक ना'वी जमातीशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून काही सामोपचाराचा मध्यममार्ग निघतो का, हे पाहत आहेत. या संशोधकांनी "अवतार' या जैविक यंत्राची निर्मिती केली आहे. हे अवतार ना'वींच्याच प्रतिकृती आहेत; मात्र विशिष्ट व्यक्तींच्या बायोलॉजिकल मेकअपच्या साह्याने तयार केलेल्या. संगणकाच्या मदतीने या व्यक्तींना अवताराशी जोडले जाते अन्‌ हे अवतार पँडोरावर जाऊन ना'वींशी संपर्क साधू शकतात. अवतार चालवण्याचे, अन्‌ ना'वींच्या चालीरीतींचे, भाषेचे प्रशिक्षण घेतलेल्या जेकचा भाऊ आकस्मात गेल्याने तोच बायो मेकअप असणारा जेक त्याची जागा घेतो. मात्र, जेकसाठी हा अनुभव अधिक मोलाचा ठरतो. युद्धात पाय निकामी झालेला जेक अवतारांच्या माध्यमातून अपंगत्वावर मात करतो.
पॅंडोरावर उद्‌भवलेल्या एका बिकट प्रसंगातून कसाबसा वाचलेल्या जेकची गाठ नेतीरी (झोई सालदाना) या ना'वी राजकन्येबरोबर होते आणि या जमातीबरोबर राहण्याची, त्यांना समजून घेण्याची दुर्मिळ संधी जेकला मिळते. आपले पाय नीट होण्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया करवून देण्याच्या बोलीवर जेकने ना'वींच्या पाडावासाठी लागणारी माहिती क्वारिचला पुरवायचं कबूल केलेले असतं; मात्र ही आपली चूक असल्याचं लवकरच त्याच्या लक्षात यायला लागतं.
टायटॅनिकप्रमाणे किंवा कॅमेरॉनच्या इतरही अनेक चित्रपटांप्रमाणे तुलनेने दुय्यम महत्त्व असून इथे अभिनयाची बाजू भक्कम आहे. इथे ते अधिक कठीण आहे; कारण नायकाचा अर्धा वेळ अ‍ॅनिमेटेड स्वरूपात आहे, तर नायिकेचा पूर्ण. सिगर्नी विव्हरदेखील अ‍ॅनिमेटेड आहे. केवळ स्टीवन लॅन्गच काय तो पूर्ण वेळ मूळ स्वरूपात आहे, मात्र त्याची व्यक्तिरेखा उघड खलनायकी छापाची असल्याने परिचित आणि भडक आहे. अवतारमध्ये काही दुय्यम संकल्पनाही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. स्टार वॉर्समधल्या फोर्सच्या जातीची, पण अधिक प्रॅक्टीकल उपयोग असणारी सर्वत्र पसरलेली ऊर्जा, मूळात केवळ त्रयस्थ असणा-या निसर्गाने अत्याचार वाढत चालला असताना तो थांबविण्यासाठी प्रत्यक्ष बाजू घेणं, मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या बॉन्डींगचा अधिक स्पष्ट आविष्कार, इत्यादी. या सर्वच कल्पना आशयाशी प्रामाणिक आहेत आणि पटण्यासारख्या.
अखेर पटकथेचं त्याच त्या सांकेतिक वळणांमध्ये अडकून राहणं अन्‌ शक्‍यतांचा पूर्ण वापर न करणं हेच अवतारचे पाय थोडे मागे खेचणारे ठरते. पण हा दोष दिग्दर्शकाच्या प्रत्येक सिनेमासंबंधात दाखवून देता येईल. खरं तर त्याला पटकथेचा अधिक मूलभूत पातळीवर जाऊन विचार करावासा वाटत नाही, हेच खरं. अर्थात आपण कॅमेरॉनच्या सौंदर्यदृष्टीला दाद देत, पॅंडोरावरली छान सहल घडवल्याच्या आनंदात या दोषाबाबत त्याला माफ करू. या निमित्ताने व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स काय करू शकतात, याचा नवा अध्याय आपल्याला पाहायला मिळाला, हे काय कमी आहे?
 - गणेश मतकरी

3 comments:

आनंद पत्रे January 5, 2010 at 3:04 AM  

खरंय, व्हिज्युअल इफेक्ट्स सोडुन कथा एकदम सरधोपट आहे, कुठेही वळण अथवा नाविन्य नाही.
मात्र डोळ्यांसाठी एकदम छान ट्रीट आहे....

Meghana Bhuskute January 6, 2010 at 5:38 AM  

New look in new year?! Good one. Happy new year.

ganesh January 6, 2010 at 7:40 AM  

i had never thought paradeso will give in ...but there you have it.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP