थॅंक यू फॉर स्मोकिंग
>> Thursday, July 31, 2008
काही दिवसांपूर्वी मी "लॉर्ड ऑफ वॉर' या चित्रपटाविषयी लिहिलं होतं. मुळात युद्धविरोधी असलेल्या या चित्रपटाचा नायक हा शस्त्रास्त्रांचा फिरता विक्रेता होता आणि युद्धापासून होणाऱ्या हानीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ एक व्यवसाय असल्याच्या त्रयस्थपणाने पाहण्याची त्याची दृष्टी ही युद्धविषयक जागतिक धोरणाकडेच उपहासाने पाहणारी होती. चित्रपटाचा सूर हा पूर्णपणे तिरकस आणि त्याच शैलीतल्या विनोदाकडे अनेकदा झुकणारा असला, तरी त्याचा आशय हा गंभीरच होता. "थॅंक यू फॉर स्मोकिंग' हा त्या चित्रपटाची प्रकर्षाने आठवण करून देणारा आहे. "थॅंक यू फॉर स्मोकिंग' आणि "लॉर्ड ऑफ वॉर'मध्ये काही उघड साम्यस्थळे आहेत. "स्मोकिंग...'चा नायक निक नेलर (आरोन एकहार्ट) हादेखील "लॉर्ड ऑफ वॉर'च्या नायकाप्रमाणे ऍन्टी हिरो आहे. तो शस्त्रास्त्र विकण्याइतका थेटपणे माणसं मारण्याला जबाबदार नाही; पण अप्रत्यक्षपणे तो हेच काम करतो. नेलर हा "ऍकॅडमी ऑफ टोबॅको स्टडीज' या सिगारेट लॉबीने चालवलेल्या आणि धूम्रपानाला रंगसफेदी चढविणाऱ्या संस्थेचा प्रवक्ता आहे. आपण मुळात एक आरोग्याला अपायकारक वस्तू विकतो, हे त्याला माहीत आहे. मात्र, त्याच्या दृष्टीने ही एक कला आहे. सर्वांना जे जमत नाही, ते त्याला जमतं याचा त्याला अभिमान आहे. या व्यसनाने लोक मरतात, हे त्याला माहीत आहेच (किंबहुना आपण या पेशात असल्याचं खरं कारण पॉप्युलेशन कंट्रोल असल्याचं तो एका प्रसंगी बोलूनदेखील दाखवतो) पण त्याच्या युक्तिवादाप्रमाणे हे धूम्रपान करणाऱ्या लोकांनाही माहीत आहे. त्यामुळे त्याची निवड ही त्यांनी जाणूनबुजून केलेली आहे, त्याला जबाबदार त्यांच्या स्वतःशिवाय इतर कोणी नाही. नायकाच्या अशा पॉलिटिकली इनकरेक्ट धोरणाबरोबरच असणारं दुसरं साम्यस्थळ आहे, ते उपहासात्मक तिरकस विनोदी मांडणीचं. पहिल्याच प्रसंगात नेलर एका टॉक शोमध्ये उपस्थित आहे. त्याच्याबरोबरचे इतर सर्व पाहुणे हे धूम्रपानाच्या पूर्ण विरोधात आहेत आणि प्रेक्षकही. एक वक्ता तर चक्क पंधरा वर्षांचा कॅन्सर झालेला मुलगा आहे. पण नेलर सहजपणे या प्रसंगाला वळवतो. "कॅन्सर झालेला रॉबिन जिवंत आणि त्याचं धूम्रपान करत राहणं, हेच स्मोकिंग लॉबीला हवंय, उलट ऍन्टी स्मोकिंगवाल्यांनाच आपली बाजू सिद्ध होण्यासाठी त्याचा मृत्यू गरजेचा आहे' असं वरवर योग्य वाटणारं चतुर उत्तर देऊन तो प्रसंगातून वाट काढतो. हा एक प्रसंग पूर्ण चित्रपटाचाच कल दाखवून देतो आणि पुढल्या घटना त्या पायावरच रचल्या जातात. नेलर हा आपल्या सदसद्विवेकबुद्धीपासून मुक्त असं सुखाचं आयुष्य जगतो. त्याचा घटस्फोट झालेला आहे; पण जोई (कॅमरोन ब्राईट) या आपल्या मुलावर तो आपलेच संस्कार होत असल्याचं पाहतो आणि हे संस्कार योग्य मार्ग न दाखवता सोपा मार्ग दाखवणारे असल्याने जोईला त्यांचं अनुकरण आकर्षक वाटणं, हे ओघानेच आलं. नेलर रोज दुपारी लंचला मॉड स्क्वाडला भेटतो. मॉड (Mod) म्हणजे मर्चंट् स ऑफ डेथ. नेलर जसा धूम्रपान उद्योगाचा प्रतिनिधी, तशी पॉली (मारिआ बेलो) मद्यनिर्मिती उद्योगाची आणि बॉबी (डेव्हिड कोचनर) शस्त्र उद्योगाचा. त्याच्याइतकेच (खरं तर त्याच्याहून कमी) लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणारे हे लोक त्याचे जवळचे मित्र. चित्रपट विशिष्ट कथानक मांडत नाही; पण नेलरच्या काही कामगिऱ्या आपल्याला दाखवतो. उदाहरणार्थ मार्लबोरो या सिगारेटच्या जाहिरातीत चमकलेल्या प्रसिद्ध पण आता कॅन्सरग्रस्त मॉडेलचं तोंड बंद ठेवण्यासाठी त्याच्यापर्यंत बॅगभर पैसे पोचवणे किंवा हॉलिवूड एजंटांना पैसे चारून सिगारेटला पुन्हा फॅशनमध्ये आणणे इत्यादी. एका बेसावध प्रसंगी मात्र त्याचा नको इतका आत्मविश्वासच त्याला अडचणीत आणतो आणि त्याच्या अत्यंत यशस्वी कारकिर्दीचा अपमृत्यू होतो की काय, अशी शक्यता निर्माण होते. दिग्दर्शक जेसन राईटमनचा (ज्याचा हा पहिलाच चित्रपट) हा चित्रपट काही बाबतीत मात्र "लॉर्ड ऑफ वॉर'हून खूपच वेगळा आहे. त्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो वरवर ज्या विषयावर आधारित आहे असं वाटतं, तो खरोखर त्याचा विषय नाही. धूम्रपानाची बाजू घेणारा आणि प्रत्यक्षात त्याच्या परिणामाची पर्वा न करणारा नायक असूनही हा चित्रपट मात्र धूम्रपानविरोधी आहे असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यातले इतर काही पैलू त्याचा रोख ठरवण्यात अधिक महत्त्वाचे आहेत. नेलर हा कोणत्याही व्यवसायात असला तरी त्याचं लॉबीइस्ट असणं किंवा जनमत तयार करणारा असणं, इथं महत्त्वाचं आहे आणि चित्रपटाचा खरा विरोध आहे तो यालाच. मन तयार करणं हा धंदा होणं, हेच या चित्रपटाला मान्य नाही आणि ते दाखवण्याचं काम तो करतो. हे अधिक स्पष्ट होतं ते त्यात युक्तिवादाला येणाऱ्या महत्त्वानं. नेलरच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं या युक्तिवादामध्ये जिंकणं, हे त्याची बाजू बरोबर असण्याशी संबंधित नाही. वेळप्रसंगी मुद्दा सोडूनही त्यानं समोरच्याला वादात गप्प बसवणं, हे तो स्वतः जिंकल्याचा आभास आणण्याकरता आणि त्याची बाजू बरोबर वाटण्याकरता पुरेसं आहे. हा चित्रपटाचा अप्रत्यक्ष संदेश धूम्रपानाशी संबंधित नाही; परंतु अधिक व्यापक आहे. प्रत्यक्ष धूम्रपानविरोधी चित्रपटानं दृश्य भागातही सिगारेट् सचा मुक्त वापर केला असता. इथं मात्र केवळ एक व्यक्तिरेखा सोडून कोणीही प्रत्यक्ष धूम्रपान करताना दिसत नाही. चित्रपटातली दुसरी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नेलरचा व्यवसाय चुकीचा असला, तरी तो सांगत असणारा एक कळीचा मुद्दा योग्य आहे, जो मानवी हक्काशी संबंधित आहे. तो म्हणतो सिगारेट्स आरोग्याला अपायकारक नाहीत असं मी म्हणत नाही; पण ते माहीत असूनही जर त्या कोणाला ओढायच्या असतील, तर ते स्वातंत्र्य त्याला हवं. समजूनउमजून स्वतःला इजा करण्याचा हक्कही माणसाला असणं, हे अत्यंत मूलभूत म्हणण्यासारखं स्वातंत्र्य आहे आणि नेलर त्याचा पुरस्कर्ता आहे. तो जेव्हा म्हणतो, की माझ्या मुलाची धूम्रपान करण्याची इच्छा असेल तर मी स्वतः त्याला सिगारेट् स आणून देईन. तेव्हा तो सिगारेट् सविषयी बोलत नसून या हक्काविषयी बोलतो. "थॅंक यू फॉर स्मोकिंग' हा विनोदी चित्रपट असल्याचा गैरसमज होणं सहज शक्य आहे, कारण प्रेक्षकांना हसवण्यासारख्या यात अनेक जागा आहेत. मात्र चित्रपटानं केवळ हसवणं, हे त्याला विनोदी चित्रपट करत नाही. त्यापलीकडे जाऊन त्याला काय सांगायचं आहे, हे पाहणं अधिक आवश्यक ठरतं. त्या पातळीवर हा गंभीर आशय सांगणारा चित्रपट आहे. त्याचं वरवरचं रूप पाहून निष्कर्षापर्यंत येणं, हे त्याच्यावर अन्याय करणारं ठरेल; आणि हा अपुरा रसास्वाद आपल्यालाही पूर्ण समाधान देणार नाही.
- गणेश मतकरी