चित्रपट एक; कथानकं अनेक

>> Thursday, July 10, 2008

तीन मित्र एका फिशिंग ट्रिपवर निघालेले. नदीच्या पात्राजवळच कॅम्प ठोकून मासेमारीला सुरवात करणार, इतक्यात त्यांच्यातल्या एकाला पाण्यात काहीतरी दिसतं. जवळ येताच कळतं, की हा एक मृतदेह आहे. तरुण मुलीचा. मृतदेह नग्नावस्थेत आहे. त्यामुळे प्रकरण नैसर्गिक नाही; बहुधा खूनच. त्यामुळे पोलिसांची भानगड तर आलीच. आता एवढ्या मुश्किलीनं सहलीसाठी वेळ काढलेला, तो तर अक्षरशः पाण्यातच गेला. मग एकाला कल्पना सुचते, की आपण समजू या की हे आपल्याला दिसलंच नाही. मुलीचा प्राण तर गेलेलाच आहे, तो काही परत येणार नाही. मग आपला वेळ तरी कशाला बरबाद करा! फार तर प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिथंच कशाला तरी बांधू आणि आपला दिवस कारणी लावू. कुठंतरी मनाला पटत नसूनही तिघे मित्र असंच काही करतात. मात्र ही अपराधीपणाची भावना जाणार कुठे? स्टुअर्ट (फ्रेड वॉर्ड) आपल्या पत्नीकडे हे बोलतो अन् तिच्या आपल्या पतीविषयीच्या कल्पनेलाच सुरुंग लागतो. त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होण्याची शक्यताच रसातळाला जाते. अमेरिकन लघुकथाकार रेमंड कार्व्हर याच्या नऊ लघुकथा आणि एका कवितेवर आधारित शॉर्ट कट्स (1993) चित्रपटातला हा एक धागा. प्रख्यात दिग्दर्शक रॉबर्ट ऑल्टमन
(नॅशव्हिल, द प्लेअर) याने कार्व्हरची दहा कथानके या चित्रपटाद्वारे बेमालूमपणे गुंफली. प्रत्यक्षात या कथा एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहेत. म्हणजे त्यातल्या व्यक्तिरेखा अन् घटनाक्रम हा परस्परांपासून पूर्णपणे वेगळा आहे. अमेरिकन मध्यम वर्गात सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या समाजाचा एक तुकडा या कार्व्हरच्या गोष्टींमधून पुढे येताना दिसतो. या तुकड्यामध्ये वास्तव्य करणारी कार्व्हरची पात्रं ही एक प्रकारचं असं संकुचित आयुष्य जगणारी आहेत. त्यांच्या अस्तित्वाला काही विशिष्ट अर्थ नाही. त्यांनी आपल्याभोवती उभारलेलं जग हे कचकड्याचं आहे, जे स्वतःबद्दलचा आणि आपल्या भोवतालचा अवकाश व्यापून राहणाऱ्या व्यक्तींबद्दलच्या काही ढोबळ समजुतींवर आधारलेलं आहे. कार्व्हरच्या गोष्टी घडतात तेव्हा या समजुतींना तडा गेलेला असतो. या पात्रांचं विश्व कोलमडून पडताना दिसतं अन् वरवर सुखवस्तू असणाऱ्या या समाजाचं खरं स्वरूप आपल्यापुढे उघडं पडतं. ऑल्टमनने या गोष्टींना एकत्र करताना त्यांच्या स्वरूपाचा हा विशेष पक्का ठेवलेला आहे अन् इतर बाबतीत मात्र बदलाचं पूर्ण स्वातंत्र्य घेतलेलं आहे आणि हे स्वातंत्र्य हाच शॉर्टकट्समधला कळीचा मुद्दा आहे. कसा ते पुढे पाहू. मला 1993 च्या शॉर्टकट्सची आठवण अचानक होण्याचं कारण संजय गुप्ताचा व्हाईट फेदरच्या दहा कथांवर आधारलेला "दस कहानियॉं' आहे हे उघड आहे. मात्र ज्यांनी तो पाहिला असेल त्यांच्या हे नक्कीच लक्षात येईल, की या गोष्टी सुट्या आहेत. त्यांच्यात काही साम्य नाही
. ना व्यक्तिरेखांचं ना आशयाचं, ना दिग्दर्शनशैलीचं. गुप्ता कंपूचं म्हणणं होतं, की हा आपल्याकडे नवा प्रयोग आहे अन् त्याला आपल्या प्रेक्षकांनी स्वीकारायला हवं. स्वीकारायला हवं हे म्हणणं मान्य. कोणताही प्रयोग हा पुरेशा गंभीरपणे केला असेल, तर तो स्वीकारला जायलाच हवा. त्यातल्या त्रुटी गृहीत धरूनही. दस कहानियॉं हे "ऍन्थॉलॉजी' या चित्रप्रकारात मोडणाऱ्या आपल्याकडच्या मोजक्या चित्रपटांतलं एक सुरवातीचं उदाहरण म्हणावं लागेल. रामू वर्मा कॅम्पच्या "डरना मना' आणि "...जरुरी है' नंतरचा प्रयोग. मात्र अधिक विचार आणि परिश्रमपूर्वक केलेला. एक वा अनेक दिग्दर्शकांनी केलेल्या वेगवेगळ्या कथांचा गुच्छ हे ऍन्थॉलॉजीचे थोडक्यात स्वरूप. मात्र मुळात या प्रकारामध्येच थोडी गोम आहे. गोम अशी, की गोष्टी स्वतंत्र असल्याने अन् प्रत्येक गोष्ट थोड्या वेळात संपून दुसरी सुरू होत असल्यानं, तिचा प्रभाव अन् पर्यायानं चित्रपटाचा प्रभाव मर्यादित. जितक्या गोष्टी अधिक, तितकी ही मर्यादा अधिक त्रासदायक. कितीही ताकदीचा दिग्दर्शक असला तरी दहा अन् पंधरा मिनिटांत तो पूर्ण लांबीच्या चित्रपटाचा परिणाम देऊ शकणार नाही, हे उघड आहे. त्यातून "
दस कहानियॉं' प्रकरण अधिकच अवघड करून सोडतो. सामान्यतः ऍन्थॉलॉजीतल्या कथा या काही एका समान सूत्राभोवती फिरणाऱ्या असतात. एका विषयाकडे पाहण्याचे भिन्न दृष्टिकोन, घटनेच्या भिन्न बाजू, विशिष्ट जागा किंवा वस्तूभोवती रचली गेलेली कथानकं अशा प्रकारचे हे चित्रपट असतात. गुप्ताचा चित्रपट हे पाळत नाही. जरी त्याचं थीम सॉंग हे आप्तांनी केलेल्या विश्वासघाताच्या सूत्राला संबोधत असलं, तरी प्रत्यक्षात इथं अनेक विषय हजेरी लावतात. योगायोगापासून ते हिंदू-मुस्लिम ऐक्यापर्यंत अन् विवाहबाह्य संबंधांपासून ते गॅंगवॉरपर्यंत काहीच इथं वर्ज्य नाही. भयपट, माफियापट, थ्रिलर, कौटुंबिक नाट्यं अशा एकत्र न होणाऱ्या चित्रप्रकारांनाही इथं ठासून एकत्र केलं जातं. त्यामुळे परिणामात एकसंधता येण्याची शक्यताच निसटते. तरीही दस कहानियॉं अन् शॉर्टकट् स हे दोन्ही चित्रपट दहा स्वतंत्र गोष्टींवर आधारित आहेत, हे साम्य उरतंच. मुळात दोन्हीचा जीवही ऍन्थॉलॉजीचाच आहे. शॉर्टकट्सच थोडा अधिकच, कारण तिथं येणाऱ्या गोष्टींमध्ये अस्वस्थ अपूर्ण मध्यम वर्गाचं चित्र उभं करणं, ही कल्पना केंद्रस्थानी आहे, जी सर्व कथांना एकत्र बांधू शकते. मात्र दिग्दर्शकीय संकल्पनेत शॉर्टकट्स उजवा ठरतो. कारण तो या कथांना एकत्र आणताना त्यांच्याकडे ऍन्थॉलॉजी म्हणून पाहत नाही, तर त्यांना एकत्र करण्याचा सर्वांत चांगला मार्ग कोणता
, हे स्वतंत्रपणे ठरवतो. इथं मासेमारीला गेलेल्या मित्राच्या कथेबरोबर इतर कथा वेगवेगळ्या घटना घेऊन येतात. एका कथेत साधं जेवणाचं निमंत्रण हे दोन जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाला पडत चाललेले तडे उघड्यावर आणतं, तर दुसऱ्या कथेत एका शाळकरी मुलाला झालेला अपघात संबंधिताच्या आयुष्यातला कडवटपणा अन् भावनिक ओलावा याला बरोबरीनं वाट करून देतो. एक कथा पत्नीनं घरबसल्या चालवलेल्या फोन सेक्सच्या व्यवसायानं हतबल झालेल्या नवऱ्याला महत्त्व देते, तर दुसरी केवळ वैयक्तिक फायद्यासाठी वर्दीचा वापर करणाऱ्या अन् बायकोला फसवत राहणाऱ्या पोलिसाला. या आणि अशा इतर कथा जोडताना ऑल्टमन त्याचं एकाच समाजाचा भाग असणं लक्षात घेतो अन् त्यांना अमुक व्यक्तिरेखा बनवण्यापेक्षा प्रातिनिधिक स्थान देतो. अनेकदा त्याच व्यक्तिरेखांना वेगवेगळ्या कथांमध्ये वापरतो, पात्र एकमेकांच्या नात्यातली असल्याचं दाखवून त्यांना जोडते, तर कधी एका कथेतल्या व्यक्तीची गाठ सहजपणे दुसऱ्या कथेतल्या व्यक्तीशी घालून देतो. एखाद्या बेकरीत, रस्त्यावर किंवा कॉफी शॉपमध्येसुद्धा! हे करताना तो कार्व्हरच्या कथा बदलण्याचं स्वातंत्र्य घेतो; मात्र आशयाशी प्रामाणिक राहतो. या दृष्टिकोनाचा फायदा असाही होतो, की सर्व गोष्टी अधिक काळ सुरू राहतात, आपल्याला पात्रांची ओळख अधिक चांगली होते आणि चित्रपटाचा एकूण परिणामही एपिसोडिक न राहता पूर्ण चित्रपटाइतका संपूर्ण होतो. कार्व्हरचं जग पूर्ण करताना ऑल्टमन आणखी एक चांगली गोष्ट करतो. त्याची पात्रं बोलताना आपल्या आयुष्यातल्या घटनांविषयी, गोष्टींविषयी बोलणारी
. या घटनाही ऑल्टमन कार्व्हरच्याच इतर गोष्टींमधून निवडतो. हे जग आपल्याला अधिकाधिक परिचयाचं होत जातं. याचा अर्थ असा निश्चित नाही, की मुळातच ऍन्थॉलॉजी हा चित्रप्रकार अर्थहीन आहे आणि कथा या शॉर्टकट् सच्याच (किंवा दुसरं उदाहरण म्हणजे "मॅग्नोलिया'च्या) मार्गानेच एकत्र केल्या जाव्यात. मात्र चित्रकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं, की आपल्या फॉर्मच्याच या निश्चित मर्यादा आहेत. दस कहानियॉंचंच उदाहरण घ्यायचं, तर लव्हडेल, हाय ऑन द हायवे आणि सेक्स ऑन द बीच या कथा इतर कथांच्या तुलनेत अगदीच सामान्य आहेत. अन् "राईसप्लेट' सारखी कथा चांगली असून आशयाने परकी आहे. मग गुप्ताने आपला विषय हा अधिक मेहनतीने ठरवायला हवा होता अन् आपल्याला काय सांगायचंय अन् कसं, हेदेखील. कथा कमी झाल्या असत्या तर अनायसे इतर कथांना अधिक वेळ मिळाला असता अन् चित्रपट अधिक परिणामकारक झाला असता, हेदेखील उघड आहे. शेवटी प्रेक्षकांच्या दृष्टीनंही महत्त्व आहे ते त्यालाच.

-गणेश मतकरी

3 comments:

Abhijit Bathe July 12, 2008 at 12:26 PM  

स्टीफन किंगचं असं म्हणणं कि story writing वगैरे ठीक, पण short stories लिहिणं सगळ्यात अवघड. त्याबाबतीत मराठीत ताबडतोब आणि एकमेव आठवतात ते अनिल बर्वे!
तर सांगायचा मुद्दा असा कि anthology वगैरे ठीक आहे, तसं काही हिंदीत बनवणं पण मी समजु शकतो, पण हिंदी काय किंवा कुठलीही भाषा काय, short story फसली तर त्याच्याएवढा मोठा पोपट नसतो. शिवाय सहाशे पानी कादंबरीची साठ पानं एका दमात वाचणं वेगळं आणि सहा पानी दहा short stories एकापाठोपाठ वाचणं वेगळं.
’दस कहानिया’ बघुन (director(s) बद्दल) आलेलं फीलिंग म्हणजे ’अबे हजाम - कायको राग दे रहा है?’. शिल्पा शेट्टीची गोष्ट, नासीर शबाना या लक्षात राहिलेल्या - नानाची गोष्ट फसली होती, गुलजारने लिहिलेली गोष्ट त्याच्या दुर्मिळ पकाऊ मध्ये जाईल - ते किंवा मेघना गुलजारने तिची वाट लावली....
Anyway the point is - Anthology प्रकार तसा पेलायला अवघड, तो नाही पेलला तर प्रेक्षकांना झेपायला अवघड. उगीच अवघड काही करणं म्हणजे स्तुत्य असंच असतं असं काही नाही.

असं DK पाहिल्यावर वाटलं. Magnolia वर बरीच चर्चा आधीच झालिए. इतर anthologies वर नंतर.

ganesh July 14, 2008 at 9:40 AM  

apparently abhijeet , we are on the same page here. i have also made it clear that DK is not really working but still i would appreciate the effort specially coming from someone like sanjay gupta. tell u why. i know for a fact(a friend of mine used to work with him)that the man believes that there is no such thing as original and one should only imitate. hence khauff(the Juror),kaante( Reservoir dogs) ,Zinda(Old Boy) etc.. if a person like him tries to take such a radically diffrent path ,it probably means there is still some hope for him. i preffer to give people enough rope ...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP