श्यामलनचं पुनरागमन

>> Wednesday, July 16, 2008

`मनोज श्यामलन ऊर्फ एम. नाईट श्यामलनच्या चित्रपटीय कारकिर्दीकडे त्याचे पहिले दोन चित्रपट (प्रेइंग विथ अँगर आणि वाईड अवेक) वजा करून पाहिलं, की तो नक्की काय करतोय हे स्पष्ट होतं. त्यानं एका मोठ्या जॉनरखाली किंवा चित्रप्रकाराखाली येणारे उपचित्रप्रकार अभ्यासले आहेत आणि या सर्वांना तो एकामागून एक टारगेट करतो आहे, स्वतःच्या खास शैलीत. हा मोठा चित्रप्रकार आहे, सुपरनॅचरल किंवा अतिमानवी विषयांवर आधारलेल्या चित्रपटांचा आणि त्यानं त्याखाली येणाऱ्या उपप्रकारांना एकामागून एक बनवण्याचा सपाटा लावला आहे. भूतपट (सिक्स्थ सेन्स), सुपरहिरोपट (अनब्रेकेबल), परग्रहवासीयांची गोष्ट (द साईन्स), मॉन्स्टर मूव्ही (द व्हिलेज) आणि परीकथा (लेडी इन द वॉटर) हे त्याने "वाईड अवेक'नंतर आणि आताच्या "द हॅपनिंग'च्या आधी केलेले चित्रपट पाहता, त्यानं निवडलेली ही दिशा स्पष्ट होते. या मालिकेतला व्यावसायिकदृष्ट्या सर्वांत यशस्वी होता उघडच "सिक्स्थ सेन्स'. किंबहुना त्यानं हा मार्ग निवडायलाही तेच कारण असावं. माझ्या वैयक्तिक आवडीचा अन् "सिक्स्थ सेन्स'हून किती तरी अधिक अर्थपूर्ण होता "साईन्स'.
सर्वच बाबतीत फसलेला असा एकच चित्रपट या बऱ्यापैकी मोठ्या यादीत आहे- तो म्हणजे "लेडी इन द वॉटर.' केवळ परीकथा हा उघडपणे मुलांच्या प्रांतातला विषय निवडणं अन् डोळ्यांसमोरचा प्रेक्षक केवळ मुलांचा नसणं, हे एकच कारण त्यामागे नाही. कारण परीकथेचाच आधार घेऊन प्रौढ प्रेक्षकांसाठी त्याच सुमारास बनवलेला "पॅन्स लॅबिरीन्थ' हा एक सर्वच बाबतीत यशस्वी चित्रपट आहे. श्यामलनच्या कामातला दृश्य भाग (जो अगदी लो बजेट दिसणारा आहे) असूनही प्रत्यक्षात त्याचे गुणविशेष (मोठ्या कॅनव्हसवर घडणाऱ्या घटनेला सूक्ष्मातून पाहण्याचा प्रयत्न करणं, विषयाला दोन वेगळ्या पातळ्यांवर मांडणं, वरवर साध्या गोष्टींमधून थरकाप उडवणारा परिणाम साधणं) हे इथं अनुपस्थित होते, ज्यामुळे त्याच्या प्रेक्षकाला फसवल्यासारखं वाटलं. "लेडी'मुळे त्याच्या प्रतिभेला एक मोठा धक्का बसला, ज्यातून सावरणं आणि आपला खास दृष्टीतल्या नव्या चित्रपटातून आपला प्रेक्षक परत मिळवणं, ही निकड होऊन बसली.
या निश्चित उद्दिष्टात "द हॅपनिंग' यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं ते त्यामुळेच. मला विचाराल तर या प्रश्नाचं उत्तर हे शंभर टक्के होकारार्थी व नकारार्थी देता येणार नाही. श्यामलनचे अनेक विशेष इथं आहेत आणि तो प्रेक्षकांची फसगत करत नाही; मात्र इथं अनेक त्रुटीदेखील आहेत. ज्यामुळे तो तुलनेनं कमी परिणामकारक ठरतो. इथं श्यामलननं निवडलेला उपप्रकार आहे तो झॉम्बी चित्रपट आणि "एन्ड ऑफ द वर्ल्ड' दाखवणारे चित्रपट यांच्या मिश्रणाचा.
"हॅपनिंग' सुरू होतो एका प्रसन्न सकाळी, न्यूयॉर्कमधल्या सेन्ट्रल पार्क भागात. जॉगिंग, कुत्रे फिरवणे, कामाला निघणारे लोक, बाकावर शांतपणे बसून पुस्तकं वाचणे... अशा कोणत्याही सकाळी शोभण्यासारख्या निरुपद्रवी उद्योगांत लोक गुंतले असताना. अचानक नीरव शांतता पसरते, लोक स्तब्ध होतात आणि जेव्हा हालचालीला परत सुरवात होते, तेव्हा ते पूर्वीचे उरलेले नसतात. स्वतःच्या वागण्याची शुद्ध नसणाऱ्या आणि आत्महत्यांना प्रवृत्त होणाऱ्या लोकांकडे पाहून प्रथम निष्कर्ष काढला जातो, की हा एखादा नर्व्ह गॅस पसरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम असावा. हे लोण पसरत जातं आणि संपूर्ण उत्तर-पूर्व अमेरिका या हल्ल्याच्या किंवा जे काय असतं त्याच्या छायेखाली येते.
इलिअट (मार्क वॉलबर्ग) हा विज्ञानाचा शिक्षक आणि त्याची पत्नी एल्मा (झुई डेशॅनेल) हे घटनेच्या पहिल्या पडसादांबरोबरच फिलाडेल्फिआमधलं राहतं घर सोडून निघतात आणि त्यांच्यासारख्याच इतरांबरोबर दूर पळण्याचा प्रयत्न करतात. पण होतंय ते नक्की कशामुळे आणि त्याची मर्यादा कुठपर्यंत, हेच स्पष्ट नसल्यानं पळणार तरी कुठे?
श्यामलननं निवडलेला दृष्टिकोन हा टिपिकल श्यामलन आहे, यात शंकाच नाही. या प्रकारे अमेरिकेतली बहुसंख्य जनता एका वेडाखाली येऊन स्वतःचा नाश ओढवते आहे आणि कायदा/ सरकार यावर उपाय काढायला असमर्थ आहेत. हे प्रत्यक्ष दाखवायचं तर प्रचंड बजेट हवं, कलाकारांची गर्दी हवी, स्पेशल इफेक्ट्स हवेत, बरंच काही हवं. मात्र, इथं श्यामलन इलिअट आणि एल्माला धरून राहतो. त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना अधिकाधिक निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जातो आणि हे सगळं असण्याची गरजच नाहीशी करतो. जगात काय घडत असेल हे व्यक्तिरेखांच्या संवादांवर, अध्येमध्ये दिसणाऱ्या अतिशय परिणामकारक; पण नो बजेट दृश्यरचनांवर (उदाहरणार्थ इमारतीच्या परातीवरून कन्स्ट्रक्शन वर्कर्सनी मारलेल्या उड्यांचा लो अँगल शॉट) आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर सोडतो. "साईन्स'मध्ये परग्रहवासीयांचा हल्ला शेतावर राहणाऱ्या एकाकी कुटुंबाच्या नजरेतून दाखवण्यासारखीच ही युक्ती आहे. आणखीही एका बाबतीत "साईन्स' आणि "हॅपनिंग' यांमध्ये साम्य आहे ते म्हणजे जाहिराती. "साईन्स'च्या जाहिरातींनी एलिअन फॅक्टर वाढवून त्या प्रकारचे चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकाला चित्रपटगृहांत वळवण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, जेव्हा प्रत्यक्षात त्यात परग्रहवासीयांची भूमिका तर जुजबी होतीच, वर चित्रपटाचा खरा आशयही परग्रहवासीयांशी दिलेली टक्कर हा नसून, नायकाच्या देवावरल्या श्रद्धेशी संबंधित होता. "हॅपनिंग'मध्येही प्रत्यक्ष घटना क्वचितच दिसत असली, तरी जाहिराती मात्र तिच्याभोवतीच फिरताना दिसतात. एव्हाना जो प्रेक्षक श्यामलनला ओळखत असेल, तो या जाहिरातींना फार महत्त्व देणार नाही. इतर काहींना मात्र दिशाभूल झाल्याबद्दल राग येण्याची शक्यता निश्चितच आहे.
हॅपनिंगमध्ये असलेला सर्वांत मोठा प्रॉब्लेम म्हणजे तो आशयाची मांडणी अनेक पातळ्यांवर करत नाही. जे प्रथमदर्शनी मांडलं जातं त्यापलीकडे जाण्याचा तो प्रयत्नच करत नाही. त्यामुळेच त्याचा एकसुरीपणा अधिक जाणवतो. दुसरी अडचण म्हणजे "हॅपनिंग'मधली घटना एकदा का दहशतवादाशी संबंधित नाही असं कळलं, की ती काय आहे यासंबंधीही एक स्पष्टीकरण दिलं जातं. हे स्पष्टीकरण फारच जुजबी आणि अस्पष्ट आहे. ते अस्पष्ट असण्यालाही निसर्गातल्या रहस्यांचा थांग मानवाला लागत नाही, असं स्पष्टीकरण दिलं जातं. पण एकूण हा प्रकार समजून घ्यावा लागतो हे खरं.
त्याशिवाय "सिक्स्थ सेन्स'नं श्यामलनकडून ठेवलेली ट् विस्ट एंडिंगची अपेक्षा तो पुरी करण्याचा प्रयत्न करतो, असं त्याच्या दर चित्रपटात दिसून येतं. इथंही तो हा प्रयत्न करतो. मात्र, तो अनावश्यक आहे. त्यातून हे ट् विस्ट एंडिंग नसून ओपन एंडिंग आहे. काहीसं अपेक्षित आणि नवी भर न टाकणारं. ते करण्यापेक्षा टीव्हीवरच्या कार्यक्रमात मिळणाऱ्या वॉर्निंगबरोबर चित्रपट संपूनही चालण्यासारखं होतं.
श्यामलनला "हिचकॉक' आणि "स्पिलबर्ग'चा वारस मानलं जातं. दोघांच्या अनुक्रमे "बर्डस' आणि "वॉर ऑफ द वर्ल्डस' या चित्रपटांशी "द हॅपनिंग' नातं सांगतो. नायक, नायिका आणि गावातल्या काही जणांच्या दृष्टीतून होणारं जागतिक आपत्तीचं मायक्रो लेव्हलवरचं दर्शन, आपत्तीचं नैसर्गिक असणं, खास करून निसर्गात एरवी निरुपद्रवी वाटणाऱ्या गोष्टीचाच आपल्याशी थेट संबंध असणं, या गोष्टी "बर्डस'मध्येही आहेत, तर नायकानं आप्तांबरोबर पळणं, लहान जागेत आसरा घेणं आणि आपत्ती दूर होण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसणं या गोष्टी "वॉर ऑफ द वर्ल्डस'मध्ये आहेत. या दोन्ही मास्टर्सनी आपापल्या तंत्रप्रावीण्याचा उत्तम उपयोग आपल्या चित्रपटांमध्ये केला आहे. वातावरणनिर्मिती आणि व्यक्तिरेखाटनापासून चित्रीकरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत मिनीमलिस्ट असणं या दोन्ही गोष्टींत श्यामलनदेखील कुठे कमी पडताना दिसत नाही. मात्र, इतर बाबतींतही त्यानं ही हुशारी दाखवायला हवी होती आणि मघा सांगितलेल्या चित्रपटीय घटकांमध्ये सुधारणा करायला हवी होती.
अर्थात, या चित्रपटानं फार नेत्रदीपक मजल मारली नसली तरी निदान त्याचा सुटण्याची भीती असलेला प्रेक्षक वर्ग परत मिळवून देऊन त्याला स्पर्धेत ठेवण्यात यश मिळवलं आहे. पुढल्या चित्रपटात तो अधिक लक्षणीय कामगिरी करेल, अशी आशा करू या.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP